गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, March 16, 2024

तू दिलेले दुःख....

राग_रंग (लेखांक ४३) राग धानी.

पूजाकोटिगुणं स्तोत्रं स्तोत्राकोटिगुणो जप:| जपात्कोटिगुणं गानं गानात् परतरं न हि || अर्थात, पुजेपेक्षा करोडो पटीने श्रेष्ठ स्तोत्र,स्तोत्रापेक्षा करोडो पटीने श्रेष्ठ जप, आणि जपापेक्षा करोडो पटीने श्रेष्ठ 'गान'.गाना पेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. धानी राग हा काफी थाटातून उत्पन्न झालेला अतिशय गोड राग आहे.भारतीय संगीतांर्गत येणाऱ्या रागांचे वर्गीकरण करण्यासाठी थाट अथवा मेल व्यवस्था करण्यात आली आहे.भारतीय संगीतांमध्ये सात शुद्ध, चार कोमल आणि एक तीव्र अशा प्रकारे एकूण बारा स्वरांचा प्रयोग केल्या जातो एका रागाच्या रचनेसाठी या बारा स्वरातील कमीत कमी पाच स्वरांचे असणे आवश्यक असते.संगीतांमध्ये थाट रागांच्या वर्गीकरणाची पद्धत आहे.सप्तकातील बारा स्वरामधील कर्मानुसार मुख्य सात स्वरांच्या समुदायाला थाट असे म्हणतात. यातूनच रागोत्पत्ती होते.थाटालाच मेल असेही म्हणतात. दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमध्ये ७२ मेल प्रचलित आहे.उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये मात्र १०थाटांचाच प्रयोग केल्या जातो. याची सुरवात पंडित विष्णु नारायण भातखण्डे यांनी करून प्रचलित केले.(दहा ऐवजी आणखी एक-दोन थाट वाढविले असते तर प्रचलित दहा थाटात न बसणारे राग पण थाट पद्धतीत चपखल बसले असते.) सध्या राग वर्गीकरणाची हीच पद्धत प्रचलित आहे. कल्याण, बिलावल, खमाज, भैरव, पूर्वी, मारवा, काफी, आसावरी, तोड़ी आणि भैरवी... भातखंडेंजी द्वारा प्रचलित असलेले हेच ते दहा थाट होय.सर्व प्रचलित,अप्रचलीत रागांना या दहा थाटात सामील करून घेतले आहे. भारतीय संगीतांमध्ये त्या स्वरसमूहाला थाट म्हणतात ज्यात रागांचे वर्गीकरण केल्या जाऊ शकते,किंवा करतात.१५व्या शताब्दीच्या उत्तरार्धात 'राग तरंगिणी’ या ग्रंथाचे लेखक लोचन कवी यांनी राग वर्गीकरणाची पारंपरिक 'ग्राम आणि मूर्छना' पद्धतीमध्ये परिवर्तन करून मेल अथवा थाट पद्धतीची स्थापना केली.लोचन कविंच्या म्हणण्यानुसार त्या काळी सोळा हजार राग प्रचलित होते. यातील मुख्य असे राग ३६ होते.सतराव्या शताब्दीमध्ये थाटांर्गत रागांचे वर्गीकरण प्रचलित झाले होते. थाट पद्धतीचा उल्लेख सतराव्या शताब्दीतील ‘संगीत पारिजात’ आणि ‘राग विबोध’ नामक ग्रंथांमध्ये सुद्धा केल्या गेला आहे. लोचन द्वारा प्रतिपादित थाट पद्धतीचा प्रयोग जवळ-जवळ तीनशे वर्षांपर्यंत होत होता. एकोणविसाव्या शताब्दीच्या शेवटी व विसाव्या शताब्दीच्या सुरवतीच्या दशकात पंडित विष्णु नारायण भातखण्डे यांनी भारतीय संगीताच्या विखुरलेल्या सुत्रांना एकत्र करून अनेक सिद्धांतांमध्ये सुधारणा केली. भातखंडेंद्वारे निर्धारित दहा थातातील सातवा थाट काफी आहे. त्यातूनच उत्पन्न झालेला धानी राग एक चंचल प्रकृतिचा राग आहे.('चंचल प्रकृतीचा' म्हणजे काय ते कळले नाही.) यात ख्यालआणि विलंबित रचना गायिल्या जात नाही,असे म्हणतात. चंचल प्रवृत्तीमुळे मध्य व द्रुत लयीयील शृंगारिक व भक्तीरसपूर्ण रचना यात गायिल्या जातात. नेहमीप्रमाणे गोड लोकधून असलेल्या या रागाला शूद्र राग म्हटल्या जातो. (रागांचे मूळ असलेल्या लोकधूनांना शूद्र श्रेणीत ठेऊन कमी का लेखल्या जातात ते मला आजतागायत कळले नाही.)असो! या रागात कोमल गंधार एक अत्यंत प्रभावशाली असून न्यास स्वर आहे.हा स्वर या रागाचा केंद्रबिंदू आहे.तसेच कोमल निषाद सुद्धा न्यासाचा स्वर आहे.काही काळापूर्वी रिषभाला अवरोहात वर्ज न करता या रागाला औडव-षाडव जातीचा मानल्या जात होते.पण सद्य काळात रिषभ वर्ज्य करुन औडव-औडव जातिचा मानतात. तरी पण काही गुणिजन शुद्ध रिषभाचा प्रयोग करून धानी राग गाताना दिसतात.म्हणजेच हा राग आज दोन्ही प्रकारे गायिल्या जातो हेच सिद्ध होते.काफी थाटातील असल्यामुळे धानी गाताना खूप काळजी घ्यावी लागते.रिषभ,धैवत लागल्यास भीमपलासी व्हायला वेळ लागत नाही. अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालय मंडळातर्फे दर वर्षी संगीत शिक्षक संमेलन घ्यायचे. अंदाजे १९७७/७८ वर्षी हे संमेलन अहमदाबाद येथे आयोजित केले होते.या संमेलनात एक बडा ख्याल गायिल्यानंतर पंडित गंगाधर तेलंग यांनी गायिलेल्या 'आंगनवा आये जोगी' या धानीतील बंदीशीने मी धानीच्या प्रेमातच पडलो.तो पर्यंत धानी हे नाव फक्त ऐकूनच होतो. ● चित्रपट गीते... 'चांद मध्यम है आसमा चुप है' लता.संगीत-मदन मोहन.चित्रपट-रेल्वे प्लॅटफॉर्म (१९५५). 'मेघा रे बोले घनन घनन' आशा,रफी. संगीत-उषा खन्ना.चित्रपट-दिल दे के देखो (१९५९). 'रात सुहानी झुमे जवानी' लता. चित्रपट-रानी रुपमती.संगीत-एस.एन. त्रिपाठी (१९५९). 'निगाहें न फेरो' रफी,सुमन कल्याणपूर.चित्रपट-ब्लॅक प्रिन्स.संगीत-दुलाल सेन (१९५९) 'प्रभू तेरो नाम' लता.चित्रपट-हम दोनो.संगीत-जयदेव (१९६१). 'कभी तनहाइयों में भी हमारी याद आयेगी' मुबारक बेगम.चित्रपट-हमारी याद आयेगी. संगीत-स्नेहल भाटकर (१९६१). 'ना ना ना रे ना ना हाथ ना लगाना, सुमन कल्याणपूर.चित्रपट-ताजमहाल. तिलक कामोद धानीचे मिश्रण (१९६३). 'रात भी है कुछ भिगी भिगी' लता.चित्रपट-मुझे जीने दो.संगीत-जयदेव (१९६३). तेरे हम ओ सनम तू जहां मैं वहां' रफी,सुमन कल्याणपूर.संगीत-सरदार मलिक.चित्रपट-बचपन. (१९६३).'ये खामोशियां ये तनहाईयां' आशा,रफी. चित्रपट-ये रास्ते है प्यार के. संगीत-रवी 'मुकद्दर आजमाना चाहता हूँ' रफी.चित्रपट-दूर की आवाज. संगीत-रवी (१९६४). 'मन मोरा नाचे तन मोरा नाचे' लता.चित्रपट-दो दिल.संगीत-हेमंत कुमार (१९६५). 'कुछ दिल ने कहां कुछ भी नहीं' लता.चित्रपट- अनुपमा. संगीत-हेमंत कुमार (१९६६) 'तडप ये दिन रात की' लता. चित्रपट-आम्रपाली.संगीत-शंकर जयकिशन. (१९६६) 'भगवान ने अपने जैसा' लता. चित्रपट-छोटा भाई.(१९६६). 'खिलते हैं गुल यहां' किशोर-लता. संगीत-एस.डी. बर्मन.चित्रपट-शर्मिली (१९७१). 'बदन पे सितारे लपेटे हुए' रफी. चित्रपट-प्रिन्स.संगीत-शंकर जयकिशन (१९६९) 'तुम जो मिल गये हो तो ऐसा लगता है' रफी.चित्रपट-हंसते जख्म.संगीत-मदन मोहन (१९७३). 'पांव में डोरी' चित्रपट-चोर मचाये शोर. संगीत-रवींद्र जैन (१९७४). 'दिल में तुझे बिठाकर, कर लुंगी मैं बंद आंखे' चित्रपट-फकिरा.संगीत-रवींद्र जैन (१९७६). 'गोरी तेरा गांव बडा प्यारा मैं तो गया वारा आके यहां रे' येसुदास.चित्रपट-चितचोर. 'आज से पहले आज से ज्यादा' येसुदास.चित्रपट-चितचोर. 'ले तो आये हो हमे सपनो के गांव में' हेमलता.संगीत-रवींद्र जैन (१९७७). 'आयी ना कुछ खबर मेरे यार की' (धानी आणि मधुकौंस रागाचे मिश्रण) किशोर,आशा,संगीत-बप्पी लहरी. चित्रपट-शराबी.(१९८४) ● नॉन फिल्मी... 'तुम कोलाहल कलह में' आशा.संगीत-जयदेव.(अनफरगेटेबल ट्रीट १९७१). 'साडे नाल वे'(छोटा ख्याल) गायिका-दृष्टी आणि स्निग्धा जहागीरदार.संगीत संयोजन-ओंकारनाथ हवालदार.(ताज फेस्टिव्हल). 'मुसफिर चलते चलते थक गया है' गझल.-गुलाम अली. ● मराठी... 'निर्गुणाचा संग धरिला जो आवडी' संत गोरा कुंभारांचा हा अभंग अनेकांनी गायीला आहे.. 'अवघाची संसार सुखाचा करीन' (धानी व भीमपलासीचे मिश्रण) संगीत-मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर.(संत ज्ञानेश्वरांचे हे पद १९३१ मध्ये कान्होपात्रा या संगीत नाटकात गोहरबाई कर्नाटकी आणि राजहंस यांनी सर्वप्रथम गायिले आहे.तसेच बाल गंधर्वांनी हे अधिक लोकप्रिय केले.) -----------------------------------------------------------------------




संगीत आणि साहित्य :