गझल कोणतीही असो ती जोरकसपणे गायिलीच पाहिजे असा भ्रम बराच काळपर्यंत आपल्याकडे होता.कदाचित त्यावेळी ध्वनिवर्धक नसल्यामुळे कदाचित असे गावे लागत असावे.पण हीच पद्धत पुढेही अनेक वर्षे कायम राहिली.गझलच्या शब्दार्थापेक्षा व त्यातील भावनांपेक्षा फक्त गायकीलाच महत्व दिल्याचे जुने गझल गायक/गायिकांचे गायन ऐकल्यावर प्रामुख्याने जाणवते.प्रेम, विरह,याचना,नाजूक दटावणी,सौंदर्य वर्णन,साक़ी,शराब,मैखाना काहीही असो प्रत्येक शेर ख्यालाप्रमाणे एकसुरी,म्हणजे बंदिशीला धरून गायिल्या जायचा.अर्थात गाणारे पट्टीचे गायक/गायिका असायचे ही बाब वेगळी.पण हळू-हळू गझलमधील शब्दांकडे लक्ष देऊन त्याला अर्थानुरूप बंदिश बनवून शब्दांना सजविण्याचा प्रयत्न सुरू झाला.त्यामुळे पूर्वी गायिल्या जाणार्या् क्षुद्र प्रवृत्तीच्या ठरविल्या गेलेल्या पिलू,खमाज,झिंझोटी वगैरे विशिष्ठ रागांच्या जोखडातून गझल गायकी मुक्त होऊन दरबारी,मालकौंस,सारख्या मान्यवर रागातही गझलच्या बंदिशी तयार व्हायला लागल्या.हा बदल होण्यामागे चित्रपट संगीताचा फार मोलाचा वाटा आहे.
चित्रपट संगीत लोकप्रिय झाल्यामुळे जुन्या सर्व गझल गायक/गायिकांची मिरासदारी चित्रपटातील सुमधुर गाण्यांमुळे संपुष्टात यायला लागली होती.त्यातील नादमधुरता,शब्दानुरूप स्वर-रचना,शब्दांची फेक,स्वरांचे बेहलावे,पोषक वाद्यवृंद व गायनातील नाजुकता लोकप्रिय व्हायला लागली होती.हा फरक जाणवायला लागल्याबरोबर आपल्या देशातील अनेक गझल गायक/गायिकांनी शास्त्रीय संगीताचा मूळ गाभा कायम ठेवून वरील सर्व प्रकार आत्मसात करून गझल गायकीचा ढंगच बदलून टाकला.यात जगजितसिंग हे अग्रेसर राहिले.ज्या काळात चित्रपटातून सुद्धा मेलोडिअस गाण्यांना उतरती कळा लागली होती त्या काळात मेलोडी कायम ठेवून,कठोर आत्मपरीक्षण करत-करत त्यांनी आपली वेगळी पण लोकप्रिय शैली निर्माण केली.
"मिलकर जुदा हुए तो न सोया करेंगे हम..."
ही क़तील शिफ़ाई यांची,जगजीत-चित्रासिंग यांनी गायिलेली सुंदर गझल ’तोडी’ नामक रागात अतिशय वेगळ्या प्रकारे,रागस्वरूपाला धक्का न लावता बांधलेली आहे.तोडी रागाची अनेक रुपं आहेत.त्यात आपल्या सारख्या रसिक मंडळींनी खोलात जाण्यात काही अर्थ नाही.कारण तो सुद्धा लेखाचा एक वेगळा विषय आहे.या रागात सा रे ग म ध नि असे स्वर लागतात.(अवरोहात पंचम स्वराचा वापर काही गायक करतात.)यातील रिषभ,गांधार,धैवत स्वर कोमल असून मध्यम तीव्र आहे.गानसमय सकाळचा आहे...अर्थात ही वेळ फक्त शास्त्रीय गायन,वादन करणार्यांसाठीच आहे.कारण या रागातील जेवढी काही चित्रपट व चित्रपटाबाहेरची गीते,भावगीते,भक्तिगीते आहेत ती सर्वकाळ गोड वाटतात,हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे.
तोडी राग जवळ- जवळ प्रत्येक गायक-वादकाने गायिला-वाजविला असावा.पं.भीमसेन जोशींच्या तोडीतील ताना, मेघांच्या गडगडटाला आव्हान देणार्या होत्या.तर प्रत्येक स्वराचे महत्व जाणून त्याचा अतिसुंदर विस्तार किशोरीबाईंच्या गाण्यात दिसून येतो.पं.जसराज यांची प्रत्येक राग गाण्याची
आपली एक वेगळी शैली आहे.तेथे कदाचित शास्त्र थोडे बाजूला पडत असेल.पण ज्याला ’मेलोडी’ म्हणतात ती त्यांच्या गायनात,ऐकतांना सतत जाणवते.याचा अर्थ इतर गायकांनी गायिलेला तोडी ऐकण्या सारखा नाही किंवा नसतो असे नाही.उदाहरण देतांना लोकप्रिय कलाकारांचेव नाव घ्यावे लागते,त्याला इलाज नाही.
अशा या तोडी रागाचे मला सर्वप्रथम आठवते ते ’आशिर्वाद’ या चित्रपटातील
’एक था बचपन...’
हे गाणे.त्यानंतर
’भावभोळ्या भक्तिची ही एकतारी...’
हे श्रीनिवास खळे यांनी तोडीच्या स्वरांसोबत इतर स्वरांचा ताना-बाना करून विणलेल अतिशय तलम गाणं,संगीतकाराच्या प्रतिभेची उत्तुंग झेप दाखविते.खळ्यांनीच स्वरबद्ध केलेला तुकारामाचा अभंग
’अगा करूणाकरा...’
हा अभंग ऐकतांना डोळे आपोआप झरायला लागतात.तसेच ’पिंजरा’ या चित्रपटाती. राम कदमांनी स्वरबद्ध केलेलं व सुधीर फडक्यांनी गायिलेलं
’कशी नशीबानं थट्टा आज मांडली...
’हे ही गाणे तोडी रागा मध्येच आहे.’अमर प्रेम’ या चित्रपटातील
’रैना बीती जाए...’
याचा मुखडाही याच रागात आहे.
साबरी बंधुंनी गायिलेली
’अल्ला हे अल्ला...’
ही सुंदर कव्वाली त्यांच्या गायकीने रात्रीच्या वेळी सुद्धा वेगळ्या विश्वात नेवून तल्लीन करते.तर त्यांनी दुसर्या ओळीत कोमल मध्यमाचा वापर वापर करून केलेली स्वरांची बांधणी भल्या-भल्यांनबुचकळ्यात टाकते.त्यांच्या गाण्यातील आर्तता सरळ हृदयात घुसून अमिर खुस्रोच्या ’सूफी’ संगीताची ’खरी’ ओळख पटवते.मध्यमाचा असाच काहीसाप्रयोग अनूप जलोटा यांनी
’तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना लगे’
या गझलच्या बंदिशीत केला आहे,तो पण श्रवणीय आहे.
माझ्या मते गानसमयापेक्षाही त्या त्या रागातील स्वरांचा उपयोग संगीतकार कशा प्रकारे करतो,गायक-गायिका कशा प्रकारे प्रस्तुती करते आणि वाद्यमेळ कसा जमतो यावर श्रोत्यांची आवड-निवड ठरत असावी.तसे नसते तर तोडी रागातील गाणी सकाळ सोडून इतर वेळी कानाला गोड लागलीच नसती.काही-काही गोष्टी परंपरेने ठरवून-ठरवून डोक्यात भरविल्या जातात त्यातलाच गानसमय हा प्रकार असावा असे मला प्रामाणिकपणे वाटते.असो...हा वादाचा मुद्दा आहे.
माझ्याकडून स्वरबद्ध झालेली बशर नवाज साहेबांची
’न इस तरह भी ख़यालों मे कोई बस जाए’
ही गझल तोडी रागात आहे.मतला शुद्ध तोडीमध्ये,पण अंतरा मात्र वेगवेगळ्या रागांचा अविर्भाव-तिरोभाव दाखवत मुर्छना पद्धतीने मूळ तोडीवर येतो.ही स्वरांची वेगळी मोहमयी गुंतागुंत आपणास नक्कीच भावेल.ऐका तर...
न इस तरह भी ख़यालो मे कोई बस जाए
मैं अपने आप को सोचूँ किसी की याद आए
तमाम रात रहा नींद का सफर जारी
सजे रहे किसी आँचल के मेहरबाँ साए
तुम्हारे पास पहुँचकर कुछ ऐसा लगता है
सफ़र से जैसे मुसाफिर वतन में आ जाए
वो चंद पल जो बचा लाए थे हम अपने लिए
सितम तो ये है के वो भी न हमको रास आए
हमारी जीत अलग है,हमारी हार अलग
ज़माने वालो को ये बात कौन समझाए
Singer-Rasika Janirkar
Shayar-Bashar Nawaz
Music Composer-Sudhakar
Live,Sanskruti Arts Festival,THANE 20015
No comments:
Post a Comment