गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Thursday, November 17, 2022

#काळोखाच्या_तपोवनातून... रसग्रहण.


गझलगंधर्व सुधाकर कदमांचा हा काव्यसंग्रह प्राप्त होऊन जवळपास एक वर्ष झालंय. पण पुस्तका बाबत व्यक्त व्हायचे राहूनच गेले. आज पुन्हा हा संग्रह चाळताना व्यक्त व्हावेसे वाटले.नुकताच त्यांचा वाढदिवसही साजरा झाला.म्हणून हे दोन शब्द...तसे या पुस्तकावर व्यक्त होणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास, तेव्हा हा एक छोटासा अभिप्राय..
   रंग बिरंगी भावकळांचा उमलून आलेला हा पुष्पगुच्छ मंद मंद दरवळत राहतो मनाच्या गाभाऱ्यात.आणि जाणीवांच्या पार पल्याड जाऊन काही सांगू पाहणारी शब्दकळा  एक अलौकिक अनुभूती देऊन जाते.

ना महाभारत,ना रामायण तरीही
जानकी अन् द्रौपदी लागे पणाला

   मुळात गायकीला समर्पित केलेले कवीचे जीवन असल्यामुळेच असेल, एक लय घेऊन कविता जन्मास येऊन ती प्रवाहित होतांना दिसते. ओलेत्या भावनांनी नखशिखांत चिंब कविता जणू कवीचे हृद्गत खोलून जातात..
   आपलेच शब्द आपल्याच भावना आणि आपलेच विरघळणे ठाई ठाई अनुभवास येते...
   भावनांचा एक एक सरस सुंदर दागिना म्हणजे जणू एक एक कविता.ह्या कविता वाचतांना फार मृदुल अलवारपणे  गुंफल्याचे सतत जाणवते. आपल्याच भावविश्वात रंगलेल्या या कवितांना  विचारांचे सुंदर रेखीव कोंदण सुध्दा लाभले आहे.
त्यात  अमाप शब्द संपदा आणि लाघवी बोल यांचा सुरेख मेळ बघायला मिळतो.
 
   मिळती जरी फुलांना अगणित घरे सुखाची
   काट्यास मात्र येथे कसलाच ना निवारा
   
    पुस्तकाचे  नावचं कवीने जीवनाशी केलेला संघर्ष सांगून जातो.तर कधी अनुभवाचे बोल कणखर पणे समाजातील अनिष्ट व्यंगावर सडेतोड प्रहार करतांना 
प्रकर्षाने जाणवतात.तर कधी कविता हळवे पणाचा परमोच्च बिंदू गाठतानाही दिसते.स्वप्नदेशीच्या प्रवासात कवी हरखून आपल्यालाच विश्वात रंगलेले दिसतात.
तर कधी  एखादी कविता जीवनाचे तत्वज्ञान इतकी सहजपणाने व्यक्त करते की आपण स्तिमित होऊन जातो..

जीवनाची एकतारी
पंढरिच्या महाद्वारी

तारणारा मारणारा
तूच रे सर्वाधिकारी

विशेष म्हणजे आपल्या पत्नीसाठी लिहिलेल्या ह्या ओळी  खूप भावस्पर्शी आहेत..

माझ्यासाठी जिवास जाळुन उजेडली जी
ती 'सुलभा' मज मनापासुनी खूप भावली

ही जोडी कायम अशीच आनंदी रहावी ह्या शुभेच्छा सहज ओठांवर येतात..

अंगी असलेला मोठेपणा कवितांमधून सुद्धा जाणवतो.

दीन दु:खितांना | मदत जे करी
तेणे मुक्ती चारी |साधियेल्या

एकंदर एक केवळ अप्रतिम सुंदरअसा हा काव्यसंग्रह आहे यात काही संशयच नाही..

हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे
असेच दु:ख झेलुनी सुखासवे फुलायचे

 ह्या ओळी किती सहजतेने जीवनाचे वास्तव मांडून जातात ना!

सौ. ‌मीनाक्षी नितीन गोरंटीवार....


 

 

No comments:





संगीत आणि साहित्य :