गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Friday, December 9, 2016


जहां पे जीना मुहाल होगा
वहीं तो जीना कमाल होगा


ये कैसी दस्तक है मेरे दिलपर
तुम्हारा शायद ख़याल होगा


न पूछो मुझको ,मलाल क्या है
तुम्हें भी सुनकर मलाल होगा


लहू हमारा, जहां गिरा है
जो गुल खिलेगा,वो लाल होगा


दिया है क्या हमने ज़िंदगी को
कभी तो पैदा सवाल होगा


मैं कैसे काटूं, बिछडके तुझसे
वो लम्हा लम्हा, जो साल होगा


वहां वहां दिल जलेंगे साग़र
जहां जहां इश्तेआल होगा


गायक - रसिका जानोरकर,मयूर महाजन
शायर - हनिफ़ साग़र
संगीत - सुधाकर कदम
Live 2015



Saturday, December 3, 2016



      माझ्या २२अक्षरी चित्रकवितेला सुधाकरी नाव दिल्यामुळे काही वर्षांअगोदर बऱ्याच लोकांना पोटदुखी सुरु झाली होती.ती मी बाळंतकाढा देऊन शमवली होती.आता पुन्हा काही विद्वान सुधाकरीचा इतिहास काय? याला मान्यता आहे काय? असल्यास कुणी दिली ? वगैरे प्रश्न माझ्यापर्यंत इकडून,तिकडून पोहचवत आहेत...
तर माझ्या विद्वान मित्रांनो...माझा जन्म वारकऱ्याच्या घरात झाला आहे.जन्मल्यापासून "हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी" ही २२ अक्षरे कानावर पडत गेलीे.ती इतकी रुजली की मला जे काव्य सुचायला लागले ते याच 'फॉर्म'मध्ये सुचत गेले.म्हणून मग मला जे म्हणायचे, लोकांना सांगायचे ते चित्रासह २२ अक्षरात सांगणे सुरु केले...आणि त्याला नाव दिले "सुधाकरी"!
आता या नावामुळे कुणाच्या केंद्रबुडाखाली जाळ लागत असेल किंवा लागला असेल त्याने आपले बूड इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडवावे...थंडावा मिळेल याची खात्री आहे.
जसा मराठी गझल गायकीचा इतिहास माझ्यापासून (वर्तमानपत्रीय व इतर कागदोपत्री (यात सुरेश भटांची पत्रेही आलीत) असलेल्या लिखित दस्तऐवजांसह,नुसते तोंडातोंडी नाही)...सुरू होतो तसाच "सुधाकरी" (चित्रकविता) हा प्रकार माझ्यापासून सुरु झाला आहे.आणि इथून हा इतिहास सुरु होतो.पुढचे माहित नाही,बाकी ठीक.

(कुणी याला माज म्हटले तरी चालेल)
धन्यवाद !
"तुका म्हणे नाहीं
संताची मर्यादा
निंदे तोचि निंदा
मायझवा...
- संत तुकाराम
______________________________________________________________________________
(मराठी गझल व गझल गायकीच्या संदर्भातील माहितीसाठी खालील कात्रणातील मजकूर गझल रसिकांनी जरूर वाचावा.-अनंत दीक्षित,दै.सकाळ)


Saturday, September 24, 2016

चार पिढ्या...

                         कै.पांडुरंगजी जिवनाजी कदम-सुधाकर पांडुरंग कदम-निषाद सुधाकर कदम-अबीर निषाद कदम.

मध्यममार्ग


Tuesday, September 6, 2016

सरणावर कळले होते....१९८१ (Poor audio)



इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
पाऊल कधी वार्‍याचे माघारी वळले होते

घर माझे शोधाया मी वार्यावर वण वण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

गायक व संगीतकार - सुधाकर कदम
गझलकार - सुरेश भट



Saturday, August 20, 2016

पाऊस...

संगीतकाराचा कस लावणारे एक वेगळ्या बाजाचे कवी अनिल कांबळे यांचे मी स्वरबद्ध केलेले हे सुंदर गीत ...जरूर ऐका...
निवेदन-कवी नारायण कुळ्कर्णी कवठेकर यांचे आहे.
(जुन्या आणि खराब झालेल्या कॅसे्टवरून उतरवले असल्यामुळे खूप ’डिस्टरबन्स’ आहे....समजून घ्यावे...)

पाऊस

पाऊस असा घनघोर
नदीला पूर
किनारे बुडले
झेलीत कंच पाऊस
कुणी हे श्वास
बहरूनी खुडले
पाऊस असा...

पाऊस असा घनघोर
तरी अनिवार
चेतले गात्र
काजळी स्वैर वार्‍यात
रक्त लाटेत
उतरली रात
पाऊस असा...

पाऊस असा घनघोर
मनी अलवार
फुले ही गाती
रानात कुणाला स्वैर
निळे वनमोर
लागले हाती
पाऊस असा...

digital art....by nil mahajan


Thursday, August 4, 2016



रे मना ! तुज काय झाले सांग ना !
का असा छळतो जिवाला सांग ना !

हारण्याची ही मजा घे एकदा
जिंकुनी तुज काय मिळते सांग ना !

नेहमी एकांत हा अंधारतो
' अत्त दीपो ' का न होशी सांग ना !

हासुनी हसवायचा हा मंत्र घे
दु:ख कां कुरवाळतो तू सांग ना !

सूर लावून गुणगुणावे गीत हे
ते नि तू का वेगळा रे सांग ना !

दूर तू जाणार या देहातुनी
एवढे काहूर कसले सांग ना !

 गीत-संगीत-गायक
-- सुधाकर कदम --


Saturday, July 30, 2016

मल्हार...


बाभळी


लव लव हिरवी गार पालवी
काट्यांची वर मोहक जाळी
घम घम करती लोलक पिवळे
फांदी तर काळोखी काळी...

झिळ मिळ करती शेंगा नाजुक वेलांटीची वळणे
या सार्‍यातुन झिर मिर करती रंग नभाचे लोभसवाणे
कुसर कलाकृती अशी बाभळी तिला न ठावी नागर रीती
दूर कुठेतरी बांधावरती झुकुन जराशी उभी एकटी

अंगावरती खेळवी राघू लाघट शेळ्या पायाजवळी
बाळ गुराखी होऊनिया मन रमते सांज सकाळी
येते परतुन नवेच होऊन लेउन हिरवे नाजुक लेणे
अंगावरती माखुन अवघ्या धुंद सुवासिक पिवळे उटणे

कवयित्री-इंदिरा संत
संगीत-सुधाकर कदम
सादरकर्ते-भारती विद्यालयाचा वाद्यवृंद व गायक,गायिका समूह.१९८६


Saturday, July 23, 2016

ग़ज़ल और बंदिश....


कुछ यादगार पल...शायर बशर नवाज़ साहब के साथ...ग़ज़ल और बंदिश


Sunday, July 17, 2016

साठवणीतील आठवणी (१९६५ ते १९७५)

           पियानो अॅकॉर्डियन

          साधारणपणे सन १९६८/६९ च्या आसपासची गोष्ट असावी.शाळा व अभ्यास या मध्ये फारसे मन नसायचे.खेळ,गणेशोत्सव,दुर्गादेवी या निमित्य माझा पाय कायमचा घराबाहेर असायचा.माझ्या सारखेच इतर मित्र जमा करून सणासुदीच्या या दिवसांमध्ये होणारे करमणुकीचे अनेक कार्यक्रम रात्री उशीरापर्यंत ऐकण्याचे एक प्रचंड खूळ त्या काळात जडले होते.आईजवळ हट्ट करून घेतलेल्या बुलबुलतरंग नामक वाद्यावर चित्रपटातील विविध गाणी वाजविण्याचा सतत प्रयत्न चालू असे.या खेरीज पेटी,व्हायोलीन,तबला,सितार या विविध वाद्यांविषयी प्रचंड आकर्षण निर्माण झाले होते.जेव्हा कुठे संधी मिळेल तेथे या वाद्यांशी मी लगट करू पाहत असे.
           गणेशोत्सव व दुर्गादेवी उत्सवां दरम्यान होणार्‍या विविध वाद्य-गायन संचांच्या (ऑर्केस्ट्राच्या) सर्व कार्यक्रमांना माझी हजेरी असे.ती विविध वाद्ये पाहून माश्झे भान हरपत असे.अशातच एके दिवशी माझ्या घराजवळ रात्री यवतमाळच्याच भाग्योदय कला मंडळ यांचा शिवरंजनी ऑर्केस्ट्रा असे लांब-लचक नांव असलेल्या वाद्यसंचाचा कार्यक्रम आहे असे खात्रीलायक रित्या कळले.अस्मादिक कार्यक्रमाच्या जागेवर अगोदरच पोहचले.त्या वेळी माझे वय होते १५ वर्षे व साल अशावे बहुधा १९६८.कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीची तयारी सुरू असताना मी स्टेजवर चढून वाद्यांना हात लावण्याच्या प्रयत्नात होतो."कार्यक्रम आता लगेच सुरू होणार आहे;तू आता स्टेजखाली उतर", गळ्यात एक पेटी सारखे वाद्य अडकवित असलेल्या तरूणाने मला सांगितले.प्रथेप्रमाणे कार्यक्रम सुरू होताच सर्व कलाकार मंडळींची ओळख वाद्यांसह करून देण्यास सुरवात झाली आणि "पियानो अॅकॉर्डियनवर आहेत सुधाकर कदम" हे शब्द कानावर पडले.गळ्यात पडलेल्या/बांधलेल्या पेटीला "पियानो अॅकॉर्डियन " म्हणतात व हे वाद्य वाजविणार्‍या तरूणाचे नांव "सुधाकर कदम" आहे,हे ज्ञा मला प्राप्त झाले.ओळख करून देताच या वाद्यावर सुधाकर कदम यांनी वाजविलेली ती सुरेल धून आजही,जवळपास ४५/५० वर्षांनंतर सुद्धा कानांत व मनांत तशीच सुरेल वाजत आहे.झाले,प्रथम दर्शनातच मी या वाद्याच्या व ते वाजविणार्‍या सुधाकर कदम याच्या प्रेमात पडलो.
            त्या नंतरच्या १५ दिवसात झालेल्या जवळपास ५/६ कार्यक्रमांना मी अगदी स्टेजजवळ हजर राहत असे व डोळ्यात,कानात प्राण आणून सुधाकर कदमचे वादन व गायन ऐकत असे;होय सुधाकर कदम गातो...ही पण कला त्याच्यात आहे हे दिसून आले.मग एक नवीनच छंद जडला;सुधकर कदचे घर शोधून काढले;त्याच्या लहान भावाशी मैत्री केली.अन्काय २४ तास मला कमी पडू लगले.माझ्या व सुधाकर कदम मध्ये जरी ८/९ वर्षांचे वयाचे अंतर असले तरी ते कधीच जाणवले नाही;व वयातले अंतर कधी आमच्या संबंधात आडवे आले नाही.किंचितसा तरल,मृदू आवाज असलेला सुधाकर,ऑर्केस्ट्रामध्ये स्वत: स्वरबद्ध केलेली काही गाणी सादर करीत असे.कार्यक्रमासाठी कराव्या लागणार्‍या तयारीसाठी प्रचंड मेहनत सर्वजण करीत असत.आता प्रख्यात असलेले वर्‍हाडी कवी श्री शंकर बडे त्या वेळेस कार्यक्रमाचे निवेदन आपल्या खुमासदार शैलीने व वर्‍हाडी कवितांच्या सहाय्याने करीत असत.इतर नांवे जरी आता विस्मृतीत गेली असली तरी,सर्व श्री मुकेवार,महेश शिरे,नानवटकर,अविनाश व रतन जोशी ही नावे मनावर कायमची कोरल्या गेली आहेत व त्यातही सुधाकर कदम याच्याशी अतिशय जवळीक झाली अन् त्याला कारणीभूत ठरले ते " पियानो अकॉर्डियन".
           त्या ५/६ वर्षांच्या काळामध्ये मी सुधाकर कदम व त्याच्या वाद्यसंचाचे एकूण एक कार्यक्रम ऐकले.प्रसिद्धी मिळाल्यावर जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरचे दौरे ही मंडळी करीत असत.दोन छोट्याशा आठवणी येथे मुद्दाम नमूद करतो.पहिला प्रसंग असाकि,यवतमाळच्या प्रसिद्ध आझाद मैदानात अमरावतीच्या "मिलन ऑर्केस्ट्रा"चा कार्यक्रम जाहिर झाला.स्वत्र:चा एक विशिष्ठ दबदबा असणार्‍या संचाच्या या कार्यक्रमाला जवळ्पास ५ ते ६ हजार रसिक हजर होते.वर्ष आता आठवत नाही,पण दादा कोंडकेच्या चित्रपटातील "माळ्याच्या मळ्यामंदी को गं उभी" हे गाणे त्या वेळी घराघरात पोहचले होते व अतिशय लोकप्रिय झाले होते.हे गाणे सादर झाल्यानंतर मिलनच्या निवेदकाने केलेल्या एका कॉमेंटमुळे यवतमाळकर रसिकांचे पित्त खवळले.काही जण मंचावरे चढून निवेदक व कलाकारांशी वाद घालू लागले.कार्यक्रम थांबला.काही अति उत्साही रसिकांनी तेवढ्या रात्री सुधाकरला व रतन जोशीला शोधून कार्यक्रम स्थळी आणले.त्या ठिकाणी सराव केला नसताना सुद्धा केवळ हार्मोनियमच्या सोबत सुधाकर व रतनने तेच गाणे सादर केले.रसिकांनी दोघांनाही अक्षरश: डोक्यावर घेतले.नंतर निवेदक व आयोजकाने रसिकांची क्षमा मागितली,पुढील कार्यक्रम सुरू झाला पण त्यात अपेक्षित रंग पुन्हा भरला नाही.त्या नंतर त्या वाद्य संचाने पुन्हा आपला कार्यक्रम सादर केला नाही.
          दुसरी आठवण म्हणजे त्या काळातच "देहाची तिजोरी,भक्तीचाच ठेवा" हे गाणे...जवळ जवळ प्रत्येक कार्यक्रमात रसिक श्रोते ह्या गाण्यासाठी सुधाकरला फर्माईशकरत.आमच्या भागात सुधाकरला जी प्रचंड लोकप्रियता लाभली,त्यात ह्या गाण्याचा फार मोठा वाटा आहे,इतके अप्रतिम गायन सुधाकर करीत असे.
          पण हाय रे दैवा,काही वर्षे रसिक श्रोत्यांच्या गळ्याचा ताईत बनलेला हा वाद्यसंच विविध कारणांनी दुभंगला.तरूणाईत असलेले सर्व कलाकार प्रथेप्रमाणे आप-आपल्या पोटा-पाण्याच्या उद्योगाला लागले.कुणी,घरच्या परंपरागत शेती मध्ये रमले तर  कुणी आपल्या वडिलोपार्जित व्यवसायात.तर काही सहजसाध्य असलेल्या शिक्षकी पेशात शिरले.सुधाकरने पण आड-वाटेवरील,कुणी नाव न ऐकलेल्या यवतमाळपासून ४०/४५ कि.मी.दूर असलेल्या आर्णी गावी संगीत शिक्षक म्हणून कार्य करायला सुरवात केली.उमेदीच्या काळात केलेले गायन,वादन,ऐकलेली विविध गायने व स्वत:चा संगीत क्षेत्रातील अभ्यास,या शिदोरीवर पुढील जीवनाचा प्रवास सुरू झाला.वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी मलाही माझी नोकरी लागल्यामुळे व वास्तव्य स्थळे बदलत राहिल्यामुळे,भेटी-गाठी कमी झाल्यात.संगीताचा अभ्यास व गायनाचा अभ्यास,दुहेरी अंगाने सुधाकरने सुरू ठेवला.त्या छोट्याशा खेडेवजा गावांत सुधाकरच्या गायन-वादनाच्या रोपाने चांगला तग धरला व ते जोमात वाढू लागले.रियाज करायला भरपूर वेळ मिळत असल्यामुळे व मुळातच पाया पक्का असल्यामुळे,त्याने आपले स्वत:चे क्षेत्र पक्के केले.सुरवाती पासूनच आवड असलेल्यागझलवर त्याने आपले लक्ष्य केंद्रीत केले;आपले सर्वस्व त्या अभ्यासात लावले.कविवर्य भटांच्या गझलांचा मागोवा घेत घेत त्याने मराठी गझल गायनाचा प्रांत केव्हा काबिज केला हे त्याला स्वत:ला व रसिकांनाही कळलेच नाही.गझल गायनासाठी अतिशय आवश्यक असा सुरेल व तलम आवाज,या इश्वरी देणगीला तेवढीच तोलामोलाची प्रचंड मेहनत सुधाकरने आर्णी सारख्या आडवाटेवरील गावांत राहून केली व गझल गायनाच्या क्षेत्रात स्वत:चे नांव व दबदबा निर्माण केला.या जवळपस /०  वर्षांमध्ये,सर्वच क्षेत्रातील बदल सुधाकरने पाहिले व पचवले,पण स्वत:चे पाय मात्र जमिनीवरच ठाम ठेवले.मृदू स्वभावाचा धनी असल्यामुळे,संगीत क्षेत्राच्या मारक स्पर्धेपासून त्याने स्वत:ला नेहमी दूर ठेवले,आपले संपूर्ण लक्ष कायम गझलेवरच ठेवले.या संगीत साधनेमुळे रसिकांनी जेव्हागझलगंधर्वम्हणून गौरविले,तेव्हाही नम्र होत या गायकाने स्वत:ला माणूस म्हणूनच सिद्ध केले.मिळालेले यश व प्रसिद्धी त्याने सहजतेने स्वीकारली पण कधी वरचढ ठरू दिली नाही.ऐन तारूण्यात मी अनुभवलेली त्याची नम्र सोज्वळ वाणी आजही तशीच आहे व स्वभातील मृदूताही.
           साधारणपणे २००० नंतर त्याने पुणेहे आपले निवासस्थान व कार्यक्षेत्र म्हणून निवडले.अनेक चाहते,रसिक,गायक,गायिका,कवी,गझलकार जवळ केलेत.
          कधी काळी माझा जिवल्ग असलेला हा ज्येष्ठ मित्र आज वास्तव्या निमित्य भलेही माझ्या सारख्या मित्रांपासून भौतिक दृष्ट्या दूर असेल,पण संवाद आजही टिकून आहे.वेगवेगळ्या कामानिमित्य कधीतरी त्याची यवतमाळला भेट होते.तसाच काल सायंकाळी त्याचा फोन आला,जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी,संवाद साधण्यासाठी पुन्हा एकवार या सहृदय गायक मित्राची भेट घेण्यासाठीआतूर झालो.
          सुधाकर,तू मनाचा मोठा आहेसच,तसाच प्रिय कुटुंब-वत्सल गृहस्थही आहेस.आणखी मोठा हो,अशीच देवाला मागणी करताना उदंड आयुष्य लाभॊ हीच त्या ईश्वर चरणी प्रार्थना.

-पक्षीमित्र जयंत अत्रे
यवतमाळ
१ जुलै २०१६


सुधाकर कदम,जयंत अत्रे


भाग्योदय कला मंडळ संचालित ’शिवरंजनी ऑर्केस्ट्रा’






संगीत आणि साहित्य :