गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Friday, December 13, 2013

"अशी गावी मराठी गझल"


काही मित्र मंडळींच्या आग्रहावरून प्रसिद्ध कवी नारायण कुळकर्णी यांचे सूत्रसंचालन असलेल्या माझ्या कार्यक्रमातील सुरेश भटांची ही गझल सादर करीत आहे.ध्वनिमुद्रण १९८४ मधील असून कॅसेटवरून CD वर उतरविल्यामुळे सदोष आहे.कृपया चांगले घ्यावे,वांगले माझ्यासाठी सोडून द्यावे.
(स्थळ-धनवटे रंग मंदिर,सीताबर्डी,नागपुर.) 


Thursday, December 12, 2013

दुकानदारी...


सुंदर आश्रम
रस्ते वळणाचे
दुतर्फा फुलांचे
ताटवेही...

कारंजी,फव्वारे
मरवरी ‘फर्श’
नाजूकसा स्पर्श
पावलांना...

अध्यात्म दुकानी
भक्तरसा वेग
तल्लीन आवेग
भजनात...

झांज,ढोल वाजे
कोणी नाच नाचे
कोणी भजनाचे
ढोंग करी...

स्वतःवरी खूष
साराच जमाव
आखीव रेखीव
भक्तीमुळे...

दान पेट्या वाही
भरभरोनिया
दुप्पट कराया
मुद्दलाला...

खारीच्या वाट्याचे
नाम जपोनिया
निघती कराया
पिकनिक...

आगळी वेगळी
ट्रीप अध्यात्मिक
भजी,मिल्कशेक
शाकाहारी...

करोनिया सारे
नामाचा गजर
मेजवानीवर
ताव मारी...

दुःख हरणारे
सुपर मार्केट
सेवेसाठी थेट
भक्तांचिया...

सुधाकर कदम

Wednesday, November 27, 2013

पुरस्कार...


प्रकाशना आधी
पुरस्कार मिळे
निकष आगळे
अभिजात...

धन्य ते देणारे
धन्य ते घेणारे
सारस्वत सारे
मराठीचे...

जन्मण्याआधीच
"भारतरतन"
घेणे म्हणवून
तसले हे...

शेरोशायरीचे
जनक,ते कोण
हाच दृष्टीकोन
आड मार्गी...

आद्य गझलकार 
मराठीचा मुद्दा 
ज्ञानेश्वर सुद्धा 
असेलही...

उगीच जोडती
अन्यत्र शेपूट
करोनिया कट
आद्यत्वाचे...

वाल्मिकीला म्हणू
आद्य गजलकार 
अनुष्टुप चार 
लिहिलेत...

कशाला बनता
कळीचा नारद
फुकटचा वाद
वाढवण्या...

उभा जन्म ज्याने
जाळोनी काढला
त्याचे श्रेय त्याला
का न द्यावे...?

ज्युलियन येथे
एवढे कष्टले
छंदशास्त्र दिले
मराठीला...

सुरेश भटांनी
बारखडी दिली
मुळाक्षरे झाली
धन्य धन्य...

कितीही लपवा
सूर्य तो सूर्यच
राही कायमच
तळपत...

तसा फडतूस
आद्यत्वाचा वाद
तरी याचा ‘नाद’
गुंजणार...

अचानक कोणी
गुरू जन्मा येतो
नावही सांगतो
भयंकर...

विवाहाआधीच
बारशाचे पेढे
करुनिया पुढे
आनंदतो...

परिक्षेवाचुनी
नंबर पहिला
निकाली लागला
बुद्धीवाद...

कौतुकास पात्र
प्राजक्ताचा सडा
गुलाब, केवडा
केरामध्ये...

सुधाकर कदम
२५/११/२०१३

Sunday, November 24, 2013

अथ मालिका पुराणम्...



टीव्ही वरी चाले 
स्वप्नांचा व्यापार
तरिही अपार
लोकप्रिय...

वास्तवापासोनि 
जरि फारकत 
तरी बघतात 
सर्वजण...

प्रत्येक मालिका 
फरफटतात 
कारवाया ऊत 
येवोनिया...

मनोरंजनाच्या 
नावे, फालतुच्या
काळ्या करणीच्या
कथा दावि...


’क’च्या मालिकांनी
सुरवात झाली 
आणि बदलली
रूचि सारी...


स्थानिक लेखक 
आणि कलाकार
लावितात पार
या मालिका...

मूळ कथानक 
ताणोनि ताणोनि
करिती अळणी
दिग्दर्शक...

नाव असो काही
कथानक तेचि
वास्तविकतेचि
ऐसी-तैसी...

एका भागामध्ये
अर्ध्या जाहिराती
बाकीची भरती 
खोगिरांची...

मोठा टीआरपी 
त्यास जाहिराती
अशी सारी नीति
आजकाल...

प्रेक्षक बिचारे
मनोरंजनाचा
गल्लाभरू ’ठेचा’
पचविती...

भाषा व्याकरण
रसातळा नेई
पालखीचे भोई
मराठीच्या...

सुधाकर कदम
गुरूवार-७.९.१२

Monday, November 11, 2013

कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले...


-प्रस्तावना-


कोणताही साहित्यप्रकार हा त्या-त्या साहित्यिकाच्या स्वभावानुरूपआकार घेत असतो. मग ती कथा असो, कादंबरी असो, वा कोणताही काव्यप्रकार असो... कथा वाचूनही लेखकाच्या स्वभावाचे पैलू कळतात की हा लेखक कोणत्या धाटणीचा आहे. आणि कवितेत तर त्या कवीचे अंतरंगच उलगडून ठेवलेले असतात. शिवाय कवी हा इतर कोणत्याही साहित्यिकाहून अधिक संवेदनशील असतो. अगदी झाडावरून गळणारं पिकलं पान पाहून सुद्धा त्याचं मन हेलावून जातं. केवळ कविता वाचूनच जातीवंत कविचा जीवनपट नजरेसमोर उभा ठाकतो.

गझल हा तसा तंत्रानुगामी काव्यप्रकार... यात मात्रांचे, वृत्ताचे बंधन असल्यामुळे फार कमी कवी या प्रकाराकडे वळले आहेत. आणि या प्रकाराकडे वळलेल्यांमध्येही फार कमी लोकांनी चांगली गझल मराठी साहित्याला दिली आहे. गझलकारांचा आकडा शेकड्यांनी असला तरी सकस गझल लिहिणा-यांची संख्या उणीपुरीच आहे.

गंगाधर मुटे हे असेच एक उल्लेखनीय नाव आहे. मातीचं गाणं लिहिणा-या या कवीची नाळ मातीशी कायम जुळलेली आहे. रानमेवा हा त्यांचा काव्यसंग्रह आधीच प्रकाशित झाला आहे. मुळात शेतकरी असल्यामुळे मातीशी तसेही नाते जडलेले. शिवाय गंगाधर मुटे हे शेतकरी संघटनेचे खंदे कार्यकर्ते असल्यामुळे शेतक-यांच्या अडी-अडचणींना, व्यथांना त्यांच्या लेखणीतून वाचा फुटलेली दिसते.

पुसतो सदा आसवांना तो पदर भुमिचा ओला
आसू पुसता हळूच पुसतो आली जाग शिवारा

अशी रचना त्यांच्या लेखणीतून सहज साकारते. अनेकदा त्यांची लेखणी पीक, पेरणी या विषयावर मार्मिक टीप्पणी करते. अशावेळी व्यथा सांगत असतानाच ते पुसटसे बंडखोर देखील होताना दिसतात... त्यांची ही एक गझल पहा...

स्मशानात जागा हवी तेवढी…

कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, 
नवे बीज ते अंकुरावे कसे ?
तणांचाच जेथे असे बोलबाला,
तिथे अन्य काही रुजावे कसे ?


पुन्हा आज होऊ नये तेच झाले,
कशा थांबवाव्या वाताहती ?
हवेनेच केला जिथे कोंडमारा,
तिथे प्राण जाणे टळावे कसे ?


तुझा पिंड आहेच विश्वासघाती,
तसा एक अंदाज आहे मला
तरी जीव गुंतून जातो तुझ्याशी,
मनाचे पिसे कुस्करावे कसे ?


जरी सत्य तू बोलशी मान्य आहे,
परी त्यास आहे कुठे मान्यता ?
सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे,
पुरावे तुझे मान्य व्हावे कसे ?


कशी एकटी हिंडते रानमाळी,
जरी अर्धवेडी भिते ना कुणा
तिला फक्त भीती जित्या माणसाची,
पशूंना तिने घाबरावे कसे ?


कसा व्यएथ नाराज झालास आंब्या,
वृथा खेद व्हावा असे काय ते
फळे चाखण्याचेच कौशल्या ज्याला,
तया बोलणे ते जमावे कसे ?


शिवारात काळ्या नि उत्क्रांतलेल्या 
खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
जिथे कुंपणे शेत खाऊन गेली,
तिथे त्या पिकांनी लपावे कसे ?


‘अभय’ काळजी त्या मृताची कशाला,
स्मशानात जागा हवी तेवढी
समस्या इथे ग्रासते जिवितांना,
विसावा कुठे अन् बसावे कुठे ?


कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, 
नव्या पिकांची नवीन भाषा, 
मरणे कठीण झाले, 
भुईला दिली ओल नाही ढगाने, 
भाजून पीक सारे पाऊस तृप्त झाला, 
आत्महत्या बळीच्या तू रोख वामना, 
गहाणात हा सातबारा... 
या त्यांच्या रचना विशेषत्वाने शेतक-यांच्या व्यथा मांडणा-या आहेत. पण गंगाधर मुटे हे कुठेही एकाच विषयात अडकून पडलेले दिसत नाहीत. मातीचं गाणं लिहिणारा हा कवी शृंगार देखील काव्यात तितक्याच खुबीने मांडताना दिसतो... आणि...

ती बोलली तरी का शब्दास नाद येतो
त्या बोलक्या स्वरांचे झंकार चित्तवेधी
असा एखादा शेर आपल्याला वाचायला मिळतो.

मक्ता या गझलेतील एका परंपरेची कास गंगाधर मुटे यांनी धरलेली दिसते. मक्ता म्हणजे कवीचे नाव अथवा टोपणनाव असलेला शेवटचा शेर... गंगाधर मुटे हे काव्यात आपले अभय हे टोपणनाव वापरतात. मक्ता लिहिताना एका गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते. ती म्हणजे मक्त्यामध्ये आपले नाव लिहिताना तेथे एखाद्या मौल्यवान शब्दाची जागा वाया तर जाणार नाही ना ? किंवा हे नाव त्या शेराच्या अर्थाला पूरक आहे ना ? या गोष्टींची काळजी घेणे. आणि अशी काळजी गंगाधर मुटे यांनी घेतलेली दिसते... मक्ता असलेले त्यांचे काही शेर पहा...

संचिताचे खेळ न्यारे... पायवाटा रोखती
चालता मी अभय रस्ता काळही भारावला

अभय एक युक्ती तुला सांगतो मी, करावे खरे प्रेम मातीवरी या
भुईसंग जगणे... भुईसंग मरणे... भुईसंग झरणे... वगैरे वगैरे

आता अभय जगावे अश्रू न पाझरावे
आशेवरी निघावे ही वाट चालताना

नको रत्न मोती, न पाचू हिरे ते
अभय ते खरे जे मिळाले श्रमाने

आत्मह्त्या बळीच्या तू रोख वामना
मी अभयदान इतके मागून पाहिले

घे हा अभय पुरावा त्यांच्या परिश्रमाचा
ती माणसेच होती जी कोहिनूर झाली

गंगाधर मुटे यांना कवितेच्या, गझलच्या रुपाने जगण्याचे संचित गवसले आहे. म्हणूनच तर ते म्हणतात...

वृत्तात चालण्याचे शब्दास भान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले

खूप काही चांगले लिहिण्याची क्षमता असणा-या गंगाधर मुटे यांना पुढील गझल लेखनासाठी शुभेच्छा...

सुधाकर कदम 

जागतिक दृष्टिदान दिन
सोमवार,१० जून २०१३



Friday, November 1, 2013


ज्योत ज्योतीने पेटता दूर सरावा अंधार;
इवल्याशा पणतीने उजळावे घरदार !
नव्या उमेदीने व्हावे लख्ख मनाचे आकाश;
आनंदाच्या उत्सवात नाचो मनाचा प्रकाश !

-श्रीकृष्ण राऊत-




Wednesday, October 23, 2013

“मधुरानी”


         गझल कोणतीही असो ती जोरकसपणे गायिलीच पाहिजे असा भ्रम बराच काळपर्यंत आपल्याकडे होता.कदाचित त्यावेळी ध्वनिवर्धक नसल्यामुळे कदाचित असे गावे लागत असावे.पण हीच पद्धत पुढेही अनेक वर्षे कायम राहिली.गझलच्या शब्दार्थापेक्षा व त्यातील भावनांपेक्षा फक्त गायकीलाच महत्व दिल्याचे जुने गझल गायक/गायिकांचे गायन ऐकल्यावर प्रामुख्याने जाणवते.प्रेम, विरह,याचना,नाजूक दटावणी,सौंदर्य वर्णन,साक़ी,शराब,मैखाना काहीही असो प्रत्येक शेर ख्यालाप्रमाणे एकसुरी,म्हणजे बंदिशीला धरून गायिल्या जायचा.अर्थात गाणारे पट्टीचे गायक/गायिका असायचे ही बाब वेगळी.पण हळू-हळू गझलमधील शब्दांकडे लक्ष देऊन त्याला अर्थानुरूप बंदिश बनवून शब्दांना सजविण्याचा प्रयत्न सुरू झाला.त्यामुळे पूर्वी गायिल्या जाणार्‍या क्षुद्र प्रवृत्तीच्या ठरविल्या गेलेल्या पिलू,खमाज,झिंझोटी वगैरे विशिष्ठ रागांच्या जोखडातून गझल गायकी मुक्त होऊन दरबारी,मालकौंस,सारख्या मान्यवर रागातही गझलच्या बंदिशी तयार व्हायला लागल्या.हा बदल होण्यामागे चित्रपट संगीताचा फार मोलाचा वाटा आहे.

चित्रपट संगीत लोकप्रिय झाल्यामुळे जुन्या सर्व गझल गायक/गायिकांची मिरासदारी चित्रपटातील सुमधुर गाण्यांमुळे संपुष्टात यायला लागली होती.त्यातील नादमधुरता,शब्दानुरूप स्वर-रचना,शब्दांची फेक,स्वरांचे बेहलावे,पोषक वाद्यवृंद व गायनातील नाजुकता लोकप्रिय व्हायला लागली होती.हा फरक जाणवायला लागल्याबरोबर आपल्या देशातील अनेक गझल गायक/गायिकांनी शास्त्रीय संगीताचा मूळ गाभा कायम ठेवून वरील सर्व प्रकार आत्मसात करून गझल गायकीचा ढंगच बदलून टाकला.यात  जगजितसिंग हे अग्रेसर राहिले.ज्या काळात चित्रपटातून सुद्धा मेलोडिअस गाण्यांना उतरती कळा लागली होती त्या काळात मेलोडी कायम ठेवून,कठोर आत्मपरीक्षण करत-करत त्यांनी आपली वेगळी पण लोकप्रिय शैली निर्माण केली.याच काळात ‘मधुरानी; नावाच्या एक गझल गायिका सुद्धा आपल्या आगळ्या-वेगळ्या हळूवार गायन शैलीमुळे प्रसिद्ध व्हायला लागल्या होत्या.परंतू त्यांना हवी तशी प्रसिद्धी मिळालेली दिसत नाही.youtube वर सुद्धा त्यांच्या मोजक्याच गझला सापडतात. त्याची शिष्या पिनाज मसानी यांच्यामध्ये मधुरानीची गायन शैली पूर्णतः दिसून येते.पण ती फक्त त्यांच्या पहिल्या अल्बममध्येच…

मला मात्र मधुरानीच्या आवाजाने व सादरीकरणाने वेड लावले आहे….
त्यांच्या आवाजात आणि सादरीकरणात एक वेगळाच ताजेपणा आहे.तो सहजपणे ऐकणार्याला आकर्षित जरून घेतो.शब्दांशी-सुरांशी लडिवाळ खेळ करत-करत गाण्याची त्यांची पद्धत म्हणा किंवा गायकी म्हणा…आपल्यालाही ‘तो’ लडिवाळपणा जाणवेल अशा प्रकारे‘लाडावत’ नेतो.असे लाडावत गाणे फार कमी गायक/गायिकांना साधते.कोणी स्वरांशी तर कोणी शब्दांशी लाडावत गातो.पण मधुरणी दोघांनाही हळुवारपणे कुरवाळत गाते.खालील गझलच्या वेगळ्या बंदिशीतही हा लाडिकपणा प्रत्येक शब्दामधून जाणवतो.या गझलची सुरवातच अतिशय लाडिकपणे केली आहे.वो जो हममे तुममे क़रार था...मंद्र सप्तकातील निषाद स्पष्टपणे दाखवून दुसर्‍या ओळीवर कसे अलवारपणे जावे...हे ऐकताना कळते.तसाच प्रत्येक शेरातील पंचम स्वर सुद्धा आपण कोणीतरी खास पाहुणे आहोत हे प्रत्येक वेळी दाखवितो.संगीत दिग्दर्शिका म्हणून आणि गायिका म्हणून मधु ग्रेटंच.........................


                                        -सुधाकर कदम-

Tuesday, October 15, 2013

गर्भश्रीमंत राग - यमन...



गझलकार प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत यांनी प्रकाशित केलेल्या ‘सीमोलंघन’ विशेषांकातील माझा लेख...

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ...


यमन रागाच्या नावावर बरेच मतभेद आहेत.काही लोक याला फारसी भाषेतील ’इमन’ चेच यमन मध्ये झालेले रुपांतर मानतात.तसेच हा राग अमीर खुस्रो नावाच्या अल्लाऊद्दीन खिलजीच्या काळातील विद्वान संगीतकाराने प्रचलित केला अशीही मान्यता आहे.एवढे मात्र निश्चित की खुस्रोच्या काळात नव-नवीन राग प्रचारात आलेत.यात फारसी,इराणी सुरावटी भारतीय रागात मिसळल्या गेल्या होत्या.गोपाल नायक हा संगीताचा प्रकांड विद्वान खुस्रोचा समकालीन आहे.दक्षिणेतील पंडीत यमन हा राग ’यमुना कल्याण’चाच एक प्रकार मानतात.या नावाचा उल्लेख दक्षिणेकडील ग्रंथांमध्ये आहे.परंतू यमुना कल्याण आणि यमन यात नावाव्यतिरिक्त काहीच साम्य नाही.उत्तर भारतीय संगीत शास्त्र (भातखंडे कृत) या ग्रंथात हा राग कल्याण थाटातून उत्पन्न झाल्याचे लिहीले आहे.पण त्यातही तथ्य वाटत नाही,हे भातखंडेंचा आदर ठेऊन नमूद करतो..(माझे हे विधान अनेकांना आवडणार नाही.)कारण प्राचिन ग्रंथांमध्ये ’यमन’ नावाच्या रागाचा कुठेच उल्लेख केलेला आढळत नाही.तसेच कोण्या एका शब्दावरून राग आला असेल असेही वाटत नाही.कारण राग निर्मिती ही एक प्रक्रीया आहे.ती एकदम होणारी नाही...
काही लोक याला यमन कल्याण असेही म्हणतात.पण त्यालाही तसा फारसा अर्थ नाही.यमन रागात विवादी स्वराप्रमाणे कधीतरी कोमल मध्यम लावला की तो यमन कल्याण होतो.याला सुद्धा ग्रंथात आधार नाही.अशा प्रकारे एखादा स्वर बदलून किंवा जास्तीचा लाऊन किंवा विवादी म्हणून एखाद्या स्वराचा प्रयोग करून तो प्रचलित करणे अशी अनेक उदाहरणे आपणास दिसून येतील. ते काहीही असले तरी यमन हा राग अत्यंत लोकप्रिय आहे यात वाद नाही.मी तर त्याला ’गर्भश्रीमंत’ राग म्हणतो.यावर लिहायचे म्ह्टले तर सूर्य,समुद्र,अवकाश,धुमकेतू यावर लिहिण्यासारखे आहे.इतका मोठा आवाका असलेला दुसरा राग माझ्या तरी पाहण्यात आला नाही.तसेच माझ्या मते ’कल्याण’ ऐवजी ’यमन’ हाच थाट असायला हवा होता.यालाच शुद्ध थाट म्हणून मान्यता मिळायला हवी होती.कारण यात सातही स्वर शुद्ध म्हणजे तीव्र आहेत.शुद्ध थाट म्हणविल्या जाणार्‍या बिलावल थाटातील कोमल मध्यम व कोमल निषादाचा वापर विद्यार्थ्यांना विचारात पाडतो.(शास्त्र म्हणून तेच शिकविल्या जात असल्यामुळे यावर कोणी बोलत नाही ,ही गोष्ट वेगळी.तसेच बोलून फायदा काय ? परीक्षेत हेच लिहावे लागणार नाहीतर गूण कमी होतील !)पण यमनच्या बाबतीत असा संभ्रम रहात नाही.
शास्त्रीय माहितीः- गेल्या २०० ते २५० वर्षांपासून चालत आलेल्या उत्तर भारतीय संगीत शास्त्रानुसार यमन राग कल्याण थाटातून उत्पन्न झाला आहेवादी स्वर गांधार असून संवादी स्वर निषाद आहे.जाती संपुर्ण असून गानसमय रात्रीचा पहिला प्रहर आहे. गानसमयावर या अगोदरही मी थोडक्यात लिहीले आहे या वेळी मात्र सविस्तर लिहीत आहे.खरे म्हणजे रागाचा गानसमय ठरविण्याची अशी कोणतीच साधने प्राचिन ग्रंथंमध्ये नमूद नाहीत.तरी पण रागाचा गानसमय ठरविल्या गेला आहे.कशाकरीता ? माहित नाही.जिथे प्राचिन ग्रंथातील रागांची नावे व आजच्या रागांच्या नावात साम्य नाही,स्वरात साम्य नाही तिथे गानसमय कसा आणि कोण ठरवणार ? काही तरी शास्त्रीय नियम लावायचे म्हणून लावणे या पलिकडे याला अर्थ नाही.माणसाने केव्हा गुणगुणावे,काय गुणगुणावे हे काय ठरवून होणार काय ? सध्याचा थाट पद्धतीचा विचार केला तर मधुवंतीसारखे राग तर थाट पद्धतीमध्ये बसतच नाही.मग दहा पेक्षा अकरा थाट करून त्या ११व्या थाटाला मधुवंती नाव दिले तर काय बिघडेल ? पण नाही, दहा थाटातच ठोक-पिट करून सर्व राग बसविणे...हे अनैसर्गिक वाटत नाही का ? हिंडोल,गौडसारंग,तोडी,मुलतानी या रागांमध्ये तीव्र मध्यम असून त्यांना दिवसा गायिल्या जाणारे राग म्हणून मान्यता दिल्या गेली आहे.खरे तर नियमानुसार तीव्र मध्यम असलेले राग रात्रीच गायिल्या जायला हवे. एक असाही नियम आहे की,’ग’ ’नि’ कोमल असलेल्या रागात तीव्र मध्यम लागत नाही.मग कोमल ग नि सोबत तीव्र म असलेल्या सुरावटीचा राग मधुकंस कसा ? खरे तर राग गाण्याच्या नियमाला फार पुर्वीपासूनच फाटा दिला आहे हे ’दर्पण’ या ग्रंथातील


"यथोत्काल एवैते गेया पूर्व्विधानतः /
राजाज्ञया सदागेया नतु कालं विचारयेत् //


आणि ’तरंगिणी मधील

"दशदंडात्परं रात्रौ सर्वेषां गानमीरीतम् /
रंगभुमौ नृपाज्ञायां कालदोषो न विद्यते //


तसेच श्री बॅनर्जी यांच्या ’गीतसुत्रसार’ (Grammer of vocar music) ग्रंथामध्ये पान ५८ वर म्हणतात...
"हमारे यहाँराग-रागिनियों को दिन तथा रात्री के नियमित समयों पर गाने की जो प्रथा चली आ रही है,वह केवल काल्प्निक है/"
या वरूनही गानसमय प्रथेतील पोकळपण स्पष्टपणे दिसून येतो.खरे म्हणजे स्वर समुदायात अशी काही विशेषता नाही की,ज्यामुळे त्यांना काही खास वेळी न गायिल्याने योग्य तो परिणाम साधल्या जात नाही.संगीताचा उद्देश स्वरांद्वारे भाव व्यक्त करून श्रोत्यांचे मन प्रसन्न करणे एवढाच आहे.म्हणजेच या करीता कोणत्याही विशिष्ठ अशा खास वेळेची गरज नाही.जे भाव सकाळी व्यक्त होऊ शकतात किंवा करू शकतात ते सायंकाळी किंवा रात्री का करू शकत नाही ? नक्कीच करू शकते,शकायलाच पाहीजे.’पारिजात’ या ग्रंथात्भूपाली राग सकाळी गायिल्या जातो असा उल्लेख आहे.परंतू सध्या तो रात्रीकालिन मानल्या जातो.(घनःशाम सुंदरा...ही भूपाली रागातील भूपाळी सकाळी गोड वाटत नाही का ? सकाळच्या अहिर भै्रव रागातील ’पु्छो ना कैसे मैने रैन बिताई..’हे चित्रपटातील गाणे रात्री मन मोहतेच ना ?) दक्षिण भारतात यमन राग सकाळी व भैरवी रात्री गायिल्या जाते.तर काहींच्या मते ललित,रामकली,तोडी वगैरे राग सायंकाळी गायिल्याने गानसिद्धी उत्तम प्रकारे होते.म्हणजेच गानसमय हा प्रकार म्हणजे लोकांवर लादलेले थोतांड आहे हे सिद्ध होते.स्वर,स्वर आहे;राग,राग आहे,केव्हाही त्याचा परिणाम सारखाच अपेक्षित आहे.
ते काहीही असले तरी यमन राग हा सर्वांचा आवडता आहे हे मात्र खरे. याचे वैशिष्ठ्य म्हणजे कल्पक गायक,वादक,संगीतकारांवर हालवकर प्रसन्न होऊन वरही देऊन टाकतो.पण जर का यात भरकटला तर ’पचका’ होणे ठरलेले आहे.यमन गाता आला की सर्व राग गाता येतात असे जाणकार सांगतात.हा राग गायिला नाही असा गायक,वादक सापडणे अशक्यच ! इतका हा मधूर आहे.भारताच्या सर्व भाषा-बोलींमधील जेवढी गाणी या रागात बनली असतील तेवढी गाणी दुसर्‍या रागात तयार झालेली नसावी.सुगम संगीतकारांसाठी तर हा राग वरदानच ठरला आहे.कोणतेही भाव समर्थपणे व्यक्त करण्याची क्षमता यमन मध्ये आहे.हे एक संगीतकार म्हणून मी ठामपणे सांगू शकतो.


(येथे मी तयार केलेल्या यमन रागाच्या विविध मूडच्या रचनांवर कोल्हापूरचे संगीत समीक्षक ऍडव्होकेट राम जोशी यांच्या लेखातील काही भाग देण्याचा मोह मला आवरत नाही.ते म्हणातात... "यमन हा रागच असा की कोणाही संगीतकारानं त्याच्या प्रेमात पडावं. कदम तरी त्याला कसे अपवाद असणार? त्यांनी यमन रागात उदंड रचना केल्या असल्या तरी त्या छापातले गणपती नाहीत, ती प्रत्येक मुर्ती स्वतंत्र आहे़. प्रत्येक चालीला स्वतःचा वेगळा चेहरा आहे, रंग आहे, रुप आहे, व्यक्तिमत्व आहे़. कार्यक्रमाची सुरुवात ते स्वरचित काव्याने करतात़.

‘सरगम तुझ्याचसाठी गीते तुझ्याचसाठी
गातो गझल मराठी प्रिये तुझ्याच साठी’

दादर्‍यातल्या ह्या बंदिशीची यमन मधील ही रचना. अगदी साधी. सुगमसंगीतामध्ये अर्थातच शास्त्रीय संगीतातील व्याकरणाला; नियमांना स्थान नाही, इथं अपेक्षित असतं ते श्रवण सौंदर्य, गोडवा, मोहकता. साहजिकच इथं शुध्द यमन शोधण्याची धडपड करू नये कारण तो यमन कल्याणाशी क्षणांत दोस्ती करतो़ आणि दोन्ही माध्यमांच्या अशा हळुवार लगावांची प्रचिती आली की उत्स्फूर्तपणे दाद देण्याशिवाय श्रोत्याला इलाजच रहात नाही़ ही अनुभूती मी त्यांच्या प्रत्येक यमनांत घेतली व घेतो़.

‘मी असा ह्या बासरीचा सूर होतो,
नेहमी ओठांपुनी मी दूर होतो’

ह्या गझलची चालही अशीच आहे़. धृवपदातली -मतल्यातली दुसरी ओळ (ज्याला क्रॉस लाईन म्हणतात) त्याची ठेवण व स्वरसमुहाची रचना अत्यंत मोहक आहे़. त्यातील ‘सूर होतो़’ इथं तार सप्तकातला षडज्‌ सूर ह्या शब्दासाठी खुबीनं वापरला तर आहेच पण ती ओळ म्हणताना ‘सूर’ हा शब्द आणि त्याचा तारषड्जाचा हळूवार पण भरीव लगाव व रुपक तालांचा एक पूर्ण जादा आवर्तन पूर्ण होईपर्यंत जो दीर्घकाळ मुक्काम ठेवतो तो अतीसुंदर लागतो़. संगीत रचनाकाराकडं नुसता सांगीतिक अलंकाराचा साठा असून चालत नाही तर स्वरपोषाखाला साजेल असाच एखादाच चढविलेला अलंकार संगीत श्रवणसौंदर्य खुलवितो़. संगीतकार हाच खर्‍या अर्थानं स्वतःच्या रचना समर्थ पणे व अपेक्षित परिणामासह गाऊ शकतो. हा अनुभव मास्तर कृष्णरावांपासून सुधीर, श्रीधर फडके, वसंत पवार, राम कदम, यशवंत देव यांच्या पर्यंत येतो. सुधाकर कदम हे स्वतः गायकही असल्याने तेही ह्या बाबीला अपवाद नाहीत़. ‘सूऱ होतो’ इथं शब्दकला आणि स्वर माधुर्य असा सुरेख समन्वय झालाय़.
‘सांज घनाच्या मिटल्या ओळी’
हे एक अतिशय हळूवार भावना उलगडून दाखविणारं सरस काव्य़. कदम यांनी बंदीशही यमनमध्येच बांधलीय़. त्यातल्या क्रॉसलाईन अखेरीस़ ‘क्षितीजावरती़’ इथं त्यांनी नि व कोमल रिषभाचा अत्यंत कौशल्यपूर्ण वापर करून यमनचा करॅक्टरच बदललाय असे नव्हे तर त्या रिषभाच्या योजनेमुळे ‘क्षितीज’ ह्या शब्दाचा अर्थ प्रतीत करण्यासाठी कोमल रिषभाला पर्यायच नाही हे त्वरीत पटते, पुरियाचं होणारं दर्शन तसेच कडव्याची चाल हे सगळं सुरेख जुळून आलंय़. प्रसिध्द कवी अनिल कांबळे यांच्या

‘जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू
ऐनवेळी अशी काय करतेस तू
'

 ह्या गीताची तर्जही यमन मध्येच बांधली आहे़. यमन मधली अत्यंत चटपटीत अशी ही स्वररचना, खेमट्याच्या अंगानं लागणारा दादर्‍याचा ठेका, लय थोडीशी उडती चपळ, त्यामुळे विशिष्ट अर्थवाही अशा ह्या गीताला उत्तम न्याय मिळाला आहे़. सौंदर्य स्थळाचा निर्देश करायचा झाल्यास ‘ऐनवेळी अशी काय’ ह्या ओळीतली अधीरता दर्शविण्यासाठी अत्यंत चपखल अशी स्वरसमुहरचना म्हणावयास हरकत नाही. ‘सामग, सामगधप’ वगैरे अर्थात हा आनंद अनुभवायचा आहे़. ‘तुझ्या नभाला गडे किनारे’ ही सुध्दा यमनमधलीच श्रवणीय रचना आहे. यमन ह्या एकाच रागातल्या चारी रचना त्यांनी मला एकापाठोपाठ ऐकविल्या. पण खासियत अशी की त्यांत तोचतोचपणा नाही़. स्वररचनेची पठडी ठरीव स्वरुपाची नाही. त्यात आहे पूर्णतः वेगळेपण, हे श्रेष्ठ संगीत रचनाकाराचं वैशिष्ट मानलं जातं. सुगम संगीतात आकर्षक मुखड्याला-धृवपदाला खास महत्व आहे़.कदम यांच्या स्वररचनेचे मुखडे अत्यंत आकर्षक असतात़. त्याहीपेक्षा अधिक कौशल्य व महत्व असतं ते मुखड्यानंतरच्या क्रॉसला. कारण संगीत रचनेच्या आकर्षकतेचे ते प्रमुख स्थान आहे़. मुखड्याच्या चालीला अनुरूप अशी किंबहुना त्याचं सौंदर्य वर्धिष्णू करणारी आरोही पूर्ण करुन अवरोही व षड्जावर विराम पावणारी स्वररचना, हे काम फार अवघड असते़. तसे नसेल तर पूर्ण चालच फसते़ अनेक संगीत रचनामध्ये हे दोष दिसतात़. संगीतकाराला इथं आपली प्रज्ञा ओतावी लागते़. सुधाकर कदमांच्या रचना ह्या कसोटीला पुरेपूर उतरणार्‍या आहेत म्हणूनच त्या भावतात़. कडव्यांच्या चालीतही मूळ चालीशी सुसंगती दिसते़. कळत नकळत अन्य रागाला स्पर्शून जाणं म्हणजे हळूच मधाचं बोट चाखण्यासारखं गोड मधुर असतं.अर्थातच शेवटच कडवं हे सर्वार्थानं हायलाईट असतं. तशीच त्याची स्वररचनाही कदम समर्थपणे करतात़. एकाच यमनाची ही विविध रुपे, विविध रंग, त्याचा वेगवेगळा ढंग. आणि त्याची अनोखी अदाकारी हे मोहजाल किंवा मायाजाल म्हणा, असं आमच्या भोवती टाकलं की आम्ही स्वतः जाणकार रसिक असूनही फसलो़. मग लक्षात आलं की ही यमनी फसवणूक होती पण ही फसवणूक गोड होती़. निर्भेळ होती.")

यमन हा अभंगापासून तॊ लावणीपर्यंत सर्व प्रकारात रंगतो म्हणा किंवा रंगवितो म्हणा !मराठीमध्ये जवळ-जवळ सर्वच संगीतकारांनी यात स्वररचना केली आहे.त्याची यादी करतो म्हटले तर तो एक मोठा लेखच होईल.तरी पण काहींचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही.’धुंदी कळ्यांना...’, ’का रे दुरावा...’, ’पराधीन आहे जगती...’, ’तोच चंद्रमा...’, ’पिकल्या पानाचा देठ की ग हिरवा...’, ’कबीराचे शेले विणतो...’, ’सुखकर्ता दुखहर्ता...(आरती)’, ’जिथे सागरा धरणी मिळते...’, ’जीवनात ही घडी...’, ’शुक्र तारा...’, ’तिन्ही सांजा सखे मिळाल्या...’, सोबतच अनेक नाट्यगीतेही यात आहेत.त्यातील अभिषेकी बुवांनी मत्स्यगंधा नाटकाकरीता रचलेले स्वरशिल्प ’देवाघरचे ज्ञात कुणाला...’ हे मला अतिशय भावले.गायक आहेत रामदास कामत. हिंदी चित्रपटसृष्टीतही यमन ने धुमाकूळ घातला आहे.सैगलच्या ’मैं क्या जानू क्या जानू रे...’ पासून तर आता-आताच्या ’तुम दिल की धडकन हो....’पर्यंत...यातील उल्लेखनीय गाणी आहेत...’मन रे तू काहे न धीर धरे...’, ’जिया ले गयो...’, ’जा रे बदरा बैरी जा...’, ’वो हँसके मिले हमको...’, ’पान खाये सैयाँ...’, ’इस मोडपर आते है...’, ’चंदन सा बदन...’, ’आँसू भरी है ...’, ’जब दीप जले आना...’ अशी किती गाणी घ्यावीत...............? उर्दू ग़ज़ल मध्ये ’रंजिश ही सही....’ही ग़ज़ल म्हणजे मैलाचा दगड आहे.सोबतच ’वो मुझसे हुये...’, ’शाम-ए-फ़िराक...’ ह्या गझला आणि ’आज जाने की ज़िद ना करो...’ ही फ़रीदा खानम यांनी गायिलेली रचना म्हणजेही कळसच आहे.यात ’मरीज़े मुहब्बत...’, ’दिलवालों क्या देख रहे हो ह्या ग़ुलामलीच्या गझला आपला वेगळा रंग दाखवितात.’क्युँ मुझे मौत के पैग़ाम दिए जाते है...’ (शोभा गुर्टू), ’तुम आए हो तो शबे इंतज़ार गुजरी है...’ (इकबाल बानो), ’आपका इंतज़ार कौन करे...’(शुमोना राय) या गझलाही अतिशय श्रवणीय आहेत. उर्दू गझल गायनातील मेहदी हसन साहेबांनी गायिलेली अहमद फ़राज़ यांची ’रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ...’ या गझलने लोकप्रियतेचे सर्व मापदंड मोडीत काढले.(खरे म्हणजे हे ’मोहब्बत’ या १९७२ सालच्या पाकिस्तानी सिनेमातील गाणे (ग़ज़ल) असून,याचे संगीतकार निसार बज़्मी हे आहेत.पण खाँ साहेबांनी महफिलीत गाऊन या रचनेचे सोने केले.)या गझल सोबतच यमन रागाचीही लोकप्रियता (गझल गायनाचे संदर्भात) परमावधीला पोहचली.मूलतःच गोड असलेल्या या रागात फ़राज़ साहेबांचे शब्द, खाँ साहेबांचा जव्हारदार मधाळ आवाज आणि शब्दांना साजेशी विनवणी करणारी बंदिश असा उच्चतम कोटीचा संगम यात झालेला दिसून येतो.याची ’सम’ तशी ऐकायला सोपी पण गाठायला कठीण अशी आहे.’आ फिरसे मुझे छोडके जाने के लिए आ’ या ओळीनंतर पुन्हा ’रंजिश’ हा शब्द येतो तेव्हा वेगळ्या प्रकारे समेवर येतो.त्यामुळे गझलची लज्जत आणखी वाढते. यातील प्रत्येक शेर गायकी अंगाने सादर केल्यामुळेगझल गायकीची वेगळी मजा चाखायला मिळते.’जैसे तुम्हे आते है न आने के बहाने’ या सेरातील ’जैसे’ या शब्दावर खर्जात केलेली ’ऩि प़ सा---सा सा सा ऩि रे - रे- रे रे ऩि रे प ग रे’ ही कारागिरी आणि नंतर यमन मध्ये नसलेला कोमल गांधार घेऊन केलेले स्वरांचे नक्षीकाम भल्या-भल्यांना मोहवून टाकते.त्या नंतरचे ’न आने के बहाने’ या वरील गांधार ते निषाद ही सुरावट सुद्धा ’बहाने’ दाखवते.त्यामुळे या गझलमध्ये जे एक आर्जव आहे ते यमन मुळे पुर्णत्वाने दाखविल्या गेले आहे.’इक उम्र से हूँ...’ या मिसर्‍यातील तार षड्जावरून खाली येऊन ’महरूम’ या शब्दाच्या शेवटी वापरलेला तीव्र मध्यमही असाच ’वंचितत्व’ स्पष्टपणे दाखवितो.आणि लगेच पुढच्या ओळीतील षड्जाला धरून केलेली विनवणी लाजवाबच...दुसरा शब्द नाही.
असा हा यमन... ऐका तर,रंजिश ही सही....

Sunday, October 13, 2013

कोमल हृदयाचा रांगडा कवी


 //शिवा राऊत//

शिवाजी रोडाबाजी राऊत म्हणजे आमचा शिवा राऊत होय.साधा,भोळा,निरागस शिवा कसा जगला यापेक्षा त्याने साहित्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा कसा उमटवला हे पाहणे महत्वाचे ठरते.सतत मुशाफिरी करणारा रांगडा शिवा स्वतःकडे जरी दुर्लक्ष करीत होता तरी कवितेच्या बाबतीत मात्र अतिशय हळवा होता.आर्णीला(जि.यवतमाळ)असतांना प्रवासात जर कविता सुचली तर सरळ आपल्या पायजाम्यावर लिहून आणायचा.नंतर घरी माझ्याकडे असलेल्या त्याच्या वहीत लिहून ठेवायचा.कविता ’सुचणे’ व ’पाडणे’ यात खूप फरक आहे.शिवाने कविता कधीच पाडली नाही,ती आपसूकच आलेली असायची.


अंगांगी कृष्णमिठीने
 जन्माचे देऊळ सजले
 गोपुरे रचावी त्याचा
 हा अक्षर उत्सव चाले
 

मराठी कवितेला आपला वेगळा बाज देणारा शिवा सतत दुःख झेलत जगला
.वेदनांच्या अंतर्द्वंदात फसलेला हा विदेही कवी सध्याच्या चकचकीत जगात


मी तो या मातीची
उन्ह विराणी वो
अभंगाला टाहो
वादळाचा

 
असे म्हणत उपेक्षित जीवन जगला
.तरी शब्दकळा मात्र त्याची म्हणजे फक्त त्याची होती.


सायीच्या सुईने
काढलास काटा
डोळे पाणवठा
पुनवेचा

अशा आतडी सोलून काढणा-या ओळी अभंग रुपाने इतक्या ताकदीने मांडणारा शिवा या काळातला एकमेव होता असे म्हटले तरी चालेल.यवतमाळ जिल्ह्यातील वेणी नावाच्या छोट्याशा खेड्यात जन्मलेला शिवा खेड्यातच वाढला,मोठा झाला व खेड्यातच संपला.त्याच्या कल्पनाशक्तीची भरारी पहिल्यावर त्याने हे सगळे कोठून ,कसे मिळविले हा प्रश्न आम्हाला नेहमीच पडायचा.यावर शिवाला छेडले असता तो ही समर्पक उत्तर देऊ शकत नसे.कारण अंतर्मनात उफाळलेल्या कल्पनांना शब्द कसे दिल्या जातात हे त्यालाही कळत नव्हते...नसावे.वृत्ताकरिता मात्रा मोजायची त्याला कधी गरजच पडत नव्हती.जे काही यायचे ते मुळातच रेखीव,बांधीव असायचे.


स्वप्न प्रहरी धुकाळ धूसर डोंगरपसरण
जशी दुरातुन दीठीत आली भिजली गवळण
                                                                                                                                             अल्याड डोंगर,पल्याड गंगा
मधि मारोती गावधुरंधर
उतार भांगातुन कौलाच्या
उन्हे सांडती मोत्याचा चुर
                                                                                                                                              या पुनव पहाटे आला
पाऊस कशाला बाई
ओलेसे अंगण झाले
वा-याला नाचण घाई

अशी अनेक उदाहरणे देता येतील.

       एकदा असंच शिवा म्हणाला,"दादासाहेब (तो मला दादा म्हणायचा) तुम्ही आकाशवाणीवर माझ्या कविता गात नाही याचे कारण काय "? मी म्हणालो,"तुझ्या कविता समजायला जरा कठीण असतात त्यामुळे लोकांना त्या आवडतील की नाही या भीतीपोटी मी गात नाही".त्यावेळी शिवा काहीच बोलला नाही.४/५ दिवसांनी मात्र माहुरच्या रेणुकादेवीवरील एक अप्रतिम कविता मला आणून दिली व कहीच न बोलता निघुन गेला.मी बघतच राहिलो.ती रचना होती


घाली अमृताचा पान्हा कृपेची साऊली
उदे उदे जगदंबे गे रेणुके माऊली


माझ्या डोळ्यात खळकन अश्रू आले...ताबडतोब हार्मोनियम घेऊन बसलो.पण योग्य अशी चाल सुचेना...असाच एक महिना निघून गेला.या एक महिन्यात शिवाने एका अवाक्षराने मला याबद्दल छेडले नाही.एक दिवस अचानक शिवरंजनीच्या स्वरांनी स्वतःहून या कवितेला सजविले व मी आकाशवाणीवर (नागपुर)गायीलो.प्रसारणानंतरचा शिवाचा आनंद पाहून मला गहिवरुन आले.अशा लहान सहान बाबींनी हरखुन जाणारा शिवा एखाद्या निरागस बालकासारखा दिसायचा.

         लग्न झाल्यावरही कौटुंबिक पाश त्याला बांधुन ठेऊ श्कले नाही.या मोहमयी दुनियेत त्याला फक्त एकाच गोष्टीचा मोह होता तो कवितेचा ! त्याचेकडे बघताना मला का कोण जाणे नेहमी गाडगे बाबांची आठवण व्हायची.तसे दोघांमध्ये काहीच साम्य नाही.पण मला मात्र वाटायचे...कदाचित चेहरेपट्टीमुळे असू शकते.गाडगे महाराजांनी कशाचाही मोह न करता समाजातील अंधश्रद्धेची जळमटं दूर करण्याचा प्रयत्न करुन जनता जनार्द्नाची सेवा केली.तर शिवाने मोह मायेच्या पल्याड जाऊन साहित्य सेवेत स्वतःला समर्पित केले.




किती आवर्तने एका समर्पणासाठी
आक्रंदणे अधांतरी,अंधार हाकाटी
भुकेमुळे ओठ ऊर अपंग पाचोळा
उभा जीव मायापाश,देह लोळागोळा


अभंग लिहीणारा शिवा आतल्या आत दुभंगत राहिला.हा दुभंग साधणे त्याला शेवटपर्यंत जमले नाही.सध्याच्या जगातला व्यहवारवाद त्याला कळला नही,जमला नाही.प्रसिद्धीसाठी कराव्या लागणा-या लटपटी-खटपटी त्याला जमल्या नाही.तो त्याचा पिंडही नव्ह्ता.खरे म्हणजे त्याच्या कविताच एवढ्या जबरदस्त होत्या की प्रसिद्धीच त्याला शोधत यायची.नागपुर तरुण भारतच्या वामन तेलंगांनी शिवाला अक्षरशः उचलले व लोकांपर्यंत पोहोचवले.आपल्या कविता,कथा छापुन याव्या म्हणून नाना प्रकार करणा-या ’साहित्यिकांच्या’जगात शिवासारख्या सरळसोट माणसाच्य़ा कविता कोणत्याही लाग्याबांध्याशिवाय छापुन यायला लागल्या यातच शिवाच्या कवितांचे वेगळेपण लपले आहे.या   हि-याचे पैलू रसिकांपर्यंत पोहचवण्याचे काम दै.तरुण भारत(नागपुर)ने त्याच्या हयातभर केले.तसेच आकाशवाणी
नागपुरच्या बबन नाखले यांनीही शिवाला जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा निर्भेळ प्रयत्न केला.दै.मतदारचे संपादक दिलीप येडतकर यांनीही त्याला व त्याच्यातील कवीला जगवले.’सोफेस्टिकेटेड’लोकांनी त्याचे मद्यपान बंद असेपर्यंतच त्याला थारा दिला.पण मित्र मंडळींनी मात्र त्याला गुणदोषांसह स्वीकारला.


 नसे आकाशात
 दहापाच सुर्य
 रत्न शिरोधार्य
 एखादेच...


शिवाच्या कवितांवर ग्रेसांप्रमाणे दुर्बोधतेचा शिक्का मारण्याचा प्रयत्न झाला.पण रसिकांनी मात्र त्याच्या आगळ्या वेगळ्या शैलीचा आणि देखण्या शब्दकळेचा भरपूर आनंद घेतला.यवतमाळचा कवी गजेश तोंडरे म्हणतो,"शिवाचा अभंग वाचकाला प्रथम मोहवतॊ,नंतर कळीज सोलून काढतो".


मांडता न आला
दुःखाचा हिशेब
वारंवार नभ
पाझरे वो...

नाचो येते मन
हळू गळे पीस
मयुर उदास
आनंदाचा...


ग्रेसांच्या तोडीच्या या कवीच्या कवितांवर धूळ बसत चालली आहे,व सांस्कृतिक क्षेत्र ती उडविण्याची तसदी घेत नाही ही दुःखाची गोष्ट आहे.आपापला तवा गरम करणा-यांच्या या युगात शिवाचा तवा थंड व्हायला लागला आहे.जिवंतपणी मरणयातना भोगणा-या शिवाला मेल्यावरही न्याय मिळाला नाही.यात नुकसान कोणाचे ? शिवाचे की मराठी भाषेचे ?

शिवाच्याच शब्दात म्हणावेसे वाटते...


नका करू कधी
मने उकीरडा
अश्वमेध काढा
मानव्याचा...


शिवाने फक्त अभंगच लिहीले असे नाही.


’देठ दुखरा हात झाला,चढत गेली बांगडी
 काय पुसशी मैत्रीणीला,गोष्ट थोडी वाकडी’

’बरडभुकेल्या मुखात आचळ पिळून आला पाऊस पान्हा
 पुलकित झाले डोंगरकाळीज निळासावळा झेलुन कान्हा’

’नाच पोरी नाच, तुझ्या चाळाला काच
 डोळ्यात तिढा,पाण्याचा पाढा
 गरत्या फिरत्या तालात नाच’

’विरहात कोंदलेले काळीज मुक्त झाले
 आणि मुक्या स्वरांना बिलगून शब्द आले’

’आसवांचे मूळ कोठे नाकळे
आतल्या आतून सारे उन्मळे
का उन्हाची वाळवीच्या सारखी
लोचनाते कोरणारी वारुळे’



’डोळा घालून घोटाला केला
 उभ्या गावाच्या कानाला गेला
 पाडपिकल्या देहाची बाई
 चव उसवहासव होई
 कशी सांगू मी चारचौघीला...’
 एकाच आवर्तनात न फिरता अशा प्रकारच्या विविध भाव-भावनांच्या कविता शिवाने लिहील्या.त्या महाराष्ट्रातील रसिकांपर्यंत पोहचाव्या तसेच शिवाचा अल्पसा का होईना परिचय व्हावा यासाठी हा प्रयत्न......कारण


’त्यानी आतड्याचे
सोहळे मांडले
अजिर्णाला दिले
आवतन...’

सुधाकर कदम

Tuesday, October 8, 2013



माझ्या मराठी गझल गायकीच्या कारकिर्दीवरून १९८३ मध्ये जेसीजतर्फे "Out Standing Young Person" हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. "The pioneer in the introduction of marathi ghazal" असा उल्लेख असलेले हे  (पुणे येथे शिफ्ट होताना) अडगळीत पडलेले मानपत्र सापडले.ते आपणासमोर ठेवीत आहे.






Tuesday, October 1, 2013

घाव ओला जरासा होता


माझी आवडती स्वर-रचना व शब्द.रूपक तालाला वेस्टर्न टच देऊन ड्रम

 सेट,बेस गिटार आणि चुटक्यांचा र्‍हिदम देऊन केलेला वेगळा 

प्रयोग.सोबत वैशालीचा आर्त आवाज... व्वा क्या बात ! असं मीच 

स्वतःला म्हणतो..............



घाव ओला जरासा होता

वेदनेचा दिलासा होता



रात्र आली तशी गेली ही

चंद्र माझा फिकासा होता



शोध जेव्हा तुझा मी केला

गाव सारा सुनासा होता



सोबतीला कुणीही नव्हते

एक माझा उसासा होता



चार डोळे मुक्याने झरले

तिच सारा खुलासा होता



गायिका-वैशाली माडे

गझलकार-दिलीप पांढरपट्टे

संगीत-सुधाकर कदम


अल्बम
‘काट्यांची मखमल’,
युनिव्हर्सल म्युझिक कंपनी.







संगीत आणि साहित्य :