- . एकमेकांशी प्रेमाने वागण्याचा, अडीअडचणीत कामी येण्याचा, वेळप्रसंगी एकमेकांना सांभाळून घेण्याचा व संकटकाळी धावून जाण्याचा अलिखित करार म्हणजे 'मैत्री'!
संघटन करून राहण्याची वृत्ती जेव्हापासून माणसाने जोपासली तेव्हापासून, नात्यांसोबत मैत्री हा प्रकारही अस्तित्वात आला असावा.समविचारी, समआचारी व्यक्तीशीच मैत्री जुळते. कुठे ना कुठे तरी एखादा सूर जुळल्याशिवाय मैत्री होऊच शकत नाही. भिन्न भिन्न विचाराच्या व्यक्तींमधेही एखादा समान धागा मैत्री निर्माण करताना दिसतो.
मैत्रीचे व मित्रांचे अनेक प्रकार, अनेक पद्धती आपणास दिसून येतात. त्यातील राजकीय मैत्री हा फार गहन विषय आहे.हिंदी-चिनी भाई भाई म्हणत १९६२ मध्ये युद्ध पुकारून उत्तर पूर्व भागाचा लचका तोडणाऱ्या चीनची मैत्री साऱ्या जगाला माहीत आहे. (सध्याही युद्ध न करता पुन्हा तोच प्रकार सुरू आहे.) पंडित नेहरू व लॉर्ड माउंटबॅटन यांच्या मैत्रीची चर्चा आजही चवीने केली जाते. हिटलर मुसोलिनी मैत्री सुद्धा प्रसिद्ध आहे. महायुद्धाच्या काळात 'मित्रराष्ट्र' हा शब्द तर परवलीच्या शब्दाइतका महत्वाचा ठरला होता.
कृष्ण सुदाम्याची मैत्री सर्वश्रुतच आहे. या मैत्रीला कोणते नाव द्यावे कळत नाही.धन्य तो कृष्ण व धन्य तो सुदामा! आज तर मोठ्या पदावर गेल्यावर आपल्या आईवडिलांना त्यांच्या गावरान पेहेरावामुळे ओळख न दाखवणारे महाभाग आपण बघतो.ते अशा सुदाम्याला काय ओळख दाखविणार?
कृष्णाच्या मित्रप्रेमात गरिबी श्रीमंती आड आली नाही. तशीच कर्ण व दुर्योधनाच्या मैत्रीतही कोणत्याच बाबी आड आल्या नाहीत.पांडव आपले सख्खे भाऊ आहेत हे समजल्यावर जर कर्णाने जर दुर्योधनाचा पक्ष सोडला असता तर युद्धिष्ठिराऐवजी तोच हस्तिनापूरच्या गादीवर बसला असता. पण मृत्यू समोर दिसत असूनही त्याने मित्राशी इमान राखून मृत्यूला कवटाळले व मैत्रीची शान वाढविली.
मित्र कसा असावा याबद्दल प्रत्येकाचे मत सारखेच असते.पण हे मत मित्राने आपल्याशी कसे वागावे याबद्दलचे असून,स्वतःवर पाळी आल्यावर मात्र यात बदलही होऊ शकतो. मैत्रीची जाण ठेवून मित्राचे उपकार स्मरून वागणाऱ्यांची अपवाद सोडून वानवाच आहे.मतलबापुरते मैत्रीचे ढोंग करणारेच बहुतकरून दिसून येतात.तुम्हाला वापरून फेकणारी मित्राची ही जात अतिशय घातक असून केसाने गळा कापण्यात वस्ताद असते.त्यामुळे मित्रासाठी जीव देणारे वा जीव लावणारे आता इतिहासजमा झाल्यातच जमा आहे. असे जरी असले तरी पण प्रत्येकाला एका सच्च्या मित्राची सतत आवश्यकता भासत असते, हे ही तितकेच खरे!
माणसाच्या आयुष्यात मित्राईतकेच महत्व मैत्रिणीलाही आहे. (हे बायकोला कसे समजावून सांगावे हा प्रश्नच आहे.) पण विवाहित पुरुषाला जर एखादी मैत्रीण असली तर बायको खपवून घेत नाही. (अर्थात, बायकोला जर मित्र असला तर नवराही खपवून घेत नाही.ही गोष्ट वेगळी.) मोठमोठे पुढारी,राजकारणी,
नेते,साहित्यिक ,गायक,संगीतकार,संशोधक यांना
त्यांच्या क्षेत्रात प्रोत्साहन देणाऱ्या मैत्रिणी (यांना ते 'प्रतिभा' असे म्हणतात.) त्यांच्या आयुष्याचे अविभाज्य अंग बनलेल्या दिसतात. (हे विधान सगळ्यांनाच लागू होते असे नाही.) ह्या 'प्रतिभां'च्या निकट सानिध्यामुळे बरीच मंडळी आपले ध्येय साध्य करतांना दिसून येते. (कुणाकुणाची पत्नी पण त्याची 'प्रतिभा' असू शकते.)
विवाहित पुरुषांच्या मैत्रिणीमुळे त्यांच्या घरात कलह निर्माण झाल्याच्याही अनेक घटना आहेत. ते काहीही असले तरी मैत्रीण असणे ही आयुष्यातील एक सुखद अनुभूती आहे असे अनेकजण मान्य करतांना दिसतात.कोणाच्या नशिबात असते,कोणाच्या नाही! त्यामुळे उगाच जळफळाट करून घेण्यात काहीच अर्थ नाही.
राजकीय मैत्रीबद्दल तर न लिहिलेलेच बरे. कोणता पक्ष कोणाच्या गळ्यात केव्हा गळा घालून 'चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा' हे गाणे आळवील हे सांगता येत नाही. या चुम्माचाटीमुळे पक्षांची शकलं झालेली आपण सर्वजण बघत आहोतच.राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो व कोणी कोणाचा मित्र नसतो. वेळ पाहून रंग बदलणारी ही जमात आहे. त्यामुळे यांच्यावर जास्ती लिहीण्यात काही मजा नाही.
-सुधाकर कदम
No comments:
Post a Comment