गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, December 26, 2021

काळोखाच्या तपोवनातून...


 .      'काळोखाच्या तपोवनातून' या माझ्या दुसऱ्या काव्यसंग्रहांच्या प्रकाशन प्रसंगी डावीकडून-शाहीर सुरेशकुमार वैराळकर,प्रकाशक शुभानन चिंचकर,अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष पंडित विकास कशाळकर, अस्मादिक,ज्यांचे हस्ते प्रकाशन झाले ते ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा.श्रीपालजी सबनीस,सन्माननीय उल्हासदादा पवार,पद्मश्री पंडित सुरेशजी तळवलकर,प्रसिद्ध गायिका अनुराधाजी मराठे,प्रसिद्ध गीत-गझलकार वैभव जोशी.

२४ डिसेंबर २०२१,एस.एम.जोशी सभागृह,पुणे.

    

Wednesday, December 15, 2021

सुधाकरी तोडी...



     हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामधील दहा थाटात नसलेल्या सुरावटीत खालील गझल स्वरबद्ध झाली आहे.यात रिषभ,गांधार,निषाद कोमल असून मध्यम व धैवत स्वर वर्ज आहेत.गायला थोड्या कठीण असलेल्या या सुरावटीच्या बांधणीला मी "#सुधाकरी_तोडी" असे नाव दिले आहे.शास्त्रीय संगीतातील विद्वानांना हे कितपत मान्य होईल ते माहीत नाही.ते "बिलासखानी तोडी" स्वीकारतात पण #सुधाकरी_तोडी ?????? असो!

Monday, December 6, 2021

काळोखाच्या तपोवनातही प्रकाशाची वाट...



           मराठी साहित्यात आणि त्यातही गझलच्या प्रांतात ज्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.ज्यांची शब्दसंपत्ती वाचकांना अंधाराच्या पायवाटे सोबत चालतांना प्रकाशाची उधळन करीत दिशा दाखवतील असा अनुभव सातत्याने मिळत राहतो.पुस्तक हाती पडल्यावर सुटत नाही असा सुधाकर कदम यांचा “ काळोखाच्या तपोवनातून ” हा गझल संग्रह वाचताना वाचकांना आत्मभान देत जातो. सुधाकर कदम हे अवघ्या महाराष्ट्राला गझल संगीतबध्द करणारे  संगीतकार म्हणून माहीत असले तरी ते शब्दाचे पूजक आणि साधक आहेत.त्यांनी गझल,कविता,विडंबनकार,गीतकार असा बराच प्रवास  केला आहे.त्यांचा हा संग्रह वाचतांना वाचकांना भावतरलता आणि त्याचवेळी त्यांचे जीवन चिंतनाचा अनुभव वाचायला मिळतो.
 माणस माणसांपासून वर्तमानात दूर जाता आहेत.माणसांची नाते सैल होता आहेत.नात्यातही व्यवहार पाहिला जातो आहे.स्वार्थाच्या बाजारातील बंध अधिक घटट होत  असल्याने नाते विरळ होता आहेत.याचे कारण ती नाती हदयांसी बांधली गेलेली नाही हे वर्तमानातील वास्तव आहे.आपण जेव्हा हदयाशी नाते सांगत बंध निर्माण करतो तेव्हा त्याचा अनुभव वेगळाच असतो.त्यातील अनुभूतीचा आंनदही अनुभवायला हवा आहे.ते  लिहितात...

 कधी कुणाला अपुल्या हदयी वसवून बघ ना
 अजून काही नवीन नाती जुळवुन बघ ना

खरेतर कविता,गझलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असताना अनेकदा कवी जीवन तत्वज्ञानाचे दर्शन घडवत असतो. अनेकदा समाजाचे वास्तव दर्शनही त्या शब्दांच्या माध्यमातून घडते . त्यासाठी कवी आपल्या जीवनाचे अनुभव,आपल्या भोवताल मध्ये जे काही दिसते तेही शब्दात नेमकेपणाने व्यक्त करीत वाचकांना आनंद आणि तत्वज्ञानाचे दर्शन घडवितांना दिसतात. वरवरच्या सौंदर्यांच्याला भाळत लोक त्याचे कौतूक करतील पण ते सौंदर्य ज्या काटयावरती टिकून आहे त्या काटयांच्या वाटयालाही दुःख आहेच.समाज व्यवस्थेतही सत्याच्या वाटेने जाणा-याच्या वाटयाला काटयासारखी उपेक्षा येत असते.आपण शेर समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर बरेच काही उलगडत जाते.त्यामुळे आपल्या भोवतालमध्ये जे काही दिसते आहे ते खेदाने व्यक्त करताना म्हणतात...

 मिळती जरी फुलांना अगणित घरे सुखाची
 काटयास मात्र येथे कसलाच ना निवारा

गझल,कवितामधून प्रेम व्यक्त केले जाते. प्रत्येकाच्या तारूण्यात मनातील भावभावनांच्या  गंधीत आठवणी  असतातच.त्या काळात मनातील भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून  कविता आधार बनतात.तर वाचकांही तारूण्यातील प्रेमासाठी अनेकदा शेर उपयोगी पडत असतात. जीवन अनुभव घेऊन आपला प्रवास सुरू राहीला तर वय वाढत जाते पण मनातील भावना मात्र सतत ताज्या आणि टवटवीत असतात.त्या जुन्या आठवणीना आजही उजाळा देताना  कदम लिहितात...अर्थात हा अनुभव प्रत्येकाचाच असतो.आनंदाच्या आठवणी नेहमीच प्रसन्न असतात..

मनात माझ्या अजूनही तू तशीच आहे
फुलासारखी प्रसन्नताही अजून तशीच आहे..

माणसांच्या ढोंगीपणाचा कळसही आपल्या भोवतालमध्ये सातत्याने दिसत असतो.माणसं वरवर फारच देखावा करतात.वर्तनातील बाहय वर्तन बदलते .मात्र अंतरिक परीवर्तनाची कास असावी लागते ती हरवली जाते.माणसं बदलतात मात्र या बदलाने फार काही साधले जात नाही.अनेकदा भगवे वस्त्र अंगावर घेतले जात असले तरी वरून साधू बनता येईल पण त्या वस्त्राच्या आत असलेला त्याग आणि वैराग्य आतून यायला हवे असते.त्यामुळे वस्त्र परीधान करूनही भोगाची वृत्ती संपत नाही त्याबददल खंत समाजाला असतेच.असे सर्वच क्षेत्रात सुरू आहे..त्या देखाव्यावरती प्रहार करताना गाळ अंतरिच्या या गझलेत ते लिहितात..

 भगव्यास पांघरूनी वरतून शुध्द झालो.
 पण गाळ अंतरिचा तो राहिला बिचारा

माणसांचे जीवन खरेतर त्या एका नियती नावाच्या अनामिक शक्तीशी जोडलेले आहे.जीवन म्हणजे दुःखाचा सागर आहे हे संतानी वास्तव सांगितले आहेच.मात्र तरी जीवन रूपी चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करावा लागतो.त्यातून सुटका करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यावर मात करणे होत नाही.जे संचिती असते ते भोगावेच लागते.कारण नियती जोखडून ठेवत असते..त्या संदर्भाने कवी लिहितात..

आयुष्याच्या चक्रव्यूहातून कधीच सुटका नसते.
नियती त्याला दळण्यासाठी खुंटा मारून बसते.

जीवनात दुःख सामावलेले आहे.ते दूर करण्याचा प्रयत्न सातत्याने माणसं करीत असतात.अशा परीस्थितीत वास्तवाचा स्वीकार करीत त्यावर मात करण्याची गरज आहे.मात्र या कालचक्रातील या वर्तूळात हे घडत राहाणार आहे त्याला आपण का भ्यावे ? त्याला सामोरे जाताना आपण अधिक आंनदाने प्रवास करायला हवा.त्याकरीता मानवी जीवनात हास्य हा महत्वाचा उपाय आहे.माणसांने सतत हसत रहावे आणि त्याच बरोबर इतरांना हास्य देत रहावे हे जीवनसूत्र पाळत गेलो तर बरेच प्रश्न सुटू शकतात म्हणून कवी लिहितात.

 हासुनी हसवायचा हा मंत्र घे
 दुःख का कुरवाळतो तू सांग ना!

आपण जीवनात सुख दुःखाचा अनुभव घेत असतो.त्या अनुभवात हसणे आणि रडणे या नैसर्गिक क्रीया घडत असतात.खरेतर जीवनात कोणताही अनुभव आला तरी त्या परीस्थितीत आपले आपणच जगत असतो.हा सारा अनुभव आपला व्यक्तीगत असतो.त्यामुळे या काळात आपण स्वतःला समजावत दुःखाच्या काळात सुखाने फुलता यायला हवे.अर्थात आपण जीवनाकडे कसे पाहतो याला अधिक महत्व आहे.त्यामुळे वाचकांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलावे म्हणून ते म्हणतात 

हसूनी वा रडूनिया तुझे तुला जगायचे
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे

जीवनात माणसांने आपला प्रवास कसा सुरू ठेवायचा यामागे प्रत्येकाचे असे काही तत्वज्ञान असू शकते.जीवन अनुभव भिन्न असले तरी अनेकदा दुःखावर मात करण्यासाठी असलेले मार्ग समान असू शकतात.त्या संदर्भाने कवी वाचकांना काही सांगू पाहता आहेत.त्याच बरोबर आपला अध्यात्मिक प्रवास हा देखील मुक्तीसाठी असतो.ती मुक्ती प्राप्त करण्यासाठी लोक कितीतरी विविध मार्गाने प्रयत्न करतात.मात्र कवी मुक्तीचा साधा सोपा उपाय सांगता आहेत.कवी त्यासाठी अभंग या प्रकारात उपदेश करतांना लिहितात

 दीन दुःखितांना / मदत जे करी
 तेणे मुक्ती चारी / साधलिया

माणसं जीवनभर आपला प्रवास सुरू ठेवताना तो सुखाचा व्हावा म्हणून  एका शक्तीमान असलेल्या निर्मिकाची प्रार्थना करीत असतात.ती प्रार्थना प्रत्येक धर्माची व्यक्ती करीत असते.आपला देव वेगळा असला तरी त्याचेकडे मागणे एकच आहे.ते मागणे जीवनशुध्दी आणि जीवनातील दुःख कमी करण्यासाठी असते.जीवनातील दुःखाचे मुळ कारण केवळ तृष्णा आहे हे कवीला माहित आहे.आपली जीवनातील तृष्णा संपली , की जीवनानंदाचा प्रवास सुरू होईल म्हणून ते अज्ञाताची हाक या कवितेत लिहितात..

 कोणाचिही करा / एकत्र प्रार्थना
 मिटवाया तृष्णा / निरागस

जीवनाच्या वास्तवाचे दर्शन अनेकदा काव्यातून वाचकांना होत असते.आपण जीवनभर आपले आपले असे करत जगतोच.स्वार्थाच्या पलिकडचा प्रवास तसा फारसा होत नाही.अशा परीस्थितीत आपण बरेच काही गमावत असतो.त्या गमविण्याची चिंता आयुष्याच्या शेवटी लागते.अशा परीस्थितीत जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर जीवनाच्या वास्तवाचे दर्शन घडते.जीवनाचा प्रवास प्रत्येकाला एकटयालाच करायचा आहे.सोबत कोणीच नसते अखेरच्याक्षणी..मात्र ही जाणीव आयुष्यात होत नाही..जीवनाचे वास्तव दर्शित करताना कवी सांगू पाहाता आहेत.

 सरणावरती चढतो जेव्हा
 कोणी नसते त्याच्या पाठी

आपल्या भोवती जे काही दिसते त्याच्या वेदना साहित्यातून येण्याची गरज असते.साहित्य हे अनुभवाची मांडणी असते.त्या अनुभवाच्या शिवाय येणारे साहित्य हे वाचकांच्या अंतकरणाला स्पर्श करू शकणार नाही.मात्र अलिकडे साहित्यातही बरेच काही घडते आहे.साहित्यातील वास्तवाचे दर्शन ते घडवितात.आपण गरीबीच्या वेदना पोटभर आहार घेऊन मांडल्याने त्यातून त्या साहित्यातून फार काही परीवर्तन घडण्याची शक्यता नाही.अनुभव शुन्यतेची मांडणी समाज परीवर्तन करू शकणार नाही.ही जाणीव निर्मळ अंतकरणाच्या लेखकाला असते म्हणून कवी ती सल मांडताना लिहितात

 ए.सी.त बसोनी / शेतक-यावरी
 लिही कांदबरी / मुंबईत

माणसं ढोंगीपणाने वागत असतात ,त्या ढोंगीपणावर केलेला प्रहार अनेकदा वाचताना मिळतोच.समाजातील या वास्तवाचे निरिक्षण करीत असताना ,त्यांना काय म्हणावे  ? असे प्रश्न पडतो तेव्हा कवी अत्यंत सोप्या भाषेत त्याची उत्तरे देऊ पाहाता आहेत.उत्तम समाजाची निर्मिती हे प्रत्येक चांगल्या माणसांचे स्वप्न असते.त्या प्रवासात चांगली माणसं कोणती याची उत्तरे आपल्याला मिळत जातात..कवी काही माणसांची लक्षणे नमूद करतात..ते लिहितात..

 ज्याच्या तोंडामध्ये / तंबाखू नि बिडी
 तयासी पाखंडी / म्हणावे गा

व्यसनापासून मुक्त असलेला समाज हा नेहमीच चांगल्या समाजाचे लक्षण आहे.या कविता संग्रहात कधी गझल , कधी अंभग ,कधी  निव्वळ कविता अनुभवायला मिळते.शब्दाचा फुलोरा न करता जीवन तत्वज्ञानाचे दर्शन या संग्रहात घडते.अत्यंत सुक्ष्म निरिक्षणही आपल्याला अनुभवायला मिळते.संगीत साधनेने जीवनाला मिळालेला आंनदाचा मार्गही अनुभवता येतो.कविता संग्रह अत्यंत वाचनीय झाला आहे.कविता संग्रहाचे अविनाश वानखेडे यांचे मुखपृष्ठही वाचकांना चिंतन करण्यास भाग पाडते.
 कविता संग्रहाचे नाव- काळोखाच्या तपोवनातून
 कवी- सुधाकर कदम
 प्रकाशक-स्वयं प्रकाशन,सासवड,पुणे
 पाने-९६
किंमत-१५०
-संदीप वाकचौरे
----------------------------

◆ काळोखाच्या तपोवनातून
◆ कवी : गझलगंधर्व सुधाकर कदम
◆ प्रस्तावना : डॉ. राम पंडित 
◆ मुखपृष्ठ : डॉ. अविनाश वानखडे 
◆ प्रकाशक : स्वयं प्रकाशन मो. 8888769659

*प्रकाशन २४ डिसेंबर २०२१*
एस. एम. जोशी सभागृह, पुणे
सायं. ६.०० वा.

संग्रह मिळवण्यासाठी तपशील -
किंमत रु. १५० + टपालखर्च ५० 
● ऑनलाइन पेमेंट करिता खाते क्र.
A/c no : 053312100004140
IFSE Code : BKID0000533
बँक ऑफ इंडिया,पुणे.
google pay - 8888858850


 

 

Pioneer gazal singer in marathi


वर्ष १९८१

     बँ.अंतुले मुख्यमंत्री असतांना,नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात मा.रा.सु.गवई यांचे काँटेजवर एका भव्य शामियान्यात काव्य - संगीत मैफल सुरेश भटांनी आयोजित केली होती.मी चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळे गवई साहेबांच्या काँटेजवरच होतो.या मैफिलीत एक तरूण गायक मराठी गझला पेश करून उपस्थितांची दाद घेताना मी पाहिला.मैफिल अतिशय सुंदर झाली.कार्यक्रमानंतर अंतुले साहेबांचे हस्ते त्या तरुणाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्याच प्रसंगी मा.जवाहरलालजी दर्डा यांनी त्या तरूण गायकाल मिठी मारुन ’हा आमच्या यवतमाळचीच नव्हे तर विदर्भाची शान आहे’ असे जाहीरपणे सांगितले. शामियान्याच्या एका कोप-यात उभे राहून हा सर्व सोहळा मी याची देही याची डोळा पाहिला.हा तरूण गायक म्हणजे सुधाकर कदम होय. सुधाकर कदमांना मी सर्वप्रथम येथे पाहिले.यावेळी सुरेश भटांसोबत सावलीप्रमाणे वावरणारा एक तरुण होता.त्याचे नाव शाहिर सुरेशकुमार वैराळकर.

     त्या नंतर मा.शरद पवारांनी वर्धा या गावी १८ ते २० सप्टेंबर १९८१ ला भव्य शेतकरी मेळावा घेतला होता.तेथेही सुधाकर कदमांचा कार्यक्रम झाला.त्यात ’सूर्य केव्हाच आंधारला यार हो’ ही सुरेश भटाची गझल गाऊन समा बांधला होता.या प्रसंगी शरद पवार,पद्मसिंह पाटील,सुधाकरराव देशमुख,रावसाहेब वडनेरकर,सुरेश भट,ना.धो.महानोर,विट्ठल वाघ,प्रा.देविदास सोटे वगैरे मंडळी उपस्थित होती.

     त्या नंतर यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा या गावी दि.२७ व २८ मार्च १९८२ ला बाबुराव बागुल यांचे अध्यक्षतेखाली दलित साहित्य सम्मेलन झाले.याचे उद्घाटन म.रा.साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाँ.सुरेंद्र बारलिंगे यांचे हस्ते झाले होते.तेथेही मी होतो.या साहित्य संम्मेलनात सुधाकर कदमांचा मराठी गझल गायनाचा रंगलेला कार्यक्रम मी स्वतः पाहिला.या वेळेपर्यंत फक्त मराठी गझल गायनाचा तीन तासाचा कार्यक्रम करणारा एकही कलाकार महाराष्ट्रात नव्हता.आणि जे कोणी करत असतील तो फुटकळ स्वरुपाचा प्रयत्न असावा.तसे नसते तर सुरेश भटांनी निश्चीतच या संदर्भात कोणाचा तरी उल्लेख केला असता.या कालावधीत औरंगाबादचे नाथ नेरळकरही आशालता करलगीकर यांना सोबत घेऊन हिमांशु कुळकर्णी यांच्या गझलांचे कार्यक्रम करीत असल्याचे दिसून येते.परंतू पुढे त्यांनी ते बंद केले.तरीही जर कोणी दावा करीत असेल तर त्याने लेखी पुरावे द्यावे.मी मरेपर्यंत त्याची गुलामी करीन.

     १९८१ मध्ये ’महाराष्ट्राचे मेहदी हसन’म्हणून सुरेश भटांनी त्यांना गौरविले.१९८२ मध्ये ’गझलनवाज’उपाधी दिली.१९८३ मध्ये महाराष्ट्र जेसीजने ’Out Standing Young Person'हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविले.गोंदिया येथे ३०/१०/१९८३ रोजी मा.छेदीलालजी गुप्ता यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.(जेसीजने दिलेल्या सन्मानपत्रात ’Pioneer in the introduction of MARATHI GAZALS'असा स्पष्ट उल्लेख आहे.) आता मला सांगा वरील सर्व मान-सन्मान सुधाकर कदमांना काहीच न करता मिळाले असतील काय ? या अगोदर ५/७ वर्षे तरी त्यांनी मराठी गझल गायकीसाठी मेहनत घेतली असेल ना ?

     मराठी गझल गायकीला तशी फार मोठी परंपरा नाही.जास्तीत जास्त ३५ वर्ष,फारच ओढाताण केली तर ४० वर्षे,बस्स ! तेही ओढून ताणूनच,त्यापलीकडे ही परंपरा जात नाही.त्यातही महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रांचे लेखी पुरावे जर पाहिले तर हा काळ आणखी कमी होतो.आणि इतिहास लिहीतांना तोंडी माहितीपेक्षा लेखी माहितीला जास्ती महत्व असते.लेखी पुरावे आणि विविध संस्थांनी मराठी गझल गायकीतील योगदानाबद्दल दिलेल्या पुरस्कारांचा विचार केला तर मराठी गझल गायकीची सुरवात सुधाकर कदम यांचे पासून झाल्याचे दिसून येते.सुरवातीच्या काळात सुरेश भट आणि सुधाकर कदम विदर्भात फिरले.नंतर मराठवाडा आणि शेवटी पश्चिम महाराष्ट्र.या वेळी कार्यक्रमाचे निवेदन कधी सुरेश भट तर कधी डाँ.सुरेशचंद्र नाडकर्णी करायचे.३/४ वर्षे महाराष्ट्रभर भ्रमंती केल्यानंतर "अशी गावी मराठी गझल" ह्या कार्यक्रमाची सांगता १५ जुलै १९८२ ला पुण्यात महाराष्ट्र परिषदेच्या माधव ज्युलियन सभागृहात झाली.या कार्यक्रमाचे निवेदन स्वतः सुरेश भटांनी केले.प्रमूख उपस्थिती डाँ,सुरेशचंद्र नाडकर्णी यांची होती.आयोजक होते ग.वा.बेहरे (कार्याध्यक्ष) आणि राजेंद्र बनहट्टी (कार्यवाह).

यानंतर कदमांनी एकट्याने कार्यक्रम करणे सुरु केले

     .या कार्यक्रमाचे निवेदन आर्णीचे कवी कलीम खान करायचे.(काही कार्यक्रमांचे निवेदन प्रसिद्ध कवी प्रा.नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी सुद्धा केले) मध्यप्रदेशातील इंदूर येथील जाल सभागृहातील दि.२८ आँक्टोबर १९८९ चा कार्यक्रम या दोघांनी चांगलाच गाजवला.मराठी गझल गायनाचा मध्यप्रदेशातील हा पहिला वहिला कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला मध्यप्रदेशातील सुप्रसिद्ध रंगकर्मी श्री बाबा डिके आणि अभिनेता चंदू पारखी उपस्थित होते.

"अशी गावी मराठी गझल" या कार्यकमावरील तत्कालीन विविध वर्तमानपत्रांच्या निवडक प्रतिक्रीया...

१) स्थानिक ’स्वरशोधक’ मंडळातर्फे यवतमाळचे सुधाकर कदम यांच्या मराठी गझल गायनाचा कार्यक्रम को-आँपरेटीव्ह बँकेच्या सभागृहात संपन्न झाला.सतत तीन तास पर्यंत बहुसंख्य रसिक या आगळ्या मैफिलीची खुमारी लुटत होते.स्वर आणि शब्दांची उत्कृष्ट सांगड घालून सादर केलेल्या गझला वर्धेच्या रसिकांच्या बराच काळ पर्यंत स्मरणात राहतील. ..............

●दै.नागपुर पत्रिका,११/४/१९८१


२) कोमल हळवी गझल श्री सुधाकर कदम त्यातल्या भावनेला फंकर घालीत हळुवारपणे फुलवितात.त्यातील शब्दांच्या मतितार्थाचे हुबेहुब चित्र रसिकांपुढे प्रकट करतात..............

●दै.लोकसत्ता,मुंबई.१४/७/१९८२


३) सुधाकर कदम याच्या गझल गायकीने,रसिक पुणेकरांना बेहद्द खूष केले.हा तरूण गायक प्रथमच पुण्यात आला,पुणेकरांनी त्याला प्रथमच ऐकले. आणि परस्परांच्या तल्लीनतेने साहित्य परिषदेच्या सभागृहाला श्रवण सुखाचे नवे लेणे अर्पण केले.सुधाकर कदम सुंदर गातात.त्यांच्या मधुर स्वरांना सारंगीची आणि तबल्याचीही सुरेख साथ लाभली होती.त्यामुळे आजचा कार्यक्रम चांगलाच रंगला............

●दै. तरूण भारत,पुणे.१६/७/१९८२.


४) सुरेश भटांनी शाबासकी दिलेल्या विदर्भातील सुधाकर कदम यांची ऐकण्यास उत्सुक असलेले पुणेकर कार्यक्रमाअगोदर सभागृहात हजर झाले होते. सुधाकर कदमांनी ’सा’ लावला मात्र पुणेकरांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे उत्स्फूर्तपणॆ स्वागत केले.आणि मग अशी रंगली मैफल की काही विचारू नका....गझल ही भावगीत किंवा सुगम संगीताच्या चालीवर गायची नसते तर शब्दाच्या मूळ अर्थाला आणखी अर्थ लावून शब्दाचा आनंद सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गझल गायनाचा हा केलेला महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे............

.●सुभाष इनामदार, सा.लोकप्रभा,मुंबई.दि.१५ आँगष्ट १९८२.


५) सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदम यांचे स्वर यातून फुललेली गझल भावपूर्ण,अर्थपूर्ण आणि उत्कंठापूर्ण होती.गझल गायनाचा ढंग हा शब्दांना अधिक अर्थ देतो.गझलांचे जे वैशिष्ठ्य उत्कंठा वाढवून धक्का देणे-तो प्रकार सुधाकर कदम यांच्या गायकीत प्रामुख्याने दिसला........................... 

●दै.लोकसत्ता,२३/७/१९८२.


६) ’हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही’ या गझलेचा प्रारंभच कदमांनी नजाकतीने केला.त्यातील ’नाही’ या शब्दावरील स्वरांचा हळुवारपणा सुखावुन गेला..............

●दै.केसरी,पुणे. दि.२५/७/१९८२.


७) मराठी गझल कशी गावी हे जाणून घ्यायचे असेल तर श्री सुधाकर कदमांची मैफल एकदा तरी ऐकावी.......... ●दै.सकाळ,पुणे.


८) गायकीतील फारसं कळो वा न कळो सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदमांचे स्वर एक वेगळं इंद्रधनुष्य घेऊन येतं.त्यांच्या मैफिलीत कधी चांदण्यांचे स्वर तर कधी स्वरांचे चांदणे होते.......................

●अनंत दीक्षित,दै.सकाळ,कोल्हापुर.६ जुलै १९८२


९) सुधाकर कदम यांनी उर्दू गझलप्रमाणे मराठी गझल कशा गायिल्या जातात याचे उत्कृष्ट दर्शन यावेळी रसिकांना करून दिले............

●दै.लोकमत,औरंगाबाद.३/३/१९८२


१०) Mr.Kadam's speciality is his throw of words coupled with exact modulations.His presentation is perfect & systematic wich at once impresses & touches................

●The Hitwad,Nagpur.23/4/1984


११) सुधाकर कदम की गायकी के अंदाज़ को समय समय पर दाद मिली...

●दै.नवभारत,नागपुर. ६ जुलाई १९८४


१२) कदाचित सुरेश भट यांच्या गझलची प्रकृती आणि सुधाकर कदम यांच्या आवाजाची जातकुळी एक असावी म्हणून सुरेश भटांच्या गझलमधील आत्मा सुधाकर कदम यांच्या आवाजाला गवसला असावा............

●दै.लोकमत,नागपुर.१३/७/१९८४


१३) मराठी गज़ले भी उर्दू की तरह सुमधूर होती है....................

●दै.चौथा संसार,इंदौर.२७/१२/१९८९


-मस्त कलंदर

१४.१०.२०११

Monday, October 4, 2021

श्रेष्ठ कलाकार,श्रेष्ठ माणूसही...दिलीप पांढरपट्टे




     सुधाकर कदम यांचा माझा स्नेहसंबंध सुमारे पंधरा वर्षांचा आहे आणि दिवसेंदिवस हा स्नेह वाढतच आहे हे मी सुरुवातीलाच आनंदाने सांगू इच्छितो.
माझ्या आठवणीप्रमाणे ते मुंबईत बांद्र्याला झालेल्या गझल संमेलनात मला पहिल्यांदा भेटले.
     यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णीहून ते लांबलचक आणि खडतर प्रवास करून मुंबईच्या या संमेलनात गझल सादर करण्यासाठी आले होते. त्यांची ही तळमळ आणि गझलसाठी प्रसंगी शारीरिक आणि मानसिक त्रास सोसण्याची तयारी मला तेव्हा खूपच भावली होती.
(त्यांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास तेव्हाही होता, हे लक्षात घेतले तर त्यांच्या या प्रवासातले त्यांचे धाडस लक्षात येते.)
     त्याच संमेलनात 'शब्द झाले सप्तरंगी' या माझ्या गझलसंग्रहाचे प्रकाशन झाले होते. तो संग्रह मी त्यांना आवर्जून भेटही दिला होता.या घटनेला सात-आठ वर्षे उलटून गेली आणि सुधाकरजींचा एके दिवशी
अचानक फोन आला. दरम्यानच्या काळात ते निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाले होते आणि माझ्या
काही गझलांना त्यांनी चाली लावल्या होत्या हे मला त्यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणातून कळले. त्यांच्या गायनाबद्दल आणि संगीतकार म्हणून असलेल्या त्यांच्या मातब्बरीबद्दल मला आधीपासूनच आदर होता. त्यामुळे या फोनमुळे मी साहजिकच हरखून गेलो आणि त्यांच्या चालींमध्ये त्यांच्याच आवाजात त्या गझला ऐकण्याची उत्सुकता वाटू लागली. यथावकाश आमची भेटही झाली; आणि त्या भेटीची मैफल कशी झाली ते कळलेच नाही. पुण्यातल्या वारजे इथल्या
त्यांच्या घरी पुढे अशा अनेक मैफली जमल्या. त्यांच्या कुटुंबियांच्या स्नेहशील स्वभावामुळे त्यांच्या घरी बसलो की, वेळ कापरासारखा उडून जातो हा अनुभव मला नेहमीच येतो.
     सुधाकरजी हे केवळ गायक व संगीतकार नाहीत; तर ते एक चांगले वाचक आणि लेखकही आहेत. 'फडे मधुर खावया' या त्यांच्या छोटेखानी गद्य पुस्तकात अनेक खुमासदार लेख आहेत. त्यातून त्यांच्या बहुश्रुतेचे आणि एकूणच जगण्याकडे बघण्याच्याउमद्या वृत्तीचे प्रत्यंतर येते.
     'काट्यांची मखमल' आणि 'तुझ्यासाठीच मी' या दोन गझल अल्बममध्ये माझ्या गझलांना त्यांनी संगीतबध्द केले आहे. सुरेश वाडकर आणि वैशाली माडे या लोकप्रिय गायक-गायिकांनी या गझल गायिल्या आहेत. सुधाकरजींनी या दोघांकडून ज्या कौशल्याने या गझला गाऊन घेतल्या आहेत, ते केवळ थक्क करणारे आहे. त्यांच्या आजवरच्या संगीतसाधनेचा आणि व्यासंगाचा पुरा अर्क या गझल अल्बममध्ये उतरला आहे असे निश्चितपणे म्हणता येते.
     यवतमाळ जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात बहुतेक सर्व आयुष्य व्यतीत झाल्यामुळे त्यांना मुंबई-पुण्याचा फारसा 'वारा' लागलेला नाही हे त्यांना भेटल्यावर एक-दोन मिनिटांतच कुणालाही सहज पटेल. प्रसिध्दीची फारशी सोय नसल्याने आणि त्यासाठी अंगी असावे लागणारे 'तंत्र' ही त्यांच्याकडे नसल्याने ते म्हणावे तितके प्रसिध्दीच्या झोतात आले नसतीलही, पण तो त्यांचा 
पिंडच नाही असे मला वाटते. त्याची त्यांना फार खंतही नाही.कारण तो त्यांचा स्वभाव नाही. जीवन समरसून जगण्यावर त्यांचा विश्वास आहे, त्यामुळे आयुष्यात काय मिळाले, काय नाही याचा ते फारसा विचार करीत नाहीत, कधी केलाच,तर तो स्थितप्रज्ञतेने किंवा साक्षीभावानेच करताना ते दिसतात.
'मैं जिंदगीका साथ निभाता चला गया,
हर फिक्रको धुएँमे उडाता चला गया'
अशा भावनेने जगणारा हा कलंदर कलावंत आहे. 
म्हणून मला ते एक श्रेष्ठ कलाकार वाटतात आणि एक श्रेष्ठ माणूसही!
---------------------------------------------------------------------
●डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित व #अक्षरमानव प्रकाशित गझलगंधर्व सुधाकर कदम सन्मानग्रंथ #चकव्यातून_फिरतो_मौनी मधून...


 

 

Thursday, August 26, 2021

गझल गायकीचा वारकरी...डॉ.किशोर सानप


      सुधाकर कदम, १३ नोव्हेंबर १९४९ रोजी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दोनोडा या खेडेगावी जन्मलेला एक उमदा गायक माणूस. बाप पांडुरंग, वारकऱ्याचं घराणं. खुद्द पांडुरंग बाप अनवट चालीत भजनं गात असे. गायनाचा पांडुरंगी गळा आणि वारकरी गायनाची परंपरा सुधाकरला बाळकडूच्या रूपातच मिळाली. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी गावी संगीत शिक्षकाची नोकरी केली.
आर्णीसारख्या खेडेगावांतून महाराष्ट्राला आणि बृहन्महाराष्ट्रातल्या रसिकराजांवर गझल गायकीची मोहिनी घालणारा सुधाकर म्हणजे गझलनवाज, #गझलगंधर्व, गझलचा स्वरताज, सुधाकर गझल गायकीसाठी, आपलं अख्खं आयुष्य साधना, तपश्चर्या करून; गझलांना स्वरसाज देताना, धुंदीत आणि गुंगीतच जगला. रमला. खरंतर सुधाकरचा अवतार सुफियाना गायकालाच शोभणारा. चेहऱ्यावर कारुण्यभाव, जगातलं दुःख नष्ट व्हावं ही चिंता. मानेवर वाढवलेल्या केसांच्या बटांची शाही झालर, गहुवर्णी देहयष्टी. जणू आपल्याच धुंदीत गाणारा फकीर, आपल्याच मस्तीत आणि धुंदीत जगला आणि रमलाही. खरंतर सुधाकर म्हणजे, गझल गायकीचा वारकरीच. अजूनही त्याचा रियाज, गायकी आणि गायकीची वारी थांबलेली नाही.

     गायन हा सुधाकरचा श्वास आहे. प्राण आहे. आत्मा आहे. गझलेच्या देहातला श्वास, आत्मा गायनाच्या स्वरानं उजागर करण्याच्याच साधनेत रत असलेला हा कलावंत आहे. म्हणूनच कवी सुरेश भट, संगीतकार यशवंत देव, राम पंडीत, पत्रकार अनंत दीक्षित, कवी श्रीकृष्ण राऊत आदिंसह सर्वदूर रसिकांनीही सुधाकर कदमच्या गझल गायकीला हृदयात अढळ स्थान दिलं आहे. #आद्य_मराठी_गझल_गायक आणि #गझलनवाज म्हणून समाजानं त्याचा गौरवही केला आहे.

     सन १९७५ पासून तर आजतागायत सुधाकर कायम गझल गायकीचा रियाझ करीतच आहे. '#अशी_गावी_मराठी_गझल' या गझल गायनाचे शेकडो धुंद करणारे कार्यक्रम सुधाकरनं आजवर केले आहेत. खुद्द सुरेश भटांनी सुधाकरच्या गझल गायन कार्यक्रमात गझलांचं निवेदन केलं आहे. सुरेश भटांनी गझलेला शब्द दिला. मराठीत गझल अजरामर केली. सुरेश भटांच्याही आधी माधवराव पटवर्धनांनी गज्जलांजली (१९३५) पहिल्यांदा मराठीत आणली. पुढे मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकरांसह अनेक दिग्गज कवींनीही गझलचा प्रभाव लक्षात घेऊन गझल लेखनात उमेदवारी केली. परंतु मराठी रसिकांच्या हृदयावर साम्राज्य केले ते गझलसम्राट सुरेश भट आणि गझलराज कवी श्रीकृष्ण राऊत यांच्या हृदयस्पर्शी गझलांनीच. मराठी गझलला लोकप्रिय आणि रसिकमान्य करण्यात या दोन्ही कवींचं योगदान अनन्यसाधारण आहे. गझलेला दिलेल्या शब्दांना अस्सल स्वरांची गायकी दिली ती #आद्य_मराठी_गझल_गायक सुधाकर कदम यांनी.

     सुरेश भटांची गझल आणि सुधाकरची गायकी, असा दीर्घ प्रवास विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकात झालेला आहे. विशेष म्हणजे गझलसम्राट विदर्भपुत्र सुरेश भटांनी गझलेला दिलेल्या शब्दांना स्वरांचा साज चढविण्याचे महत्कार्य विदर्भपुत्र सुधाकर कदमांनीच सुरुवातीच्या काळात केले. सुरेश भटांच्या लोकप्रियतेला सुधाकरनं स्वरांची सलामी दिली. गझल गायकीत सुधाकरने आपले अनन्यसाधारण स्थानही कमावले. मराठी गझल गायकीची सन १९७५ पासूनच सुरूवात करून मराठी गझल गायकीला भूमीही उपलब्ध करून दिली. पुढे विदर्भातील अकोल्याचे गझलनवाज भीमराव पांचाळेनी गझल गायकीत सर्वदूर चार चांद लावले. याच पाऊलवाटेवर राजेश उमाळे, दिनेश अर्जुना, मदन काजळे, विजय गटलेवार, माधव भागवत, रफिक शेख यांनीही गझल गायन क्षेत्रांत गायकी विकसित केली आहे. सुधाकरनं मराठी गझल गायकीची वहिवाट निर्माण केली, हे त्याचे योगदान मराठी गझल गायन क्षेत्रांत अलौकिक मानायला हरकत नाही.

     खुद्द सुधाकर गझल गायनाबाबत म्हणतो, गझल हा काव्यप्रकार इतर गीत प्रकारांपेक्षा वेगळा असल्यामुळे त्यासाठी वेगळ्या सुरावटी तयार कराव्या लागतात. संगीत हे केवळ तंत्र नसून अंतर्मनातून स्फुरणारी ती एक शक्ती असून ईश्वरप्राप्तीचे साधन आहे. मात्र त्यासाठी
तपश्चर्या करणे आवश्यक असते. कोणतीही कलासिध्दी अंत:करणाला पिळवटून निष्काम साधनेनंच प्राप्त करता येतं. खरंतर कलासाधना ही मुळात ईश्वराचीच भक्ती असते.सुधाकर कलेला ईश्वरप्राप्तीचे साधन मानतो. खरेतर कलेला ईश्वररूप मानणारा हा कलावंत कलेश्वराचाच भक्त आहे. कलेच्या भक्तीतूनच तो कलेचे अद्वैत साध्य करतो.सुधाकरला कलेचे अद्वैत साधले आहे. कलेच्या भक्तीतून गायकीच्या मुक्तीकडे त्याने
आजवर प्रवास केला आहे.

     कलेला पांडुरंग मानणारा हा स्वरांचा वारकरी आहे. पांडुरंगपुत्र आहे. सुधाकरला पांडुरंगानंच जन्म दिला. ज्याचा बापच पांडुरंग, त्याच्या कलाभक्तीला कोण अवरोध करणार? स्वरांचा सुधा-कर कलेचं दैवत पांडुरंगाची भक्ती करतो. गझल गायकीचं पंढरपूर निर्माण करणारा सुधाकर गझलेच्या पांडुरंगाचा निस्सिम वारकरी आहे. केला अभिमान पावठणी, ही वृत्ती अंगी बाणल्यामुळे कमालीची नम्रता, लिनता त्याच्या व्यक्तिमत्त्वाला उभारी देताना दिसते. कलावंताला अभिमानच पचवता येत नाही. अभिमान सोडून बाकीचं सर्वकाही पचवता येतं. सुधाकर कदम हा कलावंतांचं मानबिंदू तर आहेच, परंतु कलासाधक म्हणून तो आजवर जगत आला. जगत राहील यावरही विश्वास आहे..

     कलावंताला पूर्णत्वाचा ध्यास असतो. पावठणी तुडविल्याशिवाय कोणताही कलावंत कलेच्या पूर्णत्वाला पोहोचू शकत नाही, सुधाकर कलावंत आणि कलासाधक म्हणून कलेला,

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । 
कर कटावर ठेवोनिया ||

     मानूनच एकाग्रचित्तानं स्वरांची नवनवोन्मेषशाली निर्मिती करतो. शब्दांचे अर्थविश्व स्वरांच्याच नजाकतीतून उलगडून दाखविण्यासाठीही तो कायम साधनारत असतो. सुधाकर कलेला पांडुरंग मानतो.

माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार |
मज विश्वंभर बोलवितो ॥

किंवा

माझे सर्व भांडवल ।
बोलविले बोल पांडुरंगे ।।

     असंच मानतो. म्हणूनच, कलेचे अद्वैत किंवा कलेच्या पूर्णत्वाला पोहोचण्याची कलासाधकाच्या मुक्तीची वाट त्याला सापडली आहे. सुधाकर गायन कलेचा वारकरी आहे. कलामुक्तीच्या परमोच्च वाटेवरून प्रवास करणारा अस्सल कलासाधक आहे.

     सन १९८० ते १९८३ या चार वर्षात सुधाकर कदम आणि कवी सुरेश भटांनी 'अशी गावी मराठी गझल' हा तीन तासांचा गझल गायनाचा कार्यक्रम पहिल्यांदा सुरू करून सर्वदूर लोकप्रिय केला. संगीतकार यशवंत देव यांनी आणि अनेक गझलकार, कवी, पत्रकार, चाहत्यांनी सुधाकरचा गौरवही केला. सन १९८१ मध्ये गझल गायनाची पहिलीवहिली ध्वनिफित भरारी या नावानं आली. सुरेश भट, उ. रा. गिरी, श्रीकृष्ण राऊत, सतीश डुंबरे यांच्या गझलांना नव्यानव्या चाली आणि स्वरांजली देऊनच; अणूरेणू या थोकडा, सुधाकर आकाशाएवढा अशी भरारी सुधाकरनं संगीत आणि गायन क्षेत्रात घेतली. सुधाकरनं अनेकांच्या गझलांना स्वतःच्या चाली दिल्या. स्वयंभू स्वरही दिले. बहुतांश सुधाकरनं सुरेश भटांच्या गझलांना मात्र स्वरसाज चढविला. मराठीत ताकदीनं गझल लिहिणाच्या श्रीकृष्ण राऊतांच्याही गझलांना स्वर आणि आवाज दिला. कवीच्या शब्दांच्या खोलीत दडलेला आशय आणि अर्थाना, सुधाकरनं गायकीतून उजागर केले. कवीच्या शब्दतळाशी जाणे सोपे नव्हते. सुधाकर कवींच्या शब्दतळाशीच नव्हे तर शब्दडोहापर्यंत पोहून येतो. नंतरच तो शब्दांना स्वर आणि सांगितिक रचनांचा ईश्वरी सांजशृंगार चढवून रसिकांसमोर सादर करतो. मंत्रमुग्ध होणे कसे असते? हे सुधाकरच्या गझल गायकीने मैफिलींनी मराठी रसिकांना शिकविले. सुधाकर हा गझलेच्या सुरांनी संबंध परिसराला रोमांचित करणारा आणि मंत्रमुग्ध करणारा कलावंत आहे.

     सुधाकर कदम गेल्या चाळीस वर्षांपासून अथकपणे जीवाची आणि तब्यतेची पर्वा न करता कलासाधना करीतच आहे. नव्या चाली आणि नवे सूर देण्याची त्यांची तळमळ अस्सल असते. सुधाकरच्या गायकीचा आजवर मोठा गौरवही झाला आहे. स्वरराज छोट्या गंधर्वांनी सन १९७५ मध्येच, मराठी गझल गायकीच्या नवीन वाटेचा वाटसरू संबोधून चाळीस वर्षांपूर्वीच सुधाकरचं कलावंतपण उमेदीतच भक्कम मानलं होतं. पंडित जितेंद्री अभिषेकींनी, सुधाकरच्या सातत्य आणि परिश्रमपूर्वक कलासाधनेला यशाची गुरुकिल्ली मानली. गझलसम्राट कवी सुरेश भटांनी सन १९८१-८२ मध्येच सुधाकरला 'महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन' आणि 'गझलनवाज' ह्या मौलिक उपाधींनी गौरविले. गजानन वाटवेंनी, 'मला आवडलेला गझलिया', तर डॉ. यु. म. पठाणांनी, 'मराठी गझलेस स्वरसाज चढविणारा कलावंत' म्हटले. मा. सुधाकरराव नाईकांनी, 'शब्दस्वरांच्या झुल्यावर झुलविणारा कलाकार' म्हणून गौरव केला. समाजाच्या आणि संस्कृतीच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सुधाकरच्या गझल गायकीचा आजवर गौरवच केला आहे.

     सन १९८३ ते आजतागायता सुधाकरला अनेक मानसन्मान आणि पुरस्कारांनीही गौरवांकित केले गेले. समाजगौरव पुरस्कार, संगीतभूषण पुरस्कार, मॅन ऑफ दि इअर, आऊटस्टँडिंग यंग पर्सन, कलादूत, कलावंत, शान-ए-गझल, गझलगंधर्व, गझल गंगेच्या तटावर, भट गझल पुरस्कार, महाकवी संतश्री विष्णुदास पुरस्कार. सुधाकरचे म्युझिक अल्बमही दरम्यानच्या काळात गाजले. खपलेही. भरारी (मराठी गझलांचा पहिला अल्बम), झुला (पाठ्यपुस्तकातील कविता), अर्चना (भक्तिगीत), खूप मजा करू (बालगीतं), काट्यांची मखमल (मराठी गझल) तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी गीतांची स्वरलिपी, फडे मधुर खावया (विविध विषयांवरील ललित लेखसंग्रह) ही पुस्तकेही सुधाकरच्या कलासाधना आणि कलालेखणीतून साकार झाली आहेत.

     गौरवानं धुंद होण्यापेक्षा सुधाकरला कलासाधनेतच धुंद होता आलं. गौरव आणि मानसन्मानांनी सुधाकर मोहरला नाही. उलट सुधाकरचे स्वर अधिक मोहरले. कलावंताला गौरवानं मोहरण्यापेक्षा कलेतच अधिकाधिक मोहरता-फुलता-बहरता आलं पाहिजे. सुधाकरला हे जमलं. सुधाकरला कलेची वारी करणारा वारकरी होणं जमलं. खूप कलावंतांना कलावंत तर होता येतं. परंतु कलेचा वारकरी होणं नाहीच जमत. सुधाकर याही अंगाने स्वतःचं वेगळेपण जपत आला आहे. कलेशी कुठलीही तडजोड त्याने केली नाही. कलावंत म्हणून तो कधी याचक बनला नाही. सुधाकर कलासाधकच बनला. कलावंतांच्या तडजोडी कायम नाकारत कलेच्या धुंदीत, गुंगीतच आपल्या स्वरांचं अस्सल इमान त्याला एकाकीपणातही जपता आलं. इमान जपणारा कलावंत आजच्या मानसन्मानासाठी हपापलेल्या कलावंतांच्या जगात शोधूनही कुणी सापडत नाही. सुधाकर त्याला अपवाद आहे.

      सुधाकर हा जसा एक लोकप्रिय गायक आणि कलावंत आहे. तसाच तो अत्यंत हळवा.. संवेदनशील, कनवाळू माणूसही आहे. बरेचदा कलावंतांना आपलं माणूसपणच टिकवता येत नाही. कला आणि अहंकार टिकविता टिकविता माणूसपण केव्हा गळून पडले, हेही कळत नाही. सुधाकरने माणूसपणही टिकविल. माणूस म्हणून कुटुंबावर-समाजातल्या कुटुंबियांवर मित्रांच्या कुटूंबावर समाजातल्या कुटुंबियांवर मित्रांच्या कुटुंबावर अगाध प्रेम केलं. या माणसाला कधी राग येतो का? कधी अहंकार जागा होतो का? कधी हा कलेचं मार्केटिंग करू शकतो का? असे अनेक प्रश्न आम्हा मित्रमंडळीत कायम उपस्थित होतात. अस्सल वैदर्भिय वऱ्हाडी बोलीतून, काय गड्या किती दिवसांनी तुला भेटता आलं? अशी सुरूवात करणार. समाजातल्या सर्वच स्तरांतल्या लोकांशी जवळीक साधून, सुधाकर असंच अघळपघळ बोलून, गळ्यात हात टाकणार. पाठीवर शाबासकी देणार. सर्व बिरूदे विसरून प्रेम करणे सुधाकरला जमले.

     सुधाकर म्हणजे बोलघेवडा. पटकन् लहान मुलासारखा घरात विरघळून जाणार.. लेकराबाळांसह सर्वांशीच युगायुगाचे नाते मानून बोलणार. सुधाकरच्या अंत:करणात एक कुटुंबवत्सल माणूस आणि निरामय प्रेम करणारा सहोदर मित्र दडलेला आहे. जिवघेण्या आजारातून परतल्यावर तो गंमतीनेच मृत्यूच्या दाढेने काबूत घेतल्यावर आपण कसे मृत्यूशी झुंजलो आणि मृत्यूला पराभूत करून मित्रांना भेटायला आलो, हेही सांगणार. सुधाकर कदम म्हणजे एक आनंद. आनंदाचे डोह, आनंदाची पर्वणी, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. सुधाकरच्या मुली, पत्नी, निषादही सुधाकरचेच शोभणारे वत्सल आणि प्रेमळ रूप. सबंध महाराष्ट्रातच सुधाकरचे मैत्रमंडळ. जेथे जातो तेथे तूच माझा सांगाती, हीच वृत्ती सुधाकरला जगण्याची ऊर्जा देणारी आहे.

     सुधाकरने गझल गायनाची सार्वजनिक सुरूवात सन १९७५ नंतर केली. सन १९८० ते १९९० पर्यंत सुधाकर गझल गायक म्हणून गझलनवाज, शान-ए-ग़ज़ल बनला. सन १९९० नंतर गझल गायनाच्या क्षेत्रांत अन्यही अनेक कलावंत उमेदवारी करू लागले. सुधाकरला उमेदवारी करण्याची आणि टिकविण्याची गरजच नव्हती. सुधाकर तर मराठी गझलांना स्वरसाज देणारा आद्य अभिजात कलावंत माणूस. गझलांना चाली, ताल, लय, अर्थघनता, नवस्वर देणारा स्वरसम्राट. गायकाच्या जातकुळीत जन्मून, कलेची वारी करणारा पांडुरंगमय कलासाधक. कलेचा वारकरी जेव्हा कलासाधनेतून पांडुरंगमय होतो, तेव्हाच कला आणि कलावंताचं अद्वैत साकार होते. कोणत्याही कलावंताचं अंतिम ध्येय कलेच्या मुक्तीचा आनंद अनुभवणे असते.

आनंदाचे डोही आनंद तरंग । 
आनंदचि अंग आनंदाचे ॥
काय सांगो झाले काहीचियेबाही ।
आता पुढे चाली नाही आवडीने ॥ 

     या अद्वैतानंदाच्या स्थितीत कलासाधनेचा आनंद लुटणे, हे परमभाग्य ज्याला मिळाले, त्या कलावंताचे नाव आहे, गझलनवाज, गझलगंधर्व, गझलस्वरताज, गझलगायक सुधाकर कदम. कलेचा परम वारकरी. गझल गायकीचाही पांडुरंगमय पांडुरंगपुत्र सुधाकर कदम.
------------------------------------------------------------------

*डॉ. श्रीकृष्ण राऊत संपादित व #अक्षरमानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ #चकव्यातून_फिरतो_मौनी  मधून...


 

 

Wednesday, August 25, 2021

पत्र...सुरेश भटांचे.

.      सुरेश भट आर्णीला माझेकडे आले की 'रिलॅक्स' व्हायचे.छान मूड लागायचा व गझला लिहायचे... 
१९८० च्या त्यांच्या खालील पत्रावरून कळेलच...
------------------------------------------------------------------
प्रिय सुधाकरराव,
दि.१६ रोजी सायंकाळी साडेचारला सुखरूप पोहोचलो.घरी पोचताच मुलगा परत आल्याचे कळले.फार मोठे दडपण नाहीसे झाले.
मी दि.२१ ला नागपूर सोडत असून चंद्रपूर व मूल 
आटोपून दि.२९ ला परत येईन.
     तुमच्या घरी तुम्ही सर्वांनी  मला फारच आराम दिला.सौ.सुलभाने माझी फारच सेवा केली.असह्य मानसिक दडपण असताना मी कसातरी दिवस काढत होतो.हे दडपण काही अंशी तुमच्या घरी हलके झाले.
जानेवारी महिनाही दौऱ्याचा आहे.२९ व ३० डिसेंबरला नागपूरमध्ये आहे.
     खूप तयारी करा.मुलांना आशीर्वाद.शेखरला (त्या वेळचा तबला वादक) नमस्कार.

तुमचा 
सुरेश भट
---------------
*मानसिक दडपणातून मुक्त झाल्याबरोबर मूल येथे झालेली 'हूल' ही गझल स्वरबद्ध करण्यासाठी पोस्टाने आर्णीला पाठवली होती. ती पण खाली  दिली आहे.



 

Sunday, August 8, 2021

गझलगंधर्व - मयूर महाजन



    संगीताचा ध्यास बाळगणारे अनेक कलाकार संगीत जगताला लाभले आहेत.त्यापैकी एक उल्लेखनीय नाव म्हणजे मराठी गझल गायक व संगीतकार सुधाकर कदम होय.मराठीतील आद्य गझलकार म्हणून जसे सुरेश भटांचे नाव येते, तसेच मराठीतील आद्य गझल गायक म्हणून सुधाकरजींचे नाव येते. फक्त गझलच नाही तर शास्त्रीय गायन, सरोद वादन, मेंडोलिन वादन, सुगम संगीत गायन या सोबतच स्वररचनाकार व संगीतकार म्हणूनही त्यांनी अतिशय मोलाचे कार्य संगीत क्षेत्रात केले आहे. त्यांच्या स्वररचनांमधून ज्या वेगवेगळ्या सुरावटी रसिकांसमोर आल्या त्यावरून त्यांचे या क्षेत्रातील कौशल्य व शास्त्रीय संगीताचा गहिरा अभ्यास स्पष्टपणे दिसून येतो.
     शास्त्रीय संगीत हे मुख्यत्वे स्वरप्रधान संगीत आहे.भावगीत वा गझल  गाताना त्यातील शब्दप्रधानता प्रकर्षाने जाणवते.त्यातल्या त्यात गझलगायन प्रकारामध्ये संगीत, काव्य व लयकारी याचा समसमा आनंद घेता येतो. याबाबतीत पं. रामकृष्णबुवा वझे म्हणतात...'गझल गायकीला आपले असे स्वत:चे  एक आगळे वेगळे अती मोहक स्थान आहे.शब्दोच्चार स्पष्ट असले आणि ते विविध अंगांनी नटविण्याची कुवत गायकात असली तर गझलगायनातून ख्यालगायनाइतकी रसोत्पत्ती होऊ शकते आणि ती सुलभरीत्या रसिकांपर्यंत पोहचू शकते.'
     सुधाकर कदमांच्या  बाबतीत ज्येष्ठ भावगीत गायक स्व.गजानन वाटवे यांनी काढलेले 'मला भावलेला मराठी गझल गायक' (त्यांच्या रोजनिशीत नमूद करून ठेवलेले) उद्गार सार्थ ठरतात.याचे कारण त्यांच्या स्वर-रचनांना  असलेली शास्त्रीय संगीताची पक्की बैठक आणि काव्यानुरूप स्वररचना हे होय.खरे तर सुगम संगीत हे नावालाच सुगम असते, प्रत्यक्षात ते सुगम नसते.सुधाकर कदमांच्या मी ऐकलेल्या रचना या प्रकारातीलच आहेत.पं.शौनक अभिषेकी व अनुराधा मराठे यांनी गायिलेल्या 'अर्चना' या अल्बममधील रचनांचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न झाला तेव्हा निवेदिकेने या दोघांना सुधाकरजींच्या स्वर-रचनांबद्दल विचारले असता ते म्हणाले, 'रचना ऐकायला सोप्या पण गायला कठीण .' यावरून त्यांची संगीतकार म्हणून एक वेगळी हुकमत दिसून येते.
     एकदा आम्ही सहज बसलो असता त्यांनी ११ मात्रेच्या (सवारी) तालात स्वरबद्ध केलेली मराठी गझल ऐकवली. माझ्या माहितीप्रमाणे मराठी व हिंदी सुगम संगीताच्या क्षेत्रातील ही पहिलीच रचना असावी.नेहमीप्रमाणे केरावा, दादरा, रूपक, व्यतिरिक्त चाचर-सवारीसारख्या तालाचा सुगम संगीताकरीता वापर करून मूळ बोलाव्यतिरिक्त तेवढ्याच मात्रात विविध बोल बसवून रचनेला उठाव देणे, हे त्यांचे आणखी एक वैशिष्ठ्य आहे.
     संगीतकाराला काव्याचेही सखोल ज्ञान असणे आवश्यक असते.सुरेश भटांच्या दीर्घ सहवासामुळे त्यांचा हा अभ्यासही मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे शब्दातील भाव सुरावटीतून व्यक्त करण्याची हातोटी त्यांना साध्य झाली आहे. 

     'जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही ' 

     ही गझल त्यांनी मारवा या रागात स्वरबद्ध केली आहे. पण 'एकदा तुटलो असा कि मग पुन्हा जुळलोच नाही' या दुसऱ्या ओळीतील 'तुटलो' या शब्दासाठी मारव्यात नसलेला कोमल मध्यम व 'जुळलोच' या शब्दाकरिता केलेला कोमल धैवताचा प्रयोग अतिशय समर्पक असल्यामुळे 'दाद लेवा बन गया !' गझलगायकीचे हेच वैशिष्ठ्य असावे.काव्य जसे आपला आशय घेऊन चालते तशीच स्वररचनाही  त्या आशयाला अधिक स्पष्ट करत चालते. 'साईन लाईन व क्रॉस लाईनचा संबंध प्रत्येक कडव्याशी सतत येत असतो. हा संबंध सांगीतिकदृष्ट्याही टिकविणे ही संगीतकाराची फार मोठी जबाबदारी असते.असा सुसंवाद त्यांच्या अनेक रचनातून जाणवतो.

      'दिवस हे जाती कसे अन ऋतू असे छळतात का ?'

     या गझलमध्ये मुखडा षड्ज व त्याभोवती ठेवलाय तर पुढची ओळ मध्यम व त्याच्या आसपासच्या स्वरांभोवती फिरते.त्यामुळे या दोन्ही ओळी संपतात तेव्हा या दोन्ही ओळींना सांगीतिक पूर्णत्व आलेले असते. या गझलेकरिता त्यांनी भीमपलासी , मधुकौंस या रागांचे मिश्रण केले आहे, पण आशयाशी सुसंगतच. काव्यातील भावार्थानुसार बदलत जाणारी स्वररचना हे त्यांचे आणखी एक वैशिष्ठ्य...

     'कुठलेच फूल आता मजला पसंत नाही.'

     'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा.'

     'घाव ओला जरासा होता.'

      'शक्ती दे तू आज मजला .'

      'हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही.'

     अशा अनेक रचना भूपाली, बिहाग, भीमपलासी, यमन, कौशीकानडा, मालकौंस, भूपेश्वरी, मारवा, भैरवी, पहाडी, (त्यांचा स्वत:चा) 'मध्यमी' वगैरे रागांचा उपयोग करून त्यांनी स्वरसाज चढविला आहे.
     मराठी भाषेचे व साहित्याचे सखोल ज्ञान त्यांना आहेच, पण त्याचबरोबर उर्दूचाही अभ्यास करून उर्दू गझलाही त्यांनी तेवढ्याच ताकदीने स्वरबद्ध केल्या आहेत.हे त्यांनी हाथरसच्या (उत्तर प्रदेश)  'संगीत' मासिकामधील 'नग़्म-ए-ग़ज़ल' या सदराकरीता केलेल्या स्वरलिपीवरून व वेगवेगळ्या गायकांकडून गाऊन घेतल्याने कळून येते.
     त्यांनी स्वरबद्ध केलेले व सुरेश वाडकर,अनुराधा मराठे, पं.शौनक अभिषेकी, वैशाली माडे अशा अनेक गायक-गायिकांनी गायिलेले 'भरारी', 'खूप मजा करू', 'अर्चना', 'काट्यांची मखमल', 'तुझ्यासाठीच मी...' इत्यादी अल्बम रसिकप्रिय झाले आहेत.ते स्वत: कवी, लेखक आहेत. अशा बहुआयामी कलावंताला दीर्घआयुरारोग्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून संपवतो.

*डॉ.#श्रीकृष्ण_राऊत संपादित व #अक्षरमानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ '#चकव्यातून_फिरतो_मौनी' २०१८ मधून ...


 

 

Thursday, July 15, 2021

नवोदित मराठी गझल गायकांचें अभिनंदन व शुभेच्छा...

 २०१७ मध्ये पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात झालेल्या जागतिक मराठी गझल संमेलनाच्या एका सत्रात,मराठीमध्ये ज्या प्रमाणात गझल लिहिणारे तयार झाले त्या प्रमाणात गायक/गायिका तयार झाल्या नाहीत,अशी खंत मी व्यक्त केली होती.परंतू गेल्या चार वर्षात पुढे आलेल्या मराठी गझल गायकांची संख्या पाहून आनंदाने ऊर भरून आला.याचसाठी माझा अट्टाहास होता. मी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष होत चालला ही मराठी गझलसाठी व माझ्यासाठीही खूप आनंदाची बाब आहे.सर्व नवोदित मराठी गझल गायक/गायिकांचे मनःपूर्वक अभिनंदन व भविष्यातील वाटचालीकरिता  खूप खूप शुभेच्छा...

Tuesday, July 13, 2021


 

एक शम्मा जिगर में ही जलती रही...श्रद्धा पराते


     नागपुर के धनवटे रंगमंदिर में १५ जून की शाम मराठी ग़ज़ल के नाम संपन्न हो गयी। गायक थे,यवतमाल जिला आर्णी के श्री सुधाकर कदम। नगर के कलाप्रेमी रसिकों के लिए मराठी ग़ज़ल गायन का तीन घंटे का कार्यक्रम प्रथम प्रयोग था जिसे अपूर्व प्रतिसाद मिला।तालियों से हॉल निरंतर गुंजता रहा।वैसे अनुभव यह है कि मराठी श्रोता दाद देने में निहायत कंजूस है,किंतू इस प्रोग्राम में विदर्भ के मराठी कवियों की रचनाओं को और श्री सुधाकर कदम की गायकी के अंदाज को समय समर पर दाद मिली।उर्दू-हिंदी ग़ज़ल की महफिल आम बात है।शब्द चाहे ना समझे वह श्रोता के दिल में उतर ही जाते है और आप की वाह निकल पडती है।ग़ज़ल की मूल प्रकृति को दुसरी भाषाओं में ढालना बहुत कठीन काम है।
फिर भी अन्य भाषाओं में भी ग़ज़ल सफलतापूर्वक लिखी जा रही है।मराठी ग़ज़ल अभी भी ग़ज़ल की आत्मा को पकड नहीं पाई,किंतू मराठी कवि निरंतर प्रयासरत है।उनकी लेखनी से ग़ज़ल उतर रही है। गायक के गलेसे होकर जबतक ग़ज़ल लोगों के दिल में उतर नहीं जाती,तब तक के निर्माण का उद्देश सफल नहीं हो पाता।
     मराठी ग़ज़ल गाने के इस कठीन व्रत को चुनौती के साथ स्वीकारा है,श्री सुधाकर ने...उनका अपना अलग अंदाज़ है। मराठी रचना के मराठीपन को क्षति न पहुंचाते हुए,बडी ही सुहानी तर्जो में वे रचना को कुशलतापूर्वक बांधते है। कवि की कविता का मूल स्वर पकड पाना उनका अपना सामर्थ्य है।उनकी स्वरधारा रसिकों का मन मोहने का सामर्थ्य रखती है।धनवटे रंगमंदिर में यह उनका प्रथम कार्यक्रम जरूर है किंतु इससे पूर्व अनेक बार नागपुर के विविध भागों में महफिलें हो चुकी है। पश्चिम महाराष्ट्र के कलाप्रेमीयों ने इन्हे बेहद पसंद किया है।पुणे की मराठी साहित्य परिषद ने श्री सुधाकर को बडे सम्मन के साथ सराहा है। कोल्हापूर नगर के कलाप्रेमी रसिकों का सम्मान श्री सुधाकर अनेक बार पा चुके है। रसिकों का यह प्यार ही उन्हे गाने की अपनी मस्ती बरकरार रखने की ताकद बख्शता है।
    इसी संदर्भ में मराठी के विख्यात कवि श्री नारायण कुलकर्णी कवठेकर कहते है...
’मस्तीत गीत गा रे,
देतील साथ सारे’
रसिक साथ देंगे,भविष्य साथ देगा,इस विश्वास से श्री सुधाकर गाये जा रहे है। विदर्भ के एक लोकप्रिय मराठी कवि श्रीकृष्ण राऊत जीवन का अध्यात्म बडे सरल शब्दों मे बताते है...
’दुःख माझे देव झाले शब्द झाले प्रार्थना,
आरती जी गात आहे तीच माझी वेदना’
   उन्होने जीवन में आनेवाले दुःखों को ईश्वर का दर्जा दे दिया और वेदना को आरती की संज्ञा...शब्द जो कवि की लेखनी और गायक के गले से उतरते हैं वेप्रार्थना हो गये।
    और शृंगार के क्या कहने,तरल मुलायम शृंगार को शब्दांकित करने की कला में कविवर्य श्री सुरेश भट की कोई सानी नहीं। वे कहते है... 
’ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची
तापलेल्या अधीर पाण्याची...’

’हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही’
और कहते है...
’पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली’
इसी शृंगार का निर्वाह करते हुये पुणे के श्री अनिल कांबले कहते है...
’जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू
ऐन वेळी अशी काय करतेस तू’
   मराठी के एक बुजुर्ग कवि श्री उ.रा.गिरी ने एकाकीपन के तीव्र एहसास  को बडी संजीदगी से शब्दों में ढाला है...
’या एकलेपणाचा छेडीत मी पियानो
ओठांस भैरवीच्या दंशून जा स्वरांनो
तिमिरात हरवलेली निद्रा अनाथ माझी
माझ्यासवे तुम्ही ही कां जागता कळ्यांनो’
    निद्रा अनाथ कहने का कवि का यह अंदाज निराला है। इस रचना को श्री सुधाकर ने बडी गंभीर,गहन और दिल छू लेनेवाली तर्ज में ढाला है।’हरवलेली’ शब्द पर स्वरलहरी की जो करामात वे दिखाते है,वह खॊ जाने के भाव को मूर्त रूप समक्ष खडा करती है।रसिक स्वर की इस अदाकारी में खो जाता है।
    संगीत का क्षेत्र ही ऐसा है,जहां गायक निरंतर विद्यार्थी बना रहता है।श्री सुधाकर कदम स्वयं को हमेशा के लिये विद्यार्थी मानते है।संगीत के क्षेत्र में श्री सुधाकर की साधना करीबन बीस वर्ष से कम नहीं है। वे स्वयं संगीतकार है स्वयं गायक है।उनकी दमदार आवाज किसी भी प्रभाव व नाटकीयता आवेश से मुक्त है।सच्चे कलाकार को जीवन में कितनी भी सफलता मिले,कितना भी वैभव प्राप्त हो जाये,उसके हृदय में एक चिरंतन उदासी का,एक चिरंतन सी अनबूझ प्यास का साम्राज्य होता है,इसी को उद्देशकर वो कहते है...
”सभी कुछ मिला ज़िंदगी से मगर
एक शम्मा जिगर में ही जलती रही’
हां !!! वे उर्दू-हिंदी ग़ज़ल गाने के भी अभ्यास में व्यस्त है।इसी प्यास के दर्द की शमा के प्रकाश में वे अपना मार्गक्रमण करते चले जायेंगे,ऐसा उनका विश्वास है।कलाकार की प्रकृति में निर्मोहीपन होना उसके वह होने का प्रमाण होता है।इसी से वे कहते है...
’अपनी तबीयत ही फकीराना है
वैसे जीने को हर बहाना है
पत्ते पत्ते पे है कफस का गुमान
कौन सी शाख आशियाना है’
   सुधाकर की तबियत का फकीरानापन और सतत की खॊज ही उन्हे प्रगति के मार्ग पर निरंतर प्रेरणादायी होगी।विदर्भ के एक कोने में आर्णी जैसे गांव में जहां साधनो का अभाव हो सकता है,ऐसे स्थान में वे निरंतर साधनारत हैं यही इसका प्रमाण है।

दै.नवभारत,दि.६ जुलै १९८४

●डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित,#अक्षरमानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ  #चकव्यातून_फिरतो_मौनी मधून...



 

 

Wednesday, May 19, 2021

गझल सुधाकर कदमची...श्रीकृष्ण राऊत.


सुधाकर कदम, ये किस चीजका नाम है?
 हे आता जवळ जवळ संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे़ पुन्हा सांगण्याची काही गरज नाही, वाट आहे फक्त आता एकच की महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून कॅसेट रेकॉर्डरवर हा आवाज दर्दी गझल प्रेमींना कधी मोहिनी घालायला सुरवात करतो आणि तो नुसताच मोहिनी घालणार नाही तर त्यापुढे जाऊन थेट हृदयात त्याचे स्वतःचे घर ही करेल, आणि तुम्ही-आम्ही नुसतेच बघत राहू-ऐकत राहू़ इतकं स्वर, सौंदर्य व काळजात सरळ उतरवण्याची देखणी अदा सुधाकरच्या गळ्यात आहे़ मागेपुढे एखाद्या मैफिलीत सर्वांच्या समक्ष एखाद्या दर्दी गझल ने त्यांच्या गळ्याचे चुंबन घेतले नाही तर नवल नाही़.
 कवीला काय म्हणायचे आहे? काय सांगायचे आहे? काय सुचवायचे आहे? ते कवी कमीतकमी आणि नेमक्या शब्दात मांडतो़ तरी आशयाचा एखादा पैलू, अर्थाचा एखादा पदर रसिकाला गझल वाचून पूर्णपणे उलगडेलच असे नाही आणि गझलच्या बाबतीत तर ‘समजणे’ हे क्रियापद किती थिटे आहे हे आपल्याला कालांतराने का होईना पण समजल्याशिवाय राहत नाही़ तेव्हा अर्थाच्या पूर्णत्वाकडे आणि आशयाच्या सघनतेकडे रसिकाला हळुवार सुखवटीतून घेऊन जाण्याचे काम गझल गायक आपल्या गळ्याच्या ताकदीने करीत असतो़. आणि मला वाटते गझल गायनाचं खरं सामर्थ्य यातच आहे़ नुसत्याच गायकीचं कसब दाखवायचं असेल तर इतर गायन प्रकार काय थोडे आहेत?
 ही जाण सुधाकर कदमांना आहे़ याचा मनापासून आनंद झाला़. ती जसजशी विकसित झाली; तसतशी गझल त्यांना प्रसन्न झाली.
शब्दातील आशयाचा सुगंध कधी दरवळू लागला,स्वरांच्या सौंदर्यलहरींनी कधी काळजात भरू लागला ह्याचे भान श्रोत्यांनाही राहू नये व गझल गायकालाही. इतका गझल गायकाने महफिलचा अंशनअंश गझलमय करून टाकला पाहिजे. म्हणजेच शब्दांतील आशयाचा सुगंध व स्वरातील सौंदर्य हळुवार आंजारत- गोंजारत एकाच वेळी शब्दातील कवी व स्वरातला गायक एकमेकांशी खेळीमेळीने वागत असल्यासारखे पेश केले पाहिजे. सुधाकर कदमांना हे साधलं आहे हे विशेष ! ते शब्दातल्या कवीला कुठे दुखावत नाहीत तर स्वरातल्या गायकाला कुठे मुरड घालत नाहीत; हे त्यांना जितके अधिक आत्मसात होईल तितकी त्यांच्यावर जान देणार्‍यांची संख्या वाढत-वाढत जाऊन चांदण्यांसारखी मोजता येणार नाही़.
 गझल पेश करण्यापूर्वी गझलच्या एकंदर रुपाची झलक एखाद्या शेरमध्ये दाखविण्याची त्यांची शैली गुलाम अलीची आठवण करून देणारी असली तरी काही आठवण फार सुखद असतात, त्या तर्‍हेची ही आठवण आहे़. त्यामुळे होणार्‍या वातावरण निर्मितीने श्रोत्यांना विश्वासात घेतल्या जाते; नंतर स्वतःच्या आयुष्यातील एखादा अनुभव ज्या तन्मयतेने आपण हळुवार सांगतो तितक्या आत्मियतेनं कवीच्या शब्दातला अनुभव फुलविल्या जातो - खुलविल्या जातो - श्रोत्यांपर्यंत पोचविल्या जातो व त्यांना पुनः प्रत्ययाचा आनंद होतो़.तो एक प्रकारचा सूचक असा गोड इशारा असतो़. वाट कोणत्या स्वर्गाकडे जाते हे दिग्दर्शीत करणारा फलक असतो़. आणि मला वाटते ही शैली गझल गायनाचा एक शृंगार आहे़.
 मी सुखद आठवण म्हणतो ते या अर्थाने. रसिकांना ही सुखद आठवण चालेल कारण त्यानंतरची स्वर्गनिर्मिती ही आपल्या साधनेच्या ऐपतीप्रमाणे करणे हे प्रत्येक गझल-गायकाचे स्वतःचे योगदान असते आणि ते योगदान सुधाकर कदम आपल्या स्वरांच्या आरोह-अवरोहातून, रागांच्या माध्यमातून आणि हार्मोनियमवरील आपल्या बोटातून ‘दिल खोलके’ देतात तेव्हा ऐकणारा तृप्त होतो़.आणि गुणगुणत राहतो-

‘झिंगतो मी कळेना कशाला
जीवनाचा रिकामाच प्याला.’

लोकमत साहित्य जत्रा
१० जुलै १९८३

https://youtu.be/RlJBMllyJFg

#लेख #गझल #गझल_गायक ##singer #music


 

Monday, May 17, 2021

दै. हिंदुस्थान,अमरावती...


      मराठी गझल हा काव्यप्रकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे महान कार्य करणाऱ्या ज्या दोन व्यक्तींची आदराने नावे घेतली जातात, त्यातील एक म्हणजे कविश्रेष्ठ #सुरेश_भट व दुसरे म्हणजे कवी, गझलकार, गीतकार, संगीतकार व स्फुट लेखक 72 वर्षांचे चिरतरुण श्री. #सुधाकर_कदम. दोघेही वैदर्भीय. भट अमरावतीचे तर कदम यवतमाळ जिल्ह्याचे.
दै. हिंदुस्थानच्या "#रंग_गझलेचे" या लोकप्रिय सदरात आज कदम सर प्रथम प्रवेश करीत आहे याचा मला आनंद आहे.
       गझल सम्राट स्व.सुरेश भट ज्यांचा उल्लेख 'महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन "म्हणून करतात त्या सुधाकर कदम  यांनी मराठी गझल गायकी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात  रूजविण्यासाठी,व लोकप्रिय करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. "सुरेश भट स्मृती  पुरस्कार तसेच" #गझलगंधर्व " हा किताब प्राप्त कदम सरांचा १९८३ साली "भरारी " हा,पहिला मराठी गझल गीतांचा अल्बम प्रसिद्ध झाला.  "#खूप_मज्जा_करू "हा तेरा बालगीतांचा अल्बमही प्रसिद्ध  झाला आहे. गुलशन कुमार प्रस्तुत सीडी मध्ये " #अर्चना " या भक्तिगीतांची सीडीही प्रकाशित झाली आहे.गायक सुरेश  वाडकर व गायीका वैशाली माडे यांनी स्वरसाज चढवलेल्या "#काट्यांची_मखमल" या मराठी गझल अल्बमला , "#तुझ्यासाठीच_मी "या गीतकार दिलीप पांढरपट्टे यांच्या अल्बमला तसेच बालभारती ,पहिली ते चौथीच्या कविता" #झुला " व कुमार भारती आठवी ते दहावीच्या "झुला"ला सुधाकर कदम यांनी संगीत दिले आहे.वृत्तपत्रातून त्यानी "#फडे_मधुर_खावया "या सदराखाली स्फूट लेखन ही केलेले आहे.
अनेक वाद्य  वाजविण्यात पारंगत असलेल्या सुधाकर कदम यानी नागपूर आकाशवाणीचे #गायक व #वादक म्हणूनही काम केले आहे.
त्यांना   ' आऊट स्टॅडिंग यंग पर्सन', 'कलादूत', 'समाजभूषण', 'कलावंत', 'शान-ए-ग़ज़ल', 'महाकवी संतश्री विष्णुदास','गझल गंगेच्या तटावर' या व अन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.अर्चना या त्यांच्या अल्बम मधील भक्तिगीते पंडित शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे यांनी गायिलेली आहेत.
     आज त्यांची "घर आहे पण दारच नाही" ही गझल सादर करतो आहे. आस्वाद घ्यावा. प्रतिसाद द्यावा.

-अनिल जाधव 
अक्षय तृतीय
१४ मे २०२१


 

Tuesday, May 11, 2021

सुरेश भट आणि मी...१९८१

.              जेव्हा कुणीही मराठी गझल गात नव्हते तेव्हा     #मराठी #गझल व #गझल_गायकीच्या #प्रचार_प्रसारासाठी सुरेश भट व मी महाराष्ट्रभर फिरत होतो.त्यावेळी आम्ही दोघेही अर्धा-अर्धा कार्यक्रम करायचो.सुरवातीला भट त्यांच्या पद्धतीने व मध्यंतरानंतर हार्मोनियम तबल्याच्या साथीसह मी स्वरबद्ध केलेल्या गझला सादर करायचो. एकदा प्रयोग म्हणून दोघांनीही अधून मधून (मिक्स) गझला सादर करण्याचा एक प्रयोग १९८१ मध्ये यवतमाळ जिह्यातील #पांढरकवडा या गावी करून पाहिला...पण या पद्धतीमध्ये आम्ही दोघेही व्यवस्थित 'सेट' न होता 'डिस्टर्ब' होत गेलो.म्हणून यानंतर पुढे दोघांनी मिळून जितके कार्यक्रम केले ते अर्धे अर्धे...
         आज अचानक जुन्या फाईलमध्ये नागपुरहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक #लोकमतचे खालील कात्रण दिसले ते मुद्दाम सादर करीत आहे.

 


 

Wednesday, April 7, 2021

स्वरलयीचा गुलमोहर - राम जोशी


                सुधाकर कदम म्हणजे संगीतानंदात रममाण झालेलं व्यक्तिमत्व. त्यांनी संगीताच्या प्रांगणात (गांधर्व संगीत विद्यालय,आर्णी) सुरू केलेल्या कार्याला पंचवीस वर्षे एवढा दीर्घ कालावधी लोटला, म्हणजेच हे रौप्य महोत्सवी वर्ष. त्या निमित्त त्यांचा गौरव व विविध कार्यक्रम केले जात आहेत ही गोष्ट आनंददायी आहे़.
                  संगीताच्या माध्यमातून केलेल्या सेवेचा हा गौरव करणं हे समजपुरुषांच कर्तव्य आहे़. त्या निमित्त त्या व्यक्तिच्या कार्यकर्तृत्वाचे सिंहावलोकन होत असते, त्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळते, मार्गदर्शन होत असते़,
                 मी कोल्हापुर सारख्या, विदर्भापासून खूप दूर असलेल्या गावी राहणारा. पण त्यांची भेट-सहवास काही काळापुरताच लाभला़. पण तेवढ्या थोडक्या सहवासांनी आम्ही मनोमनी एकत्र आलो व दोघांत निखळ मैत्री निर्माण झाली़. त्याचं असं झालं, सुमारे १२/१४ वर्षापूर्वी कवीश्रेष्ठ सुरेश भटांच्या कविता-गझल सादर करण्यासाठी कदमांनी महाराष्ट्र पादाक्रांत केला. त्यावेळी त्यांचा कार्यक्रम कोल्हापुरला रसिकांच्या उपस्थितीत झाला. मला निमंत्रण होते़. कार्यक्रम चांगला झाला, मी चांगलाच प्रभावित झालो़.
                सुरेश भटांच्या गझलांची नवलाई, अनुरूप स्वर रचना व खास पध्दतीची पेशकश. तशात तबल्याच्या साथीला शेखर सरोदे तर सारंगीवर लतीफ अहमद खांसाहेब़. असा अनोखा सांगितिक योग जुळून आला़. पुढे पुढे जाऊन ओळख करुन घेणे हा माझा स्वभाव नसल्यामुळं भेट घेतली नाही. पण हा कलाकार आणि त्यांनी गायिलेल्या गझला मात्र मनात कायमच्या घर करुन राहिल्या़. ‘या नवा सूर्य आणू चला यार हो / सूर्य केव्हाच अंधारला यार हो’ हे हृदयाला भिडणारं भटाचं विद्रोह काव्य. ‘चेहरा गुलाबान झाकणे बरे नाही’ ही हळुवार - मलमली गझल. यांच्या प्रेमातच पडलो़. ह्या कलाकाराची भेट व्हावी असं मनोमनी वाटायचं आणि तसा योग जुळून आला. सुमारे एक तपानंतर; शिवाजी विद्यापीठ-संगीत विभागात मी मानद अध्यापक म्हणून काम करीत होतो़. गेल्यावर्षी सुगम संगीतासाठी कदमांची चार दिवसांची कार्यशाळा ठेवली होती. त्या चार दिवसांच्या छोट्या कालावधीत आम्ही एकत्र आलो, खूप गप्पा गाणी बजावणी झाली व बर्‍याच दिवसांची मनातली इच्छा पूर्ण झाली़. स्नेहाचे भावबंध निर्माण झाले़. कदमांनी घरगुती कार्यक्रमात अनेक भावगीते, गझला मनसोक्त ऐकविल्या. त्यांच्या स्वररचना व त्यांचे सादरीकरण यांचा प्रभाव होताच तो अधिकच वाढला़ .त्यांच्या स्वररचना वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक असल्यानं त्याबाबत लिहावं अस सारखं मनात यायचं. तो योग रौप्य महोत्सवानिमित्त आला हा माझ्या दृष्टीने सुयोग आहे, भाग्ययोग आहे़.
                 सुधाकर कदम हे व्यक्तिमत्व बहुरंगी आहे़ ते शास्त्रीय संगीत गायक आहेत. संगीत शिक्षक आहेत. समाजकर्ते आहेत. लेखणी बहाद्दरही आहेत. पण त्यांचा माझा जो संबंध आला तो सुगम संगीत स्वररचनाकार व गायक म्हणूऩ. त्यामुळे तद्विषयक त्यांच्या रसिल्या सांगितीक व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा हा प्रांजळ प्रयत्ऩ.
 सुगम संगीत हा संगीताचा एक अनुपम व मनोहारी असा प्रकाऱ. नाव जरी सुगम असलं तरी जाता जाता सहजी आत्मसात करावं इतकं ते खचितच सुगम नसतं. उलट दुर्गमच असतं. शब्दप्रधान गायकीच्या ह्या प्रकाराला शब्द हे प्राणतत्व तर स्वर हे माध्यम़. त्याला घाट येतो तो ताल-लयीमुळं. इथं शब्दांसाठी स्वर पायघड्या घालतात. साहजिकच पहिला मान काव्याचा. (पर्यायानं कवीचाही.) त्यातल्या आशय, भाव-भावना श्रोत्यांपर्यंत पोहचविणं हे कार्य संगीताचं असतं. गीताच्या आशयाचीअभिव्यक्ती संगीतातून होणं अपेक्षित असतं. किंबहुना काव्य बोलतं करणं हे संगीतकाराचं काम. यासाठी सुगम संगीतात काव्याचा आशय-विषय व भावना याची उत्तम जाण स्वररचनाकाराला असणं जसं आवश्यक,तितकंच महत्व काव्यानुकूल संगीत रचनेला; म्हणजेच चाल लावण्याला असतं. सुधाकर कदम हा काव्याची उत्तम जाण असणारा संगीतकार असल्यानं ते कवितेला अत्यंत पोषक व समर्पक असा स्वरसाज चढवून प्रत्येक कविता आपल्या संगीत रचनेनं श्रीमंत करतात. ते स्वतः कवी असल्यामुळे ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ ह्या उक्तीला साजेसं स्वरचातुर्य त्यांच्याकडे आहे़.
               शास्त्रीय संगीताचे व्यासंगी साधक असल्यामुळे कदमांच्या स्वररचनेचा पाया हा राग/रागिणीवर आधारीत असणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्यांच्या स्वररचना भारदस्त व दर्जेदार वाटतात, त्या चीप पॉप्युलॅरीटीच्या कॅटॅगिरीतल्या नव्हेत़.
 स्वररचनेसाठी त्यांनी अनेक राग/रागिण्यांची मुक्त हस्त चंदनी बरसात केली आहे़. शेकडो कवितांना स्वरांच्या चांदण्यांत न्हाऊ घातलं आहे़. तथापि जागेच्या मर्यादेचं भान ठेवण्यासाठी काही निवडक गाणी व स्वररचनांचा आस्वाद घेणं रास्त ठरेल़.
              यमन हा रागच असा की कोणाही संगीतकारानं त्याच्या प्रेमात पडावं. कदम तरी त्याला कसे अपवाद असणार? त्यांनी यमन रागात उदंड रचना केल्या असल्या तरी त्या छापातले गणपती नाहीत, ती प्रत्येक मुर्ती स्वतंत्र आहे़. प्रत्येक चालीला स्वतःचा वेगळा चेहरा आहे, रंग आहे, रुप आहे, व्यक्तिमत्व आहे़.
 कार्यक्रमाची सुरुवात ते स्वरचित काव्याने करतात़.

‘सरगम तुझ्याचसाठी गीते तुझ्याचसाठी
गातो गझल मराठी प्रिये तुझ्याच साठी’

दादर्‍यातल्या ह्या बंदिशीची यमन मधील ही रचना. अगदी साधी. सुगमसंगीतामध्ये अर्थातच शास्त्रीय संगीतातील व्याकरणाला; नियमांना स्थान नाही, इथं अपेक्षित असतं ते श्रवण सौंदर्य, गोडवा, मोहकता. साहजिकच इथं शुध्द यमन शोधण्याची धडपड करू नये कारण तो यमन कल्याणाशी क्षणांत दोस्ती करतो़ आणि दोन्ही माध्यमांच्या अशा हळुवार लगावांची प्रचिती आली की उत्स्फूर्तपणे दाद देण्याशिवाय श्रोत्याला इलाजच रहात नाही़ ही अनुभूती मी त्यांच्या प्रत्येक यमनांत घेतली व घेतो़.
 
 ‘मी असा ह्या बासरीचा सूर होतो,
 नेहमी ओठांपुनी मी दूर होतो’

ह्या गझलची चालही अशीच आहे़. धृवपदातली -मतल्यातली दुसरी ओळ (ज्याला क्रॉस लाईन म्हणतात) त्याची ठेवण व स्वरसमुहाची रचना अत्यंत मोहक आहे़. त्यातील ‘सूर होतो़’ इथं तार सप्तकातला षडज्‌ सूर ह्या शब्दासाठी खुबीनं वापरला तर आहेच पण ती ओळ म्हणताना ‘सूर’ हा शब्द आणि त्याचा तारषड्जाचा हळूवार पण भरीव लगाव व रुपक तालांचा एक पूर्ण जादा आवर्तन पूर्ण होईपर्यंत जो दीर्घकाळ मुक्काम ठेवतो तो अतीसुंदर लागतो़.
              संगीत रचनाकाराकडं नुसता सांगीतिक अलंकाराचा साठा असून चालत नाही तर स्वरपोषाखाला साजेल असाच एखादाच चढविलेला अलंकार संगीत श्रवणसौंदर्य खुलवितो़.
 संगीतकार हाच खर्‍या अर्थानं स्वतःच्या रचना समर्थ पणे व अपेक्षित परिणामासह गाऊ शकतो. हा अनुभव मास्तर कृष्णरावांपासून सुधीर, श्रीधर फडके, वसंत पवार, राम कदम, यशवंत देव यांच्या पर्यंत येतो. सुधाकर कदम हे स्वतः गायकही असल्याने तेही ह्या बाबीला अपवाद नाहीत़. ‘सूऱ होतो’ इथं शब्दकला आणि स्वर माधुर्य असा सुरेख समन्वय झालाय़.
 ‘सांज घनाच्या मिटल्या ओळी’ हे एक अतिशय हळूवार भावना उलगडून दाखविणारं सरस काव्य़. कदम यांनी बंदीशही यमनमध्येच बांधलीय़. त्यातल्या क्रॉसलाईन अखेरीस़ ‘क्षितीजावरती़’ इथं त्यांनी नि व कोमल रिषभाचा अत्यंत कौशल्यपूर्ण वापर करून यमनचा करॅक्टरच बदललाय असे नव्हे तर त्या रिषभाच्या योजनेमुळे ‘क्षितीज’ ह्या शब्दाचा अर्थ प्रतीत करण्यासाठी कोमल रिषभाला पर्यायच नाही हे त्वरीत पटते, पुरियाचं होणारं दर्शन तसेच कडव्याची चाल हे सगळं सुरेख जुळून आलंय़.
               प्रसिध्द कवी अनिल कांबळे यांच्या ‘जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू / ऐनवेळी अशी काय करतेस’ तू ह्या गीताची तर्जही यमन मध्येच बांधली आहे़. यमन मधली अत्यंत चटपटीत अशी ही स्वररचना, खेमट्याच्या अंगानं लागणारा दादर्‍याचा ठेका, लय थोडीशी उडती चपळ, त्यामुळे विशिष्ट अर्थवाही अशा ह्या गीताला उत्तम न्याय मिळाला आहे़. सौंदर्य स्थळाचा निर्देश करायचा झाल्यास ‘ऐनवेळी अशी काय’ ह्या ओळीतली अधीरता दर्शविण्यासाठी अत्यंत चपखल अशी स्वरसमुहरचना म्हणावयास हरकत नाही. ‘सामग, सामगधप’ वगैरे अर्थात हा आनंद अनुभवायचा आहे़.
 ‘तुझ्या नभाला गडे किनारे’ ही सुध्दा यमनमधलीच श्रवणीय रचना आहे. यमन ह्या एकाच रागातल्या चारी रचना त्यांनी मला एकापाठोपाठ ऐकविल्या. पण खासियत अशी की त्यांत तोचतोचपणा नाही़. स्वररचनेची पठडी ठरीव स्वरुपाची नाही. त्यात आहे पूर्णतः वेगळेपण, हे श्रेष्ठ संगीत रचनाकाराचं वैशिष्ट मानलं जातं.
              सुगम संगीतात आकर्षक
मुखड्याला-धृवपदाला खास महत्व आहे़.कदम यांच्या स्वररचनेचे मुखडे अत्यंत आकर्षक असतात़. त्याहीपेक्षा अधिक कौशल्य व महत्व असतं ते मुखड्यानंतरच्या क्रॉसला. कारण संगीत रचनेच्या आकर्षकतेचे ते प्रमुख स्थान आहे़. मुखड्याच्या चालीला अनुरूप अशी किंबहुना त्याचं सौंदर्य वर्धिष्णू करणारी आरोही पूर्ण करुन अवरोही व षड्जावर विराम पावणारी स्वररचना, हे काम फार अवघड असते़. तसे नसेल तर पूर्ण चालच फसते़ अनेक संगीत रचनामध्ये हे दोष दिसतात़. संगीतकाराला इथं आपली प्रज्ञा ओतावी लागते़. सुधाकर कदमांच्या रचना ह्या कसोटीला पुरेपूर उतरणार्‍या आहेत म्हणूनच त्या भावतात़.
              कडव्यांच्या चालीतही मूळ चालीशी सुसंगती दिसते़. कळत नकळत अन्य रागाला स्पर्शून जाणं म्हणजे हळूच मधाचं बोट चाखण्यासारखं गोड मधुर असतं.अर्थातच शेवटच कडवं हे सर्वार्थानं हायलाईट असतं. तशीच त्याची स्वररचनाही कदम समर्थपणे करतात़.
              एकाच यमनाची ही विविध रुपे, विविध रंग, त्याचा वेगवेगळा ढंग. आणि त्याची अनोखी अदाकारी हे मोहजाल किंवा मायाजाल म्हणा, असं आमच्या भोवती टाकलं की आम्ही स्वतः जाणकार रसिक असूनही फसलो़. मग लक्षात आलं की ही यमनी फसवणूक होती पण ही फसवणूक गोड होती़. निर्भेळ होती. निर्मळ आनंद देणारी हमी़. तसं पाहू गेल्यास प्रत्येक संगीतकार अशी गोड फसवणूक करीत असतो़. कारण त्याचा स्वतःचा असा एक बाज असतो.लाडका स्वर समुह असतो. आणि तो बहुसंख्य चालीत डोकावतोच़ किंबहुना त्यामुळेच संगीतकार कोणते आपण ओळखत असतो़. तीच त्याची ओळख असते. हा नियम जवळ जवळ सर्वच संगीतकारांना लागू असतो. असं थोडसं धाडसी विधान इथे नोंदवितो़. ह्या सर्व बाबी मिळूनच त्याची स्टाईल बनत असते. सुधाकर कदमांची सुद्धा अशी एक खास स्टाइल आहे. पण त्यात कोणा जानेमाने संगीतकाराची नक्कल किंवा अनुकरण नाही. त्यांचा बाज हा खुद्‌द त्यांचाच बाज आहे हे विशेष.आणि तो अस्सलही आहे़.
 ‘हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही/ चेहरा गुलाबानं झाकणे बरे नाही’, आली हांसत आली पहाट़... मेंदी भरल्या’, ‘ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची, तापलेल्या अधीर पाण्याची’, ‘सूर्य केव्हाच अंधारला यार हो’ ह्या चारही गझला वेगवेगळ्या भाव-भावनांच्या. प्रत्येक गझल अत्यंत रसरशीत आहे़. सर्वच चाली प्रामुख्याने भूप ह्या लोकप्रिय रागांत बांधल्या आहेत. पण प्रत्येक स्वररचनेत मनोहारी वैचित्र्य व काव्याला पूर्ण न्याय दिला गेलाय़. पैकी ‘हे तुझे अशा वेळी’ ही तर मास्टर पिस रचना मानावी लागेल़. माझी स्वतःची तर ही अत्यंत प्रिय रचना आहे़.
 यमन प्रमाणे ह्या चारही रचनांत भूप रागाच्या अनेक सौंदर्यस्थळांचं मुक्त व डोळे भरुन दर्शन घडतं. मोरांनी सप्तरंगी पिसांचा रंगीबेरंगी पिसारा फुलवावा त्या प्रमाणे भूप रागाचा भरगच्च फुलोरा सुधाकर कदमांनी विलक्षणरीत्या फुलविला आहे़.त्यांत यमनच्या निषादचा केलेला सुखद उपयोग, शब्दांची केलेली फेक, गझलच्या अंगानी केलेली गायकी हे सर्व सविस्तर लिहिणं म्हणजे तो एक स्वतंत्र लेखाचा किंवा भाषणाचा विषय आहे़, म्हणून इतकाच स्पर्श इथे पुरेसा आहे़.
               यमन, भूप ह्या सर्वसामान्य लोकप्रिय रागांचा चातुर्यपूर्ण उपयोग करून कदमांनी सुंदर सुंदर रचना दिल्या. त्यातील सौंदर्यकण, सौंदर्य स्थळे निर्देशित करण्याचा प्रयत्न केला़. ह्याखेरीज इतर अनेक रागांत त्यांनी अशाच विपूल रचना मासिकांना दिल्या आहेत़ त्या सर्वांचा रसास्वाद इथे नोंदविणे शक्य नाही.तरी ‘आज मी जे गीत गातो’ ‘आम्ही असे दिवाणे’ किंवा भूपश्री मधील ‘कुठलेच फुल आता’ आणि शिखर अध्याय म्हणजे ‘रंगूनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा’ ही सुरेश भटांची खास गझल ह्या सर्वच गीत व गझलांना कदम यांनी अत्यंत सुरेल चाली देऊन सुधारसपान घडविले आहे़.
 संगीत रचनाकार, स्वतः गायक असणं हे भाग्याचं लक्षण. कारण तो आपल्या हृदयात घर करून राहिलेली चाल खर्‍या अर्थी समर्थ गळ्यातून श्रोत्याच्या हृदयात पोचवितो. त्या अर्थानं कदमांच्या रचनाच भाग्यवान म्हणाव्या लागतील़ कारण सुधाकर कदम हे स्वतः मुलायम आवाजाचे, शब्दार्थानुसार गाणी प्रभावीरीत्या सादर करणारे गायक असल्याने त्यांच्या चाली व काव्यांचं सोनं होतं. नेमक्यावेळी नेमक्या शब्दावर जोर देणं, जरूर तिथं हळुवार शब्दस्वर उच्चार, प्रसंगी स्वरांचा जोरदार लगाव, स्वरांवरील न्यास, ठेहराव ह्या द्वारे ते आपलं गायन अत्यंत प्रभावी करतात़. ताल व सुरांवर त्यांचा चांगलाच काबू आहे़. तालाच्या अंगानं सुरेख गीत मांडणी करतात़.
               शास्त्रीय संगीताचा अभ्यास, रियाज व आवाज कमविला असल्यामुळे गाण्यातील भारदस्तपणा सहज नजरेत भरतो़. सुगम संगीत गायक/गायिका स्वतः हार्मोनियमवादक असेल तर दुधात साखर असा योग असतो़. वर्ज्य, विकृत, अशा बर्‍याचशा स्वरांना काबूत ठेवण्यासाठी व इन्स्टंट स्वर बदल करण्यासाठी हार्मोनियम अत्यंत उपयुक्त असते़. सुधाकर कदमांचा हार्मोनियमवरचा हात अत्यंत तयार व सॉप्ट आहे. गायनाच्या रंगतीत त्यामुळे निश्चितच भर पडते़. कडव्यामधील म्युझिक पिसेस (इंटरल्युट) ते उत्तम प्रकारे वाजवितात़ त्या रचनाही मेलोडीयस असतात़.
 गायन करताना स्वर आलापी, स्वर विस्तार व सरगमचा रास्त वापर ह्या बाबी गाणं नटविण्या-सजविणार्‍यासाठी हव्यातच़. कदमांची सरगम मांडणी बहुत खुबसुरत असते. वानगी दाखल ‘गरे निरेपगरेसा निध धनि सागमग मपधधनीध मपमपग, गपगरेसारे, निरेमगरे निसा’ ही सरगम पहावी़.
                असे हे सव्यसाची संगीतकार गायक सुधाकर कदम हे विदर्भाचं एक भूषण आहे़. नाटक आणि संगीताचं विदर्भाशी फार पूर्वीपासूनच स्नेहनातं आहे़. अनेक मान्यवर कलावंत ह्या भूमीनं महाराष्ट्राला दिले़.
 पंचवीस वर्षांची दीर्घकालीन संगीत वाटचाल कदमांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे़. अर्थातच हा प्रवास खाच खळग्यांनी, वेडवाकड्या वळणांनी, प्रसंगी काट्याकुट्यांनी रक्तबंबाळ करणारा असून सुद्धा हे सर्व अडथळे धीरोदात्तपणे पार करणार्‍या सुधाकर कदमांच्या हातून आणखी सुंदर सुंदर चाली निर्माण व्हाव्यात. त्यांची संगीत सेवा अशीच अखंड सुरू रहावी, अशा शुभेच्छा ह्या प्रसंगी मी माझ्या ह्या मृदू स्वभावाच्या व माणसासाठी आसुलेल्या मित्राला देतो़. तत्पुर्वी मनातील एक खंत नमुद करतो, भले विदर्भाने ह्या कलाकाराचं भरपूर कौतुक केलं असेल पण उर्वरीत महाराष्ट्रात ह्या कलाकाराला त्याच्या योग्यतेप्रमाणं प्रोजेक्ट केले गेले नाही. प्रथितयश गायक/गायिकांनी अभिमानाने गावी अशी त्यांची स्वररचना असूनही हे कां घडलं नाही हे एक कोडं आहे.

-ऍड.राम जोशी
मानद अध्यापक,संगीत विभाग,
शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर.
१३ नोव्हेंबर १९९९

●'पुष्पक' १४ वी गल्ली, राजारामपुरी-४१६ ००८ कोल्हापूर
--------------------------------------------------------------------
गांधर्व संगीत विद्यालय,आर्णी. रौप्यमहोत्सवी विशेषांक१९९९ मधून प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित व #अक्षर_मानव प्रकाशित '#चकव्यातून_फिरतो_मौनी' (२०१८)  मध्ये साभार....




 

Monday, March 15, 2021

श्यामरंगी रंगताना....

.       'श्यामरंगी''...वाचता वाचता आलेली सुरावट...
           #भूप रागावर आधारित...ताल #रूपक
          (कृपया हेडफोन लावून ऐकावे,ही विनंती)

शामरंगी रंगताना श्याम व्हावे.. 
राधिकेने कृष्ण अधरी  विरघळावे

बासरीचे सूर कानी गुंजताना
सावळ्याच्या सावळीने  मोहरावे

होत जाता सावळी बाधा मनाला
अनलरंगी पावरीने धुंद गावे

एक राधा एक कान्हा द्वैत कुठले
दोन मन जुळता सदा अद्वैत व्हावे

गायक - मयूर महाजन
कवयित्री - मीनाक्षी गोरंटीवर
संगीत - सुधाकर कदम
तबला - निषाद कदम
मेंडोलीन - अबीर कदम


 





संगीत आणि साहित्य :