सुगीच्या दिसात
गर्भारते रान
मोहरते मन
आपसूक...
जाये विसरूनी
भान आपोआप
निसर्गाचे रूप
पाहूनीया...
रानमेव्यासाठी
जीवाचा हपाप
अर्धे-कच्चे रूप
ओढ लावी...
गाभुळली चिंच
खुणावे पोरांना
बाजूला पानांना
सारूनीया...
हुरडता ताट
टवाळ पाखरे
हळु चोच मारे
कणसाला...
पानोपानी कंच
कळ्या उमलती
गंध पसरती
मादक तो...
चारी दिशांमध्ये
चैतन्याचा रंग
जसा की श्रीरंग
गोकुळात...
सुधाकर कदम
सुधाकर कदम
स१.९.२०१४
चित्रकार
राजेंद्र पासलकर
No comments:
Post a Comment