हा असा,की तो तसा,की तो तसा
मीच आहे फक्त येथे पारसा
(पारसा=शुद्ध,स्वच्छ,पवित्र),
झेलुनी आतावरी सार्या सरी
जाळण्याचा घेतला रे मी वसा
भोवती सारे महात्मे वंद्य ते
लक्तरे लेवून मी लाचारसा
ना कधी जमलेच खोटे हासणे
पण तरी लोकांमधे परिवारसा
चोरुनी नेती पुरावे साव हे
वाव ना ठेवी लढाया फारसा
मंदिरे ताब्यात घेता भामटे
देव,देवी आत रडती ढसढसा
नेहमी घेवून येतो खिन्नता
वर्तमानाचा जरी तू आरसा
घेरतो अंधार मजला नेहमी
काजव्यांचा मीच असुनी वारसा
वाहणार्या निर्झराचे पाय मी
वृक्षवल्ली वाढवी हा भरवसा
बोलक्या मौनातुनी संवादता
चुंबण्या अधरास,होई अधिरसा
वेढलेली वेदना गाऊ न दे
वाटतो हा सूर बघ बेसूरसा
सुधाकर कदम
No comments:
Post a Comment