गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, June 26, 2023

हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे

 कोरस व वेस्टर्न तालवाद्यांचा वापर करून संगीबद्ध केलेली 

'हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे,
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे'

ही माझीच  गझल प्राजक्ता सावरकर शिंदेच्या आवाजात सादर करीत आहे. संगीत संयोजन मिलिंद गुणे यांचे असून ध्वनिमुद्रण पुण्याच्या पंचम स्टुडिओत केले आहे.मिक्सिंग व मास्टरिंग अजय अत्रे यांनी केले.मराठी गझल गायकीतील हा पहिलाच प्रयोग आहे.आवडणे,नावडणे हा आपला हक्क आहे.त्यामुळे  मनमोकळ्या प्रतिक्रिया अपेकक्षित.


 

राग पुरिया कल्याण

         #राग_रंग १३                   

     मारवा थाटोत्पन्न पुरिया कल्याण हा राग यमन आणि पुरिया मिळून बनला आहे.त्यामुळे याचे नाव पुरिया कल्याण असे पडले आहे.ढोबळमानाने पूर्वांगात पुरिया व उत्तरांगात यमन असे याचे रूप असून यात दोन रागाचे मीलन घडवणारा पंचम स्वर अतिशय महत्वाचा आहे.कोमल रिषभ व तीव्र मध्यम असलेला हा राग गायक आणि वादकांचा अतिशय आवडता आहे. अशा प्रकारे एक वा अधिक रागाचे मिश्रणातून तयार झालेल्या रागास मिश्र राग म्हणतात.पण हे मिश्रण रंजकच असायला हवे.हे मात्र निश्चित! (हे मिश्रण ज्या कुणी केले असेल त्याला साष्टांग दंडवत) भैरव बहार, हिंडोल बहार, बागेश्री बहार,भूप कल्याण ,केदार नट,सुहा कानडा,सुहा बिलावल,जैत कल्याण,तिलक कामोद,यमन कल्याण,जलधर केदार,गौड मल्हार,जयंत मल्हार,गौड सारंग,कामोद नट,हमीर नट,जोग कौंस,मधु कौंस,मेघ मल्हार,कौशी कानडा, बसंत बहार,अहिर भैरव,नट भैरव,नट बिहाग वगैरे वगैरे ही मिश्र रागांची उदाहरणे आहेत. (असाच एक, दोन रागांचे मिश्रण वाटणारा 'गोरख कल्याण' नावाचा राग आहे.पण यात कल्याण कुठेच दिसत नाही.) गायक वादकांना मिश्र रागात आपली कला मांडताना भिन्न प्रकारच्या दोन रागांची रंजक मांडणी करण्यास खूप वाव असतो.तसे हे काम अत्यंत कौशल्याचे आहे यात वाद नाही.एक मात्र खरे की असे राग गायिल्याने गायकाची स्वरावरील हुकूमत दिसून येते,हे मात्र नक्की.
      संगीतामध्ये रागांची रचना रसोत्पत्तीसाठीच झाली असावी असे म्हणतात.पण फक्त स्वरांनी रसोत्पत्ती कशी होणार? त्यासाठी शब्द पण हवे ना! संगीताला काव्याची जोड दिल्याशिवाय ते समाजमनावर प्रभाव पाडू शकत नाही.उत्कृष्ट काव्य कशाला म्हणावे यावरील एक संस्कृत श्लोक मला सापडला.तो असा:-
   
    सुस्वरं सुरसं चैव सुरागं मधुराक्षरम् |
    सालंकार सप्रमाणं च षड्वर्ग्य गीतलक्षणं ||
   
पूर्वीच्या काळी धृपद गायकीमध्ये विविध प्रकारचे काव्य असायचे. रागाईतकेच शब्दांना पण त्या काळी खूप महत्व असावे असे तानसेन रचित राजा मानसिंगांची प्रशंसा असलेल्या खालील धृपदावरून दिसून येते.

      छत्रपति मान राजा, तुम चिरंजीव रहौ जौलो ध्रुव मेरू तारो |
      चहूं देस से गुनीजन आवत, तुम पै धावत सबहिं को जग उज्यारौ ||
      तुमसे जो नहीं और कासे जाय कहूँ दौर, मोये रक्षा करन हारौ |
      देस करोरन गुनीजन कौं अजाचक किये तानसेन प्रति पारौ ||
     
      राजे रजवाड्याची प्रशांसाच धृपदात नसायची.तर नखशिखांत अंग वर्णन,ऋतू वर्णन वगैरे काव्य पण असायचे.हे तानसेनाच्याच खालील धृपदावरून लक्षात येते.
     
      झुमि झुमि आवत नैना भारे तिहारे | विथुरी अलकै स्याम घन सी लागत
      झपकि झपकि उधरि जात मेरे जान तारे | अरुन बरन नैना ता मैं लाल लाल
      दोरे तापर यह मौज वारि वारि डारै | तानसेनि कौं प्रभु सदाई छके रहत
      कोकिल की धुनि मोहिं बिन अंजन का रै |
     
त्या मानाने ख्याल गायकीत शब्दांपेक्षा स्वरांना जास्ती महत्व देत असल्याचे दिसते.अर्थात काही मान्यवर गायक याला अपवाद असतीलही.पण बहुतेक गायक स्वरमांडणीकडेच लक्ष देत असल्याचे दिसून येते.जुन्या ग्रंथात श्रुतीची दिप्ता,आयता, मृदू,मध्या व करुणा अशी वर्गवारी केली आहे.पण निरनिराळ्या रागांचा रसांशी संबंध लावण्याच्या कामी या वर्गवारीचा उपयोग होईल असे वाटत नाही.तसेच...

    सरी विरेद्भुते रौद्रे धो बीभत्से भयानके |
    कार्यो गति तू करूणे हास्यशृंगारयोर्मपौ ||
   
स्वर आणि रस यांचा संबंध दाखविणारा असा एक संस्कृत श्लोक आहे.पण तेवढ्यावरून राग व रसाचा संबंध ठरविता येत नाही.ते काहीही असले तरी संगीताचा मुख्य उद्देश आनंद निर्मिती हाच आहे.
    मला जसराजजींचे गाणे खूप आवडायचे.त्यांनी गायिलेल्या पुरीया कल्याणने मला अक्षरशः वेड लावले होते.यवतमाळला आमच्या ऑर्केस्ट्रामध्ये उत्तम जुळे म्हणून गायक व हार्मोनियम वादक मित्र होता.जसराजजींचे त्याच्याशी नातेसंबंध असल्यामुळे मुंबईला गेला की त्यांना भेटायचा. त्याचेसोबत मी सुध्दा दोन तीनदा पंडितजींकडे जाऊन आशीर्वाद घेऊन आलो. तरुणपणीच्या शास्त्रीय गायनाच्या मैफिलीत मी बहुतेक त्यांच्या बंदिशी गायचो.
                                    ●
             -सुधाकर कदम यांची धुंद मैफल-
               यवतमाळ ता.२२     (वार्ताहर)
                    'प्रीत मोरी लागी तुमसंग' ह्या
               गोरख कल्याण रागातील मोठ्या
               ख्यालाने सुरवात करून लगेच
               छोटा ख्याल 'नेक कृपा कर आये'
               गाऊन सुधाकर कदम यांनी
               संगीताच्या धुंद मैफलीत रंग भरला.
               येथील 'रविवासरीय चर्चा मंडळाने
               हा तीन तासांचा कार्यक्रम आयोजित
               केला होता.'घेई छंद मकरंद' 'दिव्य
               स्वातंत्र्य रवी' ही नाट्यपदं व 'जाको
               मन लाग्यो शाम' हे सुरदासाचे भजन
               गाऊन तर रसिकांना श्री कदम यांनी
               अक्षरशः वेड लावले.आणि शेवटी पं.
               जसराज यांची प्रसिद्ध भैरवी 'सांवरे
               रंग राची' त्यांनी गायिली.
                      संगीताच्या या बेहोष मैफिलीस
                साथ दिली अविनाश जोशी,भास्कर
                घोटकर,रतन जोशी,विनोदकुमार वाढई
                यांनी तर हार्मोनियम आणि तबल्याची
                बहारदार साथ केली अनुक्रमे श्री.विनायक
                भिसे आणि श्री.बाबा खोतकर यांनी.
                      श्री.कदमांचा परिचय व उपस्थितांचे
                 आभार प्रदर्शन श्री.विजय राणे यांनी
                 केले.
             ● तरुण भारत,नागपूर.दि.२३ मार्च १९८७        
                                     ●     
              
त्यांचा किंवा पं.जितेंद्र अभिषेकींचा गंडाबंद शागिर्द व्हायची खूप इच्छा होती.पण आर्थिक परिस्थितीमुळे हे जमले नाही.परंतू या दोन्ही पंडितांच्या व छोटा गंधर्वांच्या सहवासाने  बऱ्याच गोष्टी शिकलो.त्या आजही कामी येत आहेत.
     उस्ताद अमीर खान, पंडित भीमसेन जोशी,रोशनआरा बेगम, प्रभा अत्रे,गीता गुलवडी, उस्ताद राशीद खान,पं. जगदीश प्रसाद,पं.अजय चक्रवर्ती, व्यंकटेशकुमार,कैवल्य कुमार गुरव,गुलाम हसन खान,विनिता गुप्ता,संगीता बंदोपाध्याय,पं. विजय कोपरकर,संजीव अभ्यंकर,मनाली बोस,कौशिकी चक्रवर्ती,ध्रुव शर्मा,पं. रविशंकर,सहाना बॅनर्जी,संजय देशपांडे (सतार), पं. रामनारायण,दिलशाद खान (सारंगी), पं. हरिप्रसाद चौरसिया,आश्विन श्रीनिवासन,पं. अजय शंकर प्रसन्ना (बासरी),उस्ताद अमजद अली (सरोद),पं. शिवकुमार शर्मा,नंदकिशोर मुळे (संतूर),पं. आनंतलाल आणि पार्टी (शहनाई), प्रवीण गोडखिंडी आणि रफिक खान (बासरी सतार जुगलबंदी) पुरिया कल्यामधील हे सर्व सध्या नेटवर उपलब्ध आहे.
     ●चित्रपट गीतांमध्ये पुरिया कल्याण रागावर आधारित गाणी नसल्यातच जमा आहे.
'तोरी जय जय करतार', उस्ताद अमीर खान.चित्रपट-बैजू बावरा.
'मेरी सांसों को महका रही है', लता.चित्रपट-बदलते रिश्ते.
      ●मराठीमध्ये ही दोन गाणी आहेत.
'गुरू एक जगी त्राता' -सुधीर फडके.
पंडित जितेंद्र अभिषेकींनी स्वरबद्ध केलेले 'मुरलीधर शाम हे नंदलाल', अतिशय गोड असे नाट्यगीत रामदास कामत यांनी अतिशय सुंदर गायिले आहे. नाटक-कट्यार काळजात घुसली.
        मी नुकताच 'काट्यास फूल आले' हा रविप्रकाश चापके या गझलकाराच्या मराठी गझलांचा अलबम केला आहे.त्यातील एक गझल पुरिया कल्याण रागावर आधारित आहे.या गझलमध्ये पुरिया कल्याण सोबत मारवा पण आपणास दिसेल.फक्त दुसऱ्या मिसऱ्यात रंजकता वाढविण्यासाठी कोमल मध्यमाचा उपयोग केला आहे.हा मध्यम पहिल्या मिसऱ्यात शेवटी तीव्र मधमावर जाताना घासून गेल्याचा पण भास होतो.दुसऱ्या शेरातील आलापात मारवा स्पष्टपणे दिसतो.हा राग मारवा थाटातीलच असल्यामुळे हा आलाप खटकत नाही.गायक आहे मयूर महाजन.यातील उस्ताद लियाकत अली खान यांची सारंगी,निनाद दैठणकरांचे संतूर आणि  पांडुरंग पवार यांचा तबला ऐकण्यासारखा आहे.
युट्युबवच्या 'गीत-गझलरंग' या चॅनलवर ही गझल आपण ऐकू शकता.

        जळलो धुपापरी मी मज सांगता न आले
        माझ्या परी फुलांना गंधाळता न आले...
       
        क्रोधास हाय केव्हा फेकून मौन मारू
       आम्हा नजाकतीने का भांडता न आले

        मृत्यो तुलाच वेड्या मी मारलेच नसते
        थांबून ये म्हणालो तुज थांबता न आले

         आजन्म मी खेळलो मी मस्तीत विस्तवाशी
         लाचार त्या चितेला मज जाळता न आले
        
युट्युब लिंक.....
https://youtu.be/QJx6Txf6o60
-------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,नक्षत्र पुरवणी. दि.२५ जून २०२३


 





संगीत आणि साहित्य :