शहरी वस्तीला
बाजूला ठेवोनी
निसर्ग बघावा
खेड्यात जावोनी
काळीशार शेते
पोपटी होऊनी
ओंजळीत सुख
देई आनंदुनी
गिरक्या घेवोनी
भिरभिरणारा
पाठ्शिवणीचा
खेळ खेळे वारा
हिरव्या डोहात
सरकत्या वाटा
जलतरंगाच्या
सरगमी लाटा
खुसखुसणारे
सळसळे रान
दाटसर पिक
अंगास लेवून
उभ्या जोंधळ्याला
मारोनोया मिठी
गुदगुल्या करी
द्वाड बरबटी
रानफूल रोपे
येई टरारून
तुर्रेदार टोप्या
डोई चढवून
सनोसळ्या राती
मन माळावरी
हलकी झुळूक
गाई दरबारी
अवखळ पाने
अंग घुसळून
वार्याच्या तालात
करीती नर्तन
अवघं लाघव
हिरवं तुडुंब
द्यावी वाटे तेथे
मनालाही डूब
भरल्या शेताचं
दर्शन घडता
सृष्टीपुढे झुके
आपसूक माथा
सुधाकर कदम
No comments:
Post a Comment