गझल
भरतीच्या या सीमा रेषा आखण्यास मज जमले नाही
लाट उसळता पाय टिकवुनी थांबण्यास मज जमले नाही
अस्सल मोती आठवणींचे जपुन ठेविले हृदयामध्ये
शेवटच्या ठोक्या पावेतो पाहण्यास मज जमले नाही
गुंतागुंत अशीच चिरंतन गुंतत गुंतत गोळा होई
या बोळ्याला दूरदूरवर फेकण्यास मज जमले नाही
चुरगळलेला चंद्र मिठीशी हळूच हसतो आणि बिलगतो
दंतव्रणाच्या खुणा हव्याशा टाळण्यास मज जमले नाही
रटाळवाण्या आयुष्याला दळण्याची ही गंमत आहे
किती पाखडा तरी सुखाला चाळण्यास मज जमले नाही
सुधाकर कदम
१५.९.२०१२
No comments:
Post a Comment