गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Tuesday, September 15, 2020

संसार - सुलभा सुधाकर


          कलाकाराशी संसार म्हणजे तारेवरची कसरत असते.त्यातही तो जर स्वाभिमानी,परखड बोलणारा,सच्चा मनाचा,स्वावलंबी, कोणासमोरही हात न पसरणार,न वाकणारा ,भल्यांना लंगोटी देऊन नाठाळाना झोडणारा असेल तर सुळावरची पोळी असते.पण मी डोळसपणे हा सूळ  स्वीकारला.अनेक वर्षे अनेक प्रकारच्या वेदना सहन करत आज साधी पोळी नाही तर पुरणाची पोळी ,ती ही वाटीभर तुपाशी खात आहे.ज्या दिवशी हळव्या पण कणखर,जिद्दी सुधाकरशी लग्न केले त्या दिवसापासून त्याची प्रतिभा कशी फुलेल याचाच विचार करत करत त्याला जमेल तशी साथ देत गेले.

           सुधाकरच्या मराठी गझल गायकीबद्दल स्व.सुरेश भटांनी त्याला १९८१ मध्ये '#महाराष्ट्राचे_मराठी_मेहदी_हसन' ही उपाधी देऊन गौरविले.गझल गायकी हा नवा प्रकार मराठीमध्ये आणल्याबद्दल महाराष्ट्र जेसीजने १९८३ मध्ये '#Out_standing_young_person' हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गोंदिया येथे मा. छेडीलालजी गुप्ता यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.सुधाकरला दिलेल्या माणपत्रात '#पायोनीअर_ऑफ_मराठी_गझल_गायकी' असा स्पष्ट उल्लेख आहे.कोणी काहीही म्हणोत,पण ह्या दोन्ही उपाध्या मिळण्याअगोदर किमान पाच/सहा वर्षे तरी सुधाकरने मराठी गझल गायकीसाठी मेहनत घेतलीच असेल ना! मधल्या काळात पुण्याला स्थायिक होईपर्यंत काही स्वतःच स्वतःला नावाजणाऱ्या मंडळींनी हे सत्य हेतुपुरस्पर दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला.

           १९८१ मध्ये मी आणि सुधाकर स्व.सुरेश भटांकडे मुक्कामी असताना एक दिवस आजचे नावाजलेले एक गायक हार्मोनियम घेऊन आपल्या चाली ऐकवायला आल्याचे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे.याला श्रीमती पुष्पाताई सुरेश भट साक्षीदार आहेत.स्व.भट व सुधाकर पलंगावर बसून त्यांच्या चाली ऐकत होते.नंतर दोघांची चर्चा झाली.त्यात सुधाकरने 'त्या' गायकाबद्दल एका शब्दानेही वाईट शेरा दिला नाही.असा हा सुधाकर.आणि सुधाकरचे कार्य लोकांसमोर येऊ नये म्हणून प्रयत्न करणारा 'तो' गायक.असो.

            हे एवढ्यासाठीच की काही वर्षांपूर्वी फेसबुकवर झालेली चर्चा मी वाचली.त्यात मराठी गझल गायकीच्या सुरवातीची काहीच माहिती नसलेल्या एका नवोदिताची प्रतिक्रिया होती.'माझा जन्मच तेव्हा झाला नव्हता.' असे होते तर मग चर्चेत सहभागी कसा झालास बाबा! अशा कॉमेंट बघून हसावे की रडावे कळत नव्हते.भटांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाचा खऱ्या अर्थाने दुरुपयोग जर कोणी केला असेल तर तो याच लोकांनी केला.पण सुधाकरचे काम खुद्द भटांसोबतचे आणि भटांच्या हयातीत केलेले असल्यामुळे  कोणी कितीही नाकारले तरी सुधाकरच्या नावाशिवाय मराठी गझल गायकीचा इतिहास पुढे जाऊच शकत नाही.

          सुधाकर नुसता गझल गायक नाही,तर तो चांगला संगीतकार आहे.सरोद,हार्मोनियम,तबला,मेंडोलीन, अकॉर्डियन या वाद्यांवर त्याचे प्रभुत्व आहे.त्याच्यात एक चांगला लेखक,कवी पण दडलेला आहे.आर्णीला त्याने समाजकारण,राजकारणही केले.तो एक चांगला पती व बापही आहे.संगीताचे शिक्षण घेताना त्याला आलेल्या खडतर अनुभवामुळे त्याने त्याच्याकडे संगीताचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बापाच्या मायेने वागविले.त्यामुळे आमचे घर म्हणजे एक मोठे कुटुंबच झाले होते.सोबतच दर वर्षी एक-दोन विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण भार उचलण्याचा वसा पुण्याला येईपर्यंत सातत्याने तीस वर्षे चालविला. ही सर्कस चालविताना मला खूप कसरत करावी लागायची.पण त्यात खूप आनंद मिळायचा.

            माझी सुधाकरशी ओळख झाल्यानंतर काही वर्षे आम्ही प्रेमात पडलो हेच कळले नाही.माझी आई शिक्षिका होती.सुंदर गायची.तिच्या शाळेत तिने त्या वेळच्या अत्यंत लोकप्रिय 'मी डोलकर' या गाण्यावर नृत्य बसविले होते.पण गायक आणि मधले म्युझिक पिसेस वाजवणारे त्यावेळी यवतमाळात कोणीच नसल्यामुळे सुधाकरच्या ऑर्केस्ट्राच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या आमच्या मैत्रिणीच्या टोळक्याने आईला सुधाकरचे नाव सुचवले.सुधाकर त्यावेळी कॉलेज करून ऑर्केस्ट्रासोबतच शाळा-शाळातील अशा प्रकारची कामे करून किंवा पार्ट टाइम जॉब करून स्वतःचा खर्च चालवायचा.या निमित्ताने त्याचे आमच्याकडे येणे सुरू झाले.आणि तो घरातील एक सदस्य बनून गेला.

            त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट होती.तरी पण त्याच्या वागण्यात,बोलण्यात,राहण्यात एक वेगळेपणा होता कुठेही लालसा दिसत नव्हती.प्रत्येक ठिकाणी मदतीचा हात पुढे करण्याचा त्यांचा स्वभाव, त्याची दिलदार वृत्ती दाखवून देत होती.अशातच मी एन.सी.सी.त असल्यामुळे कॉलेजतर्फे दार्जिलिंगला होणाऱ्या माउंटेनरिंगच्या कँपसाठी माझी निवड झाली.कँप दोन महिन्यांच्या होता.कँप करीता जाताना तो मला सोडायला बसस्थानकावर आला असता त्याच्या डोळ्यातील भाव मला वेगळा वाटला.

           दार्जिलिंगला पोहोचल्यावर आमचे खडतर ट्रेनिंग सुरू झाले. त्या धबडग्यात दिवस कसा निघून जायचा ते कळत नव्हते.पण मोकळा वेळ मिळाला की सुधाकरचे ते डोळे व हिरमुसलेला चेहरा आठवायचा व खूप काही हरवल्यासारखे वाटायचे. आम्ही एकमेकांना पत्र लिहायचो पण त्यात 'तसा' कुठलाच उल्लेख नसायचा. ती पत्रे वाचली की आजही हसायला येतं. मी पत्रात दार्जिलिंग व तेथील कँपविषयी लिहायचे व सुधाकर यवतमाळचे हाल-अहवाल कळवायचा. कँप संपवून परत आल्याबरोबर मी सरळ सुधाकरला भेटायला त्याच्या घरी गेले.त्याला पाहिल्यावर जे काही वाटले त्यावरून मी त्याच्या प्रेमात पडल्याचे कळले.सुधाकरही बोलत नव्हता. पण त्याचे डोळे बोलत होते. त्याची व्यक्त होण्याची ही नेहमीची पद्धत आहे.आजही डोळ्यावरून,चेहऱ्यावरून त्याच्या अंतर्मनाचा अदमास मला येतो.

              मी ब्राह्मण,सुधाकर कुणबी.आमचा आंतरजातीय विवाह .हा विवाह त्यावेळी खूप गाजला.तारीख होती २१ नोव्हेंबर १९७३.लग्न झाले तेव्हा सुधाकर आपली सगळी स्वप्ने बाजूला ठेऊन इच्छा नसताना पोटाच्या सोईसाठी आर्णी या वीस हजार लोकवस्तीच्या गावात संगीत शिक्षक म्हणून रुजू झाला.पगार फक्त दिडशे रुपये.त्यात घर चालवणे,येणाऱ्या जाणाऱ्यांचे करणे यात खूप ओढाताण  व्हायची.पण त्याची काहीतरी बनण्यासाठी चाललेली मेहनत मला बळ द्यायची.आज ना उद्या या मेहनतीचे फळ मिळणारच याचा मला विश्वास होता.संगीत त्याच्या रोमारोमात भिनले आहे.आजही त्याची सारी धडपड मराठी गझल गायकी लोकप्रिय करण्याकरीताच सुरू आहे.तो ब्राह्मण नसल्यामुळे अनेक वाईट अनुभव त्याच्या वाट्याला आलेत.त्यातच त्याचा स्पष्टवक्तेपणाही त्याला नडतो.घरी आणि दारीही.

                 आर्णीला आल्यावर त्याचा ऑर्केस्ट्रा सुटला.पुढे काय करावे हा मोठा प्रश्न त्याच्या समोर होता.काही तरी करावे तर कोणाचे मार्गदर्शन नाही.कोणाचा गंडा बांधावा तर आर्थिक परिस्थिती नाही.त्याला ज्यांच्याकडे संगीताचे पुढील शिक्षण घ्यायचे होते ते पं. जसराज,पं. जितेंद्र अभिषेकी ही मंडळी मुंबईला होती.मग सुधाकरने स्वतःच स्वतःचा गुरू बनून एकलव्याप्रमाणे आराधना सुरू केली.त्याला इतर वाद्यांमध्ये गती होती.पण सरोद जास्ती आवडायचे. सरोद शिकायची त्याची तळमळ बघून मी माझ्या बांगड्या विकून सरोद आणायला पैसे दिले.आणि त्याचा बिन गुरूचा,फक्त पुस्तकावरून आणि रेडिओवर सरोद ऐकून रियाज सुरू झाला.तीन वर्षे ढोरमेहनत करून सरोद वादन आत्मसात केले.कार्यक्रमही व्हायला लागले.तरी पण गायन की वादन हा तिढा काही सुटेना.सुरवातीच्या एकल कार्यक्रमात तो सरोद वादन, नाट्यगीत,एखादी उर्दू गझल आणि काही स्वतः स्वरबद्ध केलेल्या रचना सादर करायचा.नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाने आयोजित केलेल्या अशाच एका कार्यक्रमात सुरेश भटांनी त्याला ऐकले व त्याच्यातील संगीतकार गायकाला हेरले व त्यांच्या काही गझल स्वरबद्ध करण्याकरीता दिल्या.

                  सुधाकरने दिलेल्या चाली सुरेश भटांना आवडल्या.त्यामुळे मराठी गझल गायन की सरोद वादन हा नवा तिढा समोर आला.या द्विधा मनःस्थितीमधून पं. जितेंद्र अभिषेकींनी त्याला बाहेर काढले व मराठी गझल गायकी या नव्या गायन प्रकाराकडे पूर्ण लक्ष द्यावे असे सांगून मार्गदर्शनही केले.या अगोदर छोटा गंधर्वांकडूनही त्याला खूप काही शिकायला मिळाले.सुधाकरचा हार्मोनियमचा हात चांगला असल्यामुळे छोटा गंधर्वांच्या विदर्भातील कार्यक्रमासाठी कासलीकर गुरुजी सुधाकरला त्यांचेसोबत हार्मोनियमच्या साथीला पाठवायचे.त्यांचे मार्गदर्शन आशीर्वाद सुधाकरला लाभले.ही अतिशय मोलाची गोष्ट होती.कारण तो मुंबई-पुण्याला जाऊन या दिग्गजांकडून धडे घेऊ शकत नव्हता.

                हळू हळू जम बसत गेला.मराठी गझल गायनाचे कार्यक्रम व्हायला लागले.यासाठी सुरेश भटांसोबत सुधाकरने अतिशय परिश्रम घेतले.हे करताना प्रकृतीकडे हवे तसे लक्ष न दिल्याने नेमके भरात असताना १९८२ मध्ये स्पॉंडीलायसिसचा जोरदार अटॅक आला ट्रक्शन,लाईट,फिजिओथेरपी वगैरेने त्रास कमी झाला.पण सरोदच्या रियाजवर त्याचा परिणाम होऊन अत्यंत आवडीचे असे सरोद वादन त्याला बंद करावे लागले.पण गझल मात्र दवडली नाही.सोबतच इतर अनेक उपद्व्यापांचा धडाका लावला.संगीत विद्यालयाची स्थापना करून १९७३ मध्ये परीक्षा केंद्रही मिळवले.सोबतच अभिनय कला मंडळाची स्थापना करून एकांकिका स्पर्धा,पाठ्यपुस्तकातील कविता स्वरबद्ध करून त्याच्या कॅसेट्स काढणे,जिल्हाभर कविता गायनाची शिबिरे आयोजित करणे,पुण्याच्या गीतमंच विभागासाठी व बालचित्रवाणीसाठी गाणी स्वरबद्ध करणे,पत्रकारिता,राजकारण वगैरे वगैरे...

               'अशी गावी मराठी गझल' हा कार्यक्रम भरात असताना सुरेश भटांच्या गीत-गझलांची रेकॉर्ड निघणार होती.तेव्हा संगीतकार म्हणून सुधाकर ते काम करणार होता.पण कुठे माशी शिंकली कोण जाणे,हे काम दुसऱ्या कोणाकडे गेले.याचा सुधाकरला फार मोठा धक्का बसला.त्यावेळी जर हे काम सुधाकरच्या हातून झाले असते तर आजचे चित्र काही निराळेच असते.याउप्परही त्याने मराठी गझल गायकीलाच प्राधान्य देऊन आपले कार्यक्रम सुरूच ठेवले.यावेळी जर पुन्हा ऑर्केस्ट्रा सुरू केला असता तर खूप पैसा कमवता आला असता.पण सुधाकरने तसे केले नाही.महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही त्याचे कार्यक्रम गाजले.तरी पण स्वभावातील रोखठोकपणा,कोणाही समोर मान न झुकवणे,लाळघोटेपणा वगैरे न जमल्यामुळे तसा तो उपेक्षितच राहिला.तरी पण मित्र मंडळीने 'भरारी' नामक महाराष्ट्रातील पहिली कॅसेट काढली .विदर्भात तिला चांगला प्रतिसाद मिळाला.सुधाकरची घोडदौड पुणे-मुंबईतील कार्यक्रमानंतरही सुरूच राहिली.या पाच-सात वर्षात सुरेश भट आमच्या कुटुंबातील एक झाले होते.आर्णीला सतत येणेजाने सुरू असायचे.माझ्या चंद्रमौळी घरात त्यांनी अनेक सुंदर गझला लिहिल्या.कवी व संगीतकार एकत्र आल्यावर जे काही वातावरण तयार व्हायचे ते भारावून टाकणारे असायचे. या वातावरणामुळे भटांचे खाण्याचे चोचले पुरवताना मला पण आनंद मिळायचा.

                दोघांनी जागवलेल्या अनेक रात्री मला आठवतात.आर्णीकरांसाठी तर ही पर्वणीच असायची.मुलाच्या संदर्भातील सल ते माझ्याजवळ बोलून दाखवायचे.त्यांच्या या हळव्या काळात सुधाकरने व मी त्यांना खूप सांभाळून घेतले.बरेचसे निर्णय ते सुधाकरला विचारून घ्यायचे.नागपुरात कंटाळवाणे झाले की आर्णीला निघून यायचे. मग मैफली रंगायच्या. शंकर बडे,श्रीकृष्ण राऊत,नारायण कुलकर्णी कवठेकर,योगेश बऱ्हाणपूरे,वामन तेलंग,श्रद्धा पराते, जगन वंजारी,कलीम खान वगैरे साहित्यिक ,असहित्यिक व आर्णीची रसिक मंडळी याची साक्षीदार आहे.

               गझल हा दोघांमधील समान दुवा असल्यामुळे दोघांनीही गझलचे कार्यक्रम करताना पैशाला दुय्यम स्थान दिले.थोडक्यात काय तर'लष्कराची सेवा'.या सगळ्याला कोणाची दृष्ट लागली कोण जाणे. हा आनंद मेळावा १९९५ नंतर हळूहळू बंद झाला.भटांचे आर्णीला येणे बंद झाले.तरी सुधाकर शेवटपर्यंत त्यांना भेटायला जायचा. सुरेश भटांच्या मृत्यूनंतर त्याने लिहिलेल्या 'मराठी गझलचा आधारवड कोसळला' या लेखावरून सुधाकरच्या हळव्या मनाची आणि भटांवरील प्रेमाची कल्पना येते.

            आर्णीला नोकरी सुरू झाल्याबरोबर प्रचंड ऊर्जा असलेल्या सुधाकरने अनेक उपद्व्याप सुरू केले.शिवजयंती उत्सव,अभिनय कला मंडळ,स्वरगंगा या संस्थांची स्थापना करून परिसर नाट्य-संगीतमय करून टाकला.भरीस भर म्हणून पत्रकारिता सुरू केली.तालुका पत्रकार संघाची स्थापना करून त्याचे अध्यक्षपद,तसेच मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष पदही भूषविले.या सर्व उपक्रमांमुळे सकाळी चहाचे भांडे चुलीवर चढले की,सायंकाळीच उतरायचे.त्यातच शिवसेनेचे काम सुरू केल्यावर तर कार्यकर्त्यांचा राबता अधिकच वाढला. शिवसेनेचे काम करताना त्याच्यावर अनेक केसेस लागल्या. पोलिसांचा ससेमिरा इतका लागला की,त्याला तडीपार व्हावे लागले.पण जन्मजात निडर असलेल्या वृत्तीमुळे सुधाकरमध्ये फारसा फरक पडला नाही.संगीत क्षेत्रातील असल्यामुळे त्याचे सर्व स्तरातील लोकांशी तसेच राजकीय मंडळींशी सुद्धा अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते.पण राजकारण म्हटले की हे संबंध वगैरे बाजूला राहतात.त्यातच युतीचे राज्य यायच्या अगोदरच्या निवडणुकीत सुधाकरला शिवसेनेच्या उमेदवारीबद्दल विचारणा झाली होती.पण मी त्याला कठोरपणे विरोध केला.कारण राजकारणात टिकणारी ही वल्ली नाही ,हे मला चांगलेच माहीत होते.माझा टोकाचा विरोध पाहून त्याने श्रीकांत मुनगीनवार या विद्यार्थ्याला उमेदवारी देऊन निवडून आणले व विदर्भाला शिवसेनेचा पहिलावहिला आमदार दिला.पण या कामाची दखल ना शिवसेनेने घेतली ना आमदार झालेल्या विद्यार्थ्याने.त्यामुळे पुढील निवडणुकीत संजय देशमुख या बंडखोर उमेदवाराला सहकार्य केले.तो फक्त १४४ मतांनी विजयी झाला.या कालावधीत त्याला खूप मनस्ताप भोगावा लागला.संगीत दुय्यम झाले.संगीत विद्यालय हा त्याचा हलवा कोपरा होता. त्यामुळे सारे सहन करून विद्यालयाचा डोलारा कायम ठेवला.दर वर्षी वार्षीकोत्सव आयोजित करून गझल गायन स्पर्धा,कलावन्त मेळावे,आकाशवाणी सांस्कृतिक संध्या,कविसंमेलने हे उपक्रम राबवत राहिला.

             सुधाकरच्या या अनेक उपद्व्यापामुळे घरात सदा पैशांची चणचण असायची.त्यातच मुले मोठी झालेली.त्यांचे शिक्षण,घरासाठी घेतलेले कर्ज...म्हणून मी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी सुरू केली.घर,शाळा, मुले आणि सुधाकरबाळ यांना सांभाळताना जीव मेटाकुटीस यायचा.पण माझ्या संगीताच्या आवडीमुळे व सुधाकरच्या प्रेमापोटी सारे सहन केले.याच दरम्यान शाळेत मुख्याध्यापकाशी व मॅनेजमेंटशीही खटके उडत गेले.तसेही सुधाकर आर्णीला कंटाळलाच होता.मुख्याध्यापक बनलेल्या ज्या व्यक्तीसाठी सुधाकरने अनेक प्रसंगात जिवाची बाजी लावून वाचवले, तोच जिवावर उठल्यासारखा वागायला लागल्यामुळे स्वेच्छानिवृत्ती घेऊन आम्ही पुण्याला स्थायिक झालो आणि सुधाकरचे पुणे किंवा मुंबईत स्थायिक होण्याचे स्वप्न वयाच्या पन्नाशीनंतर का होईना पूर्ण झाले.

              ज्या व्यक्तीजवळ स्वतःचे असे काहीच नव्हते त्या व्यक्तीबरोबर लग्न करून 'संसार' तडीस नेणे हा तोंडाचा खेळ नाही.पण माझ्यातला 'मी' माझ्याजवळ ठेवून जे काही करायचे ते सुधाकरसाठीच असे ठरवल्यामुळे संसार सुखाचा झाला.सुधाकरला पुण्यात '#गझलगंधर्व' ही उपाधी मिळणे हा माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा क्षण होता.एका शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला सामान्य मुलगा मोळ्या विकून,शेणाच्या गोवऱ्या जमा करून,दर शनिवारी यवतमाळच्या संकटमोचन मारुतीसमोर रुईच्या फुलाचे हार विकून,शाळाशाळांमधून गाणी बसवून व कुठे तरी पार्ट टाईम  जॉब करून आपला खर्च भागवणार सुधाकर स्वबळावर येथपर्यंत पोहोचणे स्वप्नवत नाही काय?

               आज मी अत्यंत सुखात आहे.पुण्यात टू बीएचके फ्लॅट आहे,कार आहे.सुधाकरला मनासारखे (आतापर्यंत चारअल्बमचे काम केले,दोनचे सुरू आहे.)काम मिळते आहे.यापेक्षा मावळतीच्या वयात आणखी काय हवे?


"चकव्यातून फिरतो मौनी" मधून....





संगीत आणि साहित्य :