गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Friday, July 14, 2023

राग-रंग,लेखांक १५.किरवाणी



     सवाई गंधर्व संगीत महोत्सवातील पं. शिवकुमार शर्मा यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबला संगतीसोबत संतुरवर सादर केलेला किरवाणी व मेहदी हसन यांच्या 'शोला था जल बुझा हूँ' या गझलमधील किरवाणी रागाने मला अक्षरशः पछाडले होते. अजूनही युट्युबवर या दोघांना ऐकत असतो.पंडितजी आणि उस्तादजी म्हणजे संगीतातील गणितज्ञच.संतुरच्या गोड ध्वनीलहरींसोबत विविध प्रकारच्या लयकाऱ्या,तिहाया आणि त्यास तोडीस तोड झाकिरभाईचा तबला म्हणजे 'सोने पे सुहागा'.तसेच मेहदी हसन यांच्या जव्हारदार मुलायम आवाजातील गझलचचे शब्द व स्वरांची जादूगरी जादू करणारच ना!      
     तर असा हा किरवाणी  मूलतः दक्षिण भारतीय राग आहे.पण उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये इतका रुळला की दक्षिणोत्तर फरकच राहिला नाही.गायकांपेक्षा वादकांनी याला एकदम हृदयाशी धरले.चित्रपट संगीत,गझल,ठुमरी यात किरवाणी जास्ती रमला म्हणा किंवा किरवाणीने यांच्यावर जादू केली म्हणा.रोनू मुजुमदार (बासरी), निखिल बॅनर्जी (सतार) आशा अनेक वादकांनी आपल्या वाद्ययंत्रावर व चित्रपटातील संगीतकारांनी आपल्या संगीत दिग्दर्शनात किरवाणी राग भरपूर वापरला आहे.संपूर्ण जातीच्या या रागात गांधार, धैवत स्वर कोमल व बाकी स्वर शुद्ध आहेत.हा राग उत्तर भारतीय थाट पद्धतीच्या कोणत्याच थाटात बसत नाही.
     अमक्या रागाचे स्वर अमक्या रसाचे असतात.असे म्हणण्यात मला तरी गम्य वाटत नाही.प्रत्येक रागात शृंगार,वीर,भक्ती,शांत,विरह रसाची गाणी आपल्याला बघायला मिळतात.ती कमाल संगीतकाराची असते.खालील चित्रपट गीते व भावगीते पहिली तर आपणास हे कळून येईल.
     सुगम संगीतामध्ये राग नियमाला थोडेसे डावलून इतर स्वर घेण्याचा खटाटोप केल्या जातो. पण त्यामुळे गाण्यांची लज्जत वाढते. बारकाईने पाहिल्यास किरवाणीमधील खालील गाण्यात  कधी शुद्ध धैवत,शुद्ध गांधार व कोमल निषाद यांचाही वापर करून चालीचा गोडवा वाढवलेला दिसतो.खरे म्हणजे ऐकताच हृदयाला स्पर्श करेल तेच खरे गाणे! मग ते शास्त्रीय असो वा अशास्त्रीय.मी आजही शास्त्रीय,सुगम,चित्रपट गीते,ऊर्दू गझल,कव्वाली,पाश्चात्य या सर्व प्रकारचे संगीत ऐकतो,आनंद घेतो.

● चित्रपट गीते...
'ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा',किशोर कुमार.चित्रपट-दिल्ली का ठग. 'तुम बिन जाऊं कहां',रफी-किशोर.चित्रपट-प्यार का मौसम.'बेकरार दिल तू गाये जा',किशोर कुमार.चित्रपट-दूर का राही.'मेरा दिल ये पुकारे आ जा',लता.चित्रपट-नागिन.'का करू सजनी आये न बालम', येसुदास. चित्रपट-स्वामी.'ये समा समा है ये प्यार का', लता.चित्रपट-जब जब फुल खिले.'आनेवाला पल जानेवाला है',किशोर कुमार. चित्रपट-गोलमाल.'रिमझिम गिरे सावन', किशोर कुमार.चित्रपट-मंजिल.'ये रात भीगी भीगी ये मस्त हवाये',लता-मन्ना डे. चित्रपट-चोरी चोरी.'चली जा छोड के दुनिया',लता.चित्रपट-हम लोग.'गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं', किशोर कुमार.चित्रपट-लाल पथ्थर.'ओ निंद न मुझकोआये', लता-हेमंत कुमार.चित्रपट-पोस्ट बॉक्स ९९९.'मेरी भिगी भिगी सी पलकों पे रह गये', किशोर कुमार.चित्रपट-अनामिका.'कहे झूम झूम रात ये सुहानी',लता.लव्ह मॅरेज.'दिल के अरमाँ आंसूओ मे बह गये', सलमा आगा.चित्रपट-निकाह.'मेरी निंदो मे तुम मेरी खव्वाबो मे तुम', किशोर कुमार.चित्रपट-नया अंदाज.'पुकारता चला हूँ मैं', रफी.चित्रपट-मेरे सनम'आओ हुजूर तुमको सितारों में ले चलूं', आशा भोसले.चित्रपट-
'मैं प्यार का राही हूँ', आशा,रफी.चित्रपट-एक मुसफिर एक हसीना.'याद न जाये बिते दिनो की', रफी.चित्रपट-दिल एक मंदिर.'एक राधा एक मीरा',लता.चित्रपट-राम तेरी गंगा मैली.'मैं शायर तो नहीं',शैलेंद्र सिंग. चित्रपट-बॉबी.
'तू सफर मेरा तू ही मंजिल मेरी', अर्जित सिंग.चित्रपट-ऐ दिल है मुश्किल.'नजर जो तेरी लागी मैं दिवानी हो गयी', श्रेया घोषाल.चित्रपट-बाजीराव मस्तानी.'तुमको पाया है के जैसे खोया हूँ', सोनू निगम.चित्रपट-ओम शांती ओम.
'तोसे नैना लागे', क्षितिज-शिल्पा.चित्रपट-अन्वर.'अंग लगा दे रे', आदिती पौल-शैल हाडा.गोलीयों की रास लीला-राम लीला.'हर तरफ तू ही दिखे', शान-महालक्ष्मी अय्यर.

●उर्दू गझल...
'शोला था जल बुझा हूँ'-मेहदी हसन. 'ऐ हूस्ने बेपर्वा तुझे शबनम कहूँ शोला कहूँ', 'पारा पारा' -गुलाम अली. 'बेसबब बात बढाने की जरूरत क्या है' -जगजीत सिंग. 'हाथ मे लेके मेरा हाथ ये वादा कर लो' -हरिहरन.

●मराठी गाणी...
'अवमानीता मी झाले' -नाट्यगीत. 'सूर सुख खणी', नाटक-संगीत विद्याहरण. 'डोळ्यामधले आसू पुसती ओठांवरले गाणे' -सुधीर फडके. 'ही चिकमोत्याची माळ', -निरुपमा डे. 'विसर गीत विसर प्रीत' - सुधीर फडके.'अशी पाखरे येती' -सुधीर फडके.'तिन्ही लोक आनंदाने भरूनि गाउ दे' -सुधीर फडके'एकाच या जन्मी जणू',आशा भोसले.चित्रपट-आपली माणसं .'जिवलगा कधी रे येशील तू ?' आशा भोसले.-सुहासिनी.'तुझी प्रीत आज कशी स्मरू'.आशा भोसले.चित्रपट- अपराध.'सांग कधी कळणार तुला', सुमन कल्याणपूर,महेंद्र कपूर.चित्रपट-अपराध.
'सैराट झालं जी',अजय-चिन्मयी. चित्रपट-सैराट.'दिल की तपिश है आफताब', राहुल देशपांडे. चित्रपट-कट्यार काळजात घुसली. 

●Melodies fusion...
'Voice of the moon' anoushka shankar france 2014,Rag kirwani on satar- with sanjeev shankar (shehnai),danny keane (cello & piano),ayanna vitter,johnson (vocal-piano-celli),pirshanna thevarajah (indian percussion), manu delago (hang-drums-percussion).

'Kirwani' anoushka shankar. Live 2019.

'The best of firdaus orchestra with anoushka shankar'-expo 2020 dubau.
अवश्य ऐकावे.यात किरवाणी रागावर आधारित धून आहेत. युट्युबला सतार वादन ऐकताना मला अचानक सापडलेली सामुग्री.

●मराठी गझल गायकीच्या सुरवातीच्या काळात (१९८१/८२) मी डॉ.श्रीकृष्ण राऊत यांची
"दुःख माझे देव झाले शब्द झाले प्रार्थना
आरती जी गात आहे तीच माझी अर्चना..."
ही गझल किरवाणीमध्ये स्वरबद्ध केली होती.त्यानंतर
२००६ मध्ये मीरा सिरसमकर या कवयित्रीच्या बालगीतांचा 'खूप मज्जा करू' शिर्षकाचा एक अलबम पुण्याच्या 'फाऊंटन म्युझिक कंपनी'ने बनविला होता.संगीत दिगदर्शन माझे होते.त्यात किरवाणी रागावर आधारित एक सुंदर पाऊसगाणे आहे.गायिका नेहा दाऊदखाने सिन्हा हिने अप्रतिम गायिलेले हे गाणे आपण माझ्या 'गीत-गझलरंग' या युट्युब चॅनलवर ऐकू शकता.ऐका, आणि घरातील बाल गोपालांसह आपणही आनंद घ्या.

रिमझिम रिमझिम पाऊस आला
भिरभिर भिरभिर वारा सुटला
या रे नाचू या, थेंब टपोरे झेलू या
झेलू या झेलू या झेलू या

लख लख लख लख विजा चमकल्या
ढगांमधे ढम् ढोल वाजला
कटडम कटडम गारा पडल्या
भिजून सारे वेचू या
या रे नाचू या, थेंब टपोरे झेलू या
झेलू या झेलू या झेलू या

वाटांमधुनी पाणी आले
जागो जागी तळे साचले
इथले तिथले मार्गही अडले
शाळेचे तर रस्ते बुडले
पाटी दफ्तर घेऊ या
या रे नाचू या, थेंब टपोरे झेलू या
झेलू या झेलू या झेलू या

'रिमझिम'ची युट्युब लिंक...
https://youtu.be/zK7Mnj-YblA
------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,'मंथन' पुरवणी.रविवार दि.९ जुलै २०२३

 

मज सांग...



मज सांग आज तुझ्याकडे उमलून मी येऊ कशी
भवतालच्या नजरांस या चुकवून मी येऊ कशी

कुठल्या घराचा उंबरा खिळवून मजला ठेवतो
तुझिया करी उल्केपरी निखळून मी येऊ कशी

आली अचानक कोठुनी ही शीळ चंदेरी तुझी
माझ्या मनाच्या पायऱ्या उतरून मी येऊ कशी

माझ्याच श्वासांचा उभा आहे पहारा भोवती
आयुष्य हे की पिंजरा निसटून मी येऊ कशी

-ज्योती राव बालिगा

 





संगीत आणि साहित्य :