गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, September 23, 2023

राग रंग (लेखांक २५) देस राग

साहित्यसंगीतकला-विहीन:

साज्ञात् पशु-पुच्छविषाण हीन:

अर्थात:- साहित्य, संगीत आणि कला विहीन व्यक्ती शिंग आणि शेपटी विहीन पशू समान आहे.


     देस राग खमाज थाटोत्पन्न राग आहे.खमाज थाटातील इतर रागांप्रमाणे हा ही अतिशय गोड राग आहे.शास्त्रकारांच्या दृष्टीने हा राग चंचल प्रकृतीचा आहे.(रागांची प्रकृती व

उच-नीचता ठरविणाऱ्याच्या बुद्धीचे कौतूक करावे वाटते).त्यामुळे या रागात अधिकतर छोटा ख्याल व ठुमरी वगैरे गायिल्या/वाजविल्या जाते.असे शास्त्रकार म्हणतात.वादी स्वर रिषभ असून संवादी स्वर पंचम आहे.याचा गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर आहे.गानसमय ठरविण्याची पद्धत अशी:- 

      रागांचे उत्तरांग व पूर्वांग विभाजित करण्यासाठी सप्तकातील सात स्वरांसोबत तार सप्तकातील षड्ज स्वर घेऊन आठ स्वरांची योजना करून दोन भागात वाटतात. पहिला भाग षड्ज ते मध्यम पूर्वांग,पंचम ते तार षड्ज उत्तरांग.या प्रकारे जो राग दिवसाच्या पहिल्या भागात म्हणजे दिवसाचे १२ वाजल्यापासून रात्रीच्या १२ वाजेपर्यंत गायिल्या/वाजविल्या जाणारे राग,ते पूर्व राग.आणि जे राग रात्रीच्या १२ वाजेपासून दिवसाचे १२ वाजेपर्यंत गायिल्या/वाजविल्या जातात ते उत्तर राग.उत्तर भारतीय संगीतामध्ये ज्या रागांचा वादी स्वर सप्तकाच्या पूर्वांगात असेल ते राग दिवसाच्या पूर्वार्धात व ज्या रागांचा वादी स्वर सप्तकाच्या उत्तरांगात असेल ते राग दिवसाच्या उत्तरार्धात  गायिल्या/वाजविल्या जायला हवे.असा नियम आहे.रागाचा वादी स्वर जर सप्तकाच्या पूर्वांगात असेल तर संवादी स्वर निश्चितच सप्तकाच्या उत्तरांगात असेल.याच प्रकारे वादी स्वर जर सप्तकाच्या उत्तरांगात असेल तर संवादी स्वर सप्तकाच्या पूर्वांगात असेल.

     संगीताशी जोडलेलले स्वर,लय,भाव ह्या सर्व बाबी नैसर्गिक आहेत.निसर्गाशी जोडलेल्या आहेत.आपल्या हृदयाचे ठोके किती नियमित लयीत असतात ना! त्यात थोडा जरी फरक झाला तर काहीतरी बिघडल्याचे लक्षात येते.तसेच संगीताचे आहे.स्वर,ताल,लय बिघडली की गाणं बिघडतं.

     या बिघडण्यावरून कॉलेजमध्ये असतानाचा एक किस्सा आठवला.संगीत कक्षात जवळ जवळ वीसेक मुला, मुलींना एकत्र शिकविल्या जायचे.आमच्या संगीताच्या प्राध्यापकांनी देस राग शिकवायला घेतला तेव्हाची ही गोष्ट आहे. देसचा छोटा ख्याल 'रब गुना गाय रे तू मना' चार-पाच तासिकांमध्ये संपला. त्यानंतर एक तराणा शिकवायला सुरवात केली.त्याचा अंतरा होता 'नादिर दानी तुंदीर दानी दानी तदारे दानी'. माझ्यासारखे बाल वयापासून संगीत शिकणारे काही, हा अंतरा व्यवस्थित म्हणायचे.कारण त्यांचा तो अगोदरच झालेला होता.पण दहावी नंतर कॉलेजमध्ये (त्यावेळी दहावी नंतर कॉलेजमध्ये प्रवेश मिळायचा.यातील प्रथम वर्षाला 'प्री युनिव्हर्सिटी' म्हणायचे) प्रथमच संगीत विषय घेणारे विद्यार्थी वरील तराणा म्हणताना 'तुंदिर'चे 'उंदीर' करून गायचे. ते असे :- नादिर दानी उंदीर दानी दानी तदारे दानी'. आणि मग वर्गात हलकीसी खसखस पिकायची.खसखस का पिकते हे शेवटपर्यंत प्राध्यापकांना कळले नाही.कारण हे सगळे 'उंदीर' शेवटच्या दोन रांगात बसायचे.असो!

     युट्युबवर खालील कलाकारांनी गायीला/वाजविलेला देस राग विविध तालात आपण ऐकू शकता.गायन...'कारी घटा घिर आयी' उस्ताद बडे गुलाम अली खान.ताल-त्रिताल. 'पिया मत जा' उस्ताद मुबारक अली खान.ताल-झपताल. 'चितवन रोके ना रही'.पंडित जसराज,ताल-रूपक.'कारी घटा छा रही' किशोरी आमोणकर.ताल-दादरा. 'होरी खेलन को चल कन्हैय्या' मालिनी राजूरकर,ताल-त्रिताल.'नदिया बैरी भई' प्रसिध्द ठुमरी.'करम कर दीजे' उस्ताद राशीद खान.ताल-अध्दा त्रिताल. 'नादान बिछुवा' पं. राजन साजन मिश्र.ताल-त्रिताल. 'कारी घटा घिर आयी' पं. अजय चक्रवर्ती.

ताल-धिमा त्रिताल.'सखी,घन गरजत'पं. उल्हास कशाळकर.ताल-धिमा त्रिताल.'वाजत नगारे' शोभा मुद्गल.ताल त्रिताल.'आये अनोखे खिलाडी कान्हा होरी खेलहूँ न जाने' पौर्णिमा धुमाळ.ताल-अध्दा त्रिताल. 'येरी आओ रे आओ मंगल गाओ' महेश काळे.ताल-त्रिताल.'बाजे बधाईयां वे सैयां नंददे दरबार' गिरीधर गोपालजी. ताल-आडा चौताल.

वादन...पं. रवी शंकर-सतार. उस्ताद विलायत खान-सतार. उस्ताद अमजद अली खान-सरोद.पं. शिवकुमार शर्मा-संतूर.पं. हरिप्रसाद चौरसिया-बासरी.उस्ताद शाहीद परवेज-सतार.राकेश चौरसिया-बासरी. 

● देस रागावर आधारित चित्रपट गीते...

'दुख के दिन अब बितत नाही' के.एल.सैगल.

चित्रपट-देवदास.संगीत-तिमिर बरन (१९३६)

'कदम चले आगे' के.एल.सैग.चित्रपट-भक्त सूरदास.संगीत-ग्यानदत्त (१९४२). 'मिलने का दिन आ गया' के.एल.सैगल,सुरेय्या.चित्रपट-तदबीर. संगीत-लाल मोहंमद (१९४५). 'सखी री चितचोर नहीं आये' गीता दत्त.चित्रपट-जोगन.संगीत-बुलो सी रानी (१९५०)

'दूर कोणी गाये' शमशाद बेगम , मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर.चित्रपट-बैजू बावरा.संगीत-नौशाद (१९५२)

'मेरे प्यार में तुझे क्या मिला' लता.चित्रपट-देश.संगीत-अनिल बिश्वास (१९५४).'सैंय्या जा जा मोसे ना बोलो काहे को नेहा लगाये' लता.चित्रपट-झनक झनक पायल बाजे. संगीत-वसंत देसाई (१९५५). 'ठंडी ठंडी सावन की फुहार' आशा भोसले.चित्रपट-जागते रहो.संगीत-सलील चौधरी (१९५६)

'बेकसी हद से जब गुजर जाये' आशा भोसले. चित्रपट-कल्पना. संगीत-ओ.पी.नैय नैय्यर. यात खमाज,देस असे मिश्रण आहे. (१९६०). 

'पाडवे रागमयी' पी.सुशिला.चित्रपट-सीता राम कल्याणम् (कर्नाटक) संगीत-जी.नरसिंह राव (१९६१).

'हिया जरत रहत दिन रैन' मुकेश.चित्रपट-गोदान. संगीत-रवी शंकर (१९६३).

'हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे' लता. चित्रपट-दिल एक मंदिर.संगीत-शंकर जयकिशन (१९६३). 

'मेरे प्यार में तुझे क्या मिला' लता.चित्रपट-मान.संगीत-अनिल बिस्वास (१९६४).

'गोरी तोरे नैना,नैनवा कजर बिन कारे' आशा,रफी.चित्रपट-मैं सुहागन हूँ.संगीत-लच्छीराम (१९६४). 

'अजी रुठकर अब कहां जाईएगा' लता,रफी.चित्रपट-आरजू. संगीत-शंकर जयकिशन (१९६५).

'आपको प्यार छुपाने की बुरी आदत है' रफी,आशा.चित्रपट-नीला आकाश. संगीत-मदन मोहन (१९६५).

'माना मेरे हसीं सनम' रफी.चित्रपट-दी अडव्हेंचर ऑफ रॉबिनहूड.संगीत-जी.एस.कोहली (१९६५).

'फिर कहीं कोई फूल खिला' मन्ना डे. चित्रपट-अनुभव.संगीत-कनू रॉय (१९७१). 

'आयी रुत सावन की' भुपेंद्र,फैयाज.चित्रपट-आलाप.संगीत-जयदेव (१९७७).

'सांवरे के रंग रांची' वाणी जयराम. चित्रपट. मीरा.संगीत-रवी शंकर (१९७९)

'केसरिया बालमा' लता.चित्रपट-लेकिन. संगीत-हृदयनाथ मंगेशकर (१९९१).

'दिल ने कहा चुप के से' कविता कृष्णमूर्ती.चित्रपट १९४२ लव्ह स्टोरी.संगीत-आर.डी. बर्मन (१९९३).

'तकदीर का फसाना जाकर किसे सुनाए' लता,रफी.चित्रपट-सेहरा. संगीत-रामलाल हिरापन्ना (१९६३)

मोरा सायं तो है परदेस' नुसरत फतेह अली खान.चित्रपट-डाकू रानी (१९९४).

'सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है' सोनू निगम. चित्रपट-द लिजेंड ऑफ भगतसिंग.संगीत-ए.आर.रहमान (२००२).

'अगर तुम साथ हो' अलका याज्ञिक,अरिजित सिंग.चित्रपट-तमाशा.संगीत-ए.आर.रहमान (२०१५).

● गैर फिल्मी...

'सखी बाजे पग पैजनी' गायक-पुरुषोत्तम दास जलोटा,अनूप जलोटा.

'चदरीया झिनी रे झिनी' कबीर भजन.गायक-अनूप जलोटा.

'हम तो है परदेस में देस में निकला होगा चांद' -जगजीत,चित्रा.

'वंदे मातरम्' लता.चित्रपट-आनंदमठ

रवींद्रनाथ टागोरांच्या बऱ्याचशा बंदिशी देस रागावर आधारित आहेत.

'बजे सरगम' दूरदर्शन चित्रपट.

● मराठी...

'भारती सृष्टीचे सौंदर्य खेळते दारीच सतत रूप आगळे' गायिका-वसंती. चित्रपट-कुंकू. संगीत-केशवराव भोळे (१९३७) . 

'मधुकर वनवन फिरत गुंजारवाला' बाल गंधर्व. नाटक-विद्याहरण. 

'रूपास भाळलो मी, भुललो तिच्या गुणाला' सुधीर फडके,आशा भोसले.चित्रपट-अवघाची संसार.संगीत-वसंत पवार. 

'मन मंदिरा तेजाने' शिवम् महादेवन.चित्रपट-कट्यार काळजात घुसली.संगीत-शंकर,एहसान,लॉय.

__________________________________


दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी, रविवार दि.२४.९.२०२३




संगीत आणि साहित्य :