गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, September 29, 2013

अर्वाचिन गीता




आम्ही खातो अमुच्या देशा /
राजकारण  अमुचा   पेशा //

कुणी निंदा कोणि वंदा /
भ्रष्टाचार अमुचा धंदा //

’सब मतदार बारा टक्के’ /
आम्ही खुर्चीवरती पक्के //

जनता जरी राही उपाशी /
आम्ही खाऊ फक्त तुपाशी //

करा आत्महत्या तुम्ही घरात /
आम्ही मशगुल घोटाळ्यात //

तुम्हालागी ’कर’ लावितो /
आम्ही ’भत्त्यासाठी’ मरतो //

निवडुन येण्या करतो ’थेर’ /
नंतर बनतो आम्ही ’शेर’ //

तुम्ही राबुन कमवा पैका /
आम्ही भरतो परदेशी बँका /

भक्तांचिया     सेवेसाठी /
आम्ही नेते बनतो ’ट्रस्टी’ //

तुम्ही   करा   देव  देव /
आमचा ’आत्मारामी’ भाव //

तुम्ही पिकवा माणिक मोती /
आम्ही भरतो अमुची पोती //

तुम्ही कर्म करा निष्काम /
आन्ही बघतो ’निळी फिल्म’ //

तुम्ही कर्तृत्वाने व्हावे मोठे /
आम्ही  वंशपरत्वे चखोटे // 


सुधाकर कदम

Saturday, September 21, 2013

‘पी’कासो



हातामध्ये पेला 
तृषार्त हे ओठ 
कशासाठी पाठ 
फिरविता //१//

डोळ्यांनी पिण्याचे 
दिवस संपले 
म्हणोनि हे पेले 
भरतोय //२//

संध्याकाळसाठी 
थांबावे कशाला ?
घ्यावा एक प्याला 
दुपारीच //३//

देशी असो किंवा 
परदेशी असो 
बनावे ’पी-कासो’ 
चित्रावया //४//

तिचा गंध असा 
बसला अंतरी 
काय मातब्बरी 
अत्तराची //५//

समाजवादाला 
घालतसे साद 
सान-थोर भेद 
मिटवाया //६//

तुझा उपदेश 
असो तुझ्यापाशी 
माझी एक ’शिशी’ 
पुरे मज //७//

गंगाजल नको 
शेवटच्या क्षणी 
दारूच तक्षणी 
ओतावी त्वा //८//

सुधाकर कदम

वारकरी




Tuesday, September 17, 2013

आयुष्याचे गणीत



आयुष्याचे गणीत ज्याला कळले नाही 
थोडा थोडा रोजच मरतो जगतांनाही 

निरोप घेण्या आलो होतो तुझिया दारी 
ऐकु न गेले मंद उसासे निघतांनाही 

आणा-भाका घेउन सारे विसरलीस तू 
आठवते तरि ...विरहामध्ये जळतांनाही 

ओठावरती एक सुखाची लकेर दे तू 
आनंदाने गायिन मी ती मरतांनाही 

शोधुन काढू वाटा आपण सुख-दुःखाच्या 
मांडुन ठेऊ त्रैराशिक मग सरतांनाही

आप्त-सोयरे,मित्र-मैत्रीणी आणि हे जग 
मनात चाले रेखाटन धुळभरतांनाही 

प्रकाशताना कशास भ्यावे अंधाराला 
जाउनि थेट भिडावे,विपरित घडतांनाही 

मनासारखी जमली नाही कधीच मैफल 
कासाविस मी होत राहिलो गातांनाही

सुधाकर कदम 
२३ नोव्हेंबर २०१२

Wednesday, September 4, 2013

काका पुतणे...



काका पुतण्यांचे

वाद फार जुने

वाचता पुराणे

कळतसे..


पुतण्यांचा नाश

करण्याचा विडा

उचलोनी बेडा

पार केला...


महाभारतात

धृतराष्ट्र काका

मारोनिया मेखा

प्रसिद्धले...


रामायण कथा

मंथरेची बाजी

काकाच्या ऐवजी

सावत्राई...


भरतास राज्य

राम वनवासी

मागणी विनाशी

केली तेव्हा...


पेशवे पदाच्या

अभिलाषेपोटी

’नारायण’,’कटी’

’ध’च्या ’मा’ने...


याच पौराणिक

काळाची आवृत्ती

पेशवाई कृती

दावितसे...


राजकारणात

घराणे घुसता

वाद अनेकदा

झडू लागे...


काका पुतण्यांनी

हाती घेता हात

राजकारणात 

मजा येई...


घराणेशाहीची

खरी सुरवात

राजकारणात

प्राचीनची...


वारसाहक्काने

राजकीय सारी 

येई मक्तेदारी

आपोआप...


त्यामुळेच मोह 

टाळू न शकले

भलेही भांडले

सत्तेसाठी...



तमाम काकाजी

खलनायकची

करितसे गोची

पुतण्याची...





























सुधाकर कदम





संगीत आणि साहित्य :