रंगुनी रंगात
आली नवी होळी
घालोनी काचोळी
बिकीनीची....
चोहिकडे चाले
होळीला जल्लोष
रंगांचा हा मास
पचरंगी...
पुर्वी फाल्गुनात
येत असे होळी
आता बोंब हाळी
बारोमास...
सालभरी चाले
होळी न शिमगा
काय नवल गा
लाथाळीचे...
निवडणुकीत
रंगांचीच मस्ती
उमेदवार कुस्ती
खेळतसे...
निळी पिचकारी
भगव्याच्या संग
करी अंग संग
आनंदाने...
रंगालाही धर्म
असतो कळले
म्हणोनि पिवळे
पितांबर....
जाती व धर्माची
ठिगळं ठागळं
लावोनिया काळ
सोकावतो...
वावरात रोज
रंगपंचमीच
पोटरीला बोच
रक्तवर्णी...
कदम बाबांचे
एकच सांगणे
लावू नका बेणे
विकृतीचे...
सुधाकर कदम
No comments:
Post a Comment