१९८२ ची गोष्ट असेल, त्या वेळी माहुर ला ललिता पंचमी च्या दिवशी रात्रभर संगीत सेवा असायची, अनेक नामवंत कलावंत सेवेला येत असत. सुधाकर कदम ह्या कार्यक्रमाचं नियोजन करीत असत. त्या वर्षी मी गेलो आणि गायची संधी मिळाली. बाल कलावंत म्हणून कौतुकही झालं. २, ४ दिवसानीच एक पत्र आलं, छान गायलास पण ह्या कौतुकाने हुरळून जाऊ नकोस, रियाजात राहा माझे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. तुझाच सुधाकर कदम.
एका मोठ्या कालावंताकडून मिळालेल्या त्या पहिल्या शुभेच्छा होत्या, आजही ते पत्र मी जपुन ठेवलं आहे. संगीत, साहित्य आणि वक्तृत्वाच्या माझ्या प्रवासात आजही कदम सर वेळोवेळी माझं कौतुक करतात. दुसऱ्याला मनमोकळी दाद देणे , कौतुक करणे हा एक दिव्य गुण आहे, ईश्वरानी तो सगळ्यांनाच दिला नाही. कदम सर ह्या दिव्य गुणाचे धनी आहेत.
सगळेच लोक चालतात त्याच वाटेवरून सरांना कधीच चलावसं वाटलं नाही. If you want to be a path finder, you must be a path breaker, त्या काळापासून सरांनी प्रस्थापित वाटेवरून चालणं नाकारलं होतं म्हणून मराठी गझलेच्या प्रांतात इतक्या प्रदीर्घ काळापासून आपल्याच मस्तीत , आपल्याच शैलीत, विदर्भातला असूनसुद्धा ताठ मानेने वाटचाल करणारा तो एकटा टायगर आहे.
संगीता शिवाय सरांनी लेखन केलं, समाजकारण केलं, राजकारण केलं, भ्रमंती केली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीचं documentation केलं. पुढच्या पिढीसाठी हा फार मोठा ठेवा आहे.
सरांच्या कर्तृत्ववाचा आवाका इतका मोठा आहे की तो लेखणीत बांधणं माझ्यासारख्यासाठी अशक्य आहे.
३, ४ महिन्यांपूर्वी यवतमाळ वरुन पुण्याला जाताना सर माझ्या घरी आले, मनमोकळ्या गप्पा केल्या , आनंद वाटत फिरणारा माणुस आपल्या घरी येऊन गेल्या सारखं वाटलं.
सरांच्या संगीत रचना अनेक नामवंत कलावंतांनी गायल्या आहेत.
कवींच्या शब्दांना व ती रचना गाणाऱ्या गायकाच्या गळ्याला न्याय देणारा संगीतकार म्हणजे सुधाकर कदम.
मेहंदी हसनला ऐकताना ,रंजीश ही सही ऐकताना असं वाटतं साधा यमनच तर आहे.. पण नीट ऐकल्यावर लक्षात येतं, मानवी मनातील सर्व भावना व्यक्त करण्यासाठी यमनाला मेहंदी हसनचा गळा शोधावा लागतो.
कदम सरांना मराठीतला मेहंदी हसन का म्हणत असतील... ?
शब्द आणि स्वरातील भव्य दिव्यता अत्यंत साधेपणाने मांडणे हा दोघांच्याही संगीतातील स्थायीभाव आहे , ऐकताना वाटतं 'अरे किती सोपं आहे पण म्हणून बघताना त्यातला परमेश्वर दिसतो असं मला सापडलेलं उत्तर आहे.
आज सरांचा वाढदिवस आहे.
जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रातील सरांची मुशाफिरी अशीच सुरू राहो व त्यासाठी सरांना निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.
कदम सरांच्या आयुष्याकडे बघताना मला असं सतत वाटतं मिर्झा गालिबने हा शेर सरांसाठीच लिहिला असावा
हजारो ख्वाहिशे ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले।
बहोत निकले मेरे अरमा, मगर फिर भी कम निकले।
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर।
💐💐🎂🎂
डॉ सुशील देशपांडे
कारंजा लाड
No comments:
Post a Comment