गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, October 13, 2013

कोमल हृदयाचा रांगडा कवी


 //शिवा राऊत//

शिवाजी रोडाबाजी राऊत म्हणजे आमचा शिवा राऊत होय.साधा,भोळा,निरागस शिवा कसा जगला यापेक्षा त्याने साहित्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा कसा उमटवला हे पाहणे महत्वाचे ठरते.सतत मुशाफिरी करणारा रांगडा शिवा स्वतःकडे जरी दुर्लक्ष करीत होता तरी कवितेच्या बाबतीत मात्र अतिशय हळवा होता.आर्णीला(जि.यवतमाळ)असतांना प्रवासात जर कविता सुचली तर सरळ आपल्या पायजाम्यावर लिहून आणायचा.नंतर घरी माझ्याकडे असलेल्या त्याच्या वहीत लिहून ठेवायचा.कविता ’सुचणे’ व ’पाडणे’ यात खूप फरक आहे.शिवाने कविता कधीच पाडली नाही,ती आपसूकच आलेली असायची.


अंगांगी कृष्णमिठीने
 जन्माचे देऊळ सजले
 गोपुरे रचावी त्याचा
 हा अक्षर उत्सव चाले
 

मराठी कवितेला आपला वेगळा बाज देणारा शिवा सतत दुःख झेलत जगला
.वेदनांच्या अंतर्द्वंदात फसलेला हा विदेही कवी सध्याच्या चकचकीत जगात


मी तो या मातीची
उन्ह विराणी वो
अभंगाला टाहो
वादळाचा

 
असे म्हणत उपेक्षित जीवन जगला
.तरी शब्दकळा मात्र त्याची म्हणजे फक्त त्याची होती.


सायीच्या सुईने
काढलास काटा
डोळे पाणवठा
पुनवेचा

अशा आतडी सोलून काढणा-या ओळी अभंग रुपाने इतक्या ताकदीने मांडणारा शिवा या काळातला एकमेव होता असे म्हटले तरी चालेल.यवतमाळ जिल्ह्यातील वेणी नावाच्या छोट्याशा खेड्यात जन्मलेला शिवा खेड्यातच वाढला,मोठा झाला व खेड्यातच संपला.त्याच्या कल्पनाशक्तीची भरारी पहिल्यावर त्याने हे सगळे कोठून ,कसे मिळविले हा प्रश्न आम्हाला नेहमीच पडायचा.यावर शिवाला छेडले असता तो ही समर्पक उत्तर देऊ शकत नसे.कारण अंतर्मनात उफाळलेल्या कल्पनांना शब्द कसे दिल्या जातात हे त्यालाही कळत नव्हते...नसावे.वृत्ताकरिता मात्रा मोजायची त्याला कधी गरजच पडत नव्हती.जे काही यायचे ते मुळातच रेखीव,बांधीव असायचे.


स्वप्न प्रहरी धुकाळ धूसर डोंगरपसरण
जशी दुरातुन दीठीत आली भिजली गवळण
                                                                                                                                             अल्याड डोंगर,पल्याड गंगा
मधि मारोती गावधुरंधर
उतार भांगातुन कौलाच्या
उन्हे सांडती मोत्याचा चुर
                                                                                                                                              या पुनव पहाटे आला
पाऊस कशाला बाई
ओलेसे अंगण झाले
वा-याला नाचण घाई

अशी अनेक उदाहरणे देता येतील.

       एकदा असंच शिवा म्हणाला,"दादासाहेब (तो मला दादा म्हणायचा) तुम्ही आकाशवाणीवर माझ्या कविता गात नाही याचे कारण काय "? मी म्हणालो,"तुझ्या कविता समजायला जरा कठीण असतात त्यामुळे लोकांना त्या आवडतील की नाही या भीतीपोटी मी गात नाही".त्यावेळी शिवा काहीच बोलला नाही.४/५ दिवसांनी मात्र माहुरच्या रेणुकादेवीवरील एक अप्रतिम कविता मला आणून दिली व कहीच न बोलता निघुन गेला.मी बघतच राहिलो.ती रचना होती


घाली अमृताचा पान्हा कृपेची साऊली
उदे उदे जगदंबे गे रेणुके माऊली


माझ्या डोळ्यात खळकन अश्रू आले...ताबडतोब हार्मोनियम घेऊन बसलो.पण योग्य अशी चाल सुचेना...असाच एक महिना निघून गेला.या एक महिन्यात शिवाने एका अवाक्षराने मला याबद्दल छेडले नाही.एक दिवस अचानक शिवरंजनीच्या स्वरांनी स्वतःहून या कवितेला सजविले व मी आकाशवाणीवर (नागपुर)गायीलो.प्रसारणानंतरचा शिवाचा आनंद पाहून मला गहिवरुन आले.अशा लहान सहान बाबींनी हरखुन जाणारा शिवा एखाद्या निरागस बालकासारखा दिसायचा.

         लग्न झाल्यावरही कौटुंबिक पाश त्याला बांधुन ठेऊ श्कले नाही.या मोहमयी दुनियेत त्याला फक्त एकाच गोष्टीचा मोह होता तो कवितेचा ! त्याचेकडे बघताना मला का कोण जाणे नेहमी गाडगे बाबांची आठवण व्हायची.तसे दोघांमध्ये काहीच साम्य नाही.पण मला मात्र वाटायचे...कदाचित चेहरेपट्टीमुळे असू शकते.गाडगे महाराजांनी कशाचाही मोह न करता समाजातील अंधश्रद्धेची जळमटं दूर करण्याचा प्रयत्न करुन जनता जनार्द्नाची सेवा केली.तर शिवाने मोह मायेच्या पल्याड जाऊन साहित्य सेवेत स्वतःला समर्पित केले.




किती आवर्तने एका समर्पणासाठी
आक्रंदणे अधांतरी,अंधार हाकाटी
भुकेमुळे ओठ ऊर अपंग पाचोळा
उभा जीव मायापाश,देह लोळागोळा


अभंग लिहीणारा शिवा आतल्या आत दुभंगत राहिला.हा दुभंग साधणे त्याला शेवटपर्यंत जमले नाही.सध्याच्या जगातला व्यहवारवाद त्याला कळला नही,जमला नाही.प्रसिद्धीसाठी कराव्या लागणा-या लटपटी-खटपटी त्याला जमल्या नाही.तो त्याचा पिंडही नव्ह्ता.खरे म्हणजे त्याच्या कविताच एवढ्या जबरदस्त होत्या की प्रसिद्धीच त्याला शोधत यायची.नागपुर तरुण भारतच्या वामन तेलंगांनी शिवाला अक्षरशः उचलले व लोकांपर्यंत पोहोचवले.आपल्या कविता,कथा छापुन याव्या म्हणून नाना प्रकार करणा-या ’साहित्यिकांच्या’जगात शिवासारख्या सरळसोट माणसाच्य़ा कविता कोणत्याही लाग्याबांध्याशिवाय छापुन यायला लागल्या यातच शिवाच्या कवितांचे वेगळेपण लपले आहे.या   हि-याचे पैलू रसिकांपर्यंत पोहचवण्याचे काम दै.तरुण भारत(नागपुर)ने त्याच्या हयातभर केले.तसेच आकाशवाणी
नागपुरच्या बबन नाखले यांनीही शिवाला जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा निर्भेळ प्रयत्न केला.दै.मतदारचे संपादक दिलीप येडतकर यांनीही त्याला व त्याच्यातील कवीला जगवले.’सोफेस्टिकेटेड’लोकांनी त्याचे मद्यपान बंद असेपर्यंतच त्याला थारा दिला.पण मित्र मंडळींनी मात्र त्याला गुणदोषांसह स्वीकारला.


 नसे आकाशात
 दहापाच सुर्य
 रत्न शिरोधार्य
 एखादेच...


शिवाच्या कवितांवर ग्रेसांप्रमाणे दुर्बोधतेचा शिक्का मारण्याचा प्रयत्न झाला.पण रसिकांनी मात्र त्याच्या आगळ्या वेगळ्या शैलीचा आणि देखण्या शब्दकळेचा भरपूर आनंद घेतला.यवतमाळचा कवी गजेश तोंडरे म्हणतो,"शिवाचा अभंग वाचकाला प्रथम मोहवतॊ,नंतर कळीज सोलून काढतो".


मांडता न आला
दुःखाचा हिशेब
वारंवार नभ
पाझरे वो...

नाचो येते मन
हळू गळे पीस
मयुर उदास
आनंदाचा...


ग्रेसांच्या तोडीच्या या कवीच्या कवितांवर धूळ बसत चालली आहे,व सांस्कृतिक क्षेत्र ती उडविण्याची तसदी घेत नाही ही दुःखाची गोष्ट आहे.आपापला तवा गरम करणा-यांच्या या युगात शिवाचा तवा थंड व्हायला लागला आहे.जिवंतपणी मरणयातना भोगणा-या शिवाला मेल्यावरही न्याय मिळाला नाही.यात नुकसान कोणाचे ? शिवाचे की मराठी भाषेचे ?

शिवाच्याच शब्दात म्हणावेसे वाटते...


नका करू कधी
मने उकीरडा
अश्वमेध काढा
मानव्याचा...


शिवाने फक्त अभंगच लिहीले असे नाही.


’देठ दुखरा हात झाला,चढत गेली बांगडी
 काय पुसशी मैत्रीणीला,गोष्ट थोडी वाकडी’

’बरडभुकेल्या मुखात आचळ पिळून आला पाऊस पान्हा
 पुलकित झाले डोंगरकाळीज निळासावळा झेलुन कान्हा’

’नाच पोरी नाच, तुझ्या चाळाला काच
 डोळ्यात तिढा,पाण्याचा पाढा
 गरत्या फिरत्या तालात नाच’

’विरहात कोंदलेले काळीज मुक्त झाले
 आणि मुक्या स्वरांना बिलगून शब्द आले’

’आसवांचे मूळ कोठे नाकळे
आतल्या आतून सारे उन्मळे
का उन्हाची वाळवीच्या सारखी
लोचनाते कोरणारी वारुळे’



’डोळा घालून घोटाला केला
 उभ्या गावाच्या कानाला गेला
 पाडपिकल्या देहाची बाई
 चव उसवहासव होई
 कशी सांगू मी चारचौघीला...’
 एकाच आवर्तनात न फिरता अशा प्रकारच्या विविध भाव-भावनांच्या कविता शिवाने लिहील्या.त्या महाराष्ट्रातील रसिकांपर्यंत पोहचाव्या तसेच शिवाचा अल्पसा का होईना परिचय व्हावा यासाठी हा प्रयत्न......कारण


’त्यानी आतड्याचे
सोहळे मांडले
अजिर्णाला दिले
आवतन...’

सुधाकर कदम




संगीत आणि साहित्य :