- आद्य मराठी गझलगायकाचा वाचनीय कवितासंग्रह
कविवर्य सुरेश भट ह्यांनी अनेकांना लिहिते केले , तर अनेकांना गातेही केले. आद्य मराठी गझलगायक , गझलगंधर्व सुधाकर कदम हे मात्र अधिक भाग्यवान आहेत.कारण त्यांना मराठी गझलविश्वात सुरेश भटांनी गाते तर केलेच , शिवाय लिहितेही केले.कदम हे उत्तम गझलगायक आणि तितकेच उत्तम संगीतकार आहेत , हे सर्वश्रुतच आहे.मात्र कदमांच्या प्रसिद्धीपराड्गमुख वृत्तीमुळे ते कवी आहेत , हेच त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित होऊनही काव्यप्रेमींना फारसे माहीत होऊ शकलेले नाही.
' काळोखाच्या तपोवनातून ' हा कदमांचा दुसरा कवितासंग्रह असून तो सासवडच्या स्वयं प्रकाशनाने पुण्यात २१ डिसें. २०२१ रोजी समारंभपूर्वक प्रकाशित केला आहे. हा संग्रह वाचल्यानंतर हे स्पष्ट होते की ,सुधाकर कदमांचे गझलगायन जसे श्रवणीय आहे,तसेच त्यांचा हा कवितासंग्रहही वाचनीय आहे.त्यात ८३ कवितांचा अंतर्भाव असून ह्या कविता गझल , हझल , गीत,अभंग , विडंबनकविता , तसेच अन्यही कविताप्रकारांमधील आहेत.ह्या संग्रहाचे मर्म उलगडून दाखवणारी अभ्यासपूर्ण अशी सहा पृष्ठांची प्रस्तावना डॉ.राम पंडित ह्यांची लाभलेली आहे.
कदमांच्या तत्त्वचिंतक आणि त्याच वेळी कलंदर असलेल्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचे हृद्य दर्शन त्यांच्या बहुतांश कवितांमधून घडते. वानगीदाखल ' सध्यात्म ' ही कविता पहावी.अध्यात्माचे सध्याचे रूप हे सश्रद्ध माणसालाही कसे अश्रद्ध करते , हे ह्या कवितेतून कदम फार भेदकपणे चित्रित करतात. दुसरे असे की , ते वयोवृद्ध जरी असले , तरी त्यांच्या काही प्रेमकविता पाहिल्यानंतर मात्र ते ' अभी तो मैं जवान हुं ' असेच म्हणत आहेत , असे वाटत राहते. ह्या आणि अशा इतरही कारणांमुळे कदमांचा हा संग्रह वाचनीय तर झालेला आहेच.शिवाय तो संग्रहणीयही झालेला आहे.म्हणून तो काव्यप्रेमींनी आवर्जून विकत घेऊन वाचायला हवा , संग्रही ठेवायला हवा, असे सुचवावेसे वाटते.
प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर ,
डी - २०२ , विंडसर रेसिडेन्सी, बालेवाडी फाटा,
बाणेर , पुणे - ४११०४५
( भ्रमणध्वनी : ९८५०६१३६०२ )
No comments:
Post a Comment