मराठी साहित्यात आणि त्यातही गझलच्या प्रांतात ज्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.ज्यांची शब्दसंपत्ती वाचकांना अंधाराच्या पायवाटे सोबत चालतांना प्रकाशाची उधळन करीत दिशा दाखवतील असा अनुभव सातत्याने मिळत राहतो.पुस्तक हाती पडल्यावर सुटत नाही असा सुधाकर कदम यांचा “ काळोखाच्या तपोवनातून ” हा गझल संग्रह वाचताना वाचकांना आत्मभान देत जातो. सुधाकर कदम हे अवघ्या महाराष्ट्राला गझल संगीतबध्द करणारे संगीतकार म्हणून माहीत असले तरी ते शब्दाचे पूजक आणि साधक आहेत.त्यांनी गझल,कविता,विडंबनकार,गीतकार असा बराच प्रवास केला आहे.त्यांचा हा संग्रह वाचतांना वाचकांना भावतरलता आणि त्याचवेळी त्यांचे जीवन चिंतनाचा अनुभव वाचायला मिळतो.
माणस माणसांपासून वर्तमानात दूर जाता आहेत.माणसांची नाते सैल होता आहेत.नात्यातही व्यवहार पाहिला जातो आहे.स्वार्थाच्या बाजारातील बंध अधिक घटट होत असल्याने नाते विरळ होता आहेत.याचे कारण ती नाती हदयांसी बांधली गेलेली नाही हे वर्तमानातील वास्तव आहे.आपण जेव्हा हदयाशी नाते सांगत बंध निर्माण करतो तेव्हा त्याचा अनुभव वेगळाच असतो.त्यातील अनुभूतीचा आंनदही अनुभवायला हवा आहे.ते लिहितात...
कधी कुणाला अपुल्या हदयी वसवून बघ ना
अजून काही नवीन नाती जुळवुन बघ ना
खरेतर कविता,गझलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असताना अनेकदा कवी जीवन तत्वज्ञानाचे दर्शन घडवत असतो. अनेकदा समाजाचे वास्तव दर्शनही त्या शब्दांच्या माध्यमातून घडते . त्यासाठी कवी आपल्या जीवनाचे अनुभव,आपल्या भोवताल मध्ये जे काही दिसते तेही शब्दात नेमकेपणाने व्यक्त करीत वाचकांना आनंद आणि तत्वज्ञानाचे दर्शन घडवितांना दिसतात. वरवरच्या सौंदर्यांच्याला भाळत लोक त्याचे कौतूक करतील पण ते सौंदर्य ज्या काटयावरती टिकून आहे त्या काटयांच्या वाटयालाही दुःख आहेच.समाज व्यवस्थेतही सत्याच्या वाटेने जाणा-याच्या वाटयाला काटयासारखी उपेक्षा येत असते.आपण शेर समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर बरेच काही उलगडत जाते.त्यामुळे आपल्या भोवतालमध्ये जे काही दिसते आहे ते खेदाने व्यक्त करताना म्हणतात...
मिळती जरी फुलांना अगणित घरे सुखाची
काटयास मात्र येथे कसलाच ना निवारा
गझल,कवितामधून प्रेम व्यक्त केले जाते. प्रत्येकाच्या तारूण्यात मनातील भावभावनांच्या गंधीत आठवणी असतातच.त्या काळात मनातील भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून कविता आधार बनतात.तर वाचकांही तारूण्यातील प्रेमासाठी अनेकदा शेर उपयोगी पडत असतात. जीवन अनुभव घेऊन आपला प्रवास सुरू राहीला तर वय वाढत जाते पण मनातील भावना मात्र सतत ताज्या आणि टवटवीत असतात.त्या जुन्या आठवणीना आजही उजाळा देताना कदम लिहितात...अर्थात हा अनुभव प्रत्येकाचाच असतो.आनंदाच्या आठवणी नेहमीच प्रसन्न असतात..
मनात माझ्या अजूनही तू तशीच आहे
फुलासारखी प्रसन्नताही अजून तशीच आहे..
माणसांच्या ढोंगीपणाचा कळसही आपल्या भोवतालमध्ये सातत्याने दिसत असतो.माणसं वरवर फारच देखावा करतात.वर्तनातील बाहय वर्तन बदलते .मात्र अंतरिक परीवर्तनाची कास असावी लागते ती हरवली जाते.माणसं बदलतात मात्र या बदलाने फार काही साधले जात नाही.अनेकदा भगवे वस्त्र अंगावर घेतले जात असले तरी वरून साधू बनता येईल पण त्या वस्त्राच्या आत असलेला त्याग आणि वैराग्य आतून यायला हवे असते.त्यामुळे वस्त्र परीधान करूनही भोगाची वृत्ती संपत नाही त्याबददल खंत समाजाला असतेच.असे सर्वच क्षेत्रात सुरू आहे..त्या देखाव्यावरती प्रहार करताना गाळ अंतरिच्या या गझलेत ते लिहितात..
भगव्यास पांघरूनी वरतून शुध्द झालो.
पण गाळ अंतरिचा तो राहिला बिचारा
माणसांचे जीवन खरेतर त्या एका नियती नावाच्या अनामिक शक्तीशी जोडलेले आहे.जीवन म्हणजे दुःखाचा सागर आहे हे संतानी वास्तव सांगितले आहेच.मात्र तरी जीवन रूपी चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करावा लागतो.त्यातून सुटका करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यावर मात करणे होत नाही.जे संचिती असते ते भोगावेच लागते.कारण नियती जोखडून ठेवत असते..त्या संदर्भाने कवी लिहितात..
आयुष्याच्या चक्रव्यूहातून कधीच सुटका नसते.
नियती त्याला दळण्यासाठी खुंटा मारून बसते.
जीवनात दुःख सामावलेले आहे.ते दूर करण्याचा प्रयत्न सातत्याने माणसं करीत असतात.अशा परीस्थितीत वास्तवाचा स्वीकार करीत त्यावर मात करण्याची गरज आहे.मात्र या कालचक्रातील या वर्तूळात हे घडत राहाणार आहे त्याला आपण का भ्यावे ? त्याला सामोरे जाताना आपण अधिक आंनदाने प्रवास करायला हवा.त्याकरीता मानवी जीवनात हास्य हा महत्वाचा उपाय आहे.माणसांने सतत हसत रहावे आणि त्याच बरोबर इतरांना हास्य देत रहावे हे जीवनसूत्र पाळत गेलो तर बरेच प्रश्न सुटू शकतात म्हणून कवी लिहितात.
हासुनी हसवायचा हा मंत्र घे
दुःख का कुरवाळतो तू सांग ना!
आपण जीवनात सुख दुःखाचा अनुभव घेत असतो.त्या अनुभवात हसणे आणि रडणे या नैसर्गिक क्रीया घडत असतात.खरेतर जीवनात कोणताही अनुभव आला तरी त्या परीस्थितीत आपले आपणच जगत असतो.हा सारा अनुभव आपला व्यक्तीगत असतो.त्यामुळे या काळात आपण स्वतःला समजावत दुःखाच्या काळात सुखाने फुलता यायला हवे.अर्थात आपण जीवनाकडे कसे पाहतो याला अधिक महत्व आहे.त्यामुळे वाचकांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलावे म्हणून ते म्हणतात
हसूनी वा रडूनिया तुझे तुला जगायचे
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे
जीवनात माणसांने आपला प्रवास कसा सुरू ठेवायचा यामागे प्रत्येकाचे असे काही तत्वज्ञान असू शकते.जीवन अनुभव भिन्न असले तरी अनेकदा दुःखावर मात करण्यासाठी असलेले मार्ग समान असू शकतात.त्या संदर्भाने कवी वाचकांना काही सांगू पाहता आहेत.त्याच बरोबर आपला अध्यात्मिक प्रवास हा देखील मुक्तीसाठी असतो.ती मुक्ती प्राप्त करण्यासाठी लोक कितीतरी विविध मार्गाने प्रयत्न करतात.मात्र कवी मुक्तीचा साधा सोपा उपाय सांगता आहेत.कवी त्यासाठी अभंग या प्रकारात उपदेश करतांना लिहितात
दीन दुःखितांना / मदत जे करी
तेणे मुक्ती चारी / साधलिया
माणसं जीवनभर आपला प्रवास सुरू ठेवताना तो सुखाचा व्हावा म्हणून एका शक्तीमान असलेल्या निर्मिकाची प्रार्थना करीत असतात.ती प्रार्थना प्रत्येक धर्माची व्यक्ती करीत असते.आपला देव वेगळा असला तरी त्याचेकडे मागणे एकच आहे.ते मागणे जीवनशुध्दी आणि जीवनातील दुःख कमी करण्यासाठी असते.जीवनातील दुःखाचे मुळ कारण केवळ तृष्णा आहे हे कवीला माहित आहे.आपली जीवनातील तृष्णा संपली , की जीवनानंदाचा प्रवास सुरू होईल म्हणून ते अज्ञाताची हाक या कवितेत लिहितात..
कोणाचिही करा / एकत्र प्रार्थना
मिटवाया तृष्णा / निरागस
जीवनाच्या वास्तवाचे दर्शन अनेकदा काव्यातून वाचकांना होत असते.आपण जीवनभर आपले आपले असे करत जगतोच.स्वार्थाच्या पलिकडचा प्रवास तसा फारसा होत नाही.अशा परीस्थितीत आपण बरेच काही गमावत असतो.त्या गमविण्याची चिंता आयुष्याच्या शेवटी लागते.अशा परीस्थितीत जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर जीवनाच्या वास्तवाचे दर्शन घडते.जीवनाचा प्रवास प्रत्येकाला एकटयालाच करायचा आहे.सोबत कोणीच नसते अखेरच्याक्षणी..मात्र ही जाणीव आयुष्यात होत नाही..जीवनाचे वास्तव दर्शित करताना कवी सांगू पाहाता आहेत.
सरणावरती चढतो जेव्हा
कोणी नसते त्याच्या पाठी
आपल्या भोवती जे काही दिसते त्याच्या वेदना साहित्यातून येण्याची गरज असते.साहित्य हे अनुभवाची मांडणी असते.त्या अनुभवाच्या शिवाय येणारे साहित्य हे वाचकांच्या अंतकरणाला स्पर्श करू शकणार नाही.मात्र अलिकडे साहित्यातही बरेच काही घडते आहे.साहित्यातील वास्तवाचे दर्शन ते घडवितात.आपण गरीबीच्या वेदना पोटभर आहार घेऊन मांडल्याने त्यातून त्या साहित्यातून फार काही परीवर्तन घडण्याची शक्यता नाही.अनुभव शुन्यतेची मांडणी समाज परीवर्तन करू शकणार नाही.ही जाणीव निर्मळ अंतकरणाच्या लेखकाला असते म्हणून कवी ती सल मांडताना लिहितात
ए.सी.त बसोनी / शेतक-यावरी
लिही कांदबरी / मुंबईत
माणसं ढोंगीपणाने वागत असतात ,त्या ढोंगीपणावर केलेला प्रहार अनेकदा वाचताना मिळतोच.समाजातील या वास्तवाचे निरिक्षण करीत असताना ,त्यांना काय म्हणावे ? असे प्रश्न पडतो तेव्हा कवी अत्यंत सोप्या भाषेत त्याची उत्तरे देऊ पाहाता आहेत.उत्तम समाजाची निर्मिती हे प्रत्येक चांगल्या माणसांचे स्वप्न असते.त्या प्रवासात चांगली माणसं कोणती याची उत्तरे आपल्याला मिळत जातात..कवी काही माणसांची लक्षणे नमूद करतात..ते लिहितात..
ज्याच्या तोंडामध्ये / तंबाखू नि बिडी
तयासी पाखंडी / म्हणावे गा
व्यसनापासून मुक्त असलेला समाज हा नेहमीच चांगल्या समाजाचे लक्षण आहे.या कविता संग्रहात कधी गझल , कधी अंभग ,कधी निव्वळ कविता अनुभवायला मिळते.शब्दाचा फुलोरा न करता जीवन तत्वज्ञानाचे दर्शन या संग्रहात घडते.अत्यंत सुक्ष्म निरिक्षणही आपल्याला अनुभवायला मिळते.संगीत साधनेने जीवनाला मिळालेला आंनदाचा मार्गही अनुभवता येतो.कविता संग्रह अत्यंत वाचनीय झाला आहे.कविता संग्रहाचे अविनाश वानखेडे यांचे मुखपृष्ठही वाचकांना चिंतन करण्यास भाग पाडते.
कविता संग्रहाचे नाव- काळोखाच्या तपोवनातून
कवी- सुधाकर कदम
प्रकाशक-स्वयं प्रकाशन,सासवड,पुणे
पाने-९६
किंमत-१५०
-संदीप वाकचौरे
----------------------------
◆ काळोखाच्या तपोवनातून
◆ कवी : गझलगंधर्व सुधाकर कदम
◆ प्रस्तावना : डॉ. राम पंडित
◆ मुखपृष्ठ : डॉ. अविनाश वानखडे
◆ प्रकाशक : स्वयं प्रकाशन मो. 8888769659
*प्रकाशन २४ डिसेंबर २०२१*
एस. एम. जोशी सभागृह, पुणे
सायं. ६.०० वा.
संग्रह मिळवण्यासाठी तपशील -
किंमत रु. १५० + टपालखर्च ५०
● ऑनलाइन पेमेंट करिता खाते क्र.
A/c no : 053312100004140
IFSE Code : BKID0000533
बँक ऑफ इंडिया,पुणे.
google pay - 8888858850
No comments:
Post a Comment