गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, April 7, 2021

स्वरलयीचा गुलमोहर - राम जोशी


                सुधाकर कदम म्हणजे संगीतानंदात रममाण झालेलं व्यक्तिमत्व. त्यांनी संगीताच्या प्रांगणात (गांधर्व संगीत विद्यालय,आर्णी) सुरू केलेल्या कार्याला पंचवीस वर्षे एवढा दीर्घ कालावधी लोटला, म्हणजेच हे रौप्य महोत्सवी वर्ष. त्या निमित्त त्यांचा गौरव व विविध कार्यक्रम केले जात आहेत ही गोष्ट आनंददायी आहे़.
                  संगीताच्या माध्यमातून केलेल्या सेवेचा हा गौरव करणं हे समजपुरुषांच कर्तव्य आहे़. त्या निमित्त त्या व्यक्तिच्या कार्यकर्तृत्वाचे सिंहावलोकन होत असते, त्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळते, मार्गदर्शन होत असते़,
                 मी कोल्हापुर सारख्या, विदर्भापासून खूप दूर असलेल्या गावी राहणारा. पण त्यांची भेट-सहवास काही काळापुरताच लाभला़. पण तेवढ्या थोडक्या सहवासांनी आम्ही मनोमनी एकत्र आलो व दोघांत निखळ मैत्री निर्माण झाली़. त्याचं असं झालं, सुमारे १२/१४ वर्षापूर्वी कवीश्रेष्ठ सुरेश भटांच्या कविता-गझल सादर करण्यासाठी कदमांनी महाराष्ट्र पादाक्रांत केला. त्यावेळी त्यांचा कार्यक्रम कोल्हापुरला रसिकांच्या उपस्थितीत झाला. मला निमंत्रण होते़. कार्यक्रम चांगला झाला, मी चांगलाच प्रभावित झालो़.
                सुरेश भटांच्या गझलांची नवलाई, अनुरूप स्वर रचना व खास पध्दतीची पेशकश. तशात तबल्याच्या साथीला शेखर सरोदे तर सारंगीवर लतीफ अहमद खांसाहेब़. असा अनोखा सांगितिक योग जुळून आला़. पुढे पुढे जाऊन ओळख करुन घेणे हा माझा स्वभाव नसल्यामुळं भेट घेतली नाही. पण हा कलाकार आणि त्यांनी गायिलेल्या गझला मात्र मनात कायमच्या घर करुन राहिल्या़. ‘या नवा सूर्य आणू चला यार हो / सूर्य केव्हाच अंधारला यार हो’ हे हृदयाला भिडणारं भटाचं विद्रोह काव्य. ‘चेहरा गुलाबान झाकणे बरे नाही’ ही हळुवार - मलमली गझल. यांच्या प्रेमातच पडलो़. ह्या कलाकाराची भेट व्हावी असं मनोमनी वाटायचं आणि तसा योग जुळून आला. सुमारे एक तपानंतर; शिवाजी विद्यापीठ-संगीत विभागात मी मानद अध्यापक म्हणून काम करीत होतो़. गेल्यावर्षी सुगम संगीतासाठी कदमांची चार दिवसांची कार्यशाळा ठेवली होती. त्या चार दिवसांच्या छोट्या कालावधीत आम्ही एकत्र आलो, खूप गप्पा गाणी बजावणी झाली व बर्‍याच दिवसांची मनातली इच्छा पूर्ण झाली़. स्नेहाचे भावबंध निर्माण झाले़. कदमांनी घरगुती कार्यक्रमात अनेक भावगीते, गझला मनसोक्त ऐकविल्या. त्यांच्या स्वररचना व त्यांचे सादरीकरण यांचा प्रभाव होताच तो अधिकच वाढला़ .त्यांच्या स्वररचना वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक असल्यानं त्याबाबत लिहावं अस सारखं मनात यायचं. तो योग रौप्य महोत्सवानिमित्त आला हा माझ्या दृष्टीने सुयोग आहे, भाग्ययोग आहे़.
                 सुधाकर कदम हे व्यक्तिमत्व बहुरंगी आहे़ ते शास्त्रीय संगीत गायक आहेत. संगीत शिक्षक आहेत. समाजकर्ते आहेत. लेखणी बहाद्दरही आहेत. पण त्यांचा माझा जो संबंध आला तो सुगम संगीत स्वररचनाकार व गायक म्हणूऩ. त्यामुळे तद्विषयक त्यांच्या रसिल्या सांगितीक व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा हा प्रांजळ प्रयत्ऩ.
 सुगम संगीत हा संगीताचा एक अनुपम व मनोहारी असा प्रकाऱ. नाव जरी सुगम असलं तरी जाता जाता सहजी आत्मसात करावं इतकं ते खचितच सुगम नसतं. उलट दुर्गमच असतं. शब्दप्रधान गायकीच्या ह्या प्रकाराला शब्द हे प्राणतत्व तर स्वर हे माध्यम़. त्याला घाट येतो तो ताल-लयीमुळं. इथं शब्दांसाठी स्वर पायघड्या घालतात. साहजिकच पहिला मान काव्याचा. (पर्यायानं कवीचाही.) त्यातल्या आशय, भाव-भावना श्रोत्यांपर्यंत पोहचविणं हे कार्य संगीताचं असतं. गीताच्या आशयाचीअभिव्यक्ती संगीतातून होणं अपेक्षित असतं. किंबहुना काव्य बोलतं करणं हे संगीतकाराचं काम. यासाठी सुगम संगीतात काव्याचा आशय-विषय व भावना याची उत्तम जाण स्वररचनाकाराला असणं जसं आवश्यक,तितकंच महत्व काव्यानुकूल संगीत रचनेला; म्हणजेच चाल लावण्याला असतं. सुधाकर कदम हा काव्याची उत्तम जाण असणारा संगीतकार असल्यानं ते कवितेला अत्यंत पोषक व समर्पक असा स्वरसाज चढवून प्रत्येक कविता आपल्या संगीत रचनेनं श्रीमंत करतात. ते स्वतः कवी असल्यामुळे ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ ह्या उक्तीला साजेसं स्वरचातुर्य त्यांच्याकडे आहे़.
               शास्त्रीय संगीताचे व्यासंगी साधक असल्यामुळे कदमांच्या स्वररचनेचा पाया हा राग/रागिणीवर आधारीत असणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्यांच्या स्वररचना भारदस्त व दर्जेदार वाटतात, त्या चीप पॉप्युलॅरीटीच्या कॅटॅगिरीतल्या नव्हेत़.
 स्वररचनेसाठी त्यांनी अनेक राग/रागिण्यांची मुक्त हस्त चंदनी बरसात केली आहे़. शेकडो कवितांना स्वरांच्या चांदण्यांत न्हाऊ घातलं आहे़. तथापि जागेच्या मर्यादेचं भान ठेवण्यासाठी काही निवडक गाणी व स्वररचनांचा आस्वाद घेणं रास्त ठरेल़.
              यमन हा रागच असा की कोणाही संगीतकारानं त्याच्या प्रेमात पडावं. कदम तरी त्याला कसे अपवाद असणार? त्यांनी यमन रागात उदंड रचना केल्या असल्या तरी त्या छापातले गणपती नाहीत, ती प्रत्येक मुर्ती स्वतंत्र आहे़. प्रत्येक चालीला स्वतःचा वेगळा चेहरा आहे, रंग आहे, रुप आहे, व्यक्तिमत्व आहे़.
 कार्यक्रमाची सुरुवात ते स्वरचित काव्याने करतात़.

‘सरगम तुझ्याचसाठी गीते तुझ्याचसाठी
गातो गझल मराठी प्रिये तुझ्याच साठी’

दादर्‍यातल्या ह्या बंदिशीची यमन मधील ही रचना. अगदी साधी. सुगमसंगीतामध्ये अर्थातच शास्त्रीय संगीतातील व्याकरणाला; नियमांना स्थान नाही, इथं अपेक्षित असतं ते श्रवण सौंदर्य, गोडवा, मोहकता. साहजिकच इथं शुध्द यमन शोधण्याची धडपड करू नये कारण तो यमन कल्याणाशी क्षणांत दोस्ती करतो़ आणि दोन्ही माध्यमांच्या अशा हळुवार लगावांची प्रचिती आली की उत्स्फूर्तपणे दाद देण्याशिवाय श्रोत्याला इलाजच रहात नाही़ ही अनुभूती मी त्यांच्या प्रत्येक यमनांत घेतली व घेतो़.
 
 ‘मी असा ह्या बासरीचा सूर होतो,
 नेहमी ओठांपुनी मी दूर होतो’

ह्या गझलची चालही अशीच आहे़. धृवपदातली -मतल्यातली दुसरी ओळ (ज्याला क्रॉस लाईन म्हणतात) त्याची ठेवण व स्वरसमुहाची रचना अत्यंत मोहक आहे़. त्यातील ‘सूर होतो़’ इथं तार सप्तकातला षडज्‌ सूर ह्या शब्दासाठी खुबीनं वापरला तर आहेच पण ती ओळ म्हणताना ‘सूर’ हा शब्द आणि त्याचा तारषड्जाचा हळूवार पण भरीव लगाव व रुपक तालांचा एक पूर्ण जादा आवर्तन पूर्ण होईपर्यंत जो दीर्घकाळ मुक्काम ठेवतो तो अतीसुंदर लागतो़.
              संगीत रचनाकाराकडं नुसता सांगीतिक अलंकाराचा साठा असून चालत नाही तर स्वरपोषाखाला साजेल असाच एखादाच चढविलेला अलंकार संगीत श्रवणसौंदर्य खुलवितो़.
 संगीतकार हाच खर्‍या अर्थानं स्वतःच्या रचना समर्थ पणे व अपेक्षित परिणामासह गाऊ शकतो. हा अनुभव मास्तर कृष्णरावांपासून सुधीर, श्रीधर फडके, वसंत पवार, राम कदम, यशवंत देव यांच्या पर्यंत येतो. सुधाकर कदम हे स्वतः गायकही असल्याने तेही ह्या बाबीला अपवाद नाहीत़. ‘सूऱ होतो’ इथं शब्दकला आणि स्वर माधुर्य असा सुरेख समन्वय झालाय़.
 ‘सांज घनाच्या मिटल्या ओळी’ हे एक अतिशय हळूवार भावना उलगडून दाखविणारं सरस काव्य़. कदम यांनी बंदीशही यमनमध्येच बांधलीय़. त्यातल्या क्रॉसलाईन अखेरीस़ ‘क्षितीजावरती़’ इथं त्यांनी नि व कोमल रिषभाचा अत्यंत कौशल्यपूर्ण वापर करून यमनचा करॅक्टरच बदललाय असे नव्हे तर त्या रिषभाच्या योजनेमुळे ‘क्षितीज’ ह्या शब्दाचा अर्थ प्रतीत करण्यासाठी कोमल रिषभाला पर्यायच नाही हे त्वरीत पटते, पुरियाचं होणारं दर्शन तसेच कडव्याची चाल हे सगळं सुरेख जुळून आलंय़.
               प्रसिध्द कवी अनिल कांबळे यांच्या ‘जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू / ऐनवेळी अशी काय करतेस’ तू ह्या गीताची तर्जही यमन मध्येच बांधली आहे़. यमन मधली अत्यंत चटपटीत अशी ही स्वररचना, खेमट्याच्या अंगानं लागणारा दादर्‍याचा ठेका, लय थोडीशी उडती चपळ, त्यामुळे विशिष्ट अर्थवाही अशा ह्या गीताला उत्तम न्याय मिळाला आहे़. सौंदर्य स्थळाचा निर्देश करायचा झाल्यास ‘ऐनवेळी अशी काय’ ह्या ओळीतली अधीरता दर्शविण्यासाठी अत्यंत चपखल अशी स्वरसमुहरचना म्हणावयास हरकत नाही. ‘सामग, सामगधप’ वगैरे अर्थात हा आनंद अनुभवायचा आहे़.
 ‘तुझ्या नभाला गडे किनारे’ ही सुध्दा यमनमधलीच श्रवणीय रचना आहे. यमन ह्या एकाच रागातल्या चारी रचना त्यांनी मला एकापाठोपाठ ऐकविल्या. पण खासियत अशी की त्यांत तोचतोचपणा नाही़. स्वररचनेची पठडी ठरीव स्वरुपाची नाही. त्यात आहे पूर्णतः वेगळेपण, हे श्रेष्ठ संगीत रचनाकाराचं वैशिष्ट मानलं जातं.
              सुगम संगीतात आकर्षक
मुखड्याला-धृवपदाला खास महत्व आहे़.कदम यांच्या स्वररचनेचे मुखडे अत्यंत आकर्षक असतात़. त्याहीपेक्षा अधिक कौशल्य व महत्व असतं ते मुखड्यानंतरच्या क्रॉसला. कारण संगीत रचनेच्या आकर्षकतेचे ते प्रमुख स्थान आहे़. मुखड्याच्या चालीला अनुरूप अशी किंबहुना त्याचं सौंदर्य वर्धिष्णू करणारी आरोही पूर्ण करुन अवरोही व षड्जावर विराम पावणारी स्वररचना, हे काम फार अवघड असते़. तसे नसेल तर पूर्ण चालच फसते़ अनेक संगीत रचनामध्ये हे दोष दिसतात़. संगीतकाराला इथं आपली प्रज्ञा ओतावी लागते़. सुधाकर कदमांच्या रचना ह्या कसोटीला पुरेपूर उतरणार्‍या आहेत म्हणूनच त्या भावतात़.
              कडव्यांच्या चालीतही मूळ चालीशी सुसंगती दिसते़. कळत नकळत अन्य रागाला स्पर्शून जाणं म्हणजे हळूच मधाचं बोट चाखण्यासारखं गोड मधुर असतं.अर्थातच शेवटच कडवं हे सर्वार्थानं हायलाईट असतं. तशीच त्याची स्वररचनाही कदम समर्थपणे करतात़.
              एकाच यमनाची ही विविध रुपे, विविध रंग, त्याचा वेगवेगळा ढंग. आणि त्याची अनोखी अदाकारी हे मोहजाल किंवा मायाजाल म्हणा, असं आमच्या भोवती टाकलं की आम्ही स्वतः जाणकार रसिक असूनही फसलो़. मग लक्षात आलं की ही यमनी फसवणूक होती पण ही फसवणूक गोड होती़. निर्भेळ होती. निर्मळ आनंद देणारी हमी़. तसं पाहू गेल्यास प्रत्येक संगीतकार अशी गोड फसवणूक करीत असतो़. कारण त्याचा स्वतःचा असा एक बाज असतो.लाडका स्वर समुह असतो. आणि तो बहुसंख्य चालीत डोकावतोच़ किंबहुना त्यामुळेच संगीतकार कोणते आपण ओळखत असतो़. तीच त्याची ओळख असते. हा नियम जवळ जवळ सर्वच संगीतकारांना लागू असतो. असं थोडसं धाडसी विधान इथे नोंदवितो़. ह्या सर्व बाबी मिळूनच त्याची स्टाईल बनत असते. सुधाकर कदमांची सुद्धा अशी एक खास स्टाइल आहे. पण त्यात कोणा जानेमाने संगीतकाराची नक्कल किंवा अनुकरण नाही. त्यांचा बाज हा खुद्‌द त्यांचाच बाज आहे हे विशेष.आणि तो अस्सलही आहे़.
 ‘हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही/ चेहरा गुलाबानं झाकणे बरे नाही’, आली हांसत आली पहाट़... मेंदी भरल्या’, ‘ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची, तापलेल्या अधीर पाण्याची’, ‘सूर्य केव्हाच अंधारला यार हो’ ह्या चारही गझला वेगवेगळ्या भाव-भावनांच्या. प्रत्येक गझल अत्यंत रसरशीत आहे़. सर्वच चाली प्रामुख्याने भूप ह्या लोकप्रिय रागांत बांधल्या आहेत. पण प्रत्येक स्वररचनेत मनोहारी वैचित्र्य व काव्याला पूर्ण न्याय दिला गेलाय़. पैकी ‘हे तुझे अशा वेळी’ ही तर मास्टर पिस रचना मानावी लागेल़. माझी स्वतःची तर ही अत्यंत प्रिय रचना आहे़.
 यमन प्रमाणे ह्या चारही रचनांत भूप रागाच्या अनेक सौंदर्यस्थळांचं मुक्त व डोळे भरुन दर्शन घडतं. मोरांनी सप्तरंगी पिसांचा रंगीबेरंगी पिसारा फुलवावा त्या प्रमाणे भूप रागाचा भरगच्च फुलोरा सुधाकर कदमांनी विलक्षणरीत्या फुलविला आहे़.त्यांत यमनच्या निषादचा केलेला सुखद उपयोग, शब्दांची केलेली फेक, गझलच्या अंगानी केलेली गायकी हे सर्व सविस्तर लिहिणं म्हणजे तो एक स्वतंत्र लेखाचा किंवा भाषणाचा विषय आहे़, म्हणून इतकाच स्पर्श इथे पुरेसा आहे़.
               यमन, भूप ह्या सर्वसामान्य लोकप्रिय रागांचा चातुर्यपूर्ण उपयोग करून कदमांनी सुंदर सुंदर रचना दिल्या. त्यातील सौंदर्यकण, सौंदर्य स्थळे निर्देशित करण्याचा प्रयत्न केला़. ह्याखेरीज इतर अनेक रागांत त्यांनी अशाच विपूल रचना मासिकांना दिल्या आहेत़ त्या सर्वांचा रसास्वाद इथे नोंदविणे शक्य नाही.तरी ‘आज मी जे गीत गातो’ ‘आम्ही असे दिवाणे’ किंवा भूपश्री मधील ‘कुठलेच फुल आता’ आणि शिखर अध्याय म्हणजे ‘रंगूनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा’ ही सुरेश भटांची खास गझल ह्या सर्वच गीत व गझलांना कदम यांनी अत्यंत सुरेल चाली देऊन सुधारसपान घडविले आहे़.
 संगीत रचनाकार, स्वतः गायक असणं हे भाग्याचं लक्षण. कारण तो आपल्या हृदयात घर करून राहिलेली चाल खर्‍या अर्थी समर्थ गळ्यातून श्रोत्याच्या हृदयात पोचवितो. त्या अर्थानं कदमांच्या रचनाच भाग्यवान म्हणाव्या लागतील़ कारण सुधाकर कदम हे स्वतः मुलायम आवाजाचे, शब्दार्थानुसार गाणी प्रभावीरीत्या सादर करणारे गायक असल्याने त्यांच्या चाली व काव्यांचं सोनं होतं. नेमक्यावेळी नेमक्या शब्दावर जोर देणं, जरूर तिथं हळुवार शब्दस्वर उच्चार, प्रसंगी स्वरांचा जोरदार लगाव, स्वरांवरील न्यास, ठेहराव ह्या द्वारे ते आपलं गायन अत्यंत प्रभावी करतात़. ताल व सुरांवर त्यांचा चांगलाच काबू आहे़. तालाच्या अंगानं सुरेख गीत मांडणी करतात़.
               शास्त्रीय संगीताचा अभ्यास, रियाज व आवाज कमविला असल्यामुळे गाण्यातील भारदस्तपणा सहज नजरेत भरतो़. सुगम संगीत गायक/गायिका स्वतः हार्मोनियमवादक असेल तर दुधात साखर असा योग असतो़. वर्ज्य, विकृत, अशा बर्‍याचशा स्वरांना काबूत ठेवण्यासाठी व इन्स्टंट स्वर बदल करण्यासाठी हार्मोनियम अत्यंत उपयुक्त असते़. सुधाकर कदमांचा हार्मोनियमवरचा हात अत्यंत तयार व सॉप्ट आहे. गायनाच्या रंगतीत त्यामुळे निश्चितच भर पडते़. कडव्यामधील म्युझिक पिसेस (इंटरल्युट) ते उत्तम प्रकारे वाजवितात़ त्या रचनाही मेलोडीयस असतात़.
 गायन करताना स्वर आलापी, स्वर विस्तार व सरगमचा रास्त वापर ह्या बाबी गाणं नटविण्या-सजविणार्‍यासाठी हव्यातच़. कदमांची सरगम मांडणी बहुत खुबसुरत असते. वानगी दाखल ‘गरे निरेपगरेसा निध धनि सागमग मपधधनीध मपमपग, गपगरेसारे, निरेमगरे निसा’ ही सरगम पहावी़.
                असे हे सव्यसाची संगीतकार गायक सुधाकर कदम हे विदर्भाचं एक भूषण आहे़. नाटक आणि संगीताचं विदर्भाशी फार पूर्वीपासूनच स्नेहनातं आहे़. अनेक मान्यवर कलावंत ह्या भूमीनं महाराष्ट्राला दिले़.
 पंचवीस वर्षांची दीर्घकालीन संगीत वाटचाल कदमांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे़. अर्थातच हा प्रवास खाच खळग्यांनी, वेडवाकड्या वळणांनी, प्रसंगी काट्याकुट्यांनी रक्तबंबाळ करणारा असून सुद्धा हे सर्व अडथळे धीरोदात्तपणे पार करणार्‍या सुधाकर कदमांच्या हातून आणखी सुंदर सुंदर चाली निर्माण व्हाव्यात. त्यांची संगीत सेवा अशीच अखंड सुरू रहावी, अशा शुभेच्छा ह्या प्रसंगी मी माझ्या ह्या मृदू स्वभावाच्या व माणसासाठी आसुलेल्या मित्राला देतो़. तत्पुर्वी मनातील एक खंत नमुद करतो, भले विदर्भाने ह्या कलाकाराचं भरपूर कौतुक केलं असेल पण उर्वरीत महाराष्ट्रात ह्या कलाकाराला त्याच्या योग्यतेप्रमाणं प्रोजेक्ट केले गेले नाही. प्रथितयश गायक/गायिकांनी अभिमानाने गावी अशी त्यांची स्वररचना असूनही हे कां घडलं नाही हे एक कोडं आहे.

-ऍड.राम जोशी
मानद अध्यापक,संगीत विभाग,
शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर.
१३ नोव्हेंबर १९९९

●'पुष्पक' १४ वी गल्ली, राजारामपुरी-४१६ ००८ कोल्हापूर
--------------------------------------------------------------------
गांधर्व संगीत विद्यालय,आर्णी. रौप्यमहोत्सवी विशेषांक१९९९ मधून प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित व #अक्षर_मानव प्रकाशित '#चकव्यातून_फिरतो_मौनी' (२०१८)  मध्ये साभार....




 

No comments:





संगीत आणि साहित्य :