'आपुली मस्ती अपुले जगणे
सोबत अपुले जीवनगाणे
काय हवे यापरते दुसरे
मस्त कलंदर होऊन रमणे'
असे म्हणणारे एक कलंदर कवी सुधाकर कदम यांचा काळोखाच्या तपोवनातून हा कवितासंग्रह. इंद्रधनुषी रंगांप्रमाणे विविध वृत्त, ओवी, अभंग या छंदातून व्यक्त होणारी त्यांची कविता आल्हाददायी आहे. समाजातील वैगुण्यावर फटके मारणारी ही कविता बोचरी टीका करणारी नाही. मात्र गुदगुल्या करीत शालजोडीतून समाजाला समज देणारी त्यांची कविता आहे.
मुळात त्यांच्या नसानसात संगीत भिनले आहे. घरी वारकरी परंपरा असलेले सुधाकर गुरुजी हे #आद्य_मराठी_गझल_गायक आणि गझलसम्राट सुरेश भट यांचे अंतरंग स्नेही असले तरी अष्टपैलू कलाकार अशीही त्यांची ओळख आहे. मिश्किल स्वभाव, विनोदाची जाण आणि संयमित व्यक्तित्व हेही त्यांचे वैशिष्ट्य आहे.
‘काळोखाच्या तपोवनातून’ या कवितासंग्रहातील ८३ कवितांतून सुधाकर कदम हे रसिकासमोर येतात.या संग्रहात अभंग छंदातील अनेक कविता मनाला भावतात. पहिलीच कविता ‘दरवळ’ वाचताना शृंगाराचा गंध जाणवत असला तरी या अभंगातील शेवटचे कडवे
अंत नसलेला । आदिम हा खेळ।
घडवितो मेळ । दो जीवांचा ।।
हे आदिम आणि अंतिम सत्य सांगतो. सृजन आणि नवनिर्मिती यासाठी दोन जिवांचा मेळ व्हावाच लागतो. संत तुकाराम महाराज देखील म्हणतात. नवसे कन्या पुत्र होती । तरी का करावा लागे पती ।। स्त्रीबीज आणि पुरुष बीज यांच्या संयोगातून सृष्टीतील प्रजनन होत असते, हे सत्य ते सहज सांगून जातात.
‘वादळाची झिंग’ ही षडाक्षरी छंदातील कविता अशीच शृंगारिक आहे. या कवितेत ते म्हणतात,
हुंकाराचे स्वर ।
अधरांची लिपी।
स्पर्शाच्या भाषेत ।
चाले लपाछपी ।
सांडता चांदणे ।
पूर्ण चंद्रासवे ।
उमलते फूल ।
मिठीत देखणे ।।
सूचक शब्दांतून शृंगार व्यक्त करणारी ही कविता. वाचकांना मदनगंध देते.
पंढरीच्या विठ्ठलावर त्यांची श्रद्धा असली तरी ती आंधळी नाही. ती पिढ्यान् पिढ्या चालत आलेली भक्ती आहे. ‘जीवनाची एकतारी’ या अभंगात ते म्हणतात,
जीवनाची एकतारी।
पंढरीच्या महाद्वारी ।।
या अभंगात त्यांनी एक सत्य सांगितले आहे. भक्ती केली तरी दुःख काही टळणार नाही परंतु त्याची तीव्रता जाणवणार नाही हा संतांनी घेतलेला अनुभव सुधाकर गुरुजी घेतात.
वेदनांच्या पालख्यांना ।
वाहिले मी बिनपगारी ।।
परमेश्वर सर्वाधिकारी हे मान्य केले तरी शेवटी एक महत्त्वाचा सवाल ते ईश्वराला करतात,
कोणती ही रीत न्यारी ।
माणूस माणसा मारी ।।
हा सवाल ते ईश्वराबरोबरच सर्व समाजालाही करतात. त्यातून त्यांच्या चिंतनशीलतेचे दर्शन होते.
आनंंदकंद वृत्तातील ‘गाळ अंतरीचा’ ही रचना मोहकच आहे. धूपापरी जळूनी गंधीत होत गेलो ।। असे म्हणत
'मिळती जरी फुलांना अगणित घरे सुखाची,
काट्यांस मात्र येथे कसलाच ना निवारा...'
हे सत्य ते खुबीन सांगतात. गंधित आणि मोहक फुलांना सर्वच लोक चाहतात. मात्र काट्यांना कोण जवळ करतो? ही जगरीत स्पष्टपणे सांगतात. फुलांच्या रूपकातून त्यांनी येथे सुरूप - कुरूप, गरीब - श्रीमंत यांच्यातील दरी अचूकपणे टिपली आहे.
‘नको ते घडत आहे’ मध्ये त्यांनी
पानगळ येण्या अगोदर
सर्व इच्छा झडत आहे
असे सांगत भव्य बुरुजही कसा पडत आहे, ही खंत व्यक्त केली आहे.
'चोरल्याने घास...चिमणी
पाखरे ही रडत आहे...'
या ओळी तीव्र वेदना प्रकट करतात.
‘चक्रव्यूह,’ ‘शून्य,’ ‘गूढ’ आदी कविता जीवनाचे सार सांगणाऱ्या आहेत. ‘ती’ या प्रेमकवितेत त्यांनी मंदस्मित करणारी सखी कधी अबोला धरायची तर कधी लटके रागावून परती सलगी करून प्रेम व्यक्त करायची असे प्रेमाचे मर्म प्रकट केले आहे. ‘पापाचा घाट’ घर आहे पण दार नाही, बाहेर सुखी दिसणारे अंतरात किती दुःखी असतात.
'घाम गाळुनी विहिर खोदली
पाण्याची पण धारच नाही...'
या ओळींतून दुष्काळाची तीव्रता नजरेस ते आणतात. ‘जिथे तिथे हाटच पापाचा । पुण्याचा बाजारच नाही।’ हे जगात सर्वत्र दिसणारे चित्र उभे करून हे जग किती बेगडी आणि दांभिक आहे, हे नजरेस आणून देतात.
‘सावळा आनंद’ मधील भक्ती किती निखळ आहे, हे ते दाखवतात. हा भक्तीचा आनंद प्रकट करायचा नसतो तर अंतरातच जाणून घ्यायचा असतो तेथे शब्दांचे अवडंबर काय कामाचे, असा प्रश्न ते करतात. तो आनंद मुक्यानेच घ्यावा, या शब्दांतून नामस्मरण वा भक्तीचे प्रदर्शन न करतात परा वाणीने तो आनंद लुटावा, असे म्हणतात.
‘घरपण,’ ‘आनंदगाणे’ या कविता चिंतनशील आहेत. तर ‘बघ ना…’ आणि ‘सुलभा’ या प्रेम कवितांतून वेगळ्या प्रतिमांतून प्रेम व्यक्त केले आहे. सुलभा या रचनेत शेवटी ते म्हणतात
'माझ्यासाठी जिवास जाळुन उजेडली जी
ती ‘सुलभा’ मज मनापासुनी खूप भावली'
या ओळींतून त्यांनी आपल्या कुटुंबवत्सलतेची भावना प्रकट केली आहे. ‘आपण अपुल्यासाठी ’ या कवितेतून उरलो तर इतरांसाठी असं सांगून आपल्यासाठीही वेळ काढला पाहिजे हा संदेश दिला आहे. या कवितेतील
‘कणव न येई शेतकऱ्यांची
असले नेते त्यांच्या गाठी ’
या ओळींतून नेते फक्त चिथावून देतात., मरतात ते आंदोलनकर्ते हे सत्य कटू असले तरी सांगितले आहे. हल्लीच्या शेतकरी आंदोलनात आंदोलक मेले, शेतकरी लाठ्या खात बसले नेते मात्र वातानुकुलित खोल्यांत सामीष भोजन करत बसले. लोकांनी त्यांच्यापाठीमागे जाऊ नये, असेच सूचित होते. तुकोबांनी असल्या भोंदू आणि नाठाळांच्या माथी काठी मारण्यास सांगितले आहे, याची आठवण ते करून देतात. ‘अज्ञाताची हाक,’ ‘दिगंतर,’ ‘तर्पण,’ ‘हट्टी मन’ आदी कविता अंतर्मुख करतात. ‘जीवनगाणे’मधून ते सूरमयी जीवन नवे तराणे गात जगण्याचे जीवनगाणे करतात. ‘अनवट सूर’ ही कविताही अशीच सूरमयी आणि संगीतमय आहे. ‘कोण जाणे काय होते’मधून छान गझल वाचायला मिळते
'राज्य, राजे, राजवाडे संपले अन्
हे नवे आले भिकारी शोषणाला'
असा टोमणा ते सध्याच्या व्यवस्थेला मारतात.
‘विश्व,’ ‘सुगंधी कहर,’ ‘बोल कविते,’ ‘विसावा,’ ‘धुमारे’ आदि अल्पाक्षरी कवितांतून त्यांनी जगण्याला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.
‘सुखे फिरतात या दारी,’ ‘खारट घास,’ ‘रे मना’ आदी कवितांतून त्यांचे चिंतन व मनन दिसून येते. ‘सांजरात’ हा अभंग सुंदर चित्र उभे करते.
‘मस्त कलंदर’ ही कविता त्यांच्या जगण्याचे प्रतीक आहे, असे मला वाटते.
‘खेकडे’ या कवितेत जगातील भवतालच्या माणसांची प्रवृत्ती अधोरेखित होते.
या संग्रहातील सर्वच कविता विचारप्रवण करणाऱ्या आहेत. अभंग छंदातून अल्पाक्षरी कवितेतून मोठा बोध देता येतो या संत तुकारामाच्या बाण्याचा प्रत्यय ते आणून देतात.
राम पंडित यांची प्रस्तावना संग्रहाची, सुधाकर कदम यांच्या कवितेची ओळख अत्यत प्रभावीपणे करून देते.
-प्रकाश रामचंद्र क्षीरसागर.
(९०११०८२२९८)
दै. हेरॉल्ड,पणजी,गोवा. २०.३.२०२२
काळोखाच्या तपोवनातून
कवी - सुधाकर कदम
प्रस्तावना - डॉ. राम पंडित
पृष्ठे ९५, मूल्य १५० रुपये (+ पोस्टेज ५०रुपये.)
प्रकाशक - स्वयं प्रकाशन, सासवड - पुणे.
मुखपृष्ठ - डॉ.अविनाश वानखडे,पुसद.
google pay 8888858850
No comments:
Post a Comment