गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, September 30, 2023

राग_रंग (लेखांक २६) राग पिलू.


     झिंझोटी,खमाज,पहाडी सारखाच शास्त्रकारांनी पिलू रागालाही क्षुद्र प्रकृतीचा राग मानले आहे.खरे म्हणजे हा लोकसंगीताचा राग आहे.म्हणजेच शास्त्रीय रागाचे मूळ.पण मुळालाच हीन स्थान देण्याचे कारण काय तेच कळत नाही. कलेच्या विभिन्न शैलींमध्ये तसा काही भेद नसायला हवा.कला ही गुण विशेषतेने मोठी वा महान बनू शकते. म्हणून खरी श्रेष्ठता कलाकारालाच प्राप्त करावी लागते.पिलू राग समजायला मला कित्येक वर्षे लागली.कारण त्यात घेतल्या जाणाऱ्या विविध सुरावटी! पहाडी किंवा पिलू राग गाण्यासाठी खरंच तपश्चर्या करावी लागते.भूप,दुर्गा,तोडी वगैरे रागासारखं हे सरळसोट काम नाही.या रागाला (शास्त्रकार याला रागही मानत नाही.) पिलू हे नाव कसे पडले हे एक कोडेच आहे.प्राचीन ग्रंथांमध्येसुद्धा याचा उल्लेख नाही.ग्रामीण भागात गायीच्या बछड्याला,शेरडीच्या बछड्याला 'पिल्लू' म्हणायचे.पण या शब्दाचा व पिलू रागाचा काहीच संबंध नाही.कदाचित अनेक राग यातून दिसत असल्यामुळे किंवा दाखविता येत असल्यामुळे अनेक रागाचे पिल्लू म्हणजे तर पिलू राग नाही ना! असे काहीसे चमत्कारिक विचार डोक्याचे तरळून जातात.ते काही असो पण पिलू राग म्हणा किंवा धून म्हणा अतिशय गोड आहे.अनेक रागांचा छटा त्यात दाखविता येत असल्यामुळे पिलूची रंजकता वाढत जाते.या रागात ख्याल अभावानेच आढळतात.दादरा,ठुमरी,भक्तीगीत,नाट्यगीत, भावगीत,चित्रपट गीत,गझल यात हा छान रमतो.मध्यमाला षड्ज करून गायिल्या जाणाऱ्या रागांमधील पिलू हा राग अत्यंत लोकप्रिय आहे.भैरवी प्रमाणे यात बाराही स्वरांचा उपयोग ज्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे केल्या जाऊ शकतो.त्यामुळे वादकांमध्ये तर तो अधिकच प्रिय असल्याचे दिसून येते..अनेक जुन्या नव्या वादकांनी आपापल्या वाद्यांवर पिलू अतिशय समर्थपणे रंगविला आहे.पूर्वी दक्षिण भारतीय संगीतामध्ये पिलू रागाचे अस्तित्व दिसत नव्हते.पण आता मात्र जसे तिकडचे राग इकडे (उत्तर भारतात) स्वीकारल्या गेले तसे इकडचे राग पण तिकडे स्वीकारल्या गेलेत.त्यात पिलूही आहे.

     आजची गायन शैली व प्राचीन गायन शैली,तसेच आजचे राग रूप व प्राचीन (काही रागाचे) राग रूप यामध्येही बऱ्याच मोठ्या प्रमाणात तफावत आहे,सामवेदतील संगीत वेगळे,खुसरो काळातील संगीत वेगळे, व आजचे संगीत वेगळे.राग जरी तेच असले तरी त्यांच्या मांडणीत पिढी दरपिढी बदल होत गेला.खुसरोच्या काळातील ख्याल गायकीचे स्वरूप आजच्या ख्याल

गायकीपेक्षा निश्चितच वेगळे असावे.आजची ख्यालगायकी अनेक वर्षातील वेगवेगळ्या संगीत तज्ज्ञाच्या व गायकांच्या त्यांच्या त्यांच्या कंठातील संस्कारातून तयार झाली आहे.घराणे कोणतेही असो राग मात्र तेच आहेत.बदल दिसतो तो फक्त गायकीत.

     मला शोभा गुर्टूच्या 'होरी खेलन कैसे जाऊं' या ठुमरीतील आर्तनेने व्याकुळ केले होते.'नदिया किनारे मोरा गाव','तुम राधे बनो शाम','मोरे सैंय्या नहीं आये' वगैरेतून बरेच काही शिकायला मिळाले.बेगम अख्तरची 'सुध बिसराई' ठुमरी अप्रतिम आहे.यात नाना मुळेंनी तबला संगत व पुरुषोत्तम वालावलकरानी हार्मोनियम संगत केली आहे.अमानत अली व फतेह अली खान यांनी गायिलेली 'बिरहा की रैन' ठुमरी आनंददायी आहे.'शाम भई बिन शाम' उस्ताद राशीद खान,'गोरी तोरे नैन'आणि 'बरसन लागी' गुलाम अली, 'नथ,बेसर, बालम मंगवा दे' (दादरा) अजय चक्रवर्ती,'पिया बिदेस गयो रे' (ठुमरी) व्यंकटेश कुमार.वादकांमधील बहुतेक वादकांनी वाजविलेला पिलू,मिश्र पिलू मी ऐकला आहे.प्रत्येक वेळी तो वेगळाच वाटला. उस्ताद  सख़ावत हुसेन खान साहेबांचा एक व्हीडिओ १९३६ मध्ये वाडिया फिल्म्स द्वारा निर्माण करण्यात आला.उस्ताद अली अकबर खान,उस्तादअमजद अली खान यांची कमाल त्यांच्या वादनातील हुकूमत,

विचार,नजर यातून दिसून येते.ताज्या दमाचा सरोद वादक सौमिक दत्त याने सरोदवर सादर केलेला पिलू पण कमाल आहे.शहनाई वादक उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या बद्दल मी पामराने काय बोलावे. खरेच पहाडी,पिलू,मांड असे, ज्याला धून म्हणून हिणवले जाते ते राग रंगवणे अत्यंत कौशल्याचे काम आहे.तेथे पाहिजे जातीचे... ऐऱ्या गैऱ्याचे ते काम नोहे!

     काफी थाटातून निर्माण झालेला पिलू दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी गावा, असं शास्त्रकारांनी लिहून ठेवलं आहे. मात्र या परिभाषेच्या पलीकडे जाऊन संगीतकाराची दृष्टी या रागाचा एक आगळावेगळा भावबंध शोधतात. क्वचित गहिरा भक्तिभाव, करुण, आर्त भाव, भजनातली तल्लीनता, समूहगानात एकरूप झालेला समर्पित भाव, यांसाठी या रागाचा आकृतिबंध त्यांना मोह घालतो. मग कधी स्पष्टपणे, तर कधी संमिश्र रूपात 'पिलू'चे स्वर तुमच्याभोवती अगदी परिचित असा संमोहनाचा मंत्र टाकतात.

● हिंदी चित्रपट गीते...

'प्रभुजी प्रभुजी तुम राखो लाज हमारी' कानन देवी.चित्रपट-हॉस्पिटल. 'काहे गुमान करे' के.एल.सैगल. चित्रपट-तानसेन.'पा लागू कर जोरी रे' लता.चित्रपट-आप की सेवा मे. 'मोरे सैंयाजी उत्तरेंगे पार' लता.चित्रपट-उडन खटोला. 'झुले मे पवन की आयी बहार' लता,रफी.

चित्रपट-बैजू बावरा. 'पी के घर आज दुल्हनिया चली' शमशाद बेगम.चित्रपट-मदर इंडिया. 'नैना काहे को लगाये' आशा भोसले.चित्रपट-जोर का गुलाम. 'जिंदगी ख्वाब है' मुकेश.चित्रपट-जागते रहो.'मुरली बैरन भई' लता.चित्रपट-न्यू दिल्ली. 'मैं सोया अखियां मीचे' आशा,रफी,चित्रपट-फागुन. 'कैसा जादू बलमा तुने' गीता दत्त.चित्रपट-12 0'clock. 'काली घटा छाये मोरा जिया लहराये' गीता दत्त.चित्रपट-सुजाता. 'सच कहती है दुनिया' लता.चित्रपट-इश्क पर जोर नहीं. 'बडी देर भई कब लोगे खबर' रफी.चित्रपट-बसंत बहार. 'सुर ना सजे क्या गाऊं मैं' मन्ना डे.चित्रपट-बसंत बहार. 'बावरी रे जीने का सहारा' लता.चित्रपट-एक फुल चार कांटे. 'तेरे प्यार का आसरा चाहता हूँ' लता,महेंद्र कपूर.चित्रपट-धूल का फूल.

'विकल मोरा मनवा' लता. चित्रपट-ममता. 'चंदन का पलना रेशम की डोरी' हेमंत कुमार.चित्रपट-शबाब. 'झुले मे पवन के आयी बहार' लता,रफी.चित्रपट-बैजू बावरा. 'अजहू न आये बालमा सावन बीता जाय' रफी,सुमन कल्याणपूर. चित्रपट-सांज और सवेरा. 'धीरे से आजा री अखियां में निंदिया' लता.चित्रपट-अलबेला. 'धड़कते दिल की तमन्ना हो मेरा प्यार हो तुम' सुरेय्या.चित्रपट-शमा.

ल 'चल चलीये दुनिया दी' नूरजहां,मेहदी हसन.पाकिस्तानी चित्रपट-दुनिया पैसे दी. 'कभी आर कभी पार' शमशाद बेगम.चित्रपट-आर पार. 'अब के बरस भेजो भैय्या को बाबुल' आशा भोसले.चित्रपट-बंदिनी. 'ढुंढो ढुंढो रे साजना ढुंढो' लता.चित्रपट-गंगा जमुना. 'मत मारो शाम पिचकारी' लता.चित्रपट-दुर्गेश नंदिनी. 'तीर ये चुपके' आशा भोसले. चित्रपट -फागुन. 'तेरे बिन सूने नैन हमारे'लता,रफी.

चित्रपट-मेरी सूरत तेरी आंखे. 'पिया पिया ना लागे मोरा जिया' आशा भोसले.चित्रपट-फागुन. 'धीरे से आजा रे निंदिया' लता.चित्रपट-अलबेला. 'बनवारी रे जिने का सहारा तेरा नाम रे' लता.एक फूल चार कांटे. 'तू जो मेरे सूर में गुनगूना ले' येसुदास,हेमलता.चित्रपट-चितचोर.

'परदेसीयों से ना अखियां मिलाना' रफी.चित्रपट-जब जब फुल खिले. 'अपनी कहो कुछ मेरी सुनो' लता, तलत महमूद.चित्रपट-परछाईं. 'तेरे बिन सूने नैन हमारे' रफी,लता.चित्रपट-मेरी सुरत तेरी आंखे.'न झटको जुल्फ से पानी' रफी.चित्रपट-शहनाई.'आज की रात बड़ी शौक बड़ी नटखट है' रफी.चित्रपट-नई उम्र की नई फसल.'अल्ला मेघ दे,पानी दे छाया दे. एस.डी. बर्मन. चित्रपट-गाईड.'बहारों ने मेरा चमन लूटकर' मुकेश.चित्रपट-देवर.'मैं सोया अंखियां मीचे' मोहम्मद रफ़ी और आशा भोंसले.चित्रपट -

'बरसो रे हये बैरी बदरवा बरसो रे'  आशा भोसले. चित्रपट -

'छम छम घुंघरू बोले' आशा भोसले .चित्रपट-काजल.

'पिया पिया ना लागे मोरा जिया' आशा भोसले.

चित्रपट-फागुन. 'सून जा पुकार' आशा भोसले .चित्रपट-फागुन. 'बना दे प्रभुजी' मोहम्मद रफी आणि आशा भोसले. चित्रपट-फागुन. 'एक परदेसी मेरा दिल ले गया'  मोहम्मद रफ़ी और आशा भोंसले.चित्रपट-फागुन. 'मैं ने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है' रफी. चित्रपट-बरसात की रात. 'मेरी छोड़ दे कलाई'  मोहम्मद रफ़ी और आशा भोंसले. चित्रपट-फागुन. 'न जाओ सैंय्या छुडा के बैंय्या' गीता दत्त.चित्रपट-साहिब बीबी और गुलाम.

'तुम रूठ के मत जाना' मोहम्मद रफ़ी और आशा भोंसले.चित्रपट-फागुन. 'है है रसिया तू बड़ा बेदर्दी' आशा भोसले.चित्रपट-दिल दिया दर्द लिया. 'कौन गली गयो शाम' परवीन सुलताना, चित्रपट-पाकिजा. 'दिन सारा गुजारा तोरे अंगना' लता,रफी. चित्रपट-जंगली. 'जाइये आप कहां जायेंगे' आशा.मेरे सनम. 'मेरा प्यार वो है के मरकर भी तुझ को' महेंद्र कपूर. चित्रपट-ये रात फिर न आयेगी.'नदिया किनारे' लता.चित्रपट-अभिमान. 'दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे रे' किशोर कुमार.चित्रपट-शराबी.

'ये तो सच है के भगवान है' हरिहरन,प्रतिमा राव,घनश्याम वासवानी,संतोष तिवारी,रवींद्र रावल. 'मैं ने रंग ली आज चुनरिया' लता.चित्रपट-दुल्हन एक रात की. 'आज की रात बड़ी शौक़ बड़ी नटखट है' मोहम्मद रफ़ी और आशा भोंसले.चित्रपट-नयी उमर की नयी फसल.'देखती ही रहो आज दर्पण ना तुम' मुकेश.चित्रपट-नयी उमर की नयी फसल.-'इसको भी अपनाता चल' मोहम्मद रफ़ी.चित्रपट

-नयी उमर की नयी फसल. 'कारवां गुज़र गया' मोहम्मद रफी.चित्रपट-नयी उमर की नयी फसल.'मेरी सैंया गुलबिया का फूल: - सुमन कल्याणपुर और मीनू पुरूषोत्तम.-चित्रपट-नयी उमर की नयी फसल. 'ना मानू ना मानू' लता.गंगा जमुना. 'मेरा प्यार भी तू है' लता,मुकेश.-चित्रपट-साथी. 'शोख शोक आँखें' आशा भोसले.चित्रपट-फागुन. 'चेहरा है या चांद खिला है' किशोर कुमार.चित्रपट-सागर. 'तुम्हे दिल से चाहा था हम ने' मोहम्मद अजीज.चित्रपट-मीरा का मोहन.'आज सोचा तो आंसू भर आये' लता.हंसते जख्म.'गैरों पे करम अपनो पे सितम' लता.चित्रपट-आंखे.'तेरे इश्क का मुझ पे हुवा ये असर' आशा भोसले.चित्रपट-नागिन.बाबूल की दुवाये लेती जा' रफी.चित्रपट-नीलकमल. 'ऐ मालिक तेरे बंदे हम' लता,मन्ना डे. चित्रपट-दो आंखे बारह हाथ.(याचा अंतरा मालकंस रागात आहे) 'सावन के झुलों ने मुझको बुलाया' मोहम्मद अजीज.चित्रपट-निगाहें. 'देर से आना जल्दी जाना' अलका याज्ञिक,मनहर उधास.चित्रपट-खलनायक. 'सुरमई अखियों मे' येसुदास. चित्रपट-सदमा./'चुरा लिया है तुम ने जो दिल को' आशा,रफी.यादों की बारात.'ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना' किशोर कुमार. चित्रपट-मुकद्दर का सिकंदर.'मैनू इश्क दा लगिया रोग' अनुराधा पौडवाल.चित्रपट-दिल है के मानता नहीं. 'मोरे कान्हा जो आये पलट के' आरती अंकलीकर.सरदारी बेगम. 'घनन घनन' उदित नारायण, सुखविंदर सिंह, अलका याग्निक, शंकर महादेवन, शान, किशोरी गोवारिकर.चित्रपट-लगान. 'तुमको पाया है तो जैसे खोया हूँ' राज सोधा,सैयद अली.चित्रपट-ओम् शांती ओम्.

● नॉन फिल्मी...

'मैं खयाल हूँ किसी और का' -नुसरत फतेह अली खान.'जिन के होटों पे हंसी पाव मे छाले होंगे' -गुलाम अली. 'चिठ्ठी न कोई संदेस' नज्म-जगजीत सिंग.'चाहत देस से आनेवाले' -पंकज उधास. 'नई उमर की नये सितारों'- भूपिंदर सिंह'यह शुभ सुहाग की रात' - मन्ना डे

● मराठी...

'अरे वेड्या मना ' नाटक-शाकुंतल.

'कोण तुजसम सांग' नाटक- सौभद्र.

'परवशता पाश दैवे' नाटक-रणदुंदुभी.

'पावना वामना' नाटक- सौभद्र.

'मी अधना' नाटक-मानापमान.

'हरी मेरो जीवन प्राण अधार' नाटक-मंदारमाला.

'नच सुंदरी करू कोपा' नाटक-सौभद्र.

'तुमबिन मोरी कौन खबर ली' नाटक-अमृतसिद्धी.

'लाविते मी निरांजन' नाटक-वाहतो ही दुर्वांची जुडी.

'दे रे कान्हा चोळी लुगडी' लता.चित्रपट-पिंजरा.

'लावते मी निरांजन' -माणिक वर्मा.

'सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले' -सुमन कल्याणपूर.

'या इथे लक्ष्मणा' सुधीर फडके. गीत रामायण.

'सागरा प्राण तळमळला' -मंगेशकर भावंडं.

'माझे माहेर पंढरी' किशोरी आमोणकर.

'दिवस तुझे हे फुलायचे' -अरुण दाते.

__________________________________________

दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' रविवार पुरवणी.दि. १ ऑक्टोंबर २०२३.



Saturday, September 23, 2023

राग रंग (लेखांक २५) देस राग

साहित्यसंगीतकला-विहीन:

साज्ञात् पशु-पुच्छविषाण हीन:

अर्थात:- साहित्य, संगीत आणि कला विहीन व्यक्ती शिंग आणि शेपटी विहीन पशू समान आहे.


     देस राग खमाज थाटोत्पन्न राग आहे.खमाज थाटातील इतर रागांप्रमाणे हा ही अतिशय गोड राग आहे.शास्त्रकारांच्या दृष्टीने हा राग चंचल प्रकृतीचा आहे.(रागांची प्रकृती व

उच-नीचता ठरविणाऱ्याच्या बुद्धीचे कौतूक करावे वाटते).त्यामुळे या रागात अधिकतर छोटा ख्याल व ठुमरी वगैरे गायिल्या/वाजविल्या जाते.असे शास्त्रकार म्हणतात.वादी स्वर रिषभ असून संवादी स्वर पंचम आहे.याचा गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर आहे.गानसमय ठरविण्याची पद्धत अशी:- 

      रागांचे उत्तरांग व पूर्वांग विभाजित करण्यासाठी सप्तकातील सात स्वरांसोबत तार सप्तकातील षड्ज स्वर घेऊन आठ स्वरांची योजना करून दोन भागात वाटतात. पहिला भाग षड्ज ते मध्यम पूर्वांग,पंचम ते तार षड्ज उत्तरांग.या प्रकारे जो राग दिवसाच्या पहिल्या भागात म्हणजे दिवसाचे १२ वाजल्यापासून रात्रीच्या १२ वाजेपर्यंत गायिल्या/वाजविल्या जाणारे राग,ते पूर्व राग.आणि जे राग रात्रीच्या १२ वाजेपासून दिवसाचे १२ वाजेपर्यंत गायिल्या/वाजविल्या जातात ते उत्तर राग.उत्तर भारतीय संगीतामध्ये ज्या रागांचा वादी स्वर सप्तकाच्या पूर्वांगात असेल ते राग दिवसाच्या पूर्वार्धात व ज्या रागांचा वादी स्वर सप्तकाच्या उत्तरांगात असेल ते राग दिवसाच्या उत्तरार्धात  गायिल्या/वाजविल्या जायला हवे.असा नियम आहे.रागाचा वादी स्वर जर सप्तकाच्या पूर्वांगात असेल तर संवादी स्वर निश्चितच सप्तकाच्या उत्तरांगात असेल.याच प्रकारे वादी स्वर जर सप्तकाच्या उत्तरांगात असेल तर संवादी स्वर सप्तकाच्या पूर्वांगात असेल.

     संगीताशी जोडलेलले स्वर,लय,भाव ह्या सर्व बाबी नैसर्गिक आहेत.निसर्गाशी जोडलेल्या आहेत.आपल्या हृदयाचे ठोके किती नियमित लयीत असतात ना! त्यात थोडा जरी फरक झाला तर काहीतरी बिघडल्याचे लक्षात येते.तसेच संगीताचे आहे.स्वर,ताल,लय बिघडली की गाणं बिघडतं.

     या बिघडण्यावरून कॉलेजमध्ये असतानाचा एक किस्सा आठवला.संगीत कक्षात जवळ जवळ वीसेक मुला, मुलींना एकत्र शिकविल्या जायचे.आमच्या संगीताच्या प्राध्यापकांनी देस राग शिकवायला घेतला तेव्हाची ही गोष्ट आहे. देसचा छोटा ख्याल 'रब गुना गाय रे तू मना' चार-पाच तासिकांमध्ये संपला. त्यानंतर एक तराणा शिकवायला सुरवात केली.त्याचा अंतरा होता 'नादिर दानी तुंदीर दानी दानी तदारे दानी'. माझ्यासारखे बाल वयापासून संगीत शिकणारे काही, हा अंतरा व्यवस्थित म्हणायचे.कारण त्यांचा तो अगोदरच झालेला होता.पण दहावी नंतर कॉलेजमध्ये (त्यावेळी दहावी नंतर कॉलेजमध्ये प्रवेश मिळायचा.यातील प्रथम वर्षाला 'प्री युनिव्हर्सिटी' म्हणायचे) प्रथमच संगीत विषय घेणारे विद्यार्थी वरील तराणा म्हणताना 'तुंदिर'चे 'उंदीर' करून गायचे. ते असे :- नादिर दानी उंदीर दानी दानी तदारे दानी'. आणि मग वर्गात हलकीसी खसखस पिकायची.खसखस का पिकते हे शेवटपर्यंत प्राध्यापकांना कळले नाही.कारण हे सगळे 'उंदीर' शेवटच्या दोन रांगात बसायचे.असो!

     युट्युबवर खालील कलाकारांनी गायीला/वाजविलेला देस राग विविध तालात आपण ऐकू शकता.गायन...'कारी घटा घिर आयी' उस्ताद बडे गुलाम अली खान.ताल-त्रिताल. 'पिया मत जा' उस्ताद मुबारक अली खान.ताल-झपताल. 'चितवन रोके ना रही'.पंडित जसराज,ताल-रूपक.'कारी घटा छा रही' किशोरी आमोणकर.ताल-दादरा. 'होरी खेलन को चल कन्हैय्या' मालिनी राजूरकर,ताल-त्रिताल.'नदिया बैरी भई' प्रसिध्द ठुमरी.'करम कर दीजे' उस्ताद राशीद खान.ताल-अध्दा त्रिताल. 'नादान बिछुवा' पं. राजन साजन मिश्र.ताल-त्रिताल. 'कारी घटा घिर आयी' पं. अजय चक्रवर्ती.

ताल-धिमा त्रिताल.'सखी,घन गरजत'पं. उल्हास कशाळकर.ताल-धिमा त्रिताल.'वाजत नगारे' शोभा मुद्गल.ताल त्रिताल.'आये अनोखे खिलाडी कान्हा होरी खेलहूँ न जाने' पौर्णिमा धुमाळ.ताल-अध्दा त्रिताल. 'येरी आओ रे आओ मंगल गाओ' महेश काळे.ताल-त्रिताल.'बाजे बधाईयां वे सैयां नंददे दरबार' गिरीधर गोपालजी. ताल-आडा चौताल.

वादन...पं. रवी शंकर-सतार. उस्ताद विलायत खान-सतार. उस्ताद अमजद अली खान-सरोद.पं. शिवकुमार शर्मा-संतूर.पं. हरिप्रसाद चौरसिया-बासरी.उस्ताद शाहीद परवेज-सतार.राकेश चौरसिया-बासरी. 

● देस रागावर आधारित चित्रपट गीते...

'दुख के दिन अब बितत नाही' के.एल.सैगल.

चित्रपट-देवदास.संगीत-तिमिर बरन (१९३६)

'कदम चले आगे' के.एल.सैग.चित्रपट-भक्त सूरदास.संगीत-ग्यानदत्त (१९४२). 'मिलने का दिन आ गया' के.एल.सैगल,सुरेय्या.चित्रपट-तदबीर. संगीत-लाल मोहंमद (१९४५). 'सखी री चितचोर नहीं आये' गीता दत्त.चित्रपट-जोगन.संगीत-बुलो सी रानी (१९५०)

'दूर कोणी गाये' शमशाद बेगम , मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर.चित्रपट-बैजू बावरा.संगीत-नौशाद (१९५२)

'मेरे प्यार में तुझे क्या मिला' लता.चित्रपट-देश.संगीत-अनिल बिश्वास (१९५४).'सैंय्या जा जा मोसे ना बोलो काहे को नेहा लगाये' लता.चित्रपट-झनक झनक पायल बाजे. संगीत-वसंत देसाई (१९५५). 'ठंडी ठंडी सावन की फुहार' आशा भोसले.चित्रपट-जागते रहो.संगीत-सलील चौधरी (१९५६)

'बेकसी हद से जब गुजर जाये' आशा भोसले. चित्रपट-कल्पना. संगीत-ओ.पी.नैय नैय्यर. यात खमाज,देस असे मिश्रण आहे. (१९६०). 

'पाडवे रागमयी' पी.सुशिला.चित्रपट-सीता राम कल्याणम् (कर्नाटक) संगीत-जी.नरसिंह राव (१९६१).

'हिया जरत रहत दिन रैन' मुकेश.चित्रपट-गोदान. संगीत-रवी शंकर (१९६३).

'हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे' लता. चित्रपट-दिल एक मंदिर.संगीत-शंकर जयकिशन (१९६३). 

'मेरे प्यार में तुझे क्या मिला' लता.चित्रपट-मान.संगीत-अनिल बिस्वास (१९६४).

'गोरी तोरे नैना,नैनवा कजर बिन कारे' आशा,रफी.चित्रपट-मैं सुहागन हूँ.संगीत-लच्छीराम (१९६४). 

'अजी रुठकर अब कहां जाईएगा' लता,रफी.चित्रपट-आरजू. संगीत-शंकर जयकिशन (१९६५).

'आपको प्यार छुपाने की बुरी आदत है' रफी,आशा.चित्रपट-नीला आकाश. संगीत-मदन मोहन (१९६५).

'माना मेरे हसीं सनम' रफी.चित्रपट-दी अडव्हेंचर ऑफ रॉबिनहूड.संगीत-जी.एस.कोहली (१९६५).

'फिर कहीं कोई फूल खिला' मन्ना डे. चित्रपट-अनुभव.संगीत-कनू रॉय (१९७१). 

'आयी रुत सावन की' भुपेंद्र,फैयाज.चित्रपट-आलाप.संगीत-जयदेव (१९७७).

'सांवरे के रंग रांची' वाणी जयराम. चित्रपट. मीरा.संगीत-रवी शंकर (१९७९)

'केसरिया बालमा' लता.चित्रपट-लेकिन. संगीत-हृदयनाथ मंगेशकर (१९९१).

'दिल ने कहा चुप के से' कविता कृष्णमूर्ती.चित्रपट १९४२ लव्ह स्टोरी.संगीत-आर.डी. बर्मन (१९९३).

'तकदीर का फसाना जाकर किसे सुनाए' लता,रफी.चित्रपट-सेहरा. संगीत-रामलाल हिरापन्ना (१९६३)

मोरा सायं तो है परदेस' नुसरत फतेह अली खान.चित्रपट-डाकू रानी (१९९४).

'सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है' सोनू निगम. चित्रपट-द लिजेंड ऑफ भगतसिंग.संगीत-ए.आर.रहमान (२००२).

'अगर तुम साथ हो' अलका याज्ञिक,अरिजित सिंग.चित्रपट-तमाशा.संगीत-ए.आर.रहमान (२०१५).

● गैर फिल्मी...

'सखी बाजे पग पैजनी' गायक-पुरुषोत्तम दास जलोटा,अनूप जलोटा.

'चदरीया झिनी रे झिनी' कबीर भजन.गायक-अनूप जलोटा.

'हम तो है परदेस में देस में निकला होगा चांद' -जगजीत,चित्रा.

'वंदे मातरम्' लता.चित्रपट-आनंदमठ

रवींद्रनाथ टागोरांच्या बऱ्याचशा बंदिशी देस रागावर आधारित आहेत.

'बजे सरगम' दूरदर्शन चित्रपट.

● मराठी...

'भारती सृष्टीचे सौंदर्य खेळते दारीच सतत रूप आगळे' गायिका-वसंती. चित्रपट-कुंकू. संगीत-केशवराव भोळे (१९३७) . 

'मधुकर वनवन फिरत गुंजारवाला' बाल गंधर्व. नाटक-विद्याहरण. 

'रूपास भाळलो मी, भुललो तिच्या गुणाला' सुधीर फडके,आशा भोसले.चित्रपट-अवघाची संसार.संगीत-वसंत पवार. 

'मन मंदिरा तेजाने' शिवम् महादेवन.चित्रपट-कट्यार काळजात घुसली.संगीत-शंकर,एहसान,लॉय.

__________________________________


दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी, रविवार दि.२४.९.२०२३

Saturday, September 16, 2023

राग-रंग (लेखांक २४) केदार

"Music is a higher revelation than all wisdom and philosophy" Ludwigvan Beethoven. केदार हा एक प्राचीन राग आहे,राग केदार, ज्याला केदारा पण म्हटल्या जाते. शिवाच्या (शंकर,महादेव) नावावरून हे नाव ठेवल्याचेही बोलल्या जाते.ज्यात ख्याल, ठुमरी, ध्रुपद अशा शास्त्रीय गीत प्रकारच्या विभिन्न शैलीं सोबतच यावर इस आधारित हल्के शास्त्रीय गीत सुद्धा सामिल आहे. गुरु ग्रंथ साहेबानुसार राग केदारा (ਕੇਦਾਰਾ) मनाला आत्माच्या वास्तविक चरित्राला अवगत करते. (थोडे विषयांतर होईल पण हे मांडणे मला आवश्यक वाटते.मी मागील लेखात लोक संगीता विषयी बोललो होतो.जगातील सर्व देशातील लोकसंगीताचा अभ्यास केला तर सर्वत्र काही ना काही साम्य आढळतेच.हंगेरीच्या जिप्सी समुदायातील लोकगीतांमध्ये 'शिवरंजनी' रागाचे स्वर सापडतात.सैबेरीयाच्या लोकसंगीतात 'सिंदूरा', रशियाच्या स्योलेन्सखमध्ये 'भूपाली',दून नदीच्या आसपास 'दुर्गा', किवमध्ये 'झिंझोटी','गुणकली','जौनपुरी',येरवानमध्ये जोगिया.मंगोलियाच्या राष्ट्रीय वाद्यवृन्दामध्ये 'भूपाली','धानी','मालकौंस','मेघ' आणि 'दुर्गा' रागांचे दर्शन झाल्याचे 'संगीत चिंतामणी'कार आचार्य बृहस्पती यांनी त्यांच्या ग्रंथात नमूद करून ठेवले आहे.यावरून संगीताला भाषेचे बंधन नसते हे लक्षात येते.एखादी गोष्ट माहीत नसणे हा काही अपराध नाही,पण माहिती असून मुद्दाम त्याकडे लक्ष न देणे वा माहिती असून खोटे ठरविणे हे मात्र अत्यंत वाईट आहे.संगीताचे बाबतीत नीर क्षीर विवेक बुद्धीने त्या त्या बाबींचे विश्लेषण करायला हवे.जगात सर्वत्र सात स्वर मान्य आहेत.या स्वरांच्या संवादातून प्राचीन काळी त्या त्या प्रांतात अनेक सुरावटी तयार झाल्या.त्या लोकसंगीताच्या स्वरूपात आजही जिवंत आहेत.) केदार राग आपल्या समोर प्रत्येक वेळी गंभीर,जटिल, समृद्ध, मादक, सुखदायक,प्रणयी आणि उत्थानकारी अशा वेगवेगळ्या रुपात आपल्या समोर येतो.रागदारी ही लोकरीच्या गुंडाळ्यासारखी आहे.धागा ओढत जा स्वेटर विणत जा...प्रत्येक क्षणाला नवनवीन वीण. ज्याची जशी मेहनत तशी त्याची कलाकुसर.प्रत्येकाचा पोत वेग-वेगळा.यात कल्पनाशक्तीला पण भरपूर वाव असतो. कलाकारी केली तर खरंच हे अफाट काम आहे. केदारमधील मी सर्वप्रथम शिकलो ती 'सोच समझ मन मीत पिहरवा' त्यावेळी 'सोचण्याची' व समजण्याची कुवत नसल्यामुळे अर्थ कळला नाही.पण राग स्वरूप कळून आले.त्यातील स्वरांची गोडी कळून आली.स्वरांचं एक बरं असतं.शब्द मिळाले तरी छान, न मिळाले तरी छान. सोबतीला शब्दच हवेच असा काही आग्रह नसतो.आणि आलेच तर नाही पण म्हणत नाही.तसे नसते तर वाद्यसंगीत रसिकप्रिय झालेच नसते.तसेच शब्द स्वरांची सांगड तर कुणालाही आवडणारच ना! 'कान्हा रे,नंद नंदन' ही केदारमधील माझी आवडती अशी एक लडिवाळ चीज आहे.ज्या कोणी ही बंदिश केली त्याला साष्टांग दंडवत.हा सायंकाळी उशिरा गायिल्या जाणाऱ्या रागांमध्ये सगळ्यात लोकप्रिय रागांपैकी एक आहे.ज्या कोणी केदार रागाची रचना केली,त्याच्या सांगीतिक जाणिवेची व बुद्धिमत्तेचे कौतुक करावेसे वाटते.१७ व्या शताब्दीतील ग्रंथांनुसार केदार राग मोगल कालीन संगीतकारांचा आवडता असून मैफलीतील प्रमुख रागापैकी एक होता,असे संगीत विद्वानांचे मत आहे. केदार रागाला दक्षिण भारतीय संगीत पद्धतीने पण स्वीकारले आहे.ज्याला 'केदारम्' म्हटल्या जाते.यात अनेक संगीतकारांच्या कलाकृती आजही आपण ऐकू शकतो.जसे त्रिमूर्ती संगीतकार श्री मुत्थुस्वामी दिक्षितार यांचे 'आनंद नटाना प्रकाशम्'.याच्यासारखाच कर्नाटकातील हमीर कल्याण आहे. केदार रागाचे अनेक प्रकार आहे. शुद्ध केदार,चांदनी केदार, मलुहा केदार, जलधर केदार, सावनी केदार, बसंती केदार, केदार बहार, नट केदार, आनंदी केदार, शाम केदार, तिलक केदार वगैरे वगैरे.यातील रसिकप्रिय असे काहीच प्रकार आहेत.पं.भातखंडेंच्या उत्तर भारतीय संगीत पद्धतीनुसार केदार रागाचे चार प्रकार महत्वाचे मानले गेले आहे. १.शुद्ध केदार,२.चांदनी केदार, ३. मलुहा केदार आणि ४. जलधर केदार. ● जलधर केदार गाणाऱ्यांमध्ये पं.रामाश्रय झा 'रामरंग', पं.गणपतराव बेहरे,गंगुबाई हंगल, पं. सी.आर.व्यास, पं. डी. व्ही.पलुस्कर, पं. भीमसेन जोशी.● मलुहा केदार :- पं. सी.आर.व्यास,उस्ताद अली अकबर खान (सरोद),डॉ. लालमणी मिश्र (वीणा),उस्ताद विलायत हुसेन खान,उस्ताद लताफत हुसेन खान,पं.के.जी.गिंडे, उस्ताद शराफत हुसेन खान,पं. भीमसेन जोशी,पं. अरुण द्रविड.निशांत पनीक्कर.● चांदनी केदार :- उस्ताद अमीर खान, बसवराज राजगुरू, श्रुती सडोलीकर,पं. बुधादित्य मुखर्जी (सतार),उस्ताद विलायत खान-उस्ताद इम्रत खान (सतार),उस्ताद शाहिद परवेज (सतार),उस्ताद तन्वीर अहमद खान.● बसंती केदार-यात बसंत आणि केदार रागाचे मिश्रण असावे हे स्पष्टपणे दिसते.हा राग उस्ताद अल्लादिया खान साहेबांनी प्रचलित केला असे म्हणतात.उच्च कोटीचे सादरीकरण पं. मल्लिकार्जुन मन्सूर, केसरबाई केरकर,मोगुबाई कुर्डीकर,मास्टर कृष्णराव, किशोरी अमोणकर.● नट केदार :- पं. राम मराठे, मोगुबाई कुर्डीकर, किशोरी आमोणकर.● केदार बहार :- पं. एस.एन. रातांजनकर. ● तिलक केदार (तिलक कामोद व केदार रागाचे मिश्रण) :- मास्टर कृष्णराव. ● श्याम केदार (श्याम कल्याण व केदार रागाचे मिश्रण) :- अब्दुल हलीम जाफर खान, निखिल बॅनर्जी (सतार). ● आनंदी केदार (नंद व केदार रागाचे मिश्रण).● मांड केदार :-बसवराज राजगुरू.● आडंबरी केदार :- मल्लिकार्जुन मन्सूर ● विविध गायक/वादकांनी सादर केलेला केदार युट्युबवर उपलब्ध आहे.उस्ताद बडे गुलाम अली खान,पं. भीमसेन जोशी, जयश्री पाटणकर,मालिनी राजूरकर,पं. शिवकुमार शर्मा (संतूर),रोनू मुजुमदार (बासरी),पं. निखिल बॅनर्जी (सतार),पं. बुद्धदेव दासगुप्ता (सरोद),रहीम फहीमुद्दीन डागर (धृपद),पं. राजन साजन मिश्र,पं. वसंतराव देशपांडे,उस्ताद राशीद खान,किशोरी आमोणकर,पद्मा तळवलकर,अश्विनी भिडे,पं. सत्यशील देशपांडे,अरुण कशाळकर,पं.उल्हास कशाळकर,पं.व्यंकटेश कुमार,पं.अजय चक्रवर्ती,अनुपमा भागवत (सतार),कौशिकी चक्रवर्ती,जयतीर्थ मेवूंडी,अपूर्वा गोखले,ओंकार दादरकर,सावनी शेंडे,मौमिता मित्रा,राजेंद्र कुलकर्णी (बासरी),सुचिष्मीता दास,मनाली बोस,पुर्बायन चटर्जी (सतार),पं. पिनाकीन व्यास वगैरे वगैरे... केदारमधील तराण्यावर एक नृत्य पण उपलब्ध आहे. ● केदार रागावर आधारित चित्रपट गीते... 'पंछी बावरा चांद से प्रीत लगाये' खुर्शीद. चित्रपट-भक्त सूरदास (१९४२). 'उठाये जा उनके सितम' लता.चित्रपट-अंदाज. संगीत-नौशाद (१९४९). 'मैं पागल मेरा मनवा पागल' तलत महमूद. चित्रपट-आशियाना. संगीत-मदन मोहन (१९५२). 'साजन बिना निंद न आवे' लता.चित्रपट-मुनीमजी.संगीत-एस.डी. बर्मन (१९५५). 'हमको मन की शक्ती दे मन विजय करे' वाणी जयराम.चित्रपट-गुड्डी.संगीत-वसंत देसाई (१९७१). 'दरशन दो भगवान नाथ मोरी अखियां प्यासी रे' मन्ना डे, हेमंत कुमार,सुधा मल्होत्रा.चित्रपट-नरसी भगत.संगीत-रवी.(१९५७). 'बेकस पे करम किजीए' लता.चित्रपट-मुगले आजम.संगीत-नौशाद.(१९६०). 'कान्हा जा रे लता,मन्ना डे. चित्रपट-बूट पॉलिश, तेल मॉलिश.संगीत-चित्रगुप्त (१९६१). 'आप यूं ही अगर हम से मिलते रहे देखीये एक दिन प्यार हो जायेगा' लता,रफी.चित्रपट-एक मुसफिर एक हसीना.संगीत-ओ.पी.नय्यर (१९६२). 'किसी की याद' रफी.चित्रपट-जहांआरा. संगीत-मदन मोहन (१९६४). 'इतने करीब आके भी क्या जाने किस लिए' तल महमूद,मुबारक बेगम.चित्रपट-शगून.संगीत-खय्याम (१९६४). 'जाओ रे जोगी तुम जाओ रे' लता.चित्रपट-आम्रपाली.संगीत-शंकर जयकिशन (१९६४). 'मिल जा रे जाने जाना' लता.चित्रपट-बेनजीर. संगीत-एस.डी. बर्मन (१९६४). 'आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है'-किशोर, लता.चित्रपट-घर.संगीत-आर.डी. बर्मन (१९७८). 'बोले तो बांसुरी सही' येसुदास.चित्रपट-सावन को आने दो. संगीत-राजकमल.(१९७९). 'पल दो पल का साथ हमारा' रफी,लता.चित्रपट-द बर्निंग ट्रेन.संगीत-आर.डी. बर्मन (१९८०). 'हर वक्त तेरे हुस्न का होता है समा और' महेंद्र कपूर.चित्रपट-चिंगारी.संगीत-रवी (१९८९). ● गैर फिल्मी.... 'भुली बिसरी चंद उमीदे' गझल -मेहदी हसन. 'ख़ब्रुम रसीदु आईएम शब' फ़ारसी कव्वाली.नुसरत फ़तेह अली खान - भाग १ , भाग 2 'भगवद्गीतेतील मंत्र' -जितेन्द्र अभिषेकी. 'गोकुल में बाजत शाम बधाई' भक्तीगीत. पं. जसराज. 'कब की खडी जमुना' भक्तिगीत. परवीन सुलताना. ● मराठी चित्रपट गीते... 'ही कुणी छेडिली तार' आशा भोसले,पं. वसंतराव देशपांडे.चित्रपट-गुळाचा गणपती.संगीत-पु.ल.देशपांडे. 'तुझी नि माझी फुलली प्रीती' आशा भोसले,वसंतराव देशपांडे.चित्रपट-वैजयंता.संगीत-वसंत पवार. 'नवीन आले साल आजला' आशा भोसले. चित्रपट-तू सुखी रहा.संगीत-वसंत पवार. 'आज मी आळविते केदार' मधुबाला जव्हेरी.चित्रपट-अवघाची संसार. संगीत-वसंत पवार. 'गा रे कोकिळा गा' आशा भोसले.चित्रपट-बायकोचा भाऊ. संगीत-वसंत प्रभू.(सुरवात हमीर सारखी वाटते) 'दिवा लाविते दिवा' आशा भोसले.चित्रपट-तू सुखी रहा.संगीत-वसंत पवार. 'प्रभूपदास नमित दास' नांदी. गायक-रामदास कामत,प्रकाश घांग्रेकर, भालचंद्र पेंढारकर,अरविंद पिळगांवकर.नाटक-पुण्यप्रभाव. 'वालीवध ना खलनिर्दालन' सुधीर फडके.गीत रामायण. 'सत्यम् शिवम् सुंदरा' उत्तरा केळकर. चित्रपट-सुशिला.संगीत-राम कदम (१९७८) --------------------------------------------------------------------------- दै. उद्याचा मराठवाडा, 'नक्षत्र' रविवार पुरवणी. दि.१७.९.२०२३

Saturday, September 9, 2023

राग-रंग (लेखांक २३) सोहोनी.

न नादेन विना गीतं न नादेन विना स्वर: | न नादेन विना नृतं तस्मान्नादात्मकं जगत || अर्थात नादाशिवाय ना गीत,ना स्वर, ना नृत्य,अवघे जग नादात्मक आहे. सोहनी राग मारवा थाटातुन उत्पन्न झाला आहे.सा, रे॒, ग, म॑, प, ध, नि हे मारवा थाटाचे स्वर आहेत.म्हणजेच मारवा थाटात रिषभ स्वर कोमल, मध्यम स्वर तीव्र व बाकी स्वर शुद्ध आहेत.राग मारवा, ‘मारवा’ थाटाचा आश्रय राग आहे.ज्यात रिषभ कोमल और मध्यम तीव्र असतो पण पंचम स्वर वर्ज आहे.आरोहावरोहात सहा स्वर लागत असल्यामुळे याची जाती षाडव-षाडव ठरते.याचा वादी स्वर रिषभ तथा संवादी स्वर धैवत आहे.ह्या रागाच्या गायन-वादनासाठी दिवसाचा चौथा प्रहर योग्य मानला गेला आहे. सोहनी रागाची उत्पत्ती मारवा थाटातील असल्यामुळे सोहनीमध्ये सुद्धा मारव्याचेच स्वर लागत असले तरी आरोहात रिषभ वर्ज आहे. आरोह-सा ग म॑ ध नि सां. अवरोह-सां नी ध म॑ ग रे॒ सा. रात्रीच्या शेवटच्या प्रहरी गायिल्या जाणाऱ्या या रागाचा वादी स्वर धैवत असून संवादी स्वर गांधार आहे.याला चंचल प्रकृतीचा राग मानतात.(पण 'मुगले आझम' चित्रपटातील बडे गुलाम अली खान साहेबांनी गायिलेले 'प्रेम जोगन बनके' ऐकल्यावर हे पटत नाही.) असो! सोहनी हा मारवा थाटातील अतिशय गोड आणि लोकप्रिय राग आहे.याच थाटातील पुरीया,साजगिरी, ललित (●काही गायक ललित रागात शुद्ध धैवताचा प्रयोग करतात.परंतु अधिकांश गायक यात कोमल धैवताचा प्रयोग करतात. कोमल धैवताच्या ललितचा प्रचार अधिक असल्याने हा प्रकार अतिशय लोकप्रिय आणि कर्णप्रिय पण आहे. भातखंडेंनी यात शुध्द धैवत मान्य केल्यामुळे याला मारवा थाटात बसविण्याचा अवघड प्रयत्न केला. खरे तर ललित राग भातखंडे प्रणित दहा थाटातील कुठल्याच थाटात योग्य प्रकारे बसत नाही. ह्याला जबरदस्ती मारवा थाटात बसविले आहे. ललित आणि मारवा रागाचे स्वर आणि स्वरूप दोन्ही बिलकुल मेळ खात नाही. दोन्ही रागांचे स्वर भिन्न आहेत. ललित रागात शुद्ध मध्यम, जो रागाचा वादी स्वर असून एकदम प्रबळ आहे,तो स्वर मारवा रागात पूर्णपणे वर्ज्य आहे. खरे तर ललित रागाला एक अलग थाट मानायला हवे होते. या थाटात ललित, मेघ रंजनी तथा ललित रागाप्रमाणे दोन्ही मध्यमाचा प्रयोग होऊ शकणारे व भविष्यात निर्माण होणारे राग यात बसवता आले असते. जोपर्यंत दहा थाटच मान्य आहेत तोपर्यंत कोमल धैवताच्या ललित रागाला पूर्वी थाटात ठेवणेच योग्य वाटते.) भटियार (●अधिकतर विद्वान भटियार रागाला बिलावल थाटान्तर्गत मानतात. बिलावल थाटातील राग मानण्याचे कारण यात शुद्ध मध्यम हा प्रधान स्वर आहे.आणि मारवा रागात शुद्ध मध्यमाचा प्रयोगच होत नाही. तसेच रागस्वरूपाच्या दृष्टीने पण मारव्याच्या जवळपास जात नाही.) बिभास (●बिभास रागाचे तीन प्रकार आहेत. शेवटचे दोन प्रकार क्रमशः पूर्वी आणि मारवा थाट जन्य राग आहेत. तीनही बिभास एक दुसऱ्यापासून वेगळे आहेत. त्यातील भैरव थाट जन्य बिभास अधिक प्रचारात आहे.) हे राग पण सुंदर आहेत. सोहनी रागामध्ये ख्याल आणि ठुमरी हे गायकीचे दोन्ही प्रकार मान्य आहेत.पण ठुमरी अंगाच्या गायकीत याचा अधिक प्रयोग होत असल्याचे दिसून येते.या रागाचा प्रयोग दोन प्रकारे केल्या जातो.पहिल्या प्रकारात औडव-षाडव जाती अंतर्गत आरोहात रिषभ आणि पंचम तथा अवरोहात पंचम स्वराचा प्रयोग होत नाही.दुसऱ्या प्रकारात आरोहात रिषभ आणि अवरोहात पंचम स्वराचा उपयोग केल्या जात नाही.सोहनीमध्ये पुरीया व मारवा रागाच्याच स्वरांचा प्रयोग केल्या जातो.परंतू त्याचा प्रभाव आणि भावाभिव्यक्तिमध्ये खूप फरक आहे.या रागात मींड, गमक याचा योग्य प्रयोग केल्यास यातील भाव अधिक चांगल्या तऱ्हेने प्रकट होतात. सोहनी दक्षिण भारतातील 'हंसनंदी' रागप्रमाणे आहे.जर हंसनंदी रागात शुद्ध रिषभाचा प्रयोग केला तर तो ठुमरी अंगाच्या सोहनी रागाप्रमाणे वाटतो. हा लेख लिहिण्यामागचे मुख्य कारण उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी गायिलेले मुगले आजम चित्रपटातील 'प्रेम जोगन बनके' हे गाणे आहे.रसिकांनी जरूर ऐकावे.या रागात हिंदी व मराठी गाणी खूपच कमी आहेत... ● चित्रपट गीते... 'कुहू कुहू बोले कोयलिया' लता,रफी.चित्रपट-सुवर्ण सुंदरी.संगीत-आदि नारायण राव (१९५७) 'प्रेम जोगन बनके' उस्ताद बडे गुलाम अली खान.चित्रपट-मुगले आजम.संगीत-नौशाद (१९६०). (या चित्रपटा संबंधात अनेक किस्से प्रचलित आहेत. चित्रपटाचे निर्माता निर्देशक के.आसिफ यांनी संगीतकर म्हणून नौशाद यांची निवड केली.त्यावेळी नौशाद फिल्म इंडस्ट्रीत जवळ जवळ वीस वर्षांपासून काम करीत होई.सफल ससंगीतकर म्हणून त्यांना ओळखले जात होते.या वेळेपर्यंत त्यांनी जवळ जवळ पन्नास चित्रपटांना संगीत दिले होते. त्यातील सर्वच गाणी लोकप्रिय झाली होती.बैजू बावरा,मदर इंडिया सारखे सफल चित्रपट त्यांच्या नावावर होते.त्यामुळे सर्व निर्मात्यांची संगीतकार म्हणून पहिली पसंती त्यांना असायची.के. आसिफ यांनी जेव्हा उस्ताद बड़े गुलाम अली खान यांना चित्रपटात गायची विनंती केली तेव्हा खान साहेबांनी साफ नकार दिला.चित्रपटात गायची बिलकुल इच्छा नसल्याचे सांगितले. यावर के.आसिफ यांनी मागाल तेवढे मानधन देण्याचे कबूल केले.त्यावेळी बड़े गुलाम अली खान यांनी २५००० रुपये मानधन सांगितले.त्या काळी मोठ्यातला मोठा गवैय्या ५०० रुपयांच्या वर मानधन घेत नसे.पण के.आसिफ यांनी २५००० रुपये देऊन त्यांच्याकडून गाऊन घेतले.) 'झुमती चली हवा' मुकेश.चित्रपट-संगीत सम्राट तानसेन (१९६२) 'कही दीप जले कही दिल' लता.चित्रपट-बीस साल बाद (१९६२) 'जीवन ज्योत जले' आशा भोसले.चित्रपट-गृहस्थी. संगीत-रवी (१९६३) 'कान्हा रे कान्हा' लता. चित्रपट-ट्रक ड्रायव्हर. संगीत-सोनिक ओमी (१९७०) ● मराठी... 'जिवलगा कधी रे येशील तू' आशा भोसले. चित्रपट-सुवासिनी.संगीत-सुधीर फडके (१९६१) 'सख्या रे घायाळ मी हरिणी' लता. चित्रपट-सामना. संगीत-भास्कर चंदावरकर (१९७४) 'नंदाघरी नंदनवन फुलले' भावगीत -सुमन कल्याणपूर. ------------------------------------- दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र'पुरवणी.रविवार दि.१०.१०.२०२३.

Saturday, September 2, 2023

राग_रंग (लेखांक २२) दुर्गा...

स्त्रीलिंगी नाव असलेल्या 'कलावती','सरस्वती','बागेश्री', 'धनाश्री','मधुवंती','रागेश्री' 'सावनी','भैरवी' अशापैकीच एक राग 'दुर्गा'! नाव जरी स्त्रीलिंगी असले तरी ह्या रागांना 'ही' राग न म्हणता 'हा' राग असे पुल्लिंगीच संबोधल्या जाते.ही पण एक गंमत आहे. हा राग बिलावल थाटातून निर्माण झालेला मधुर राग आहे.बिलावल थाटाने भारतीय शास्त्रीय संगीताला मोहून टाकणारे खूप राग बहाल केले आहेत.त्यातीलच अतिशय साधा,सोपा पण गोड असा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ‘दुर्गा’ हा राग आहे. बिलावल थाटाचे पूर्वीचे ग्रंथातील नांव, ‘धीरशंकराभरण’ हेआहे. या थाटातून बावीस रागांची निर्मिती होते, असे ग्रंथकार सांगतात. रात्री गायल्या जाणाऱ्या रागातील लोकांना आवडणारा, मधुर वाटणारा हा राग आहे. या रागाची प्रकृती गंभीर म्हणता येणार नाही, किंवा चंचल म्हणता येणार नाही. कर्नाटक संगीतातील ‘शुद्ध सावेरी’ या रागाशी साधर्म्य सांगणारा हा राग, मात्र दोन्ही रागांचे चलन वेगळे आहे. कर्नाटक संगीतातून जरी हा राग आला असला, तरी उत्तर हिंदुस्थानी संगीतात चांगलाच लोकप्रिय झाला आहे.खरे म्हणजे संगीताच्या शैली जरी भिन्न असल्या तरी भेद केवळ दोनच असते. ते म्हणजे,चांगले वा वाईट.म्हणून शैलींमुळे नाही तर खास विशेष गुणांनी कलांना महान बनविल्या जाते असे म्हटले तर वावगे होणार नाही. संगीताचा मुख्य आधार नाद आहे.ज्याला मनुष्य आपल्या कंठाद्वारे व विविध वाद्यांद्वारे उत्पन्न करतो.या नादाचे नियम काही सिद्धांतानुसार करण्यात आले असून, या सिंद्धांताच्या आधारावर संगीतातील सात स्वरांची निश्चिती करण्यात आली आहे.आणि तेच संगीत कलेचा प्राण आहे.संगीताचे मुख्य माध्यम स्वर आणि लय हे आहे.हे माध्यम अतिशय आंतरिक आहे.आपणाला यास बाहेरून एकत्र करायची गरज पडत नाही.तसेच संगीतामध्ये दोन अशा विशेषता आहे,की ज्या दुसर्‌या कोणत्याच कलांमध्ये नाहीत.त्यातील एक आहे ’काकु’.काकु हा शब्द ’के’ धातुपासून उत्पन्न झाला आहे.ज्याचा अर्थ आहे ’लोकोपतापयोः...’ म्हणजे ध्वनीची हृदयापासून निघणारे सुक्ष्मभाव व्यक्त करण्याची क्षमता...! ही शक्ती किंवा क्षमता फक्त ध्वनी किंवा स्वरातच आहे,शब्दात नाही.दुसरी विशेषता ही आहे,की ध्वनीमध्ये कर्षण (ताणणे)गूण आहे.याला आपण कितीही मात्रांपर्यंत ओढू (ताणू) शकतो.शब्दाला जर जास्ती ओढ दिली तर शब्दत्वाची हानी होऊन त्याचे ध्वनीत परिवर्तन होते.या दोन विशेषत्वामुळे संगीतामध्ये जी सुक्ष्म भाव व्यक्त करण्याची शक्ती येते ती अन्य कोणत्याच कलांमध्ये नाही.स्वरांमध्ये जो सलगपणा (Immediacy) आहे तो अन्य कोणत्याच माध्यमात नाही.शब्दाच्या भावाभिव्यक्तित अडथळा येऊ शकतो परंतू स्वरांच्या भावामध्ये तो येत नाही.ही एक सरळ भाषा आहे.जिचा उपयोग पशु-पक्षी सुद्धा करतात.ध्वनीचे वैशिष्ठ्य म्हणजे ती एका हृदयातून निघते आणि दुसर्‌या हृदयात पोहोचते..शब्दांना समजणे कठीण जाऊ शकते पण स्वर म्हणजे मानवाची मातृभाषा आहे.त्याची अभिव्यक्ती हृदयातून होते आणि त्यामुळेच या भाषेने पशु-पक्षी सुद्धा प्रभावित होतात..असो! दुर्गा रागात गांधार व निषाद वर्ज असल्यामुळे याची जाती औडव औडव आहे.यात सर्व स्वर शुद्ध आहेत.वादी स्वर धैवत असून संवादी स्वर रिषभ आहे.गानसमयरात्रीचा पहिला प्रहर. हा पूर्वांगप्रधान राग आहे.संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक-वादक अत्यंत सोप्या अशा या रागातून काय अप्रतिम चित्र उभे करतात,ते त्यांच्या गायन,वादनातून दिसून येते.या रागातली 'गावत दुर्गा रागिनी’ हे पं. शंकरराव व्यास, यांनी रचलेले लक्षणगीत व "सखी मोरी रुमझुम...' ही प्रसिद्ध बंदिश शास्त्रीय संगीताच्या रसिकांनी नक्कीच ऐकली असेल.सा रे म प ध सा इतक्याच स्वरात रंगणाऱ्या या रागात विविध स्वरांच्या मुर्छना केल्या तर वेगवेगळे राग आपणास दिसून येतात.जसे:- धैवताला षड्ज मानून दुर्गा रागाचे स्वर घेतले असता 'मालकौंस', रिषभाला षड्ज केल्यास 'धानी', मध्यमाला षड्ज केल्यास 'भूप', पंचमाला षड्ज केल्यास 'मधमाद सारंग'! विभिन्न स्वरांपासून आरंभ होणाऱ्या सप्तकाच्या क्रमशः आरोहावरोहाला 'मुर्छना' असे म्हणतात.संगीतातील 'ग्राम' ही संकल्पना मुर्छना पद्धतीचा आधार आहे. या रागात चित्रपट किंवा इतर गीते फारशी नाहीत.पण जी काही आहेत ती श्रवणीय आहे.तसे पाहिले तर शास्त्रीय संगीत व चित्रपट संगीताचा उद्देश केवळ मनोरंजन असल्याचे दिसून येते.फरक इतकाच की शास्त्रीय संगीत कठीण नियमाच्या साखळीत बांधून रसिकांसमोर येते.या उलट चित्रपट संगीत हलक्या-फुलक्या पद्धतीने आणि चित्रीकरणासह लोकांसमोर आल्यामुळे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते व लोकप्रिय होते.जरी चित्रपटातील गाण्यांचा शास्त्रीय संगीत हा बेस असला तरी मनोरंजनाच्या शर्यतीमध्ये शास्त्रीय संगीत चित्रपट संगीताच्या मानाने मागेच राहते.म्हणजेच फक्त श्राव्यपेक्षा दृक माध्यमांद्वारे संगीत आबाल-वृद्धांच्या अंतर्मनापर्यंत थेटपणे पोहोचते असे बर्नार्ड शा (१९२५ चे नोबेल पुरस्कार साहित्य विजेता महान नाटककार व कुशल राजनीतिज्ञ मानवतावादी व्यक्तित्व), हर्बर्ट रीड (एक इंग्रजी कला इतिहासकार, कवि, साहित्यिक आलोचक आणि दार्शनिक होते),प्लेटो (प्रसिद्ध दार्शनिक) या पाश्चात्य तज्ज्ञांचे म्हणणे बरोबर आहे असे वाटते. दुर्गा राग बहुतेक आजी,माजी कलाकारांनी गायीला व आपापल्या वाद्यांवर अतिशय सुंदर रीतीने सादर केला आहे.याचे सर्व व्हीडिओ युट्युबवर असल्यामुळे आपण बघू शकता. ● चित्रपट गीते... 'ऐ बादे सबा आहिस्ता चल' हेमंत कुमार.चित्रपट-अनारकली.संगीत-सी.रामचंद्र (१९५३). 'ओ दूर के मुसफिर हमको भी साथ ले ले रे' रफी. चित्रपट-उडन खटोला. संगीत-नौशाद (१९५५). 'वृन्दावन का कृष्ण कन्हैया सबकी आंखों का तारा' चित्रपट-मिस मेरी.संगीत-हेमंत कुमार (१९५७). 'चंदा रे मोरी पतीया ले जा' लता,मुकेश.चित्रपट-बंजारन. संगीत-परदेसी (१९६०). 'गीत गाया पत्थरोंने' आशा भोसले,किशोरी आमोणकर,महेंद्र कपूर. चित्रपट-गीत गाया पत्थरोंने.संगीत-रामलाल हिरापन्ना (१९६४). 'जानेवाले ओ मेरे प्राण तेरी खुशी है मेरी बहार' आशा भोसले.चित्रपट-गीत गाया पत्थरोंने.संगीत-रामलाल हिरापन्ना (१९६४) 'हम ईंतजार कंटेंगे तेरा कयामत तक' रफी,आशा.चित्रपट-बहू बेगम.संगीत-रोशन (१९६७). 'सावन का महिना पवन करे सोर'लता,मुकेश. चित्रपट-मिलन.संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल.(१९६७). 'जीवन से ना हार जीनेवाले' गायक,संगीतकार-किशोर कुमार.चित्रपट-दूर का राही (१९७१). 'कहां तक ये मन को अंधेरे छलेंगे' किशोर कुमार.चित्रपट. बातों बातों में.संगीत-राजेश रोशन (१९७९). 'तू इस तरहा से मेरी जिंदगी में शामिल है' मनहर उधास. चित्रपट-आप ऐसे तो न थे.संगीत-उषा खन्ना (१९८०) ●हिंदी... 'हे राम हे राम' भजन-जगजीत सिंग. 'देवी भजो दुर्गा' भजन-मीता पंडित. 'जय जय जय दुर्गे मां भवानी' गायक-डॉ.रामगोपाल त्रिपाठी. ●मराठी... 'कर हा करी धरीला शुभांगी' संगीत नाटक 'संशय कल्लोळ'. 'चंद्रिका ही जणू' संगीत नाटक 'मानापमान'. 'या लता शिकविती गीत' संगीत नाटक 'धाडिला राम तिने का वनी' गायक- नारायणराव बोडस. 'केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा' -सुमन कल्याणपूर. 'पायो जी मैंने राम रतन धन पायो' 'केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली' आशा.सुरेश भट, हृदयनाथ मंगेशकर. --------------------------------------------------------------------------- दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी, रविवार दि.३ सप्टेंबर २०२३.

काट्यांची मखमल..

नुसत्याच तुझ्या हसण्याने...





संगीत आणि साहित्य :