गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, April 20, 2026

कृष्ण शब्द, आशा स्वर

  कोणाचे आयुष्य कुठे,कसे वळण घेईल हे सांगताच येत नाही.मित्रवर्य श्रीकृष्ण राऊत याचे बाबतीत असेच काही घडले.अचानक चित्रपट निर्माते प्राचार्य (अकोला) डॅडी देशमुख हे स्वतः #राघू_मैना या चित्रपटासाठी गीते लिहून घेण्यासाठी श्रीकृष्णाकडे गेले.श्रीकृष्णाने नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.गीत तयार झाले .ती लावणी होती.आणि गाणार होत्या आशा भोसले.किती आनंदाचा क्षण ना! लावणीला चाल बसली, ढोलकीवर थाप पडली आणि पडद्यावर आली... 'ठिणग्या ठिणग्यांची घुंगरं बांधून उभी आग मी सजली' श्रीकृष्णाचे गाणे आशाबाईंनी गावे...क्या बात! काय ते विश्वनाथ मोरे यांचे संगीत,काय ते मधू कांबिकरांचे ठसकेदार नृत्य,आणि काय त्या आशाबाईंच्या गाण्यातील फिरक्यांच्या ठिणग्या ...हाये! या बाबतीत श्रीकृष्णा नशीबवान निघाला. तेव्हा मी श्रीकृष्णाला म्हणालो होतो की,'आता तू मेलास तरी चालेल!' अर्थात हे आनंदातिरेकात माझ्या तोंडून निघाले होते. आज आशाजी नाहीत ही दुःखाची बाब!मी सुद्धा आशाजींसाठी '#आभाळाचे_गर्द_निळेपण_या_डोळ्यांना_यावे' हे यवतमाळच्या स्व.गजेश तोंडरेचे गीत स्वरबध्द केले होते.वर्ष होते १९९९. आर्थिक तयारी सुरू असतानाच गजेश अचानक स्वर्गवासी झाला व हा प्रोजेक्ट थंड बस्त्यात गेला.माझ्या आयुष्यातील एक संधी म्हणा, इच्छा म्हणा... कायमची रुखरुख लावून अपूर्ण राहिली.पुण्यात आल्यानंतर काही वर्षातच हे गीत मी स्वतः खर्च करून प्राजक्ता सावरकर शिंदेकडून गाऊन घेतले.ही माझी आवडती स्वरावली होती.प्राजक्ताचे या गीताचे सोने केले.हे सोने गजेशच्या एका स्मृतिदिनी श्रद्धांजली म्हणून त्याला अर्पण केले. 

-सुधाकर कदम

                                  ■

श्रीकृष्णाचे मनोगत:- आयुष्याला पुरून उरलेलं ऐश्वर्य

     साल १९८०. आम्ही तेव्हा बोरगाव मंजूला भाड्याच्या घरात राहत होतो. एक दिवस अचानक आमच्या घराचा पत्ता विचारत डॅडी देशमुख आले. सोबत वाघ सर होते. आमच्या वेटाळात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. आमच्या राऊत कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. चहापानानंतर डॅडींनी भेटीचे प्रयोजन सांगितले. 'देवकीनंदन गोपाला ' च्या अभूतपूर्व यशानंतर त्यांनी 'राघू मैना ' ह्या चित्रपटाचीतयारी सुरू केली होती.त्या चित्रपटाची गीते लिहिण्याचे आमंत्रण घेऊन दस्तुरखुद्द डॅडी आले होते.खरं तर त्यांनी पंधरा पैशाचे एक पोस्टकार्ड टाकले असते तरी मी धावत पळत गेलो असतो. पण कवी - कलावंताचा सन्मान कसा करावा, हा त्यांच्या देहा एवढाच मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे निसर्गदत्त होता.अकोल्याच्या झेडपी रेस्ट हाऊसला गाण्यांची बैठक ठरली होती. मी पोचलो.संगीतकार विश्वनाथ मोरे, त्यांचे सहाय्यक राजाराम जामसंडेकर, दिग्दर्शक राजदत्त, किशोर मोरे, विठ्ठल वाघ ही मंडळी बैठकीला हजर होती.  पटकथेतला गीताचा प्रसंग आपल्या विलक्षण कथनशैलीने राजदत्तजींनी आमच्यासमोर जिवंत उभा केला. आता त्या प्रसंगाला साजेशा ओळी लिहिण्याची माझी परीक्षा होती. ही बैठक आठ दिवस चालली.गीताचे साठ सत्तर मुखडे तरी लिहिले असतील. पण राजदत्त साहेबांना काही पसंत येत नव्हते. हार न मानता पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होतो आणि हा मुखडा सुचला -

"ठिणग्या ठिणग्यांची 

घुंगरं बांधून 

उभी आग मी सजली

अहो सांभाळा हो

आता नाचते नाचते बिजली "

राजदत्तजींनी 'ओके ' म्हटले. ह्या गीताचे वीस - पंचवीस अंतरे लिहिले. त्यातले तीन 'ओके' झाले.माझ्या त्या गीताला आशाताई गाणार होत्या.माझ्या मनाची अवस्था भावतरल झाली होती.त्या गीताचं रेकॉर्डिंग झालं.

रेकॉडिंगसाठी मला मुंबईला जाता आले नाही. आशाताईंची भेट होऊ शकली नाही. पणमाझ्या शब्दांचं सोनं करणाऱ्या आशाताईंच्या दैवी स्वराने मला श्रीमंत केलं. ते ऐश्वर्य मी आयुष्यभर मिरवत आलो.

 - श्रीकृष्ण राऊत



No comments:





संगीत आणि साहित्य :