गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Tuesday, August 19, 2025

गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र...डॉ.श्रीकृष्ण राऊत



मित्रहो,

गझलेच्या आकृतिबंधाची सांगोपांग चर्चा करणारे पुस्तक सुरेश भटांना लिहायचे होते.या संदर्भात आमची अनेकदा चर्चा झाली होती.'#गझलनामा ' असे त्या पुस्तकाचे शीर्षकही त्यांनी निश्चित केले होते. पण पुस्तक लिहिण्याएवढी सवड आयुष्याने त्यांना दिली नाही. तो ड्रिमप्रोजेक्ट पूर्ण करण्याचे काम नियतीने मित्रवर्य श्रीकृष्ण राऊत याचेकडून करवून घेतले. पुसदच्या संमेलनात दि.१७ ऑगस्ट २५ ला नुकताच प्रकाशित झालेला 'गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र ' हाच श्रीकृष्ण राऊत याचा तो ग्रंथ होय.

      श्रीकृष्णाचा गझललेखनाचा अनुभव प्रदीर्घ आहे. तेवढाच त्यांचा छंदःशास्त्राचा व्यासंगही दांडगा आहे.या ग्रंथात त्यांने संस्कृत छंद:शास्त्र आणि फारसी छंदःशास्त्राची केलेली तौलनिक चिकित्सा हे त्यांचे मौलिक योगदान आहे.गझललेखनातील अनेक बारकावे जसे की, वृत्त निवडताना घ्यावयाची दक्षता, वृत्तामधील यतिस्थान, वृत्तातील लवचिकता, वृत्तात उपयोजिलेल्या शब्दांच्या उच्चाराची ओढाताण ह्याबद्दल त्यांनी सोदाहरण केलेल्या सूचना अत्यंत उपयुक्त आहेत. काफियांचे प्रकार, काफियांची पुनरावृत्ती,काफियांचे दोष या विषयी त्यांनी केलेले वस्तुनिष्ठ विश्लेषण मराठी गझलेला समृद्ध करणारे आहे. सुबोध भाषा हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. गझल ह्या सशक्त काव्यप्रकाराबाबत नवोदित आणि ज्येष्ठांच्या मनात अनेक शंका येतात, उदा. मात्रावृत्ते, स्वरकाफिया, दीवान इ. अशा शंकांचे निरसन करणारा हा ग्रंथ, गझलप्रेमी, गझलकार, गझल अभ्यासक या सर्वांसाठीच अत्यंत मौलिक ठरणार आहे. तसेच ज्यांना गझल लिहिण्याचं वेड असते आणि ज्यांचे खयालही दर्जेदार असतात परंतु कुठेतरी ज्यांच्यापुढे गझल-व्याकरणाच्या मापदंडावर गझल खरी उतरली आहे की नाही असा संभ्रम जेव्हा उपस्थित होतो,त्या सर्व गझल लिहिणाऱ्यांसाठी सुस्पष्ट दिशा दाखविणारा आहे.

     मराठीमध्ये छंद:शास्त्राच्या उपयोजनाच्या अंगाने सांगोपांग व सुस्पष्ट असे लेखन आजवर क्वचितच झाले आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात (सन १९२७) डॉ. माधवराव पटवर्धन (कविवर्य माधव जुलियन) यांनी प्रथमच “#छंदोरचना” हा ग्रंथ लिहून मराठीला छंद:शास्त्राची भक्कम परंपरा दिली.त्यामुळे गझल या प्रकाराचा परिचय मराठीत करून देण्याचे श्रेय डॉ. माधवराव पटवर्धन यांना जाते. नंतर कविवर्य सुरेश भट यांनी या प्रकाराला नवे व्याकरण, नवी अभिव्यक्ती आणि लोकमान्यता दिली. मात्र, त्यांनी अपेक्षित स्वरूपातील उपयोजित छंदशास्त्र प्रत्यक्षात उभे करू शकले नाहीत.त्याची कमी श्रीकृष्णाच्या या  ग्रंथाचे भरून काढली आहे.

     या ग्रंथात कुठेही अवघड किंवा किचकट शास्त्रीय मांडणी नाही. सोप्या, सरळ आणि सुस्पष्ट भाषेत गझलेच्या अंतरंगाबरोबरच बहिरंगाचे विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे या ग्रंथाचे मूल्य अधिकच वाढते. पूर्वसूरींचा मान ठेवूनही श्रीकृष्ण राऊत याचा हा ग्रंथ समकालीन गझलकारांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे.


-गझलगंधर्व सुधाकर कदम

सी१सी/१३,गिरीधर नगर

मुंबई बंगलोर महामार्ग

वारजे माळवाडी

पुणे ४११ ०५८

मोबाईल ८८८८८५८८५०

--------------------------------------------------------------------------

□ गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र 

( मराठी गझलेचे व्याकरण )

□ लेखक : श्रीकृष्ण राऊत

□ स्वयं प्रकाशन, सासवड, पुणे 9890811567

□ मुखपृष्ठ : सतीश पिंपळे, अकोला 9850199323

□ प्रस्तावना : डॉ.अविनाश  सांगोलेकर

□ पाठराखण - सुरेशकुमार वैराळकर,

□ पृष्ठे : २७६

□ किंमत : ४००/-

□ पोस्टेज : ६५/-

□ गुगल पे / फोन पे :9284253805

□ व्हॉटसअप नं. 8668685288

No comments:





संगीत आणि साहित्य :