. #जगत_मी_आलो_असा लेखांक ८
शीर्षक वाचून तुम्हाला दुष्यंताची शकुंतला आठवली असेल.ती ही शकुंतला नाही.ही आमची यवतमाळची 'आगीनगाडी' होय.रंभेच्या मुलीचे रक्षण शकुन पक्षाने केले म्हणून दुष्यंताच्या शकुंतलेचे नाव शकुंतला पडले.काही काळ दुष्यंताला शकुंतलेचा विसर पडला होता ही कथा सुद्धा आपणास माहीत असेलच.अशी ही शकुंतला पुराणात वर्णन केल्याप्रमाणे सुस्वरूप,देखणी कण्व ऋषींच्या आश्रमात वाढलेली वगैरे वगैरे... पण जिला रंग ना रूप अशा यवतमाळच्या 'यवतमाळ ते मूर्तिजापूर' चालणाऱ्या छोट्या (नॅरो गेज) आगीनगाडीला (आगीनगाडी कसली ढक्कलगाडी म्हटले तरी चालेल.) शकुंतला हे सुंदर नाव देणाऱ्या यवतमाळकर रसिकास दाद द्यावी लागेल.ही गाडी इंग्रजांच्या काळात क्लिक निक्सन अँड कंपनीच्या माध्यमातून २५ डिसेंबर १९०३ मध्ये जिल्ह्यातील कापूस इंग्लंडमधील मँचेस्टरला पोहोचवण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आली होती. यवतमाळ रेल्वे स्टेशनचा कोड आहे ytl. येथे दोन प्लॅटफॉर्म आहेत.पण विना शेड! (सध्या नवीन रेल्वे स्टेशनचे काम सुरू असल्याचे कळते.खरे खोटे सरकारला माहीत.)
तर मित्रहो, ही गोष्ट आहे १९६५ ते १९७० च्या दरम्यानची.बोरी अरब जवळील लाडखेड येथे ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता. लाडखेड हे यवतमाळ मूर्तिजापूर रेल्वे मार्गावर असल्यामुळे सर्व लवाजमा घेऊन 'शकुंतले'ने लाडखेडला गेलो.त्यावेळी शकुंतलेला वाफेचे इंजिन होते.कार्यक्रम करून दुसऱ्या दिवशी शकुंतलेनेच यवतमाळला निघालो. यवतमाळ जवळच्या लोहारा या गावापर्यंत आल्यावर गाडी आचके देत थांबली.ती सुरूच होईना.चौकशीअंती (ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार) बॉयलर थंड झाल्याचे कळले.बऱ्याच प्रयत्नानंतर अर्ध्या तासाने गाडी धकली, पण थोडे दूर जात नाही तो पुन्हा थांबली.पुनः चौकशी केली असता 'गाडीत बिघाड झाल्यामुळे केव्हा सुरू होईल होईल हे सांगता येत नाही' असे उत्तर आले.गाडी ना धड लोहारा गावत ना धड यवतमाळात.(या परिस्थितीमुळे 'ना घर के ना घाट के' म्हणजे काय ते कळून आले.) लोहारा ते यवतमाळ अंतर तसे तीन साडेतीन किलोमीटर.गाडी चालती असती तर दहा/पंधरा मिनिटात यवतमाळला पोहोचलो असतो.पण एवढ्या अंतरासाठी शकुंतलेने अख्खा एक तास घेऊनही मधेच मुक्काम ठोकला.सायंकाळ होत आली होती.रात्री पुनः यवतामाळातच कार्यक्रम होता.गाडी अशा ठिकाणी थांबली होती की, दुसरे कुठलेही वाहन मिळणे शक्य नव्हते.काय करावे कोणालाच सुचेना.बराच खल झाल्यावर सगळ्यांनी आपापली वाद्ये घेऊन रुळा रुळाने चालत रेल्वे स्टेशन गाठायचे व तेथून टांग्याने गावात आमच्या (ऑर्केस्ट्राच्या) रूमवर जायचे ठरले.गायक मंडळी आपापले गळे घेऊन निघाली.बाकी वादक मंडळी पण आपापले वाद्य घेऊन चालू लागली.या प्रकरणात बासरीवाला मजेत होता.सगळ्यात गोची माझी होती.कारण अकॉर्डियन...! तेही अवजड असे पियानो अकॉर्डियन.तबलेवाल्याने तबल्याची झोळी खांद्यावर घेतली.बॉंगोवाल्याने बॉंगो एका हातात घेतला.
कोंगोवल्याची पंचाईत झाली.त्याने सरळ ते धूड डोक्यावर घेतले.ते पाहून मीही अकॉर्डियनचे धूड डोक्यावर घेतले.व सगळेजण 'हर हर महादेव' म्हणत रस्त्याने (रुळाने) लागलो. यवतमाळच्या चौकीजवळ (सध्याचे दर्डा नगर) आल्यावर आमची 'वरात' पाहून आंबटशौकीन रसिक जमा होऊन गंमत बघायला लागले.आम्हाला मेल्याहून मेल्यासारखे झाले.पण इलाज नव्हता. कसे बसे स्टेशवर पोहोचलो व तेथून टांग्याने ऑर्केस्ट्राच्या खोलीवर! आयुष्यात पाहिल्यांदा या गाडीत बसलो.त्यानंतर बॉयलरचा धसका घेऊन पुनः प्रवास करण्याची हिंमत केली नाही.
--------------------------------------------------------------------
दि.१४ डिसेंबर २०२५ दैनिक विदर्भ मतदार,अमरावती.


