(महा)राष्ट्रधर्म
माझे तुझेपण
अवतरले की
सारी आपुलकी
दूर जायी...
माथी भडकती
भावना चळती
संहाराची नीति
स्विकारता...
कसोटीच्या क्षणी
आक्रीत घडते
थरकापविते
सामान्याना...
जातीची खिंडारे
भरता भरे ना
तरीही राज्यांना
भोके पाडी...
होते सामाजिक
विभाजन जेव्हा
एकोप्याला तेव्हा
तडा जाते...
दूर आसामात
हिंसाचार होता
येथे का ’स्त्रैणता’
सुरू होई...?
समाज कंटक
अफवास्त्र सोडी
होई तोड-फोडी
चहुकडे...
गट-तटवार
जात-धर्म-राज्य
यालाच सुराज्य
म्हणावे का...?
कितीदा चुकीची
होते हाताळणी
तरिही ’गुळणी’
तोंडात का...?
पोळी भाजण्यात
राजकीय पक्ष
नेहमीच दक्ष
असतात...
आपापला स्वार्थ
साधण्यासि वेगे
पेटविती दंगे
जागोजागी...
फुटीरतावाद
राज्या-राज्यातला
विवादाला साद
घालितसे...
सर्व जनतेने
ठेवोनि एकोपा
भावबंध जपा
सांगणे हे...!
जय हिंद ! जय महाराष्ट्र
सुधाकर कदम
No comments:
Post a Comment