गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Thursday, January 25, 2024

आठवणीतील-शब्द-स्वर(लेखांक २४)

.                       
                             ● जर-तर ●

     सुरेश भटांची भेट झाल्यानंतर हळू हळू जुन्या गझलांसह नवीन झालेल्या गझला स्वरबद्ध करण्यासाठी मला देत गेले.तोपर्यंत मी सरोद वादन व स्वरबद्ध केलेल्या उ.रा. गिरी,शंकर बडे,शिवा इंगोले,बबन सराडकर,श्रद्धा पराते,ग्रेस,नीलकांत ढोले, शरद पिदडी,नीलकृष्ण देशपांडे,गजेश तोंडरे, ’बेताब’ अलिपुरी, इंदू कौशिक, अशोक अंजूम,गोवर्धन भारती, विनू महेंद्र, प्यारेलाल श्रीमाल, यांच्या मराठी-हिंदी गीत-गझलांचा संमिश्र कार्यक्रम करायचो.नंतर सुरेश भट आर्णीला माझ्याकडे आले की नवीन गझल,नव्या बंदिशी,मैफली,खवैयेगिरी आणि मूड लागलाच तर आर्णी जवळच्याच काठोडा या छोट्याशा गावातील रमेश माहुरे पाटील या रसिक मित्राकडे गप्पा,कॅरम,मैफिल,खाणे,
आराम असा एकूण कार्यक्रम असायचा.एकदा तर पुष्पा वहिनी (श्रीमती पुष्पा सुरेश भट), चित्तरंजन सुद्धा कठोड्याला आले होते.सोबत कवी कलीम खान असायचेच.सुरेश भटांच्या सहवासाने १९८०/८१ मध्ये माहुरे घरातील तरुणाई कविता करायला लागली होती.

हवा जरासा आसरा
तुझ्या मनाचा कोपरा
सुगंध अलगद हेरतो
गुलाब तू की मोगरा
-अशोक माहूरे

माझ्या खुळया मनाला हेही पसंत होते !
डोळ्यात या तुझ्या जे फसवे वसंत होते!!
आम्हा कफल्लकांच्या प्रेमास जात कुठली ?
खोटे तुझे दिलासे पण जातीवंत होते !!
-मनोज माहुरे

ही तरुण कंपनी सुरेश भटांची सेवा तर करायचीच पण तेवढ्याच खोड्या पण करायचे.त्यांच्या गझलांचे विडंबन करून त्यांनाच ऐकवून प्रेमाच्या शिव्या खाणे हे नित्याचे.
सगळे त्यांना बावाजी म्हणायचे.रमेश पाटलांचे वडील बंधू पांडुरंग पाटील यांच्या घराला एक तळघर होते.दुपारचे जेवण झाले की बच्चा कंपनी त्यांना आराम करण्यासाठी तळघरात घेऊन जायचे.थंडगार तळघरात पलंग,खुर्च्या,
टेबल,पंखा अशी व्यवस्था असायची.तेथे यांच्या गप्पा सुरु व्हायच्या.गप्पा करताना कुणी त्यांचे पाय दाबत,कुणी हात दाबत.भटांना अंग दाबून घायची सवय होती.अंग दाबण्यावरून काठोड्याचाच एक किस्सा आठवला.
दुपारची झोप झाली की पालथे पडून पाटलाकडील गड्याला पाठीवर पाय द्यायला लावून पाठ चेपून घ्यायचे.
एकदा मी व कलीम नेहमीप्रमाणे रविवारी काठोड्याला गेलो असता भटांचा विषय निघाला.त्यांच्या गझलांवर चर्चा सुरू झाल्यावर ते किती मोठे कवी आहेत,त्यांच्या कविता मोठ मोठे गायक गायिका  गातात वगैरे वगैरे...
आमच्या ह्या गप्पा गडी ऐकत होता.तो लगेच म्हणाला 'अस्तिन मोठे,म्या त लै येळा त्यायले तुडवलं हाये' त्याच्या या वाक्यावर हास्यकल्लोळ उठला.
      भटांनी एकदा आर्णीला माझ्याकडे मुक्कामी असताना 'नात' (हजरत पैगंबर साहेबांची स्तुती असलेले गीत) लिहिली.ती सर्वप्रथम मला दाखवली व म्हणाले इथल्या उर्दूच्या जाणकारांना बोलव.मी लगेच मित्र रशीद भाईचे वडील करीम चाचांकडे गेलो व त्यांना सुरेश भटांनी मराठीमध्ये नात लिहिल्याचे सांगितले व घरी येण्याचे निमंत्रण दिले.करीम चाचा म्हणजे उर्दू गझलांची चालती बोलती डिक्शनरीच.आर्णीच्या कंबलपोष बाबांच्या दर्ग्यावरील उरुसात होणाऱ्या कव्वालीचे आयोजन,तसेच कव्वाल ठरवण्याचे काम तेच करायचे.
उर्दूवर कमांड असलेले करीम चाचा घरी आले.सुरेश भटांनी त्यांच्या पद्धतीने नात ऐकवली.चाचा एकदम खुश झाले व नात लिहिलेल्या कागदावर
'बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम' 
( इस्लाममध्ये कोणत्याही कामाचा शुभारंभ  "बिस्मिल्लाह-हिर्रहमा-निर्रहीम" b-ismi-llāhi r-raḥmāni r-raḥīmi بِسْمِ ٱللَّٰهِ ٱلرَّحْمَٰنِ ٱلرَّحِيمِ  याने करतात.'बिस्मिल्लाह'चा अर्थ आहे 'शुभारंभ'!) असे उर्दूमध्ये लिहिले.कारण ती मराठी भाषेत लिहिलेली पहिली नात होती.शब्द होते....

'उजाड वैराण वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद
जगातल्या दीन दु:खीतांचा अखेरचा आसरा मुहम्मद'

(ही सुरेश भटांच्या हस्ताक्षरातील नात माझ्या ब्लॉगवर टाकली असता एका भामट्याने तेथून कॉपी करून त्यावर लेख लिहून जणू काय त्याच्याकडेच ही नात लिहिल्या गेली असा आभास निर्माण केला.माझा किंवा माझ्या ब्लॉगचा उल्लेख करण्याचे साधे सौजन्य त्या महाभागाने दाखविले नाही.म्हणून मी 'भामटा' हा शब्द वापरला.)

    आर्णीमध्ये माझ्या मित्र मंडळीत सर्व जाती धर्माचे लोक होते. मी संगीत शिक्षक व गायक असल्यामुळे सगळे माझ्यावर प्रेम करायचे.करीम चाचा सोबत मस्ती पण करायचो, शिव्या खायचो.निषादचा जन्म झाला तेव्हा आम्ही दोघेही नोकरी करत होतो.त्यावेळी शेजारी पिंजारी बुढा-बुढी राहात होती.ते दोघे निषादला सांभाळायचे.नंतर तर ते आमच्या घरातील सदस्य बनले होते.एक वर्षानंतर सुलभाने नोकरी सोडली.त्यानंतरही पिंजारी कुटुंबाने माझ्या तिन्ही मुलांना आजी-आजोबासारखे प्रेम दिले, माया केली.अर्थात त्यांच्या शेवटच्या काळात आम्हीही त्यांची काळजी घेतली. 
     कंबलपोष बाबांच्या उरुसात पूर्वी फक्त कव्वाल्या व्हायच्या.मी तेथे कव्वाल्यासोबतच वऱ्हाडी कवी संमेलन घेणे सुरू केले.यात शंकर बंडे, मिर्झा रफी अहमद बेग,राजा धर्माधिकारी अशी दिगग्ज मंडळी असायची. नंतर भजन स्पर्धा सुध्दा सुरू झाल्या.त्या काळी जत्रा,उरूस म्हणजे लहान मुलांसोबतच हौस्या-गौश्या-नौश्यांची मजा असायची.परिसरातील खेड्यातील लोकांची आवश्यक सामानाची खरेदी चालायची. खास आकर्षण म्हणजे तंबूतील दोन मध्यांतर असलेला चित्रपट.चित्रपट बघायला जायचे म्हणजे बसण्याकरिता सोबत सतरंजी घेऊन जावे लागायचे. त्या चित्रपटाच्या जाहिराती म्हणजे वेगळंच काम होतं.आर्णीला अशीच एक बारमाही टॉकीज होती.तिथल्या भोंग्यावर आरती लागली की आता चित्रपट सुरू होणार हे गावकऱ्यांना कळायचे.यवतमाळ जिल्ह्यातील माझ्या दोनोडा या मूळ गावी सकाळी घंटी वाजली की शाळा सुरू होणार हे कळायचे.सायंकाळी घंटी वाजली की मारूतीच्या देवळात आरती सुरू होणार हे कळायचे.आर्णीत आरती सुरू झाल्यावर चित्रपट सुरू होणार हे कळायचे.आरती म्हणजे प्रत्यक्षातील आरती नव्हे.तर 'मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की' ही रेकॉर्ड!
     हळू हळू भटांच्या गझला स्वरबद्ध व्हायला लागल्या. आणि आम्ही दोघांनी मिळून कार्यक्रम करायचे ठरवले.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या गावी पहिला प्रयोग केला.त्यात एक गझल भटांनी त्यांच्या पद्धतीने सादर करायची व नंतर मी हार्मोनियम तबल्यासह ताला-सुरात एक गझल सादर करायची.हा कार्यक्रम लोकांनी आनंद घेत ऐकला.पण आम्हा दोघांनाही त्यात मजा आली नाही.कारण एकाची लिंक लागत नाही तो दुसऱ्याचा नंबर यायचा. तेव्हा दोघांनी अर्धा अर्धा कार्यक्रम करायचे ठरवले.हा प्रयोग यशस्वी झाला.
त्यानंतर आम्ही महाराष्ट्रभर या पद्धतीने अनेक कार्यक्रम केले.१९८२ च्या पूर्वार्धापर्यंत संपूर्ण तीन तासांची मैफल होईल इतक्या गझला स्वरबद्ध झाल्यावर फक्त माझ्या गझल गायनाचा तीन तासाचा कार्यक्रम पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधव ज्युलियन सभागृहात आयोजित करण्यात आला.महाराष्ट्रातील ऐतिहासिक अशा या तीन तासाच्या पहिल्या-वहिल्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वतः सुरेश भटांनी केले.शीर्षक होते
"#अशी_गावी_मराठी_गझल"! दुसऱ्या दिवशी याच शिर्षकाचा स्वतः भटांनी निवेदन केलेला कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर निवडक रसिकांसमोर सादर करून प्रसारित करण्यात आला.त्या नंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज,राजवाडे सभागृह,मराठे यांचे संगीत विद्यालय अशी कार्यक्रमांची रांग लागली.पश्चिम महाराष्ट्रातील काही कार्यक्रमाचे सूत्र संचालन कधी डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी तर कधी पुण्यातील प्रसिद्ध संगीत समीक्षक श्रीरंग संगोराम करायचे.राजवाडे सभागृहातील कार्यक्रमाला तर नावाजलेले भावगीत गायक गजाननराव वाटवे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
     अशा प्रकारे 'अशी गावी मराठी गझल' च्या मैफली गाजत असताना १९८२ च्या शेवटास  मी स्वरबद्ध केलेल्या गझलांची कॅसेट काढावी असे भटांच्या मनात आले.तसे अलुरकरांशी बोलणेही झाले.त्या काळी पुण्याच्या अलुरकर म्युझिक कंपनीचे महाराष्ट्रभर नाव होते.सुरेश भटांनी मला तसे पत्रही पाठवले.त्यात या कॅसेटचे संगीत संयोजन आनंद मोडक करतील असाही उल्लेख होता.(ते पत्र व माझ्याकडे लिहिलेली नात खाली देत आहे.) नंतर कुठे माशी शिंकली कोण जाणे.हा प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही.पण लगेच एच एम व्ही कंपनीने काढलेली सुरेश वाडकरांच्या आवाजातील सुरेश भटांच्या गीत-गझलांची कॅसेट बाजारात आली.संगीतकार होते स्व.रवी दाते.
    ही सुवर्णसंधी हुकल्यानंतर मी या संदर्भात शेवटपर्यंत भटांशी बोललो नाही.शेवटी वीस वर्षांनंतर दिलीप पांढरपट्टे यांच्या गझला सुरेश वाडकरांकडून गाऊन घेण्याची संधी मला मिळाली.२०१२ मध्ये युनिव्हर्सल कंपनीतर्फे "#काट्यांची_मखमल" हा अल्बम बाजारात आला.या अल्बममध्ये वैशाली माडे माझ्या संगीत दिग्दर्शनाखाली सर्वप्रथम वाडकरांसोबत युगल गझल गायिली.त्या नंतर सुरू झालेले माझे काम आज २०२४ मध्येही त्याच जोमाने सुरू आहे. 
    (तसा तर २००६ मध्ये टी सिरीजने बाजारात आणलेला  #अर्चना हा पंडित शौनक अभिषेकी आणि अनुराधा मराठे यांच्या आवाजातील भक्तीगीतांचा अल्बम पहिला आहे. पुण्यात स्थायिक झाल्यावर खरे काम तेथून सुरू झाले.) 
१९८२ #मध्येच_जर_पहिला_अल्बम_बाजारात_आला_असता_तर?





संगीत आणि साहित्य :