गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, August 12, 2023

राग रंग (लेखांक १९) अहीर भैरव.

     संगीताचे शिक्षण सुरू असताना सकाळी सकाळी एखादेवेळी एखादा गवैय्या रेडिओवर'अहीर भैरव' गायचा.उद्घोषणात हे कानी पडायचे.अहीर भैरवशी आलेला संबंध हा तेव्हढ्यापुरताच, कारण विशारद पर्यंत हा राग अभ्यासक्रमात नव्हता.(आता असेल तर माहीत नाही.) अहीर भैरव या नावावरून अहीर आणि भैरव या दोन रागांचे मिश्रण असावे असे वाटते.पण अहीर नावाचा राग असण्याबद्दल दोन मतप्रवाह आहेत.होता व नव्हता असे. पूर्वांगात भैरव व उत्तरांगात काफी अशा दोन रागांच्या मिश्रणातून बनलेला अतिशय गोड राग म्हणजे अहीर भैरव.हा भैरव थाटोत्पन्न मानतात. पण भैरव थाटात तर कोमल धैवत आहे.मग हा भैरव थाटोत्पन्न कसा? हा किडा थोडे-फार संगीत कळायला लागल्यापासून वळवळतो आहे.संपूर्ण जातीचा हा राग सकाळी म्हणजे प्रातः काळी गातात.संपूर्ण जाती म्हणजे ज्यातील आरोहावरोहात सातही स्वर लागतात तो!
सात स्वरांबद्दल 'नारदीय शिक्षा' या प्राचीन ग्रंथात एक श्लोक आहे...

षड्जस्य ऋषभश्चैव गान्धारो मध्यमस्तथा |
पञ्चमो धैवतश्चैव निषाद: सप्तम: स्वर: ||

अहीर भैरव हा आनंद भैरव रागाला हा जवळचा आहे.तसेच कालिंगडा,रामकली हे सुध्दा समप्राकृतीक रागात मोडतात.कर्नाटकातील 'चक्रवाकम' सुद्धा अहीर भैरवशी मिळता जुळता आहे. मूळ भैरव रागाप्रमाणे हा प्राचीन राग नाही.त्यामुळे इतर प्राचीन रागांप्रमाणे यात बंदिशी पण कमीच दिसतात. शास्त्रानुसार हा राग गंभीर प्रकृतीचा आहे. पण 'ज्वेल थिफ' या चितत्रपटातील लताबाईंनी गायिलेले 'होटों मे ऐसी बात मै  छुपाके चली आयी' हे गाणे ऐकल्यावर तसे वाटत नाही.मी पुनः पुनः सांगतो की,रागाला प्रकृती नसते.प्रकृती काव्याची असते.त्याप्रमाणे स्वरसाज चढतो.आणि प्रकृती बदलते.याच रागातील 'मेरी सूरत तेरी आंखे' या चित्रपटातील 'पुछो ना कैसे मैं ने रैन बिताई' हे मन्ना दा ने गायिलेले गाणे गंभीर या सदरात मोडेल. पण ते त्यातील शब्दांमुळे.आणि शब्दानुरूप दिलेल्या सुरावटीमुळे.या रागात गुजराथी लोकगीतं सुद्धा स्वरबद्ध केलेली मला आढळली.काव्याबद्दल एक संस्कृत श्लोक प्रसिद्ध आहे...

न सा विद्या न सा रीतिर्न तच्छास्त्रं न सा कला |
जायते यन्न काव्यांगमहो  भारो महान् कवे: ||

म्हणजेच ज्यात काव्यांग नाही अशी कोणती न विद्या, न रीती, न शास्त्र, न कला! 
      एकोणविसाव्या शतकापर्यंत सहा राग व त्या रागांचा परिवार ही रागवर्गीकरणाची पद्धत होती.शिवमत,0कल्लीनाथ मत,भरत मत,हनुमान मत या सर्वांचे या बाबतीत एकमत होते.आणि या सगळ्यांच्या मतानुसार मुख्य सहा रागात भैरव हा राग हा होता.म्हणजेच भैरव हा प्राचीन व अहीर भैरव हा अर्वाचीन राग असल्याचे स्पष्ट होते.सोळाव्या शतकाच्या पुर्वार्धात दक्षिणेतील संत गायक पुरंदरदास भारत भ्रमण करत असताना त्यांचा परिचय भैरव थाटाशी झाला.उत्तर भारतात भैरव थाटाला राग शिक्षणाचा मूळ आधार मानत असल्याचे बघून ते भैरवाला उत्तर भारतातून दक्षिण भारतात घेऊन गेले.आणि त्यांनी कर्नाटक  संगीतातील राग शिक्षणाचा मूळ आधार थाट बनविला.त्या युगातील ग्रंथकार रामामात्य यांनी या थाटाला 'मालवगौड' असे म्हटले आहे.मालवगौडचा अर्थ 'मालवा आणि गौड प्रांतातील प्रचलित थाट'. कर्नाटक संगीतामधील 'मायामालवगौड' भैरव रागाशी मिळता जुळता आहे.(पण दक्षिण भारतीय संगीत पध्दतीमध्ये रागायनासाठी वेळेचे बंधन नसल्यामुळे तो आपल्याकडील भैरव व भैरव थाटीय राग सकाळीच गायला हवे असे त्यावर बंधन नाही.उत्तर भारतीय संगीतामधील ही बंधने शिथिल करायला काय हरकत? कोणताही राग केव्हाही गायीला तरी गोडच वाटणार ना!(तसेही आकाशवाणीवरुन सादर होणाऱ्या शास्त्रीय गायन/वादनात रागगायन संबंधीचे नियम पाळल्या जातातच असे नाही.) पुंडरिकाने आपल्या 'रागमाला' ग्रंथातही प्रथम राग भैरव असे म्हटले आहे.प्राचीन धृपद संग्रहात सुद्धा सर्वप्रथम भैरव रागाच्या चिजा संग्रहित केलेल्या दिसतात.
     शहाजहानच्या काळात बख्शूने केलेल्या 'सहसरस' नामक धृपद संग्रहात पहिली बंदिश भैरव रागात असल्याचा उल्लेख आहे.(मुसलमान और भारतीय संगीत,पान ६२). भैरव रागाचे अनेक प्रकार आहेत.जसे:- नट भैरव, आनंद भैरव,बंगाल-भैरव, सौराष्ट्र-भैरव,शिवमत-भैरव,आलम भैरव, बैरागी भैरव, मोहिनी भैरव, बीहड़ भैरव, प्रभात भैरव, भावमत भैरव, देवता भैरव, कबीर भैरव, गौरी भैरव, हिजाज़ भैरव आणि त्यातीलच एक अहीर-भैरव.सध्या प्रचारात मात्र काही प्रकारच आहेत.त्यातही नट भैरव, बैरागी भैरव जास्ती चलनात व लोकप्रिय आहेत.यातील बैरागी भैरव हा भैरव कुळातील असला तरी त्यातील कोमल निषादामुळे भैरवाहून वेगळा वाटतो.त्यामुळे त्याला फक्त बैरागी म्हणून संबोधतात. 'नेट'च्या युगात जुन्यांपासून नवीन गायक/वादकांनी गायिलेल्या व आपापल्या वाद्यावर वाजविलेल्या अहीर भैरवसह इतर भैरव प्रकार आपण युट्युबवर ऐकू शकता.
अहीर भैरव रागावर आधारित चित्रपट गीते :-
'अपने जीवन की उलझन को' लता.चित्रपट-उलझन.'चलो मन जाए घर अपने'येसुदास.चित्रपट-स्वामी विवेकानंद.'धीरे धीरे सुबह हुई'चित्रपट-हैसीयत.'माई री मैं कासे कहूं' लता.
चित्रपट-दस्तक.(अहीर भैरव आणि काही अन्य रंगांचे मिश्रण).'मैं तो कबसे तेरी शरण में' हरिहरन,नीलिमा सहानी.- राम नगरी'मन आनंद आनंद छाया' आशा भोसले,सत्यशील देशपांडे. चित्रपट-विजेता.'अपने जीवन की उलझन को' किशोर कुमार. चित्रपट-उलझन.
'मेरी वीणा तुम बिन रोये' लता.चित्रपट-देख कबीरा रोया.
'मेरी गलियों से लोगों की यारी' लता मंगेशकर,महेंद्र कपूर.चित्रपट-धर्मात्मा.'पूछो ना कैसे मैंने रेन बिताई' मन्ना डे.चित्रपट-मेरी सूरत तेरी आंखें.'वक्त करत जो वफा आप हमारे होते' मुकेश.चित्रपट-दिल ने पुकारा.'राम तेरी गंगा मैली हो गई' लता.चित्रपट-राम तेरी गंगा मैली.'प्यार तेरी पहली नज़र को सलाम' लता.चित्रपट-एक दूजे के लिए. 
'सोलह बरस की बाली उमर को सलाम' लता.चित्रपट-एक दूजे के लिए.'वंदना करो, अर्चना करो' लड़की सह्याद्री की पं. जसराज।'अलबेला साजन आयो रे' उस्ताद सुलतान खान,कविता कृष्णमूर्ती.चित्रपट-हम दिल दे चुके सनम.
'जिंदगी को संवरना होगा' येसुदास.चित्रपट–आलाप.
'अब तेरे बिन जी लेंगे हम' कुमार शानु.चित्रपट-आशिकी.
गैर फिल्मी...
'हमे कोई गम नहीं था' -मेहदी हसन.
'राम का गुणगान करिए' -लता,पंडित भीमसेन.
'जय शंकरा गंगाधरा' नाट्यगीत.गायक-पं. राम मराठे.
'तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल' संत नामदेव,पं. भीमसेन जोशी.
'फिर उसी रहगुजर पर शायद' -गुलाम अली.
'तेरे हिज्र में सजना कबसे जागी न सोई' -फरिहा परवेज. कवी/संगीतकार फहीम मजहर.

 ● बऱ्याच वर्षांपुर्वी सुरेश भटांना श्रद्धांजली म्हणून पुण्यातील स्नेहसदनमध्ये मराठी गझल गायनाचा कार्यक्रम केला होता.त्यावेळी ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण यांची खालील गझल मी स्वरबद्ध केली होती.ही अहीर भैरव रागावर आधारित असून यातील मतल्याच्या पहिल्या मिसऱ्यात मी दोन्ही रिषभांचा प्रयोग केला आहे.नंतर पुढे विविध स्वरांचा व मु्र्छनाचा प्रयोग यात केला आहे.पण यातील  'दोन्ही रिषभांचा' प्रयोग मला सगळ्यात जास्ती भावला.कारण कोणत्याही प्रकारे रसहानी न होता अशा प्रकारे गोडवा वाढणे किंवा वाढविणे हे कौशल्याचे काम आहे.अर्थात शेवटी रसिक हेच खरे न्यायाधीश असतात हेही तेवढेच खरे! प्रयोग आवडल्यास आपला.नावडल्यास माझा.युट्युब लिंक खाली दिली आहे...

outube link...

रानात पाखरांची नाही कुठे निशाणी
रोमांचल्या ऋतूंनी जावे कुण्या ठिकाणी

हासून बोलण्याचा तो काळ दूर गेला
आता न बोलताही झाली व्यथा शहाणी

पानातल्या कळीने लाजू नये असे की
डोळ्यामधे उन्हाच्या यावे फिरून पाणी

येथे न राहिलेले कोणीच सोबतीला
माझीच हिंडते ही छाया उदासवाणी

गायिका-भैरवी कदम (देव)
तबला-निषाद कदम
व्हायोलिन-प्रमोद जांभेकर
हार्मोनियम-भाविक राठोड
सूत्र संचालन-शाहीर सुरेशकुमार वैराळकर

 

 

 





संगीत आणि साहित्य :