गाणे हीच पूजा
असे जिचे सूत्र
अशी एकमात्र
आशाताई...
आरोहावरोह
सूर ताल लय
द्रुत आणि ठाय
आशाताई...
शब्दांचे वैविध्य
नेमक्या स्वरात
सांगून जातात
आशाताई...
खट्याळ ’स्टाईल’
अवखळ ढंग
वेगळाच रंग
आशाताई...
भूपाळीपासोनि
लावणीपर्यंत
करिते श्रीमंत
आशाताई...
गाण्यातली सारी
नजाकत,वर्म
म्हणजेच मर्म
आशाताई...
खटके,मुरक्या
सरगम ताना
तर्हा दावी नाना
आशाताई...
गाणे जगविते
हास्य फुलविते
व तृप्त करिते
आशाताई...
माझ्या बंदिशींना
स्वर मिळो तुझे
हेचि स्वप्न माझे
आशाताई...
सुधाकर कदम
No comments:
Post a Comment