गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, August 31, 2019

मराठी गझलेचा गंधर्व...

म.टा.नागपूर आवृत्तीत दर शुक्रवारी प्रकाशीत होणाऱ्या "आयुष्याचा सफरनामा" सदरातील या आठवड्याच्या भावना शेअर करतो आहे, कृपया गोड मानून घ्याव्या.
-मसूद पटेल

मनात खरी जिद्द कलेप्रती खरी आसक्ती असली की कितीही विपरीत परिस्थिती माणसाला ध्येयप्राप्तीपासून रोखू शकत नाही.’गझलगंधर्व' सुधाकर कदम यांचा सांगीतिक प्रवास याचे जिवंत उदाहरण आहे.यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात येणार्‍या दोनोडा या लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेले सुधाकर कदम पुढे ’गझलगंधर्व’ पुरस्काराचे मानकरी ठरतील याची त्यावेळी कोणी कल्पनाही केली नसेल.
. चौथ्या वर्गापर्यंतचे शिक्षण गावीच पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी कदम यवतमाळला गेले.शालेय शिक्षणासोबतच वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी दादा पांडे यांचेकडे तबला वादनाचे तर वडिलांकडॆ गायन आणि हार्मोनियम वादनाचे धडे गिरवायला सुरवात केली.वयाच्या अवघ्या सोळा सतराव्या वर्षात संगीतकार म्हणून कारकिर्दीची सुरवात केली.यवतमाळ येथे मित्रमंडळींसह भाग्योदय कला मंडळ’ नावाचा ऑर्केस्ट्रा स्थापन केला यात ते सिनेसंगीतासोबतच स्वत: स्वरबद्ध केलेली गीते गाऊ लागले.त्यांनी सर्वप्रथम स्वरबद्ध केलेली शंकर बडे यांची गझल,’आम्ही असे दिवाणे आम्हास नाव नाहीआम्ही घरोघरी अन् आम्हास गाव नाही’ आजही लोकप्रिय आहे.
. संगीत विशारद झाल्यावर पोटापाण्याची व्यवस्था म्हणून कदम यांनी आर्णी येथील एका शाळेत संगीत शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली.यासोबतच संगीत विद्यालय आणि संगीत परीक्षा केंद्र सुरू केले.या शहराला सांस्कृतिक ओळख मिळवून दिली.दरम्यानच्या काळात अनवधानाने ते राजकारणाकडे ओढले गेले.त्यांच्याकडे आमदारकीची संधी चालून आली परंतू कुटुंबाचा राजकारणास विरोध असल्याने त्याण्नी उमेदवारीस सविनय नकार दिला.आपले विद्यार्थी श्रीकांत मुनगीनवार यांना पुढे केले.विशेष म्हणजे मुनगीनवार हे विदर्भातील शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून निवडूनही आले होते.
. सुधाकर कदम यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ म्हणजे कवीश्रेष्ठ सुरेश भटांसोबत व्यतीत झालेला काळ होय.याच काळात त्यांनी उत्तमोत्तम गझला स्वरबद्ध करून रसिकांना अर्पित केल्या.मराठी गझल जनसामान्यात रुजविण्यासाठी सुरेश भटांनी चालविलेल्या मोहिमेचे ते खंदे समर्थक होते.मराठी गझलेच्या प्रचारासाठी हे दोघे स्वखर्चाने एसटीचा प्रवास करून महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात मराठी गझलचा एकत्रितरित्या कार्यक्रम करायचे.अर्धा कार्यक्रम सुरेश भटांचा,तर अर्धा कार्यक्रम सुधाकर कदम यांचा त्यांच्या वाद्यवृंदासह गझल गायनाचा, असे या एकत्रित कार्यक्रमाचे स्वरूप असायचे.नंतर भटांच्या सूचनेनुसार ’अशी गावी मराठी गझल’ या नावाने कदम हे गझलगायनाचा तीन तासांचा स्वतंत्र कार्यक्रम करू लागले.या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग पुण्याला मसापच्या पटवर्धन सभागृहात १५ जुलै १९८२ रोजी पार पडला.या कार्यक्रमाच्या नामकरणापासून निवेदनापर्यंतच्या जबाबदार्‍या खुद्द सुरेश भटांनी पार पाडल्याने मराठी गझल क्षेत्रातील ही मह्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना होय.येथूनच कदम यांच्या वैयक्तिक गझलगायनाची सुरवात झाली.हा गायन प्रवास अजूनही सुरू आहे.आज त्यांच्या नावावर तीन अल्बम आहेत.
. कदम हे नोकरी निमित्त आर्णीत दीर्घकाळ होते मात्र येथे त्यांचे मन रमले नाही. २००३ मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून आकाश विस्तारण्यासाठी ते पुण्यात स्थायिक झाले.स्वकष्टाने उद्दीष्ट साध्य करून नवीन पिढीसाठी एक आदर्श वस्तूपाठ त्यांनी ठेवला आहे,बांधन जनप्रतिष्ठान व अभिजात गझल या संस्थांतर्फे देण्यात येणारा ’गझलगंधर्व’,प्रख्यात उर्दू शायर निदा फाजली यांच्यासोबत मिळालेला ’शान-ए-ग़ज़ल’आणि महाराष्ट्र जेसीजतर्फे मिळालेला ’आऊट स्टॅंडिंग यंग पर्सन’ हे तीन पुरस्कार अतिशय महात्वाचे आहेत. या सुरेल प्रवासात त्यांना मोलाची सथ लाभली ती पत्नी सुलभा यांची.आयुष्यभर संगीताची मुशाफिरी करणारा हा अवलिया स्वरयात्री,स्वत:च गायिलेल्या या ओळीद्वारे अतिशय समर्पकरित्या या दुनियेसोबत संवाद साधतो आहे.
’तुजपाशी मज टाळायाचे लाख बहाणे होते,
मजपाशी पण तुझियासाठी केवळ गाणे होते'.





संगीत आणि साहित्य :