विराट घुमटे
गळकी मंदिरे
चोहिकडे झरे
स्वप्नांचेच...
रंगरसनेत
बुडाली वासना
नाचता येईना
अंगणाला...
आंधळे चैतन्य
प्राक्तनात शिरे
विझताना उरे
सावली ही...
अभंगती विजा
तिमिर फोडोनॊ
येई रक्ताळोनी
स्वप्नभूमि...
चिरनिद्रेपार
पांगळा प्रवास
अंधुक सुवास
मातीचाच...
ओल्या मातीतले
अनवाणी सुख
संचिताचे दुःख
उगाळते...
आषाढ कार्तिक
सारा आसमंत
अथांगपणात
भुरभुरे...
निर्वाणाचा रस्ता
संगमरवरी
भागाही गर्भारी
देहूसंगे...
श्रावण मुळाशी
अवतरे भास
वर क्षितिजास
छळणारे...
अंधाराच्या गावी
पाजळले दिवे
मोठ्या भक्तिभावे
तुकोबाने...
सुधाकर कदम
शुक्रवार
दि.१९.जुलै २०१३
आषाढी एकादशी
No comments:
Post a Comment