गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, September 15, 2019

स्वरांचे चांदणे,चांदण्यांचे स्वर... अनंत दीक्षित.



       यवतमाळ जिल्यातील आर्णी या गावातले सुधाकर कदम हे एक गाणारं झाड आता हळू हळू महाराष्ट्रात पसरू लागलं आहे.सुरेश भटांची गझल मुळातच एक लावण्य असलेली गझल आहे.त्यांच्या गझला जेव्हा सुधाकर कदम सादर करतात तेव्हा चांदण्यात चांदणे साडावे तसा एक आगळा मोहोर सभागृहात पसरत जातो.
कोल्हापूरच्या मिड टाऊन रोटरी क्लबच्या वतीने ही गझल मैफल परवाच शाहू स्मारक भवनात झाली.कदम तसे कोल्हापूरला आता नवे नाहीत.सुरेश भटांबरोबर गेल्या महिन्यातच त्यांनी एक मैफल रंगविली होती.त्यावेळी जे अतृप्त होते त्यांचे "मागचे जुने देणे,टाळणे बरे नाही",या भावनेने रोटरी क्लबने हा कार्यक्रम केला होता.
मराठी गझल गायनाचा एक संपुर्ण कार्यक्रम तसा नवाच आहे.गझलच्या सर्व पायर्‍यांवरील अमृतांची फुले श्रोत्यांपर्यंत पोहचविणे हे एक कसबच असते.त्या दृष्टीने कदम यांची मेहनत निश्चितच कौतुकास्पद आहे. 
उत्तरेकडे जेव्हा मुशायरे होतात तेव्हा हजारो माणसे गझलच्या स्पंदनाचे माधुर्य लुटतात.त्यांचा अदम्य उत्साह कधी-कधी सकाळीच चंद्र घेऊन येतो.या अर्थानं मराठी माणूसही रसिकतेच्या बाबतीत कमी नाही.मराठी माणूसही कोठेही,कधीही कलदार असाच आहे,त्यामुळे या अनोख्या कार्यक्रमाचे चांगले स्वागत होते.
गायकीतलं फारसं कळत असो वा नसो सुरेश भट यांचे शब्द आणि सुधाकर कदम यांचे सूर एक वेगळं इंद्रधनुष्य घेऊन येते.एकदा ही गझल तुमच्या मनात थुयी थुयी नाचू लागली की तुमच्यात एक लाजवाब पिंगा सुरू होतो.
"मैफलीत या माझ्या पाहतेस का खाली
हाय, लाजणार्‍याने जागणे बरे नाही..."
]यासारखी मुलायम गझल हे कदम यांच्या अदाकारीचे वैशिष्ट् घेऊनच येते.किंवा
"लागले वणवे इथे दाही दिशांना
एक माझी आग मी विझवू कशाला..."
या सारखी अनामिक चिंता तुम्हाला गहराईत नेऊन सोडते.
"हेच का स्वातंत्र्य ज्याचे स्वप्न आम्ही पाहिले
हेच का ते स्वप्न ज्याचे स्वप्न आम्ही पाहिले..."
सुरेश भटांचा प्रश्न कदम यांच्या सुरातून आकार गेऊन येतो.शब्दातून आलेला आकार मुळात भक्कम आहे.त्यावर साजही तेवढाच भक्कम आहे.
गझलतज्ञ किंवा गायकीचे तज्ञ कदम यांच्या कार्यक्रमातील वजा-बाक्या मांडू शकतील.तशा जागाही असतील.परंतू एक नवा सूर आज गझलसाठी येतोय ही गोष्ट निश्चितच स्वागतार्ह आहे.तरीही अगदी अनोख्या माणसालाही एक कुणकुण लागते.हा कार्यक्रम आणखी आखीव व्हावा.सातत्याने त्यावर मेहनत घेतली आहे,याच्या स्पष्ट खुणा दिसायला हव्यात.साचेबंदपणाचा धोका टाळायला हवा.
या मैफिलीच्या इतर अंगांचा विचार केला नाही तर ते अन्याय्य होईल.सर्वप्रथम तुमच्या मनात घर करते ते ती लतीफ अहमद यांची सारंगी.रिमझिम बरसात होत असताना मोराचं नृत्य जसं रोमांचकारी असतं तसं या मैफलीत लतीफ अहमद यांची सारंगी रोमांचकारी आहे.नक्षत्रांनी जागा पकडाव्यात तसे त्यांचे सूर कानात जातात.
दुसरे आहेत तबला वादक शेखर सरोदे.या माणसाचा जन्मच तबल्यासाठी झालाय असं दिसतं.तबल्यातून एक एक मोहक सौंदर्य बाहेर काढण्याचं कसब आहे.त्यात हिसके आहेत,भोवरे आहेत,लपंडाव आहे आणि बरंच काही.त्यांच्या बोटांची किमया अजब आहे.जागा रिकामी दिसली की तबला आणि सारंगीची या मैफलीतली झूंज अफलातून आनंद देणारी आहे.
दै.सकाळ
कोल्हापुर
१६ ऑगष्ट १९८२



Saturday, September 7, 2019


१९८१ मध्ये कविश्रेष्ठ सुरेश भट व गझल गायक सुधाकर कदम हे मराठी गझल गायकी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी निघाले होते.त्याची सुरवात विदर्भापासून झाली.तेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्याच्या सुरवातीला पांढरकवडा (जि.यवतमाळ) येथे आले असता माझ्याकडे एक सुंदर मैफिल झाली.आणि तेव्हापासून माननीय सुधाकरजी कदम या गझल गायकांची मी 'पंखा' झाले...ती आजतागायत !
त्यांच्या " तुझ्यासाठीच मी... ' या अल्बमचे प्रकाशन झालेय या समजुतीत मी अगदी काल पर्यंतहोते...पण काल प्रकाशनाबद्दल fb वर वाचले.आणि लगेच हा अलबम विकत घेतला व त्याचे पारायण केले...हे पारायण करताना मला जे सुचले,भावलेे ते आपणा रसिकांसमोर मांडत आहे.
" तुझ्यासाठीच मी... " या मराठी गझलच्या अल्बममध्ये 'गझलगंधर्व' श्री. सुधाकरजी कदम या गायक व "पंडित" ही ऊपाधी कमीच पडावी अशा या संगीतकाराने- कवी : श्री दिलीप पांढरपट्टे व गायिका वैशाली माडे सह एक न् एक गझलेला, गाण्याला.... प्रत्येक ओळीचा व शब्दातला भाव जाणून आपल्या स्वर-साजाने नवा आलेख व आशय दिला आहे.शब्दांना वेगवगळ्या सुरावटीतून गुंफतांना एक मायाजालच आपल्याला हळूहळू आनंदात सामील करीत आपल्या कानातून थेट ह्रदयावर साम्राज्यं गाजवते !
सगळ्या रचना एकाच संवेदनशील कवीच्या असूनही लाजवाब आहेत.तरूणाईला तालासूरावर खिळवून ठेवणारी रचना----
"किती सावरावे.... कसे सावरावे"
...किती बहारदार... यातील कोरस,गिटार हलकेच जी साथ देतात व रूंजी घालून गायब होणारी फुलपाखरासारखी अकाँर्डियनची गिरकी यामुळे ऐकणाऱ्याचा खरेच झोक जातो!
" तुझा भास झाला पुन्हा आडवेळी,
पहाटे पहाटे जसे ऊन्ह यावे....."
या ओळी तसेच कोरसचे सूरही वेगळेच रंग भरणारे आहेत ! क्या बात! याच रचनेतील
"ईथे मेघ भरला...तिथे मोर फुलला,
अरे ईश्वराला असे ओळखावे..."
ह्या ओळी तर प्रणयातला रस व शॄंगार केवळ एका ओळीच्या चालीतून व आवजातून असे जमलेय की ईश्वरी देणगी मिळालेले हे तिघंही --- गीतकार ----संगीतकार व गायक आपणास ईश्वरी सॄजनातील तारतम्य व तन्मयताही स्वरांच्या व आवाजाच्या विविध वळणांद्वारे जागो-जागी दाखवतात. यातीलच
"आसवांना टाळणे आता नको,
दु:ख हे सांभाळणे आता नको..."
या गझलेत शब्द....सूर...लय व तालाची हलकी रिमझिम घेऊनच अंगावर येते.
"बोललो त्याला किती झाली युगे,
हा अबोला टाळणे आता नको..."
असे मोजके शब्द गायिका वैशाली माडे यांचे नर्म मधाळ गळ्यातून ऐकल्यावर आपले काळीज केव्हा काबिज केले गेले हे
कळतही नाही !
कसबी संगीतकार सुधाकरजी यांची नादब्रह्माशी सूर जुळलेली स्वर-रचना...
"घाव ओला जरासा होता"
रूपक तालाला 'वेस्टर्न टच' देऊन साईड ऱ्हिदममध्ये चुटक्यांसह इतरही वाद्यांचा वेगळ्या प्रकारे उपयोग करून जी झिंग आणली आहे त्याला तोड नाही....तसेच
"वेदनेचा दिलासा होता"
या ओळीतील 'वेदनेचा' या शब्दातील वेदना वैशालीने अश्या प्रकारे दाखविली की अंगावर सर्रर्रर्रर्रकन काटा यावा...
प्रत्येक गझलेतील पुढल्या ऊत्तराच्या ओळींची गंमत लाजवाबच!
सुधाकरजींची गझलेला व गीतांना नव्या नव्या, अव्वल चाली देउन अवघी मैफिल वेड्यागत आपलीशी करून घेण्याची आदत फार फार जुनी नाही तर ; केवळ पंचेचाळीस वर्षांपूर्वीची आहे! तेच हे विदर्भातील एके काळचे अत्यंत नम्र, लोकप्रिय गायक
!...........आजही तसेच अविरत,शांतपणे तेच तपस्वी दान परत संगीतकाराच्या रूपाने आपल्या ओंजळीत भरभरून घालत आहेत....दाता बनून देत आहेत............
याच अल्बमधील
"असेच जगलो झुगारले या जगास जेव्हा,
असाच झाला तुझा नि माझा प्रवास तेव्हा"
या गझलेत सुधाकरजींनी तबला,सतार व सारंगीचे सूर अचूक स्थळे हेरून असे काही पेरलेत कि आपण नकळत गुलाम अलीच्या गझलां इतकेच एका मोहक नादमयी अंमला खाली सूर-शब्द-ताल यांचे वारूवर आरूढ होत पुढे पुढे जातो !... एक हूरहूर लागुन रहाते.........
"कळे ना मला हे कसा नेमका तू ,
कधी ऊन्ह होशी,कधी चंद्रमा तू..."
या गझलेला अशी काही सुरावट दिली... की प्रेयसीला पडणारे गोड कोडे सूरांमूळे अलगद सुटल्याचा अफलातून प्रत्यय येतो! (ही रचना ऐकताना मला मदन मोहन या प्रख्यात संगीतकाराची प्रकर्षाने आठवण आली.)
अशीच आणिक एक दुसरी हासरी गझल...
"नुसत्याच तुझ्या हसण्याने जगण्याचे दु:खं वितळले,
एकाच तुझ्या स्पर्शाने आभाळ मनाचे भरले...."
हे विलोभनिय शब्दांचे अवकाश....तार सप्तकात ऊचलून नेणारे गर्भश्रीमंत सूर......... अगदी सहजतेने मनाचा ठाव घेउन आपला ताण विसरायला भाग पाडतात.....
" अक्षरे पुसटली आणिक हरवली खुणेचि पाने,
जाणुन ईशारा मी ही मग पुस्तक माझे मिटले !"
कवीने अशी नर्म मर्मस्थळे अनेक जागी पेरलीत! वाद्ये तर स्वर्ग दोन बोटेच उरलाय असे वाटायला लावतील एवढी बेजोड. तरीही शब्दांना वाजवी न्याय देत देतच आपले ईमान नं सोडता..पेरलीय ! असे नेमके स्वरसौंदर्य शब्दांना बहाल करणारे सुधाकरजी म्हणजे शास्त्रीय संगीताला नवा अध्याय जोडणारे कलावंत ! हा सच्चा गायक/वादक कलाकार रागांचा व तालांचा सुरेख वापर मराठी गझलेसाठी करुन हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत कलेला एक नवा साज/वसन बहाल करतोय,ही फार मोठी गोष्ट आहे.
"तुझ्यासाठीच मी माझे तराणे छेडले होते"
ही रचना गझल म्हणून व कंपोझिशन म्हणून उचांकच आहेअसे मला वाटते.यातील तरल भाव,हळवअधिरे समर्पण,विलगतेची खंत,तक्रारीचा हळुवार सूर,सलत जाणारी वंचना आपल्या मनात खोलवर रुजत जाते...
"जगाच्या सर्व शपथा मी जरी त्या मोडल्या होत्या,
तुला जे जे दिले ते ते वचन मी पाळले होते...."
यातील उरात ठसलेल दुखरा सल सुरावटीद्वारे दाखविण्यात सुधाकरजी यशस्वी ठरलेत ! या गझलच्या प्रत्येक शेरातील भाव परस्परांना जराही धक्का लागू न देता एखाद्या माहीर शल्यविशारदाच्या नजाकतीने स्वारांद्वारे हाताळत भावाभिव्यक्ती केली...या अलबम मधील बहुतेक रचना कल्याण थाटावर आधारित आहेत.पण ऐकताना मात्र हे जाणवत नाही.आणि इथेच संगीतकाराचे सारे कौशल्य प्रकर्षाने दिसून येते.
"मनाच्या खोल डोहाच्या तळाशी ठेवले जपुनी,
निखारे धुंद श्वासांचे तुझ्या जे पेटले होते..."
यातील सुरावटीमुळे 'मनाच्या'शब्दाचे फुलपाखरू बनते व 'खोल डोह' अक्षरश: डोह बनून अंगावर काटा फुलवणारा 'अँटिक पीस' बनून जातो.
याच अलबम मधील
"आई असते श्रावण अविरत रिमझिमणारा"
हे फार वेगळ्या सुरांसह पूजेचं ताट घेऊन येणारं,आईची महती सांगणारं सुरेख व सुरेल गीत आहे...यातील शांत सागरासारखे रुपेरी सूर संपूर्ण दिवस गोड करून जातात.
सुधाकरजींनी स्वरबद्ध केलेला "काटयांची मखमल" हा सुरेशजी वाडकर व वैशाली माडेच्या आवाजातील असाच एक आणखी 'जानलेवा' अलबम...
सुरेशजींच्या मुरलेल्या गळ्यातून संगीतकार म्हणून सुधाकरजींनी जे काही गाऊन घेतलेय ते ही अफाटच!
(सुरेशजींनी अलबमच्या प्रकाशन प्रसंगी हे कबूल केल्याचे मी वाचले.तसेच कवी व संगीतकार आदरणीय यशवंतजी देव यांनी सुद्धा "शब्द स्वरांची मखमल" असे या अलबम संबंधी उद्गार काढले.) यातील प्रत्येक गझल ऐकतांना हे फार प्रकर्षाने जाणवते ......
मराठीतून इतक्या देखण्या सुरावतीच्या गझला इतके दिवस का नाही दिसल्या ? हा प्रश्न पडतो.... वैशाली माडेच्या आवाजातील ही गझल हा प्रश्न अधिक तीव्र करते....
"हसू ऊमटले दु:खं भोगता,गंमत आहे,
गझल मिळाली तुला शोधता,गंम्मत आहे"
आणि या गझलेत उत्तर ओघानेच मिळून जाते! ......यातील व्हायोलिनच्या सुरावटीने मन शांत शांत होऊन जाते.या गझलमधील एकूण एक शेर शब्द-सूर - लय- तालाची लयलूट करणारा आहे.गिटार , सतार , व्हायलीन
याची हळूवार मस्ती खऱ्या अर्थाने 'गंमत' आणून आर्ततेच्या टोकाला नेणारी आहेत......
..... या दोन्ही अल्बमसाठी जीवतोडपणे मेहनत घेणारी सारी कलाकार मंडळी व कुटुंबीय यांना वंदन...(विशेषतः दोन्ही अलबममधील सारंगी व बासरी कायम लक्षात राहणारी आहे.)सुधाकरजींचा कायम असाच मूड व लोभ रसिकांवर राहून नवनव्या बंदिशी ऐकायला मिळो हीच सदिच्छा !

-सीमा गादे (गादेवार )
मुम्बई.






संगीत आणि साहित्य :