आयुष्याचे गणीत ज्याला कळले नाही
थोडा थोडा रोजच मरतो जगतांनाही
निरोप घेण्या आलो होतो तुझिया दारी
ऐकु न गेले मंद उसासे निघतांनाही
आणा-भाका घेउन सारे विसरलीस तू
आठवते तरि ...विरहामध्ये जळतांनाही
ओठावरती एक सुखाची लकेर दे तू
आनंदाने गायिन मी ती मरतांनाही
शोधुन काढू वाटा आपण सुख-दुःखाच्या
मांडुन ठेऊ त्रैराशिक मग सरतांनाही
आप्त-सोयरे,मित्र-मैत्रीणी आणि हे जग
मनात चाले रेखाटन धुळभरतांनाही
प्रकाशताना कशास भ्यावे अंधाराला
जाउनि थेट भिडावे,विपरित घडतांनाही
मनासारखी जमली नाही कधीच मैफल
कासाविस मी होत राहिलो गातांनाही
सुधाकर कदम
२३ नोव्हेंबर २०१२
No comments:
Post a Comment