गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, August 8, 2021

गझलगंधर्व - मयूर महाजन



    संगीताचा ध्यास बाळगणारे अनेक कलाकार संगीत जगताला लाभले आहेत.त्यापैकी एक उल्लेखनीय नाव म्हणजे मराठी गझल गायक व संगीतकार सुधाकर कदम होय.मराठीतील आद्य गझलकार म्हणून जसे सुरेश भटांचे नाव येते, तसेच मराठीतील आद्य गझल गायक म्हणून सुधाकरजींचे नाव येते. फक्त गझलच नाही तर शास्त्रीय गायन, सरोद वादन, मेंडोलिन वादन, सुगम संगीत गायन या सोबतच स्वररचनाकार व संगीतकार म्हणूनही त्यांनी अतिशय मोलाचे कार्य संगीत क्षेत्रात केले आहे. त्यांच्या स्वररचनांमधून ज्या वेगवेगळ्या सुरावटी रसिकांसमोर आल्या त्यावरून त्यांचे या क्षेत्रातील कौशल्य व शास्त्रीय संगीताचा गहिरा अभ्यास स्पष्टपणे दिसून येतो.
     शास्त्रीय संगीत हे मुख्यत्वे स्वरप्रधान संगीत आहे.भावगीत वा गझल  गाताना त्यातील शब्दप्रधानता प्रकर्षाने जाणवते.त्यातल्या त्यात गझलगायन प्रकारामध्ये संगीत, काव्य व लयकारी याचा समसमा आनंद घेता येतो. याबाबतीत पं. रामकृष्णबुवा वझे म्हणतात...'गझल गायकीला आपले असे स्वत:चे  एक आगळे वेगळे अती मोहक स्थान आहे.शब्दोच्चार स्पष्ट असले आणि ते विविध अंगांनी नटविण्याची कुवत गायकात असली तर गझलगायनातून ख्यालगायनाइतकी रसोत्पत्ती होऊ शकते आणि ती सुलभरीत्या रसिकांपर्यंत पोहचू शकते.'
     सुधाकर कदमांच्या  बाबतीत ज्येष्ठ भावगीत गायक स्व.गजानन वाटवे यांनी काढलेले 'मला भावलेला मराठी गझल गायक' (त्यांच्या रोजनिशीत नमूद करून ठेवलेले) उद्गार सार्थ ठरतात.याचे कारण त्यांच्या स्वर-रचनांना  असलेली शास्त्रीय संगीताची पक्की बैठक आणि काव्यानुरूप स्वररचना हे होय.खरे तर सुगम संगीत हे नावालाच सुगम असते, प्रत्यक्षात ते सुगम नसते.सुधाकर कदमांच्या मी ऐकलेल्या रचना या प्रकारातीलच आहेत.पं.शौनक अभिषेकी व अनुराधा मराठे यांनी गायिलेल्या 'अर्चना' या अल्बममधील रचनांचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न झाला तेव्हा निवेदिकेने या दोघांना सुधाकरजींच्या स्वर-रचनांबद्दल विचारले असता ते म्हणाले, 'रचना ऐकायला सोप्या पण गायला कठीण .' यावरून त्यांची संगीतकार म्हणून एक वेगळी हुकमत दिसून येते.
     एकदा आम्ही सहज बसलो असता त्यांनी ११ मात्रेच्या (सवारी) तालात स्वरबद्ध केलेली मराठी गझल ऐकवली. माझ्या माहितीप्रमाणे मराठी व हिंदी सुगम संगीताच्या क्षेत्रातील ही पहिलीच रचना असावी.नेहमीप्रमाणे केरावा, दादरा, रूपक, व्यतिरिक्त चाचर-सवारीसारख्या तालाचा सुगम संगीताकरीता वापर करून मूळ बोलाव्यतिरिक्त तेवढ्याच मात्रात विविध बोल बसवून रचनेला उठाव देणे, हे त्यांचे आणखी एक वैशिष्ठ्य आहे.
     संगीतकाराला काव्याचेही सखोल ज्ञान असणे आवश्यक असते.सुरेश भटांच्या दीर्घ सहवासामुळे त्यांचा हा अभ्यासही मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे शब्दातील भाव सुरावटीतून व्यक्त करण्याची हातोटी त्यांना साध्य झाली आहे. 

     'जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही ' 

     ही गझल त्यांनी मारवा या रागात स्वरबद्ध केली आहे. पण 'एकदा तुटलो असा कि मग पुन्हा जुळलोच नाही' या दुसऱ्या ओळीतील 'तुटलो' या शब्दासाठी मारव्यात नसलेला कोमल मध्यम व 'जुळलोच' या शब्दाकरिता केलेला कोमल धैवताचा प्रयोग अतिशय समर्पक असल्यामुळे 'दाद लेवा बन गया !' गझलगायकीचे हेच वैशिष्ठ्य असावे.काव्य जसे आपला आशय घेऊन चालते तशीच स्वररचनाही  त्या आशयाला अधिक स्पष्ट करत चालते. 'साईन लाईन व क्रॉस लाईनचा संबंध प्रत्येक कडव्याशी सतत येत असतो. हा संबंध सांगीतिकदृष्ट्याही टिकविणे ही संगीतकाराची फार मोठी जबाबदारी असते.असा सुसंवाद त्यांच्या अनेक रचनातून जाणवतो.

      'दिवस हे जाती कसे अन ऋतू असे छळतात का ?'

     या गझलमध्ये मुखडा षड्ज व त्याभोवती ठेवलाय तर पुढची ओळ मध्यम व त्याच्या आसपासच्या स्वरांभोवती फिरते.त्यामुळे या दोन्ही ओळी संपतात तेव्हा या दोन्ही ओळींना सांगीतिक पूर्णत्व आलेले असते. या गझलेकरिता त्यांनी भीमपलासी , मधुकौंस या रागांचे मिश्रण केले आहे, पण आशयाशी सुसंगतच. काव्यातील भावार्थानुसार बदलत जाणारी स्वररचना हे त्यांचे आणखी एक वैशिष्ठ्य...

     'कुठलेच फूल आता मजला पसंत नाही.'

     'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा.'

     'घाव ओला जरासा होता.'

      'शक्ती दे तू आज मजला .'

      'हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही.'

     अशा अनेक रचना भूपाली, बिहाग, भीमपलासी, यमन, कौशीकानडा, मालकौंस, भूपेश्वरी, मारवा, भैरवी, पहाडी, (त्यांचा स्वत:चा) 'मध्यमी' वगैरे रागांचा उपयोग करून त्यांनी स्वरसाज चढविला आहे.
     मराठी भाषेचे व साहित्याचे सखोल ज्ञान त्यांना आहेच, पण त्याचबरोबर उर्दूचाही अभ्यास करून उर्दू गझलाही त्यांनी तेवढ्याच ताकदीने स्वरबद्ध केल्या आहेत.हे त्यांनी हाथरसच्या (उत्तर प्रदेश)  'संगीत' मासिकामधील 'नग़्म-ए-ग़ज़ल' या सदराकरीता केलेल्या स्वरलिपीवरून व वेगवेगळ्या गायकांकडून गाऊन घेतल्याने कळून येते.
     त्यांनी स्वरबद्ध केलेले व सुरेश वाडकर,अनुराधा मराठे, पं.शौनक अभिषेकी, वैशाली माडे अशा अनेक गायक-गायिकांनी गायिलेले 'भरारी', 'खूप मजा करू', 'अर्चना', 'काट्यांची मखमल', 'तुझ्यासाठीच मी...' इत्यादी अल्बम रसिकप्रिय झाले आहेत.ते स्वत: कवी, लेखक आहेत. अशा बहुआयामी कलावंताला दीर्घआयुरारोग्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून संपवतो.

*डॉ.#श्रीकृष्ण_राऊत संपादित व #अक्षरमानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ '#चकव्यातून_फिरतो_मौनी' २०१८ मधून ...


 

 

No comments:





संगीत आणि साहित्य :