गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, October 23, 2013

“मधुरानी”


         गझल कोणतीही असो ती जोरकसपणे गायिलीच पाहिजे असा भ्रम बराच काळपर्यंत आपल्याकडे होता.कदाचित त्यावेळी ध्वनिवर्धक नसल्यामुळे कदाचित असे गावे लागत असावे.पण हीच पद्धत पुढेही अनेक वर्षे कायम राहिली.गझलच्या शब्दार्थापेक्षा व त्यातील भावनांपेक्षा फक्त गायकीलाच महत्व दिल्याचे जुने गझल गायक/गायिकांचे गायन ऐकल्यावर प्रामुख्याने जाणवते.प्रेम, विरह,याचना,नाजूक दटावणी,सौंदर्य वर्णन,साक़ी,शराब,मैखाना काहीही असो प्रत्येक शेर ख्यालाप्रमाणे एकसुरी,म्हणजे बंदिशीला धरून गायिल्या जायचा.अर्थात गाणारे पट्टीचे गायक/गायिका असायचे ही बाब वेगळी.पण हळू-हळू गझलमधील शब्दांकडे लक्ष देऊन त्याला अर्थानुरूप बंदिश बनवून शब्दांना सजविण्याचा प्रयत्न सुरू झाला.त्यामुळे पूर्वी गायिल्या जाणार्‍या क्षुद्र प्रवृत्तीच्या ठरविल्या गेलेल्या पिलू,खमाज,झिंझोटी वगैरे विशिष्ठ रागांच्या जोखडातून गझल गायकी मुक्त होऊन दरबारी,मालकौंस,सारख्या मान्यवर रागातही गझलच्या बंदिशी तयार व्हायला लागल्या.हा बदल होण्यामागे चित्रपट संगीताचा फार मोलाचा वाटा आहे.

चित्रपट संगीत लोकप्रिय झाल्यामुळे जुन्या सर्व गझल गायक/गायिकांची मिरासदारी चित्रपटातील सुमधुर गाण्यांमुळे संपुष्टात यायला लागली होती.त्यातील नादमधुरता,शब्दानुरूप स्वर-रचना,शब्दांची फेक,स्वरांचे बेहलावे,पोषक वाद्यवृंद व गायनातील नाजुकता लोकप्रिय व्हायला लागली होती.हा फरक जाणवायला लागल्याबरोबर आपल्या देशातील अनेक गझल गायक/गायिकांनी शास्त्रीय संगीताचा मूळ गाभा कायम ठेवून वरील सर्व प्रकार आत्मसात करून गझल गायकीचा ढंगच बदलून टाकला.यात  जगजितसिंग हे अग्रेसर राहिले.ज्या काळात चित्रपटातून सुद्धा मेलोडिअस गाण्यांना उतरती कळा लागली होती त्या काळात मेलोडी कायम ठेवून,कठोर आत्मपरीक्षण करत-करत त्यांनी आपली वेगळी पण लोकप्रिय शैली निर्माण केली.याच काळात ‘मधुरानी; नावाच्या एक गझल गायिका सुद्धा आपल्या आगळ्या-वेगळ्या हळूवार गायन शैलीमुळे प्रसिद्ध व्हायला लागल्या होत्या.परंतू त्यांना हवी तशी प्रसिद्धी मिळालेली दिसत नाही.youtube वर सुद्धा त्यांच्या मोजक्याच गझला सापडतात. त्याची शिष्या पिनाज मसानी यांच्यामध्ये मधुरानीची गायन शैली पूर्णतः दिसून येते.पण ती फक्त त्यांच्या पहिल्या अल्बममध्येच…

मला मात्र मधुरानीच्या आवाजाने व सादरीकरणाने वेड लावले आहे….
त्यांच्या आवाजात आणि सादरीकरणात एक वेगळाच ताजेपणा आहे.तो सहजपणे ऐकणार्याला आकर्षित जरून घेतो.शब्दांशी-सुरांशी लडिवाळ खेळ करत-करत गाण्याची त्यांची पद्धत म्हणा किंवा गायकी म्हणा…आपल्यालाही ‘तो’ लडिवाळपणा जाणवेल अशा प्रकारे‘लाडावत’ नेतो.असे लाडावत गाणे फार कमी गायक/गायिकांना साधते.कोणी स्वरांशी तर कोणी शब्दांशी लाडावत गातो.पण मधुरणी दोघांनाही हळुवारपणे कुरवाळत गाते.खालील गझलच्या वेगळ्या बंदिशीतही हा लाडिकपणा प्रत्येक शब्दामधून जाणवतो.या गझलची सुरवातच अतिशय लाडिकपणे केली आहे.वो जो हममे तुममे क़रार था...मंद्र सप्तकातील निषाद स्पष्टपणे दाखवून दुसर्‍या ओळीवर कसे अलवारपणे जावे...हे ऐकताना कळते.तसाच प्रत्येक शेरातील पंचम स्वर सुद्धा आपण कोणीतरी खास पाहुणे आहोत हे प्रत्येक वेळी दाखवितो.संगीत दिग्दर्शिका म्हणून आणि गायिका म्हणून मधु ग्रेटंच.........................


                                        -सुधाकर कदम-




संगीत आणि साहित्य :