गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, October 3, 2012

सुरेश भटांचे, मला आवडणारे एक सुंदर गीत...


फाटक्या पदरात माझ्या ...

फाटक्या पदरात माझ्या का तुझे मावेल अंबर ?
दानही करशील तू, पण मी असा आहे कलंदर !

कुंतलांनी बांधिला तू धावता बेबंद वारा
पापण्यांनी झाकिला तू एक एकाकी निखारा
सजविला विजनात माझ्या तू वसंताचा पसारा
का अशी केलीस माझी वेदना तू अधिक सुंदर ?

कुठुन मज आले अचानक हे प्रकाशाचे निमंत्रण
मी कसे सोसू अकल्पित हे सुगंधांचे समर्पण
हा कसा माझ्या पथावार रिमझिमे सुकुमार श्रावण ?
आसवांना काय सांगू सुख तुझे छळते अनावर !

मी असा दाही दिशांना वारियाने विखुरलेला 
मी असा माझ्या मनातुन नेहमीचा हरवलेला
हाय हातातून माझ्या मी कधीचा निसटलेला
अन् तरी गीतात माझ्या उमलतो आहे तुझा स्वर !

गायक-संगीतकार
सुधाकर कदम



No comments:





संगीत आणि साहित्य :