गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, October 28, 2020

चकव्यातून फिरतो मौनी...सन्मामग्रंथ.

प्रत्येक रसिक चाहत्यापर्यंत "चकव्यातून फिरतो मौनी" हा डॉ. श्रीकृष्ण राऊत संपादित सन्मानग्रंथ पोहोचलाच असेल असे नाही.काही रसिकांनी मागणी केली पण आवृत्ती संपत आल्यामुळे ते पण शक्य नव्हते.म्हणून हे पेज तयार केले आहे.यात सन्मानग्रंथातील सर्व लेख एक एक करून रसिकांना वाचावयास मिळतील.तरी या पेजला अवश्य भेट देऊन लेखांचा आस्वाद घेत जावा,ही विनंती.

लिंक...
https://www.facebook.com/चकव्यातून-फिरतो-मौनी-101099181746471/



 

Monday, October 26, 2020

उर्दू गझलगायन ऐकताना...

https://gazalakar20.blogspot.com/2020/09/blog-post_28.html?m=1

          हिंदुस्थानी संगीतातील सगळ्यात लोकप्रिय सुगम संगीत प्रकार म्हणून गझलची गणना करायला हवी.हा एकमेव असा प्रकार आहे की,यात काव्य व संगीत याचा समसमान आनंद घेता येतो.तसे ठुमरी,दादरा, चैती, कजरी वगैरे प्रकारात होत नाही.भारतात शास्त्रीय संगीत पद्धतीमध्ये शब्दांना तसे फारसे  महत्व दिल्या जात नाही.स्वरांना आधार देण्यापुरतेच त्याचे महत्व असते.अर्थात शास्त्रीय संगीताचे गायक हे मान्य करणार नाही,पण हे कटू सत्य आहे.मी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतानाच्या चिजा आठवल्या की अजूनही हसायला येतं. उदा:- "तेंडेरे कारण मेंडेरे यार"....किंवा कॉलेजमध्ये शिकविलेल्या देस रागातील तरण्याचा अंतरा "नादिर दानी तूंदिर दानी दानी त दारे दानी"...ही ओळ गाताना अनेक विद्यार्थी (कारण तो सामूहिक वर्ग असायचा) "नादिर दानी तुंदिर दानी च्या ऐवजी "उंदिर दानी" असे गायचे...अशा अनेक चिजा आम्ही शिकलो.पण अर्थ कळला नाही.... कळले ते फक्त रागांचे स्वर-रूप.

            साहित्यातील एक उत्तम प्रकार म्हणून गझलचा छान उपयोग झाला.पण संगीत प्रकार म्हणून जसा व्हावा तसा विचार शास्त्रीय संगीतामध्ये झाला नाही.ज्या लोकसंगीतामधून शास्त्रीय संगीताची उत्पत्ती झाली त्या लोकगीतांनाच शास्त्रकारांनी दूर ठेवून दुय्यम स्थान दिले,ते गझलला कसे काय मोठे स्थान देतील?आपल्या देशात संगीताचे फार मोठे भांडार प्रादेशिक संगीतामध्ये उपलब्ध होते/आहे.यातूनच विविध गान प्रकार तयार झालेत.पण शास्त्रीय संगीताचे पक्के शास्त्र बनवताना  या सर्व प्रकारांना सुगम मानून शास्त्रीय संगीताच्या परिघाबाहेर ठेवल्या गेले.त्यामुळे संगीताची एक प्रकारे हानीच झाली.

            खरे तर गझल गायकाला चार अवधाने सांभाळावी लागतात.अभ्यास करावा लागतो.

 १.त्याला शास्त्रीय संगीताचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते.

२.तो उत्कृष्ट गायक असायला हवा.

३.त्याला साहित्याची पण चांगली जाण असायला हवी.(म्हणजे अभ्यास आलाच.)

अत्यंत महत्वाचे 

४.म्हणजे तो उत्कृष्ट संगीतकारही असायला हवा.

असे असूनही गझल गायन प्रकाराला 'सुगम' म्हणणे हास्यास्पद आहे.

पं. रामकृष्णबुवा वझे सारखे थोर शास्त्रीय गायक गझल गायकीबद्दल काय म्हणतात ते बघा...

      "गझल गायकीला आपलं असं स्वतःचं एक आगळं वेगळं अती मोहक स्थान आहे.शब्दोच्चार स्पष्ट असते आणि ते विविध अंगांनी नटविण्याची कुवत गायकात असली तर गझल गायनातून ख्याल गायनाइतकी रसोत्पत्ती होऊ शकते आणि ती सुलभ रित्या श्रोत्यांपर्यंत पोहचू शकते".

        तसेच सुप्रसिद्ध तबला वादक तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर म्हणतात,"गझल गायनामध्ये काव्याच्या बरोबरीने सांगीतिक रचनाही तितकीच दर्जेदार असली तर ती रचना अतिशय सहजतेने श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचते.भिडते..."असो....

          उर्दू गझल गायकीचा शोध घेताना आपल्याला ध्वनीमुद्रणाचा शोध लागल्यानंतर निघालेल्या  ध्वनीमुद्रिकांचा अभ्यास करावा लागेल.या इतिहासाचा धांडोळा घेताना भारतीय शास्त्रीय संगीतात  उर्दू गझल गायकीचा विकास ठुमरी सोबत झाल्याचे दिसून येते.सुरवातीच्या  गायक/गायिकांचे गझल गायन हे गायन न वाटता पठण वाटत होते असा उल्लेख अशोक दा रानडे यांच्या एका लेखात वाचल्याचे आठवते...यातुन गायकी अंगाने पुढे जाणाऱ्यांमध्ये गोहरजान,शमशाद, सुंदराबाई आणि त्यावेळच्या इतर गायिका दिसतात.पण खऱ्या अर्थाने गझल गायनाची सर्व यांत्रिक पद्धतीतून मुक्तता होऊन गझल गझलसारखी गाण्याची सुरवात बेगम अख्तर व बरकतअली खान साहेब यांना जाते.

       (माझ्या गुरुचे गुरू छोटा गंधर्व नेहमी यवतमाळला यायचे.ते आले की मी त्यांच्या सेवेत असायचो. तसेच विदर्भात जिथे कुठे त्यांचा कार्यक्रम असेल तेथे ते मला हार्मोनियमच्या साथीला घेवून जायचे.असाच एकदा ब्रह्मपुरीला त्यांचा कार्यक्रम होता.मी सोबत होतोच...कार्यक्रमाच्या अगोदर तानपुरे लावून स्वर लावणे सुरू असताना अचानक ते म्हणाले

"तू मराठी गझल गायनाचा नव्याने प्रयत्न करतो असे मला कळले."

मी होय म्हणालो.त्या दिवशी त्यांचा काय मूड लागला कोण जाणे.रियाजात बरकतअली खान साहेबांच्या काही गझला त्यांनी मला गाऊन दाखविल्या. त्यातील बारकावे समजावून सांगितले. इतकेच नव्हे तर मूर्च्छना पद्धतीचा या गायकीत कसा उपयोग करता येतो ते सप्रयोग समजावून सांगितले.तसेच बरकतअलीची गझल गायकी टप्पा अंगाची होती हे ही सांगितले.त्यांच्या या प्रसादाचा उपयोग मला गझल संगीबद्ध करताना आपोआप  होत गेला.)

      उर्दू गझल गायकी तीन प्रकारांनी आपल्या समोर येते...

१. ठुमरी प्रमाणे - बेगम अख्तर

२. गीतांप्रमाणे - सैगल,मल्लिका पुखराज

३. टप्पा अंगाने - बरकत अली खान

       गझल गायकी लोकप्रिय करण्यात या गायक/गायिकांच्या ध्वनिमुद्रीकांसोबतच चित्रपटांचाही मोठा वाटा आहे.

          गझल गायकी ही शब्द व संगीत श्रोत्यांपर्यंत पोहचविण्याची अतिशय सुंदर प्रक्रिया आहे.विसाव्या शतकात भावपूर्ण सादरीकरणासोबतच दरबारी,यमन,मल्हार वगैरे  भारदस्त म्हणविल्या जाणाऱ्या रागांमध्ये बंदिशी बनवायला लागले.तसेच काव्य निवडही उत्तम व्हायला लागली.आपापल्या कुवतीप्रमाणे अविर्भाव-तिरोभाव, मूर्च्छना पद्धतीचा वापर करायला लागले.सगळ्याच गझल गायक/गायिकांचा उल्लेख या लेखात करणे अशक्य आहे.कारण प्रत्येक गायक/गायिकेचा आपला एक ढंग आहे.त्यावर लिहायचे तर प्रत्येकावर एक लेख होऊ शकतो.या लेखात अत्यंत लोकप्रिय अशा काही गझल गायकांच्या गायकीची मला दिसलेली वैशिष्ठ्ये थोडक्यात उद्धृत करण्याचा प्रयत्न करतो.

         सर्वप्रथम भारत पाकिस्तानातील जुन्या-नव्या उर्दू गझल गायक/गायिकांची नावे माहिती करून घेऊ.

●मल्लिका पुखराज,उ.अमानत अली खान,अहमद रश्दी,नूरजहां,एम.बी.जॉन,मेहदी हसन,फरीदा खानम,अहमद परवेज,इकबाल बानो,मुन्नी बेगम,हमीद अली खान,हुसैन बख्श,परवेज मेहदी,गुलाम अली,नुसरत फतेह अली, मेहनाज बेगम,नैय्यरा नूर,आबिदा परवीन, असद अमानत अली खान,शफाकत अमानत अली खान,आसिफ मेहदी,सज्जाद अली....पाकिस्तान.


●बेगम अख्तर,तलत महमूद,सैगल,मधुरानी,पंकज उधास, अनुप जलोटा, चंदन दास,जगजित/चित्रा सिंग,भुपेंद्र/मिताली सिंग,राजेंद्र/नीना मेहता, पिनाज मसानी,तलत अजीज,हरिहरन,रुपकुमार राठोड,अहमद,महंमद हुसेन,जसविंदर सिंग...भारत.

(अनवधानाने काही नावे सुटली असल्यास क्षमस्व!)

उर्दू गझल गायकीतील सर्वच गायक/गायिकांचे त्यांच्या त्यांच्या परीने मोलाचे योगदान आहे.सगळ्यांवर लिहिणे या एका लेखात शक्य होणार नाही.त्यातल्या त्यात मला भावलेल्या काही जणांच्या गायकीवर थोडे फार भाष्य करण्याचा प्रयत्न करतो.

           माझ्या मते उर्दू गझल गायकीत रागदारीचा उत्कृष्ट उपयोग बेगम अख्तर यांनी केला आहे.त्यांची गझल गायकी ठुमरी,दादरा अंगाने जात होती.पण जव्हारदार मधाळ, मधूनच पत्ती लागणाऱ्या आवाजाने तेव्हाच्या रसिकांना वेड लावले होते.आजही त्यांनी गायिलेल्या गझला लोकप्रिय असून गायिल्या जातात.

             मेहदी हसन यांची गायकी म्हणजे शब्दांना न्याय देत कसे गावे याची पाठशाळाच.... यावर लेखाच्या शेवटी अजून लिहिले आहे.

            फरीदा खानम...शांत,संयत पण ठसठशीत गायकी असलेली गायिका.त्यांच्या "दिल जलाने की बात करते हो","ना रवा ... ","गुलों की बात करो","वो मुझ से हुए" वगैरे गझला ऐकल्यानंतर गायकीची प्रचिती येते.

               गुलाम अली म्हणजे अनवट बंदीशीचा बादशहा.गुलाम अली इतका सरगमचा वापर दुसऱ्या कुणीही केला नाही.शब्दानुरूप वेगवेगळ्या सुरावटींचा वापर आणि कार्यक्रमाचे वेळीची  देहबोली रसिकांकडून दाद घेणारी..."कहाँ आके रुकने थे रास्ते" या गझलमधील "जहां मोड था" येथील 'मोड',"दिल में इक लहर सी उठी हैं अभी" मधील 'हमींग' व 'लहर' या शदावरील वेगवेगळ्या सुरावटी त्यांच्या गझल गायकीचे वेगळेपण सिद्ध करते.त्यांच्या "चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है" या गझलने जगभरातील रसिकांना वेड लावलेले सगळ्यांनीच पाहिले.

              जगजित सिंग म्हणजे उर्दू गझल गायकीला पडलेले सुरेल स्वप्न आहे.मेहदी हसन प्रमाणेच खर्जयुक्त जव्हारदार  मधाळ आवाज,वाद्यवृंदाचा योग्य वापर,गझलांची निवड यामुळे भारतातीलच नव्हे तर जगभरातील रसिकांनी जगजित-चित्रा जोडीला डोक्यावर घेतले.जगजित सिंग हे उत्कृष्ट 'कंपोजर' असल्यामुळे इतर गायक/गायिकांच्या जोडयांपेक्षा ही जोडी जास्ती लोकप्रिय ठरली.गायक जर उत्कृष्ट संगीतकार असेल तर गाणे नक्कीच उठावदार होते,हे अनेक संगीतकार गायकांच्या गायनावरून लक्षात येते.ह्या साऱ्या वैशिष्ठयांमुळे आपल्या देशात जगजित सिंग इतकी लोकप्रियता  बेगम अख्तर नंतर कुणालाच मिळाली नाही

  ●उर्दू गझल गायकीचा बादशहा मेहदी हसन●

मेहदी हसन खां साहेबांचा जन्म १८ जुलै १९२७ ला भारतात लुना या राजस्थातील एका गावात झाला.वडील उस्ताद अझीम खान व काका उस्ताद इस्माईल खान परंपरागत धृपद गायक होते.त्यामुळे संगीत त्यांच्या रक्तातच वंशपरंपरेने आले होते.वयाच्या आठव्या वर्षी मोठ्या बंधुसोबत त्यांनी धृपद व ख्याल गायन सादर केले.त्यांचा पिटीव्ही वरील पहिला कार्यक्रम १९५२ मध्ये झाला."नजर मिलते ही दिल की बात का चर्चा ना हो जाए" हे त्यांचे चित्रपटातील पहिले गाणे होते.चित्रपट होता 'शिकार',कवी यजदानी जालंधरी, संगीतकार असगर अली व एम हुसेन.

तसेच चित्रपटातील पहिली गझल होती "गुलों में रंग भरे बादे नौबहार चले" शायर फ़ैज अहमद फ़ैज,संगीत राशीद यांचे.

लता मंगेशकरांसोबत त्यांची दोन गाणी आहेत.एक मदन मोहन यांच्या संगीत दिगदर्शनाखाली गायिलेले 'नैनो में बदरा छाए' मधील एक अंतरा आणि मेहदी हसन यांनी संगीत दिलेल्या 'सरहदें' या अल्बम मधील 'तेरा मिलना बहुत अच्छा लगता है'

दोन्ही गाण्यांची लिंक...

१.

https://youtu.be/ad6Scios6zc

नैनो में बदरा...

२.

https://youtu.be/Do9Q7TwHoCA

तेरा मिलना बहुत अच्छा...


           जगभर उर्दू गझल गायन लोकप्रिय करणारा हा कलावंत आयुष्याच्या शेवटापर्यंत गात राहिला.जवळ जवळ साठ वर्षे आवाज सांभाळून त्याच दमाने गात राहणे तोंडाचा खेळ नाही.

खान साहेबांचा शिष्यवर्ग पण छोटा नाही.त्यात प्रामुख्याने परवेज मेहदी,तलत अजीज,राजकुमार रिजवी,गुलाम अब्बास,सलामत अली,अफजल,मुन्नी सुभानी, रेहान अहमद खान,सविता आहुजा,शमशाद हुसेन चांद, शहनवाज बेगम (बांगला देश),यास्मिन मुश्तरी (बांगला देश) आणि हरिहरन ही नावे येतात.

           त्यांचे गझल गायन म्हणजे शब्द-सुरांची अप्रतिम उधळण असायची."दिल की बात लबों पर लाकर, अब तक हम दुख सहते थे" हबीब जालीब यांची ही गझल काफी थाटावर आधारित आहे.पण त्यातीलच "बीत गया सावन का महिना मौसम ने नजरे बदली" हा शेर गाताना मध्यमाला षड्ज करून पहाडी रागाच्या स्वरांनी 'सावन'चा इतका मस्त फिल दिला की,कितीही ऐकले तरी समाधान होत नाही.....क्या बात हैं!


मुजफ्फर वारसीची "क्या भला मुझको परखने का नतीजा निकला" या गझलची बंदिश मालकौंस रागात आहे.पण पुढे शेरात दोन्ही गांधार,दोन्ही निषादाचा प्रयोग करुन  केलेला अविर्भाव-तिरोभाव अतिशय मनभावन आहे.मालकौंस राग कुठे सोहनी राग कुठे,पण हे स्वरांचे धनुष्य पेलून प्रत्यंचा चढवलीच...

         अहमद फराज यांची '"अब के हम बिछडे" ही गझल व बंदिशही तशीच...या सुरावटीचा मोह हृदयनाथ मंगेशकरांसोबतच मलाही पडला.व "मालवून टाक दीप चेतवून अंग अंग,राजसा किती दिसात लाभला निवांत संग" ही सुंदर रचना हृदयानाथांनी व "कुठलेच फूल आता मजला पसंत नाही,कळते मला अरे हा माझा वसंत नाही" ही गझल मी स्वरबद्ध केली.

रईस खां साहेबांनी भैरवी रागात स्वरबद्ध केलेलं चित्रपटातील गीत "मैं खयाल हूँ किसी और का,मुझे सोचता कोई और है" जेव्हा कार्यक्रमात गातात तेव्हा त्यातील "सुबहो न मिल सकी" या ओळींवर ललित रागाच्या स्वरांची पखरण करतात तेव्हा जाणकारांच्या अंगावर रोमांच उठतो.ती आर्तता काळजात सरळ घुसते.

      "कभी मेरी मूहाब्बत कम न होगी,लुटाने से दौलत कम न होगी" या पाकिस्तानी चित्रपटातील गीतावर बेतलेली खमाज रागातील "मुहब्बत करने वाले कम न होंगे,तेरी महफिल में लेकिन हम न होंगे" ही ठाय लयीतील गझल अफलातूनच आहे.यातील "जमाने भर के गम" या शेरात मिया मल्हारची झलक दाखवणारी सुरावट,"अगर तू इत्तेफाकन मिल भी जाए" या शेरात केलेली विविध रागांच्या स्वरांची उधळण अतिशय रंजक आहे.

      मेहदी हसन यांनी जितक्या विविध रागात गझल गायिल्या तितक्या इतर कुणी गायिल्याचे दिसत नाही.(थोडा अपवाद गुलाम अली).

●गुलों में रंग भरे... झिंझोटी.

●शोला था जल बुझा हूँ...

●एक बस तू ही नहीं...मियाँ मल्हार

●कोंपले फिर फूट आए...सारंग

●कुब कू फैल गई बात... दरबारी

●जब उस जुल्फ की बात चली...बसंत मुखारी

●बात करनी मुझे मुश्किल...पहाडी

●बहुत बुरा है मगर...ललित

●रंजिश ही सही... यमन

●अबके हम बिछडे....भुपेश्वरी

अजूनही बरीच उदाहरणे देता येतील पण विस्तार भयास्तव थांबतो...

पुढे खान साहेबांच्या गायकी विषयी त्यांच्याच तोंडूनच ऐका...


मुलाखतीची लिंक

https://youtu.be/KBscPu-iXt4


गझलकार...सीमोल्लंघन विशेषांकामधून साभार...

Saturday, October 17, 2020

प्रेम पिया हम पाये...राजे मधुकरराव देशमुख (माहूर)

.        

 ‘हरचंद सुरीली नग़मोंसे
 जज़बात जगाये जाते है,
 उस वक़्त की तलखी याद करो,
 जब साज़ मिलाये जाते है।’
 
     निःसंशय सुरेल गीतांनी आपल्या भावना उल्हासित, प्रफुल्लित होतात़. परंतु त्या एकमेवाद्वितीय क्षणाची उत्कटता लक्षात घ्या की जेव्हा वाद्ये स्वरात मिळविली जातात़. निःसंशय तो क्षण शब्दातीत, वर्णनातीत आहे़. तितकाच शब्दातीत, वर्णनातीत तोहि क्षण आहे की जेव्हा गायक तन्मय होऊन गात असतो. आणि स्वरवेडा श्रोता आपले प्राण कानात आणून ऐकत असताना आत्मविस्मृतीत जातो़. एक अतूट अजोड नाते जोडण्याची शक्ती, किमया, करिष्मा स्वरात आणि फक्त स्वरांतच आहे़. माझे आणि सुधाकर कदम यांचे नाते गेल्या साडेतीन दशकांत जुळल्या गेले. त्याचे गमक वरील शेरमध्ये आहे़.
       कुणाशी नाते जुळते ते उगीचच नाही़. खटपट, प्रयत्न करुन जुळविण्याची ही बाब नाही़. आपल्या काही ऋणानुबंधाच्या गाठी पडलेल्या असतात़. त्या केव्हा पडलेल्या असतात याची आपल्याला कल्पनाही नसते़. परंतु केव्हातरी अनाहुतपणे ती आपल्याला सापडते. आणि त्या गाठीचे रहस्य उलगडत जाते़. त्यावेळी जो आनंद होतो त्या सुखद संवेदनांचं वर्णन करता येत नाही़. माझा आणि सुधाकर कदम यांचा संबंध आला त्याचं रहस्य या ऋणानुबंधाच्या गाठीत आहे़. मला एकवेळा गुरुवर्य पुरुषोत्तमराव कासलीकर म्हणाले होते, “बाबुरावजी, स्वरराजांच्या स्वराला मधाची उपमा दिल्याने मधाची महती वाढते, स्वरराजांची नाही!" आज एका निमित्ताने सुधाकर कदम विषयी लिहीत आहे, तेव्हा मला नेमकं वरील विधान आठवलं. वाटते की माझ्या लिहीण्याने सुधाकरची शान वाढत नाही; वाढलीच तर माझी वाढेल़. मी एक स्वरवेडा माणूस आहे़; तो कानी पडला की माझं मन तिकडे धाव घेते़. त्यावेळी माझी जात कोणती पुसू नका. आठवते़ सुधाकर स्वराचा ठेवा आहे़. स्वराचा वाहता निर्झर आहे़. त्या ठेव्याजवळ बेभान होऊन धाव घेणे हा मधुकराचा स्वभावधर्मच आहे़. नाही तरी ‘घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद’ आपल्याला हाच संकेत देतो की नाही?
       या साडेतीन दशकात अतूट, अजोड सहवासातून मी सुधाकरचे ख्याल गायन ऐकलं आहे़. नाट्यपदे ऐकली आहेत़. त्यांची गझल गायकी ऐकली आहे़. पदेही ऐकली आहे़. हे सर्व ऐकून माझे मन प्रसन्न झाले आहे़. याचे कारण हे की या वेगवेगळ्या गायकीमधून जात असतांना त्यांनी आपला स्वर सोडला नाही़. तालाचे तर भान ठेवलेच पण गायकी ही श्रोत्यांना प्रसन्न करणारी असावी याचेही अवधान ठेवले. यातच त्यांच्या गायकीचे गम्य आहे़. सुधाकर जेव्हा गझल गायकी कडे वळले; त्यावेळी त्यांच्यावर क्वचित टीकाही झाली असेल, पण ते बरोबर नाही़. साचेबंद ख्याल गायकी आणि राग दारीच्या पूर्वापार चालत असलेल्या मजबूत बंदिशी मधून ते घरसले असे म्हणता येईल का? महाराष्ट्रीय श्रोता नाट्यपदवेडा आहे़. ख्याल ऐकल्यानंतर आपल्या आवडत्या नाट्यगीताची तो फरमाईश करतोच़. परंतु त्या नाट्यपदाला कोणता रागाधार आहे. वगैरे चौकशा करुन त्या पदाचा उपमर्द करतो का? नाही ना?

दिले नादॉं तुझे हुवा क्या है ।
आखिर इस दर्द की दवा क्या है ॥

      ही मिर्झा गालिबची गझल कोणत्या एका रागाच्या ख्याल गायकी अंगाने गायची. हा जगावेगळा अट्‌टाहास वरील गझलचा आशय, अर्थ, भावना याचा नीट विचार करुन ती स्वरांनी रंजक करणे; यात गझल गायकाचे कौशल्य आहे़. आपली गझल गायकी पेश करत असता माझ्या कल्पनेप्रमाणे सुधाकर कदम यांनी वरील प्रमाणे व याहीपेक्षा आधक अवधान बाळगले आहे़. पुढे जाऊन मी असंही म्हणेन की अनेक तपांच्या अतूट रियाजातून, विलंबित ख्याल गायक, ज्याला अक्षरमंत्राचा साक्षात्कार झाला आहे, तोच गझल समर्थपणे पेश करु शकेल़. या विधानाला कोणी आव्हान देत असेल तर मी प्रात्यक्षिक द्यायला तयार आहे़.
       स्वरराज छोटा गंधर्व अनेक वेळा यवतमाळला येवून गेले़. त्यांचा मुक्काम त्यांचे शिष्योत्तम श्री पुरुषोत्तम कासलीकरांकडे असे़. अशावेळी मला आवर्जून बोलाविल्या जायचे़ .स्वरराज आले की कासलिकरांच्या घराला सम्मेलनाचे रुप यायचे़. या वर्दळीत सुधाकर कदम सर्वात पुढे पेश असत़. छोटा गंधर्व त्यांचेशी विशेष सलगीने, आपुलकीने वागत असतांना मी त्यांना पाहिले आहे़. अनेकदा हार्मोनियमच्या साथीला सुधाकर कदम यांना बरोबर घेऊन जायचे़.माहुरचे आद्य दैवत श्री रेणुकादेवी़. रेणुकेचे नवरात्र हे माहुरच्या खास आकर्षणाचा काऴ. त्यातल्या त्यात ललिता पंचमीचे महत्व तर अनन्य साधारण़. आपली संगीत सेवा रेणुकेच्या चरणी अर्पण करण्यास दूरजवळचे अनेक कलाकार येत़. त्यात सुधाकर कदम हे प्रामुख्याने असत़. त्या दिवशीच्या संचलनाची जिम्मेदारी आम्ही त्यांचेवर टाकत असू़. ही जबाबदारी ते रात्री नऊपासून सकाळी सुर्योदयापर्यंत निरलसपणे पार पाडत़. संगीत महफिलीचे संचलन करणे ही स्वयं एक कलाच आहे़. त्याला संगीताचा आत्मा ओळखणारा जाणकारच हवा़. येर्‍या गबाळ्याचे ते काम नाही़. संगीताप्रमाणे गोड वाणी, प्रसन्न मुद्रा, उत्तम जोपासलेले शरीर सौष्ठव, मनमिळाऊ स्वभाव या सर्वामुळे ते त्या नऊ-दहा तासाच्या स्टेजवर मानापमानातल्या धैर्यधरासारखे वाटत़. यावेळचा त्यांचा पोषाखही अगदी प्रसंगाला अनुरुप असा चोखंदळ असे़. अशा या मनस्वी कलाकाराची मराठी गझल गायकी विदर्भाइतकीच पश्चिम महाराष्ट्र- मध्यप्रदेशात गाजली़. त्यांच्या मैफिलींचे वृत्त वर्तमान पत्रातून मी वाचत होतो तेव्हा मला मनःपूर्वक आनंद व्हायचा़.
       सुधाकर कदम आर्णीला़ स्थायिक झाले़. गांधर्व संगीत विद्यालय ही स्वतंत्र संस्था निर्माण करून संगीताचे दान त्यांनी दिले़. या संस्थेच्या विद्यमाने ते दरवर्षी संगीत सम्मेलन घेतात़. या वेळी ते जीव ओतून त्यात राबतात़. सम्मेलन असते एक ना दोन दिवसाचे़ पण त्यामागचे जे कष्ट एक महिना आधीपासून उपसावे लागतात; याचा प्रामाणिक आढावा घेतला तर सम्मेलन काय असते ते कळेल़. संगीत सम्मेलनासोबतच अभिनय कला मंडळ, शिवजयंती उत्सव समिती, तालुका पत्रकार संघ, सरगम, अशा अनेक संस्थांची स्थापना करून सामाजिक, राजकीय, सांगीतिक, बौध्दिक या सर्व स्तरावर आपल्या जीवनाची वाटचाल दमदारपणे चालत असता त्यांनी थोड्याच काळात अमाप लोकप्रियता मिळवली़. हिंदू आणि मुस्लिम समाजात ते सारखेच लोकप्रिय आहेत़. हरदिल अजीज़ आहेत़. भावी आयुष्यात त्यांना आणखी लोकप्रियता मिळो, सगळ्यांचे हरदिल अजीज़ होवो ही या रौप्य महोत्सव प्रसंगी कामना.

(गांधर्व संगीत विद्यालय,आर्णी. रौप्य महोत्सवी विशेषांक १९९९)

'मौनी' मधून....


 

Thursday, October 15, 2020

मनोगत-आशिष जाधव

                       
( ...मराठी गझलगायक म्हणून सुधाकर कदमांचं मोठेपण मांडण्याची हीच वेळ आहे. ही बाब खरीच आहे, सुधाकर कदम यांना पाहिजे तशी संधी आणि प्रसिद्धी त्यांच्या गायनकलेच्या किंवा सृजनशीलतेच्या काळात विदर्भात आणि तिथून मुंबई-पुण्याकडं मिळाली नाही. )

- [ ] मी साधारणत: आठ वर्षांचा असेल १९८१ मध्ये खामगावच्या घरी सुधाकर कदमांची मैफल झाली. ती मैफल आणि ते दोन दिवस मला आजही लक्षात आहेत. माझ्या वडिलांचे (बी.एल.जाधव) मित्र म्हणून सुधाकर कदम, त्यांच्याबरोबर वडिलांचे लहान भावासारखे असलेले कवी कलीम खान(ज्यांच्या आर्णीच्या घरातला माझा आणि आमच्या खेड्यातल्या घरातला त्यांचा जन्म), कवी श्रीकृष्ण राऊत, नारायण कुळकर्णी-कवठेकर आणि शेखर सरोदे(ॲड. असीम सरोदेचे काका) असे सगळे दोन दिवस  आमच्या घरी मुक्कामी होते. रात्री मैफल झाली. कदाचित ती माझी ऐकलेली पहिली मैफल आणि म्हणूनच आजही ती स्मरणात आहे. सुरेश भटांच्या मराठी गझला सुधाकर कदमांनी गायल्या होत्या. तबल्यावर शेखर सरोदे होते. कलीम खान, नारायण कवठेकर यांचं निवेदन होतं. संध्याकाळी सुरू झालेली मैफल मध्यरात्री उशिरापर्यंत चालली होती, हे मला दुसऱ्यादिवशी कळलं होतं. त्या मैफलीत एक उर्दू नज़्म सुधाकर कदमांनी दोनदा गायली होती. ते शब्द पाठ झाले होते, 'बात निकलेगी तो दूर तलक जायेगी'... नंतर कळलं ती प्रसिद्ध नज़्म जगजितसिंग यांची  होती. वडिलांकडे गजलांच्या एलपी रेकाॅर्डचा नंतर कॅसेटचा मोठा खजाना आहे. माझ्या लहानपणापासून मी गुलाम अली-मेहदी हसन-हुसेन बक्श ऐकत आलोय. त्यामुळं लहान वयातच गाणं ऐकण्याची सवय लागलेली होती. आणि म्हणूनच सुधाकर कदमांची ती मी आयुष्यात ऐकलेल्या पहिल्या मैफलीची आठवण खोलवर मनात रुजली असेल कदाचीत. 

- [ ] पुढे जेव्हा मला गझल कळायला लागली, तेव्हा त्या मैफलीची रेकाॅर्डेड कॅसेट मी कित्येकदा ऐकली. (आजही सुधाकर कदमांच्या त्या रेकॉर्डिंगच्या कॅसेटस् वडिलांकडे आहेत.) महान गझलकार सुरेश भट यांच्या सुरूवातीच्या काळातल्या जवळजवळ सर्वच गाजलेल्या गझला सुधाकर कदमांनी त्या मैफलीत स्वत:च्या चालीत गायल्या होत्या. नंतर जेव्हा मी मुंबईत आलो आणि काही गझलनवाजांच्या मराठी गझला ऐकल्या तेव्हा तर सुधाकर कदम यांच्या गझल गायकीचं, त्यांच्या सृजनशिलतेचं, त्यांच्या मखमली आवाजाचं मोठेपण प्रकर्षानं जाणवलं. कुठेही उगाचच स्वर लांबवणे किंवा स्वरच्छल नाही की कुठे उगीच काही वेगळी हरकत घेतल्याचा आव. शास्त्रीय संगितातल्या रागदारीत राहून शब्दांना न्याय्य न्याय देणारी गझलगायकी, हेच सुधाकर कदमांच्या गझलगायनाविषयीचं माझं ठाम मत आहे. मला गझल आणि गायकी समजून-उमजून ऐकण्याचा चांगला कान देवानं दिलाय, म्हणूनही मी म्हणत असेल. त्यामुळेच कलेच्या बाजारीकरणाच्या जगात सच्च्या रसिकांपर्यंत पोहोचण्यात सुधाकर कदम कमी पडले, हेही आवर्जून सांगावं लागेल. तो त्यांचा की परिस्थितीचा की विदर्भातल्या आडमार्गाला असलेल्या आर्णीसारख्या केवळ नावालाच तालुका असलेल्या गावाचा दोष आहे, याचा विचार मी जेव्हा मुंबईतल्या प्रसारमाध्यमामधला आघाडीचा पत्रकार म्हणून करतो, तेव्हा काही प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात, हे लक्षात येतं.  

गत ४० वर्षांपासून मनात दाटलेल्या आठवणींना लिहितं करावंसं वाटलं एवढंच....

-आशिष जाधव


 

Wednesday, October 14, 2020

गर्भश्रीमंत राग 'यमन'


.      यमन रागाच्या नावावर बरेच मतभेद आहेत.काही लोक याला फारसी भाषेतील ’इमन’ चेच यमन मध्ये झालेले रुपांतर मानतात.तसेच हा राग अमीर खुस्रो नावाच्या अल्लाऊद्दीन खिलजीच्या काळातील विद्वान संगीतकाराने प्रचलित केला अशीही मान्यता आहे.एवढे मात्र निश्चित की खुस्रोच्या काळात नव-नवीन राग प्रचारात आलेत.यात फारसी,इराणी सुरावटी भारतीय रागात मिसळल्या गेल्या होत्या.गोपाल नायक हा संगीताचा प्रकांड विद्वान खुस्रोचा समकालीन आहे.दक्षिणेतील पंडीत यमन हा राग ’यमुना कल्याण’चाच एक प्रकार मानतात.या नावाचा उल्लेख दक्षिणेकडील ग्रंथांमध्ये आहे.परंतू यमुना कल्याण आणि यमन यात नावाव्यतिरिक्त काहीच साम्य नाही.उत्तर भारतीय संगीत शास्त्र (भातखंडे कृत) या ग्रंथात हा राग कल्याण थाटातून उत्पन्न झाल्याचे लिहीले आहे.पण त्यातही तथ्य वाटत नाही,हे भातखंडेंचा आदर ठेऊन नमूद करतो..(माझे हे विधान अनेकांना आवडणार नाही.)कारण प्राचिन ग्रंथांमध्ये ’यमन’ नावाच्या रागाचा कुठेच उल्लेख केलेला आढळत नाही.तसेच कोण्या एका शब्दावरून राग आला असेल असेही वाटत नाही.कारण राग निर्मिती ही एक प्रक्रीया आहे.ती एकदम होणारी नाही...

काही लोक याला यमन कल्याण असेही म्हणतात.पण त्यालाही तसा फारसा अर्थ नाही.यमन रागात विवादी स्वराप्रमाणे कधीतरी कोमल मध्यम लावला की तो यमन कल्याण होतो.याला सुद्धा ग्रंथात आधार नाही.अशा प्रकारे एखादा स्वर बदलून किंवा जास्तीचा लावून किंवा विवादी म्हणून एखाद्या स्वराचा प्रयोग करून तो प्रचलित करणे अशी अनेक उदाहरणे आपणास दिसून येतील. ते काहीही असले तरी यमन हा राग अत्यंत लोकप्रिय आहे यात वाद नाही.मी तर त्याला ’गर्भश्रीमंत’ राग म्हणतो.यावर लिहायचे म्ह्टले तर सूर्य,समुद्र,अवकाश,धुमकेतू यावर लिहिण्यासारखे आहे.इतका मोठा आवाका असलेला दुसरा राग माझ्या तरी पाहण्यात आला नाही.तसेच माझ्या मते ’कल्याण’ ऐवजी ’यमन’ हाच थाट असायला हवा होता.यालाच शुद्ध थाट म्हणून मान्यता मिळायला हवी होती.कारण यात सातही स्वर शुद्ध म्हणजे तीव्र आहेत.शुद्ध थाट म्हणविल्या जाणार्‍या बिलावल थाटातील कोमल मध्यम व कोमल निषादाचा वापर विद्यार्थ्यांना विचारात पाडतो.(शास्त्र म्हणून तेच शिकविल्या जात असल्यामुळे यावर कोणी बोलत नाही ,ही गोष्ट वेगळी.तसेच बोलून फायदा काय ? परीक्षेत हेच लिहावे लागणार नाहीतर गूण कमी होतील !)पण यमनच्या बाबतीत असा संभ्रम रहात नाही.

शास्त्रीय माहितीः- गेल्या २०० ते २५० वर्षांपासून चालत आलेल्या उत्तर भारतीय संगीत शास्त्रानुसार यमन राग कल्याण थाटातून उत्पन्न झाला आहे.वादी स्वर गांधार असून संवादी स्वर निषाद आहे.जाती संपुर्ण असून गानसमय रात्रीचा पहिला प्रहर आहे. गानसमयावर या अगोदरही मी थोडक्यात लिहीले आहे या वेळी मात्र सविस्तर लिहीत आहे.खरे म्हणजे रागाचा गानसमय ठरविण्याची अशी कोणतीच साधने प्राचिन ग्रंथंमध्ये नमूद नाहीत.तरी पण रागाचा गानसमय ठरविल्या गेला आहे.कशाकरीता ? माहित नाही.जिथे प्राचिन ग्रंथातील रागांची नावे व आजच्या रागांच्या नावात साम्य नाही,स्वरात साम्य नाही तिथे गानसमय कसा आणि कोण ठरवणार ? काही तरी शास्त्रीय नियम लावायचे म्हणून लावणे या पलिकडे याला अर्थ नाही.माणसाने केव्हा गुणगुणावे,काय गुणगुणावे हे काय ठरवून होणार काय ? सध्याचा थाट पद्धतीचा विचार केला तर मधुवंतीसारखे राग तर थाट पद्धतीमध्ये बसतच नाही.मग दहा पेक्षा अकरा थाट करून त्या ११व्या थाटाला मधुवंती नाव दिले तर काय बिघडेल ? पण नाही, दहा थाटातच ठोक-पिट करून सर्व राग बसविणे...हे अनैसर्गिक वाटत नाही का ? हिंडोल,गौडसारंग,तोडी,मुलतानी या रागांमध्ये तीव्र मध्यम असून त्यांना दिवसा गायिल्या जाणारे राग म्हणून मान्यता दिल्या गेली आहे.खरे तर नियमानुसार तीव्र मध्यम असलेले राग रात्रीच गायिल्या जायला हवे. एक असाही नियम आहे की,’ग’ ’नि’ कोमल असलेल्या रागात तीव्र मध्यम लागत नाही.मग कोमल ग नि सोबत तीव्र म असलेल्या सुरावटीचा राग मधुकंस कसा ? खरे तर राग गाण्याच्या नियमाला फार पुर्वीपासूनच फाटा दिला आहे हे ’दर्पण’ या ग्रंथातील

 

"यथोत्काल एवैते गेया पूर्व्विधानतः /

राजाज्ञया सदागेया नतु कालं विचारयेत् //

 

आणि ’तरंगिणी मधील

 

"दशदंडात्परं रात्रौ सर्वेषां गानमीरीतम् /

रंगभुमौ नृपाज्ञायां कालदोषो न विद्यते //

 

तसेच श्री बॅनर्जी यांच्या ’गीतसुत्रसार’ (Grammer of vocal music) ग्रंथामध्ये पान ५८ वर म्हणतात...

"हमारे यहाँ राग-रागिनियों को दिन तथा रात्री के नियमित समयों पर गाने की जो प्रथा चली आ रही है,वह केवल काल्पनिक है"

या वरूनही गानसमय प्रथेतील पोकळपण स्पष्टपणे दिसून येतो.खरे म्हणजे स्वर समुदायात अशी काही विशेषता नाही की,ज्यामुळे त्यांना काही खास वेळी न गायिल्याने योग्य तो परिणाम साधल्या जात नाही.संगीताचा उद्देश स्वरांद्वारे भाव व्यक्त करून श्रोत्यांचे मन प्रसन्न करणे एवढाच आहे.म्हणजेच या करीता कोणत्याही विशिष्ठ अशा खास वेळेची गरज नाही.जे भाव सकाळी व्यक्त होऊ शकतात किंवा करू शकतात ते सायंकाळी किंवा रात्री का करू शकत नाही ? नक्कीच करू शकते,शकायलाच पाहीजे.’पारिजात’ या ग्रंथात भूपाली राग सकाळी गायिल्या जातो असा उल्लेख आहे.परंतू सध्या तो रात्रीकालिन मानल्या जातो.(घनःशाम सुंदरा...ही भूपाली रागातील भूपाळी सकाळी गोड वाटत नाही का ? सकाळच्या अहिर भै्रव रागातील ’पु्छो ना कैसे मैने रैन बिताई..’हे चित्रपटातील गाणे रात्री मन मोहतेच ना ?) दक्षिण भारतात यमन राग सकाळी व भैरवी रात्री गायिल्या जाते.तर काहींच्या मते ललित,रामकली,तोडी वगैरे राग सायंकाळी गायिल्याने गानसिद्धी उत्तम प्रकारे होते.म्हणजेच गानसमय हा प्रकार म्हणजे लोकांवर लादलेले थोतांड आहे हे सिद्ध होते.स्वर,स्वर आहे;राग,राग आहे,केव्हाही त्याचा परिणाम सारखाच अपेक्षित आहे.

ते काहीही असले तरी यमन राग हा सर्वांचा आवडता आहे हे मात्र खरे. याचे वैशिष्ठ्य म्हणजे कल्पक गायक,वादक,संगीतकारांवर हा लवकर प्रसन्न होऊन वरही देऊन टाकतो.पण जर का यात भरकटला तर ’पचका’ होणे ठरलेले आहे.यमन गाता आला की सर्व राग गाता येतात असे जाणकार सांगतात.हा राग गायिला नाही असा गायक,वादक सापडणे अशक्यच ! इतका हा मधूर आहे.भारताच्या सर्व भाषा-बोलींमधील जेवढी गाणी या रागात बनली असतील तेवढी गाणी दुसर्‍या रागात तयार झालेली नसावी.सुगम संगीतकारांसाठी तर हा राग वरदानच ठरला आहे.कोणतेही भाव समर्थपणे व्यक्त करण्याची क्षमता यमन मध्ये आहे.हे एक संगीतकार म्हणून मी ठामपणे सांगू शकतो.


(येथे मी तयार केलेल्या यमन रागाच्या विविध मूडच्या रचनांवर कोल्हापूरचे संगीत समीक्षक ऍडव्होकेट राम जोशी यांच्या लेखातील काही भाग देण्याचा मोह मला आवरत नाही.ते म्हणातात... "यमन हा रागच असा की कोणाही संगीतकारानं त्याच्या प्रेमात पडावं. कदम तरी त्याला कसे अपवाद असणार? त्यांनी यमन रागात उदंड रचना केल्या असल्या तरी त्या छापातले गणपती नाहीत, ती प्रत्येक मुर्ती स्वतंत्र आहे़. प्रत्येक चालीला स्वतःचा वेगळा चेहरा आहे, रंग आहे, रुप आहे, व्यक्तिमत्व आहे़. कार्यक्रमाची सुरुवात ते स्वरचित काव्याने करतात़.

 

‘सरगम तुझ्याचसाठी गीते तुझ्याचसाठी

गातो गझल मराठी प्रिये तुझ्याच साठी’

 

दादर्‍यातल्या ह्या बंदिशीची यमन मधील ही रचना. अगदी साधी. सुगमसंगीतामध्ये अर्थातच शास्त्रीय संगीतातील व्याकरणाला; नियमांना स्थान नाही, इथं अपेक्षित असतं ते श्रवण सौंदर्य, गोडवा, मोहकता. साहजिकच इथं शुध्द यमन शोधण्याची धडपड करू नये कारण तो यमन कल्याणाशी क्षणांत दोस्ती करतो़ आणि दोन्ही माध्यमांच्या अशा हळुवार लगावांची प्रचिती आली की उत्स्फूर्तपणे दाद देण्याशिवाय श्रोत्याला इलाजच रहात नाही़ ही अनुभूती मी त्यांच्या प्रत्येक यमनांत घेतली व घेतो़.

 

‘मी असा ह्या बासरीचा सूर होतो,

नेहमी ओठांपुनी मी दूर होतो’

 

ह्या गझलची चालही अशीच आहे़. धृवपदातली -मतल्यातली दुसरी ओळ (ज्याला क्रॉस लाईन म्हणतात) त्याची ठेवण व स्वरसमुहाची रचना अत्यंत मोहक आहे़. त्यातील ‘सूर होतो़’ इथं तार सप्तकातला षडज्‌ सूर ह्या शब्दासाठी खुबीनं वापरला तर आहेच पण ती ओळ म्हणताना ‘सूर’ हा शब्द आणि त्याचा तारषड्जाचा हळूवार पण भरीव लगाव व रुपक तालांचा एक पूर्ण जादा आवर्तन पूर्ण होईपर्यंत जो दीर्घकाळ मुक्काम ठेवतो तो अतीसुंदर लागतो़. संगीत रचनाकाराकडं नुसता सांगीतिक अलंकाराचा साठा असून चालत नाही तर स्वरपोषाखाला साजेल असाच एखादाच चढविलेला अलंकार संगीत श्रवणसौंदर्य खुलवितो़. संगीतकार हाच खर्‍या अर्थानं स्वतःच्या रचना समर्थ पणे व अपेक्षित परिणामासह गाऊ शकतो. हा अनुभव मास्तर कृष्णरावांपासून सुधीर, श्रीधर फडके, वसंत पवार, राम कदम, यशवंत देव यांच्या पर्यंत येतो. सुधाकर कदम हे स्वतः गायकही असल्याने तेही ह्या बाबीला अपवाद नाहीत़. ‘सूऱ होतो’ इथं शब्दकला आणि स्वर माधुर्य असा सुरेख समन्वय झालाय़.

‘सांज घनाच्या मिटल्या ओळी’

हे एक अतिशय हळूवार भावना उलगडून दाखविणारं सरस काव्य़. कदम यांनी बंदीशही यमनमध्येच बांधलीय़. त्यातल्या क्रॉसलाईन अखेरीस़ ‘क्षितीजावरती़’ इथं त्यांनी नि व कोमल रिषभाचा अत्यंत कौशल्यपूर्ण वापर करून यमनचा करॅक्टरच बदललाय असे नव्हे तर त्या रिषभाच्या योजनेमुळे ‘क्षितीज’ ह्या शब्दाचा अर्थ प्रतीत करण्यासाठी कोमल रिषभाला पर्यायच नाही हे त्वरीत पटते, पुरियाचं होणारं दर्शन तसेच कडव्याची चाल हे सगळं सुरेख जुळून आलंय़. प्रसिध्द कवी अनिल कांबळे यांच्या

 

‘जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू /

ऐनवेळी अशी काय करतेस’

 

तू ह्या गीताची तर्जही यमन मध्येच बांधली आहे़. यमन मधली अत्यंत चटपटीत अशी ही स्वररचना, खेमट्याच्या अंगानं लागणारा दादर्‍याचा ठेका, लय थोडीशी उडती चपळ, त्यामुळे विशिष्ट अर्थवाही अशा ह्या गीताला उत्तम न्याय मिळाला आहे़. सौंदर्य स्थळाचा निर्देश करायचा झाल्यास ‘ऐनवेळी अशी काय’ ह्या ओळीतली अधीरता दर्शविण्यासाठी अत्यंत चपखल अशी स्वरसमुहरचना म्हणावयास हरकत नाही. ‘सामग, सामगधप’ वगैरे अर्थात हा आनंद अनुभवायचा आहे़. ‘तुझ्या नभाला गडे किनारे’ ही सुध्दा यमनमधलीच श्रवणीय रचना आहे. यमन ह्या एकाच रागातल्या चारी रचना त्यांनी मला एकापाठोपाठ ऐकविल्या. पण खासियत अशी की त्यांत तोचतोचपणा नाही़. स्वररचनेची पठडी ठरीव स्वरुपाची नाही. त्यात आहे पूर्णतः वेगळेपण, हे श्रेष्ठ संगीत रचनाकाराचं वैशिष्ट मानलं जातं. सुगम संगीतात आकर्षक मुखड्याला-धृवपदाला खास महत्व आहे़.कदम यांच्या स्वररचनेचे मुखडे अत्यंत आकर्षक असतात़. त्याहीपेक्षा अधिक कौशल्य व महत्व असतं ते मुखड्यानंतरच्या क्रॉसला. कारण संगीत रचनेच्या आकर्षकतेचे ते प्रमुख स्थान आहे़. मुखड्याच्या चालीला अनुरूप अशी किंबहुना त्याचं सौंदर्य वर्धिष्णू करणारी आरोही पूर्ण करुन अवरोही व षड्जावर विराम पावणारी स्वररचना, हे काम फार अवघड असते़. तसे नसेल तर पूर्ण चालच फसते़ अनेक संगीत रचनामध्ये हे दोष दिसतात़. संगीतकाराला इथं आपली प्रज्ञा ओतावी लागते़. सुधाकर कदमांच्या रचना ह्या कसोटीला पुरेपूर उतरणार्‍या आहेत म्हणूनच त्या भावतात़. कडव्यांच्या चालीतही मूळ चालीशी सुसंगती दिसते़. कळत नकळत अन्य रागाला स्पर्शून जाणं म्हणजे हळूच मधाचं बोट चाखण्यासारखं गोड मधुर असतं.अर्थातच शेवटच कडवं हे सर्वार्थानं हायलाईट असतं. तशीच त्याची स्वररचनाही कदम समर्थपणे करतात़. एकाच यमनाची ही विविध रुपे, विविध रंग, त्याचा वेगवेगळा ढंग. आणि त्याची अनोखी अदाकारी हे मोहजाल किंवा मायाजाल म्हणा, असं आमच्या भोवती टाकलं की आम्ही स्वतः जाणकार रसिक असूनही फसलो़. मग लक्षात आलं की ही यमनी फसवणूक होती पण ही फसवणूक गोड होती़. निर्भेळ होती.")

 

      यमन हा अभंगापासून तॊ लावणीपर्यंत सर्व प्रकारात रंगतो म्हणा किंवा रंगवितो म्हणा !मराठीमध्ये जवळ-जवळ सर्वच संगीतकारांनी यात स्वररचना केली आहे.त्याची यादी करतो म्हटले तर तो एक मोठा लेखच होईल.तरी पण काहींचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही.’धुंदी कळ्यांना...’, ’का रे दुरावा...’, ’पराधीन आहे जगती...’, ’तोच चंद्रमा...’, ’पिकल्या पानाचा देठ की ग हिरवा...’, ’कबीराचे शेले विणतो...’, ’सुखकर्ता दुखहर्ता...(आरती)’, ’जिथे सागरा धरणी मिळते...’, ’जीवनात ही घडी...’, ’शुक्र तारा...’, ’तिन्ही सांजा सखे मिळाल्या...’, सोबतच अनेक नाट्यगीतेही यात आहेत.त्यातील अभिषेकी बुवांनी मत्स्यगंधा नाटकाकरीता रचलेले स्वरशिल्प ’देवाघरचे ज्ञात कुणाला...’ हे मला अतिशय भावले.गायक आहेत रामदास कामत. हिंदी चित्रपटसृष्टीतही यमन ने धुमाकूळ घातला आहे.सैगलच्या ’मैं क्या जानू क्या जानू रे...’ पासून तर आता-आताच्या ’तुम दिल की धडकन हो....’पर्यंत...यातील उल्लेखनीय गाणी आहेत...’मन रे तू काहे न धीर धरे...’, ’जिया ले गयो...’, ’जा रे बदरा बैरी जा...’, ’वो हँसके मिले हमको...’, ’पान खाये सैयाँ...’, ’इस मोडपर आते है...’, ’चंदन सा बदन...’, ’आँसू भरी है ...’, ’जब दीप जले आना...’ अशी किती गाणी घ्यावीत...............? उर्दू ग़ज़ल मध्ये ’रंजिश ही सही....’ही ग़ज़ल म्हणजे मैलाचा दगड आहे.सोबतच ’वो मुझसे हुये...’, ’शाम-ए-फ़िराक...’ ह्या गझला आणि ’आज जाने की ज़िद ना करो...’ ही फ़रीदा खानम यांनी गायिलेली रचना म्हणजेही कळसच आहे.यात ’मरीज़े मुहब्बत...’, ’दिलवालों क्या देख रहे हो ह्या ग़ुलामलीच्या गझला आपला वेगळा रंग दाखवितात.’क्युँ मुझे मौत के पैग़ाम दिए जाते है...’ (शोभा गुर्टू), ’तुम आए हो तो शबे इंतज़ार गुजरी है...’ (इकबाल बानो), ’आपका इंतज़ार कौन करे...’(शुमोना राय) या गझलाही अतिशय श्रवणीय आहेत. उर्दू गझल गायनातील मेहदी हसन साहेबांनी गायिलेली अहमद फ़राज़ यांची ’रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ...’ या गझलने लोकप्रियतेचे सर्व मापदंड मोडीत काढले.(खरे म्हणजे हे ’मोहब्बत’ या १९७२ सालच्या पाकिस्तानी सिनेमातील गाणे (ग़ज़ल) असून,याचे संगीतकार निसार बज़्मी हे आहेत.पण खाँ साहेबांनी महफिलीत गाऊन या रचनेचे सोने केले.)या गझल सोबतच यमन रागाचीही लोकप्रियता (गझल गायनाचे संदर्भात) परमावधीला पोहचली.मूलतःच गोड असलेल्या या रागात फ़राज़ साहेबांचे शब्द, खाँ साहेबांचा जव्हारदार मधाळ आवाज आणि शब्दांना साजेशी विनवणी करणारी बंदिश असा उच्चतम कोटीचा संगम यात झालेला दिसून येतो....


अशीच विनवणी मी स्वरबद्ध केलेल्या #तुझ्यासाठीच_मी या अलबम मधील 'तुझ्यासाठीच मी...'या गझलमध्ये आपणास दिसून येईल.(अर्थात खरे परीक्षक आपण आहात) असा हा यमन...

ऐका तर मग...फक्त मध्य आणि मंद्र सप्तकातील ही बंदिश, वैशाली माडेच्या आवाजात..

               तुझ्यासाठीच मी माझे तराणे छेडले होते

              तुझ्यासाठीच स्वप्नांचे दिवे मी लावले होते

                                              -दिलीप पांढरपट्टे

 

Tuesday, October 6, 2020

सूरों का साधक....चंद्रशेखर बाजोरिया

.         मित्रता कब होंगी । कैसे होंगी, जीवन के किस मोड पर होगी, कहा नही जा सकता । कभी कभी कोई व्यक्ति आपके जीवन मे इस तरह प्रवेश कर जाता है कि वह तुम्हारे जीवन का अभिन्न अंग बन जाता है ।
 इसी तरह एक मुलाकात हुई सुधाकर कदम से । भाग्योदय ऑर्केस्ट्रा में अकॉर्डीअन बजाते देखा था, बादमे मुलाकात हुई एक शास्त्रीय संगीत सभा में । मालुम पडा इनका रुझान अब लाईट म्युझिक से शास्त्रीय संगीत की ओर मुड गया है और अपने शास्त्रीय संगीत मे संगीत विशारद की उपाधी भी प्राप्त कर ली है ।
 यही से हमारी मैत्री बढने लगी । साथ में जुड गये स्व़ श्री शेखर सरोदे, प्रा़.विनायक भीसे । संगीत की बैठके होने लगी । इन्ही बैठकों मे मुझे सुधाकर के बारे में काफी कुछ जानने को मिला ।
 सुधाकर कभी दकीयानुसी विचारो का नही रहा । उसने शास्त्रीय संगीत की तपस्या की तो लाईट म्युझीक को पूजा भी है । गायन मे महारथ हासील करने की कोशीश की तो वाद्य यंत्रों से खेला भी है । खुद के संगीत के रीयाज के साथ दूसरो को भी संगीत की शिक्षा देने की कोशिश की है ।
 इस संगीत का सफर तय करने में उसे कितनी मुश्कीलों का सामना करना पडा मै जानता हूँ।
 चांदेकर परिवार की कन्या से प्रेम विवाह करने के बाद पारीवारिक जीम्मेवारी, आर्थिक समस्या सामने खडी थी । यवतमाल में कहीं नौकरी उपलब्ध न थी अंत मे समझोता कर आर्णी जैसे छोटे से गॉंव मे संगीत शिक्षक की नौकरी कर ली ।
 आर्णी में कोई संगीत का मार्गदर्शक नही । कुछ करने की तमन्ना मनमें है । पर किसी का प्रोत्साहन नही । आजकल कला के क्षेत्र में भी उँचाइयों को छूने के लिये किंग मेकर की जरुरत होती है । वो भी उपलब्ध नही ।
 अंत में एकलव्य का ही सिध्दांत अपनाकर पंडीत जसराजजी को प्रेरणा स्त्रोत बनाकर आर्णी मे ही रियाज शुरु किया । उस वक्त गजल का दौर शुरु हो चुका था । गुलाम अली, मेहदी हसन, पंकज उधास, अनुप जलोटा इनका नाम शीर्षस्थ पर चल रहा था । उसी वक्त सुधाकर कदम मराठी के शीर्षस्थ कवि श्री सुरेशजी भट के संपर्क में आये और उनकी लिखी हुई मराठी की गजलो को संगीत में ढाला ।
 मुझे याद है वह रात जब शायद पहली बार सुधाकर कदम ने यवतमाल जूनिअर चेंबर्स के तत्वावधान में मराठी के गजलों का कार्यक्रम स्थानीय टाऊन हॉल मे दिया था । रसिक वृंद झूम उठे थे । शायद यवतमाल के रसिको को पहली बार आभास हुआ कि यवतमाल में एक इतना अच्छा कलाकार है । उसी वर्ष इन्हे भारतीय जुनिअर चेंबर ने महाराष्ट्र के दस सर्वोत्कृष्ट युवकों में से एक का पुरस्कार दिया । संपूर्ण महाराष्ट्र में सुधाकर कदम के मराठी गजलों के कार्यक्रम हुए, सराहें गये ।
 इन्ही व्यस्तताओं के बावजुद आर्णी में गांधर्व संगीत विद्यालय की स्थापना की । कई विद्यार्थीयों को संगीत की शिक्षा दी । आर्णी मे हर वर्ष कलाकारों के लिये प्रतियोगिता आयोजीत की उन्हे पुरस्कृत किया ।
 एक खास बात देखी, वो सिर्फ खुद के लिये नही जीता बल्की संगीत के लिये जीता है, सूरों के लिए जीता है ।

अध्यक्ष, 
यवतमाल कॉटन सिटी जेसीज.
१९८३



 





संगीत आणि साहित्य :