गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, November 11, 2013

कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले...


-प्रस्तावना-


कोणताही साहित्यप्रकार हा त्या-त्या साहित्यिकाच्या स्वभावानुरूपआकार घेत असतो. मग ती कथा असो, कादंबरी असो, वा कोणताही काव्यप्रकार असो... कथा वाचूनही लेखकाच्या स्वभावाचे पैलू कळतात की हा लेखक कोणत्या धाटणीचा आहे. आणि कवितेत तर त्या कवीचे अंतरंगच उलगडून ठेवलेले असतात. शिवाय कवी हा इतर कोणत्याही साहित्यिकाहून अधिक संवेदनशील असतो. अगदी झाडावरून गळणारं पिकलं पान पाहून सुद्धा त्याचं मन हेलावून जातं. केवळ कविता वाचूनच जातीवंत कविचा जीवनपट नजरेसमोर उभा ठाकतो.

गझल हा तसा तंत्रानुगामी काव्यप्रकार... यात मात्रांचे, वृत्ताचे बंधन असल्यामुळे फार कमी कवी या प्रकाराकडे वळले आहेत. आणि या प्रकाराकडे वळलेल्यांमध्येही फार कमी लोकांनी चांगली गझल मराठी साहित्याला दिली आहे. गझलकारांचा आकडा शेकड्यांनी असला तरी सकस गझल लिहिणा-यांची संख्या उणीपुरीच आहे.

गंगाधर मुटे हे असेच एक उल्लेखनीय नाव आहे. मातीचं गाणं लिहिणा-या या कवीची नाळ मातीशी कायम जुळलेली आहे. रानमेवा हा त्यांचा काव्यसंग्रह आधीच प्रकाशित झाला आहे. मुळात शेतकरी असल्यामुळे मातीशी तसेही नाते जडलेले. शिवाय गंगाधर मुटे हे शेतकरी संघटनेचे खंदे कार्यकर्ते असल्यामुळे शेतक-यांच्या अडी-अडचणींना, व्यथांना त्यांच्या लेखणीतून वाचा फुटलेली दिसते.

पुसतो सदा आसवांना तो पदर भुमिचा ओला
आसू पुसता हळूच पुसतो आली जाग शिवारा

अशी रचना त्यांच्या लेखणीतून सहज साकारते. अनेकदा त्यांची लेखणी पीक, पेरणी या विषयावर मार्मिक टीप्पणी करते. अशावेळी व्यथा सांगत असतानाच ते पुसटसे बंडखोर देखील होताना दिसतात... त्यांची ही एक गझल पहा...

स्मशानात जागा हवी तेवढी…

कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, 
नवे बीज ते अंकुरावे कसे ?
तणांचाच जेथे असे बोलबाला,
तिथे अन्य काही रुजावे कसे ?


पुन्हा आज होऊ नये तेच झाले,
कशा थांबवाव्या वाताहती ?
हवेनेच केला जिथे कोंडमारा,
तिथे प्राण जाणे टळावे कसे ?


तुझा पिंड आहेच विश्वासघाती,
तसा एक अंदाज आहे मला
तरी जीव गुंतून जातो तुझ्याशी,
मनाचे पिसे कुस्करावे कसे ?


जरी सत्य तू बोलशी मान्य आहे,
परी त्यास आहे कुठे मान्यता ?
सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे,
पुरावे तुझे मान्य व्हावे कसे ?


कशी एकटी हिंडते रानमाळी,
जरी अर्धवेडी भिते ना कुणा
तिला फक्त भीती जित्या माणसाची,
पशूंना तिने घाबरावे कसे ?


कसा व्यएथ नाराज झालास आंब्या,
वृथा खेद व्हावा असे काय ते
फळे चाखण्याचेच कौशल्या ज्याला,
तया बोलणे ते जमावे कसे ?


शिवारात काळ्या नि उत्क्रांतलेल्या 
खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
जिथे कुंपणे शेत खाऊन गेली,
तिथे त्या पिकांनी लपावे कसे ?


‘अभय’ काळजी त्या मृताची कशाला,
स्मशानात जागा हवी तेवढी
समस्या इथे ग्रासते जिवितांना,
विसावा कुठे अन् बसावे कुठे ?


कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, 
नव्या पिकांची नवीन भाषा, 
मरणे कठीण झाले, 
भुईला दिली ओल नाही ढगाने, 
भाजून पीक सारे पाऊस तृप्त झाला, 
आत्महत्या बळीच्या तू रोख वामना, 
गहाणात हा सातबारा... 
या त्यांच्या रचना विशेषत्वाने शेतक-यांच्या व्यथा मांडणा-या आहेत. पण गंगाधर मुटे हे कुठेही एकाच विषयात अडकून पडलेले दिसत नाहीत. मातीचं गाणं लिहिणारा हा कवी शृंगार देखील काव्यात तितक्याच खुबीने मांडताना दिसतो... आणि...

ती बोलली तरी का शब्दास नाद येतो
त्या बोलक्या स्वरांचे झंकार चित्तवेधी
असा एखादा शेर आपल्याला वाचायला मिळतो.

मक्ता या गझलेतील एका परंपरेची कास गंगाधर मुटे यांनी धरलेली दिसते. मक्ता म्हणजे कवीचे नाव अथवा टोपणनाव असलेला शेवटचा शेर... गंगाधर मुटे हे काव्यात आपले अभय हे टोपणनाव वापरतात. मक्ता लिहिताना एका गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते. ती म्हणजे मक्त्यामध्ये आपले नाव लिहिताना तेथे एखाद्या मौल्यवान शब्दाची जागा वाया तर जाणार नाही ना ? किंवा हे नाव त्या शेराच्या अर्थाला पूरक आहे ना ? या गोष्टींची काळजी घेणे. आणि अशी काळजी गंगाधर मुटे यांनी घेतलेली दिसते... मक्ता असलेले त्यांचे काही शेर पहा...

संचिताचे खेळ न्यारे... पायवाटा रोखती
चालता मी अभय रस्ता काळही भारावला

अभय एक युक्ती तुला सांगतो मी, करावे खरे प्रेम मातीवरी या
भुईसंग जगणे... भुईसंग मरणे... भुईसंग झरणे... वगैरे वगैरे

आता अभय जगावे अश्रू न पाझरावे
आशेवरी निघावे ही वाट चालताना

नको रत्न मोती, न पाचू हिरे ते
अभय ते खरे जे मिळाले श्रमाने

आत्मह्त्या बळीच्या तू रोख वामना
मी अभयदान इतके मागून पाहिले

घे हा अभय पुरावा त्यांच्या परिश्रमाचा
ती माणसेच होती जी कोहिनूर झाली

गंगाधर मुटे यांना कवितेच्या, गझलच्या रुपाने जगण्याचे संचित गवसले आहे. म्हणूनच तर ते म्हणतात...

वृत्तात चालण्याचे शब्दास भान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले

खूप काही चांगले लिहिण्याची क्षमता असणा-या गंगाधर मुटे यांना पुढील गझल लेखनासाठी शुभेच्छा...

सुधाकर कदम 

जागतिक दृष्टिदान दिन
सोमवार,१० जून २०१३



No comments:





संगीत आणि साहित्य :