पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वी विदर्भात खाजगी बसेस चालायच्या. हात दाखवला तेथे थांबून प्रवासी घेणाऱ्या या रंगीबेरंगी खेकडा छाप बसेस प्रवाशांच्या अतिशय आवडत्या होत्या. या बसेसमध्ये मनुष्यप्राणीच प्रवास
करायचे असे नाही, तर कोंबडे, बकरे, कुत्रे, गारुड्याचे साप वगैरे प्राणीही इतर प्रवाशांसोबत प्रवास करायचे. आजच्या सारखी फक्त मनुष्य प्राण्यांनाच मुभा नव्हती. त्यामुळे 'सर्वप्राणी समभाव' प्रत्येकामध्ये रूजायचा (एखाद्या वेळी जर गारूड्यांचा नागोबा चुकून माकून पेटाऱ्याच्या बाहेर आला तर कोणालाही चावत नसे असे म्हणतात?) या बसेसच्या 'फरंट' सीटवर म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूच्या आसनावर गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच बसू शकत असे. गावचा मामलेदार, पाटील, डॉक्टर वगैरे प्रवास करणार असेल, तर त्याचे सामान आणण्याकरिता माणूस जायचा. चुकून जर एखादा सर्वसाधारण माणूस तिथे बसलेला असला, तर येणाऱ्या प्रतिष्ठिताकरिता त्याला उठवले जायचे. इतर पासिंजर मागच्या बाजूला असलेल्या दोन साईडच्या बाकड्यावर बसायचे त्यानंतर येणारे प्रवाशी मात्र बगिच्यात आपले बस्तान बसवीत. बगीचा म्हणजे काय हा प्रश्न आपणास पडला असेल, नाही? बगीच्या म्हणजे बाग नसून दोन बाकड्यामधील जागेला बगिचा म्हणायचे. बगिच्यात बसणाऱ्याचे हाल सगळ्यात जास्ती व्हायचे पण कोणीही कुरकुरत नसे.
आमच्या आर्णीला त्यावेळी (यवतमाळ-आर्णी-यवतमाळ) कोळशावर चालणारे वाफेचे इंजिन असलेली हाफटन चालायची. तिचीही वेगळीच गंमत होती. बसच्या मागच्या बाजूला बॉयलर, त्यांत सतत कोळसे टाकणे, ड्रायव्हर व बॉयलरच्या मध्ये प्रवाशी! चढाई आली तिचे कुंथणे, फारच त्रास होऊन थांबली की बॉयलर गरम करणे वगैरे सोपस्कर करत दोन अडीच तासात ४२ किलोमीटर अंतर कापल्या जात असे. कधी कधी तीन तासही लागत. या सर्व खाजगी बसेसना ग्रामीण भागात ‘लंदफंद' सर्व्हिस म्हणत. हे नांव का पडले हा संशोधनाचा विषय आहे तरी पण आमच्या अल्पबुद्धीप्रमाणे कोठेही थांबणे, केव्हातरी निघणे, केव्हाही पोहोचणे, कितीही प्रवासी घेणे, कुठेही उतरवणे, वेळेनुसार न धावणे, नर, नारी, पशु या सगळ्यांना मुक्त प्रवेश देणे, या सगळ्या प्रकारांमुळे या सर्व्हिसला लदफंद हे नाव पडले असावे, ते काहीही असले तरी त्या काळात लंदफंद सर्व्हिस पॉप्युलर होती, एवढे मात्र नक्की.
सध्या संपूर्ण भारताची स्थिती लंदफंद सर्व्हिस सारखी झाली आहे. 'कोणीही यावे टिचकी मारोनी जावे' अशी! काँग्रेसची लंदफंद सर्व्हिस घोट्याळ्यावर चालायला लागली म्हणून त्रस्त झालेल्या प्रवाशांनी भाजपाच्या हाती सुकाणू देण्याचे ठरविलें. परंतु आपणही लंदफंद सर्व्हिसमध्ये काँग्रेसच्या मागे नसल्याचे दाखवून दिले.उलट आताच जास्ती लंदफंद वाढली, असे जनता ओरडत आहे.
वरील सर्व बाबींवरून लंदफंद म्हणजे भोंगळ असा एक अर्थ निघतो. संपूर्ण देशात अनेक वर्षापासून लंदफंद चालू आहे. सरकार लंदफंद, कार्यालये लंदफंद, पोलीस लंदफंद, सर्व काही लंदफंद! एखाद्या कार्यालयात आवश्यक कामाकरिता जावून बघा! ज्या व्यक्तिशी तुम्हाला काम आहे ती व्यक्ती त्या कार्यालयात त्यावेळी तुम्हाला सापडेल तर शपथ आणि सापडलीच तर लंदफंद केल्याशिवाय काम झाले तर शर्यत! सगळीकडच्या लंदफंद सर्व्हिसमुळे अखिल भारतीय जनतेला लंदफंदची इतकी सवय झाली आहे की, असे जर घडले नाही तर त्यांना चुकल्या चुकल्यासारखे वाटायला लागते.
जुन्या लंदफंद सर्व्हिसची नावेही मस्त होती. बलवंत, दत्त, लोकसेवा, समर्थ वगैरे वगैरे, सध्या नव्याने सुरू झालेल्या खाजगी बसेस सारखे ट्रॅव्हल्स वगैरे नाव नव्हते. खरे पाहिले तर ट्रॅव्हल्स म्हणजे आधुनिक युगातील सोफॅस्टिकेटेड लंदफंदच! कारण महागडी तिकिटे काढून मुद्दाम ए.सी. कोचमधून प्रवास करावा, तर वातानुकुलित यंत्रच बंद असते. तर कधी कधी व्हीडीओ नादुरूस्त असतो. त्यामुळे चालकाच्या पसंतीची आपणास नको असलेली गाणी ऐकत प्रवास करणे नशिबी येते. त्यातही थांबे चालकाच्या मर्जीचेच असल्यामुळे ह्या बसेस प्रवाशांकरिता आहे की, चालक-मालकाकरिता हा प्रश्नच पडतो. एकदा आम्ही बडौद्याहुन नागपूरला येत होतो. रात्री सुरत नंतर एकही थांबा न घेता बस सतत धावत होती. सकाळी मात्र सगळ्यांची चुळबूळ सूरू झाली. त्यातही मुलांची तर जास्तीच. त्यामुळे काही प्रवाशांनी बस थांबवायची विनंती केली. पण ९.०० वाजेपर्यंत त्यांचा ठरलेला ढाबा येईपर्यंत काही बस थांबली नाही. त्यामुळे लहान मुलांनी आईच्या मांडीवरच आपले प्रातः कालीन कार्य उरकले. त्यावेळी मात्र ट्रॅव्हल्स पेक्षा लंदफंद बरी, असे जुन्या मंडळींना निश्चितच वाटले असेल. कारण ती जिथे म्हटले तिथे थांबत होती. आताच्या सुंदर सुंदर ट्रॅव्हल्स तर गिरकी घेऊन मोराच्या तोऱ्यात फक्त ढाब्याच्या बनातच थांबतात.
आपले आयुष्यही लंदफंद सर्व्हिससारखेच आहे. नको तिथे थांबते, जो प्रवासी सोबत हवासा वाटतो तो मिळत नाही. फ्रंट सीटवर बसायची इच्छा असून, बगिच्यात बसावे लागते. गाव लवकर यावे, असे वाटत राहते. पण ते अशा वेळी येते की गात्र थकल्यामुळे आले काय न आले काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असते. निघतो एका गावी जायला, पोहचतो दुसऱ्याच गावी. त्यातही गर्दी ही की कोणाजवळ मन मोकळे करतो म्हटले तर शक्य होत नाही. कारण जो तो आपल्याच घाईगर्दीत असतो. आयुष्याच्या लंदफंदचे सुकाणू आपल्या हातातून निघून जाते व पत्ताही लागत नाही. त्याला आपण आपले कर्मभोग समजून निमूटपणे बघत राहतो. त्यातही अपघात झाला तर... 'राम नाम सत्य है...'
-सुधाकर कदम
रेखाचित्र - सुरेश राऊत,यवतमाळ.
No comments:
Post a Comment