गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, September 9, 2023

राग-रंग (लेखांक २३) सोहोनी.

न नादेन विना गीतं न नादेन विना स्वर: | न नादेन विना नृतं तस्मान्नादात्मकं जगत || अर्थात नादाशिवाय ना गीत,ना स्वर, ना नृत्य,अवघे जग नादात्मक आहे. सोहनी राग मारवा थाटातुन उत्पन्न झाला आहे.सा, रे॒, ग, म॑, प, ध, नि हे मारवा थाटाचे स्वर आहेत.म्हणजेच मारवा थाटात रिषभ स्वर कोमल, मध्यम स्वर तीव्र व बाकी स्वर शुद्ध आहेत.राग मारवा, ‘मारवा’ थाटाचा आश्रय राग आहे.ज्यात रिषभ कोमल और मध्यम तीव्र असतो पण पंचम स्वर वर्ज आहे.आरोहावरोहात सहा स्वर लागत असल्यामुळे याची जाती षाडव-षाडव ठरते.याचा वादी स्वर रिषभ तथा संवादी स्वर धैवत आहे.ह्या रागाच्या गायन-वादनासाठी दिवसाचा चौथा प्रहर योग्य मानला गेला आहे. सोहनी रागाची उत्पत्ती मारवा थाटातील असल्यामुळे सोहनीमध्ये सुद्धा मारव्याचेच स्वर लागत असले तरी आरोहात रिषभ वर्ज आहे. आरोह-सा ग म॑ ध नि सां. अवरोह-सां नी ध म॑ ग रे॒ सा. रात्रीच्या शेवटच्या प्रहरी गायिल्या जाणाऱ्या या रागाचा वादी स्वर धैवत असून संवादी स्वर गांधार आहे.याला चंचल प्रकृतीचा राग मानतात.(पण 'मुगले आझम' चित्रपटातील बडे गुलाम अली खान साहेबांनी गायिलेले 'प्रेम जोगन बनके' ऐकल्यावर हे पटत नाही.) असो! सोहनी हा मारवा थाटातील अतिशय गोड आणि लोकप्रिय राग आहे.याच थाटातील पुरीया,साजगिरी, ललित (●काही गायक ललित रागात शुद्ध धैवताचा प्रयोग करतात.परंतु अधिकांश गायक यात कोमल धैवताचा प्रयोग करतात. कोमल धैवताच्या ललितचा प्रचार अधिक असल्याने हा प्रकार अतिशय लोकप्रिय आणि कर्णप्रिय पण आहे. भातखंडेंनी यात शुध्द धैवत मान्य केल्यामुळे याला मारवा थाटात बसविण्याचा अवघड प्रयत्न केला. खरे तर ललित राग भातखंडे प्रणित दहा थाटातील कुठल्याच थाटात योग्य प्रकारे बसत नाही. ह्याला जबरदस्ती मारवा थाटात बसविले आहे. ललित आणि मारवा रागाचे स्वर आणि स्वरूप दोन्ही बिलकुल मेळ खात नाही. दोन्ही रागांचे स्वर भिन्न आहेत. ललित रागात शुद्ध मध्यम, जो रागाचा वादी स्वर असून एकदम प्रबळ आहे,तो स्वर मारवा रागात पूर्णपणे वर्ज्य आहे. खरे तर ललित रागाला एक अलग थाट मानायला हवे होते. या थाटात ललित, मेघ रंजनी तथा ललित रागाप्रमाणे दोन्ही मध्यमाचा प्रयोग होऊ शकणारे व भविष्यात निर्माण होणारे राग यात बसवता आले असते. जोपर्यंत दहा थाटच मान्य आहेत तोपर्यंत कोमल धैवताच्या ललित रागाला पूर्वी थाटात ठेवणेच योग्य वाटते.) भटियार (●अधिकतर विद्वान भटियार रागाला बिलावल थाटान्तर्गत मानतात. बिलावल थाटातील राग मानण्याचे कारण यात शुद्ध मध्यम हा प्रधान स्वर आहे.आणि मारवा रागात शुद्ध मध्यमाचा प्रयोगच होत नाही. तसेच रागस्वरूपाच्या दृष्टीने पण मारव्याच्या जवळपास जात नाही.) बिभास (●बिभास रागाचे तीन प्रकार आहेत. शेवटचे दोन प्रकार क्रमशः पूर्वी आणि मारवा थाट जन्य राग आहेत. तीनही बिभास एक दुसऱ्यापासून वेगळे आहेत. त्यातील भैरव थाट जन्य बिभास अधिक प्रचारात आहे.) हे राग पण सुंदर आहेत. सोहनी रागामध्ये ख्याल आणि ठुमरी हे गायकीचे दोन्ही प्रकार मान्य आहेत.पण ठुमरी अंगाच्या गायकीत याचा अधिक प्रयोग होत असल्याचे दिसून येते.या रागाचा प्रयोग दोन प्रकारे केल्या जातो.पहिल्या प्रकारात औडव-षाडव जाती अंतर्गत आरोहात रिषभ आणि पंचम तथा अवरोहात पंचम स्वराचा प्रयोग होत नाही.दुसऱ्या प्रकारात आरोहात रिषभ आणि अवरोहात पंचम स्वराचा उपयोग केल्या जात नाही.सोहनीमध्ये पुरीया व मारवा रागाच्याच स्वरांचा प्रयोग केल्या जातो.परंतू त्याचा प्रभाव आणि भावाभिव्यक्तिमध्ये खूप फरक आहे.या रागात मींड, गमक याचा योग्य प्रयोग केल्यास यातील भाव अधिक चांगल्या तऱ्हेने प्रकट होतात. सोहनी दक्षिण भारतातील 'हंसनंदी' रागप्रमाणे आहे.जर हंसनंदी रागात शुद्ध रिषभाचा प्रयोग केला तर तो ठुमरी अंगाच्या सोहनी रागाप्रमाणे वाटतो. हा लेख लिहिण्यामागचे मुख्य कारण उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी गायिलेले मुगले आजम चित्रपटातील 'प्रेम जोगन बनके' हे गाणे आहे.रसिकांनी जरूर ऐकावे.या रागात हिंदी व मराठी गाणी खूपच कमी आहेत... ● चित्रपट गीते... 'कुहू कुहू बोले कोयलिया' लता,रफी.चित्रपट-सुवर्ण सुंदरी.संगीत-आदि नारायण राव (१९५७) 'प्रेम जोगन बनके' उस्ताद बडे गुलाम अली खान.चित्रपट-मुगले आजम.संगीत-नौशाद (१९६०). (या चित्रपटा संबंधात अनेक किस्से प्रचलित आहेत. चित्रपटाचे निर्माता निर्देशक के.आसिफ यांनी संगीतकर म्हणून नौशाद यांची निवड केली.त्यावेळी नौशाद फिल्म इंडस्ट्रीत जवळ जवळ वीस वर्षांपासून काम करीत होई.सफल ससंगीतकर म्हणून त्यांना ओळखले जात होते.या वेळेपर्यंत त्यांनी जवळ जवळ पन्नास चित्रपटांना संगीत दिले होते. त्यातील सर्वच गाणी लोकप्रिय झाली होती.बैजू बावरा,मदर इंडिया सारखे सफल चित्रपट त्यांच्या नावावर होते.त्यामुळे सर्व निर्मात्यांची संगीतकार म्हणून पहिली पसंती त्यांना असायची.के. आसिफ यांनी जेव्हा उस्ताद बड़े गुलाम अली खान यांना चित्रपटात गायची विनंती केली तेव्हा खान साहेबांनी साफ नकार दिला.चित्रपटात गायची बिलकुल इच्छा नसल्याचे सांगितले. यावर के.आसिफ यांनी मागाल तेवढे मानधन देण्याचे कबूल केले.त्यावेळी बड़े गुलाम अली खान यांनी २५००० रुपये मानधन सांगितले.त्या काळी मोठ्यातला मोठा गवैय्या ५०० रुपयांच्या वर मानधन घेत नसे.पण के.आसिफ यांनी २५००० रुपये देऊन त्यांच्याकडून गाऊन घेतले.) 'झुमती चली हवा' मुकेश.चित्रपट-संगीत सम्राट तानसेन (१९६२) 'कही दीप जले कही दिल' लता.चित्रपट-बीस साल बाद (१९६२) 'जीवन ज्योत जले' आशा भोसले.चित्रपट-गृहस्थी. संगीत-रवी (१९६३) 'कान्हा रे कान्हा' लता. चित्रपट-ट्रक ड्रायव्हर. संगीत-सोनिक ओमी (१९७०) ● मराठी... 'जिवलगा कधी रे येशील तू' आशा भोसले. चित्रपट-सुवासिनी.संगीत-सुधीर फडके (१९६१) 'सख्या रे घायाळ मी हरिणी' लता. चित्रपट-सामना. संगीत-भास्कर चंदावरकर (१९७४) 'नंदाघरी नंदनवन फुलले' भावगीत -सुमन कल्याणपूर. ------------------------------------- दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र'पुरवणी.रविवार दि.१०.१०.२०२३.

No comments:





संगीत आणि साहित्य :