गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, November 26, 2011

गझलवर संगीताचे आक्रमण... किती खरे किती खोटे ?

फुल पातों से नही रंगसे चुना जाता है
भोर हाथोंसे नही तम से बुना जाता है
प्राण की पीर पुकारों मे जगाने वालो
गीत कानो से नही दिल से सुना जाता है...

स्नेहलता स्नेह नावाची ही कवियत्री गीत कसे ऐकावे हे यातून सांगते.कानापेक्षा मनापासून ऐकल्याने कोणत्याही गीत प्रकाराचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेता येतो.पण गझलच्या बाबतीत मात्र यापेक्षा अधिक काही तरी हवे असते. गझल शब्दांदारे असो वा स्वरांद्वारे सरळ ऐकणा-यांच्या मनात उतरायलाच हवी.मग ती कानाने ऐको वा मनाने ! याचाच अर्थ असा,की शब्द आणि स्वरांनी बरोबरीने हातात हात घालून,एकमेकांचा आब राखून खेळत-बागडत, निर्व्याजपणे रसिकांपुढे यायला हवे. गझल गायन हे सुगम गायन नाही.पण लोकांचा तसा समज आहे,किंवा करून दिला गेल्या आहे.सुगम संगीतापेक्षा थोडे हटके असल्यामुळे माझ्या मते याला सुगम-शास्त्रीय किंवा उप-शास्त्रीय म्हणायला हरकत नसावी.सुगम संगीताला गायक,कवी,संगीतकार अशा अनेकांची साथ लाभते.गझल गायकाला मात्र गायक,संगीतकार व वादक (बहुतेक गझल गायक उत्कृष्ट हामोनियम असल्याचे दिसून येते.)अशा तिहेरी भूमिका वठवाव्या लागतात.शास्त्रीय संगीतासोबच भाषेचाही व्याकरणासह सखोल अभ्यास करावा लागतो.आज आपल्यासमोर अनेक गझल गायक आहेत.परंतू बेगम अख़्तर,मेहदी हसन,फ़रीदा खानम,ग़ुलाम अली आणि जगजितसिंग हीच नावे का आठवतात ? याचे कारण त्यांचा शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास,शब्द-स्वरांची समज,स्वतःच स्वतःची विकसित केलेली गान शैली हे आहे.आपल्या देशात इतरही अनेक गायक-गायिका आहेत.परंतू त्यातील कोणी चांगला संगीतकार आहे तर कोणी चांगला गायक.गझल गातांना,गाणा-यातला गायक आणि संगीतकार हे दोघेही समतुल्य आणि समन्वयक असले तरच ते चीरकाल टिकणारी गायकी देऊ शकतात.
    
"दिल--नादाँ तुझे हुआ क्या है
आख़िर इस दर्द की दवा क्या है"

ही गझल अनेक गायक,गायिकांनी गायिली आहे.परंतू काही निवडकच गायकांच्या आवाजात ती श्रोत्याना आवडते.त्यातल्या त्यात मेहदी हसनच्या आवाजाने तर काळीजच पोखरत जाते.गझल मांडणीसाठी स्वरांचा कसा उपयोग करावा याचे हे एक मोठे उदाहरण आहे.शास्त्रीय संगीतातील अविर्भाव-तिरोभाव,मुर्छना आदि प्रकारांचा उपयोग मेहदी हसन आणि जगजितसिंग यांनी जसा केला, तसा इतर गायकांनी केल्याचे आढळत नाही.ग़ुलाम अलींनी हे न करताही गमक,मुरकी,मींड,नोटेशन याचा वापर करून आपल्या गायकीने गझल अत्यंत श्रीमंत करुन ठेवली.बेग़म अख़्तर पर्यंत गझल गायकीवर शास्त्रीय संगीतातील दादरा,ठुमरी,कजरी,चैती या गान प्रकाराची छाप प्रकर्षाने जाणवते.मेहदी हसन,ग़ुलाम अली यांच्याही सुरवातीच्या गझलांवर हा प्रभाव दिसतो.पण अख़्तरी बाईंपेक्षा मेहदी हसन यांनी शब्दांना प्राधान्य देऊन एक एक शब्द सुरांच्या गोलाईने भरून ऐकणा-यांपर्यंत स्पष्टपणे कसा जाईल याचा विचार जास्ती केलेला दिसतो.ग़ुलाम अलींच्या गझल गायनात कधी स्वरांचे प्राबल्य तर कधी शब्दांचे प्राबल्य्र जाणवते.पण एकूणच त्यांच्या गझल गायकीने जनमानसावर मोहिनी घातली आहे.या सगळ्यात जगजितसिंगची गायकी मात्र आणखीनच वेगळी ठरते.काळीज भेदणारा आवाज,उर्दूचा ’सच्चा’लहजा, शास्त्रीय संगीतावरील मजबूत पकड आणि सतत वेगवेगळे प्रयोग करून पाहण्याची मानसिकता यामुळे त्यांच्या तुलनेत भारतातील इतर गझल गायकांचा विचार केला तर त्यांच्या उंचीला कोणीच पोहिचले नाही असे खेदाने म्हणावे लागते.(या बद्दल दुमत असू शकते.)चित्रा सिंगच्या बाबतीत काहीही प्रवाद असले तरी तिने गायिलेल्या मिर्झा ग़ालिबया मालिकेतील गझला काळजाला भेदून जातात.या दोघांचे गझल गायकीतील योगदान विसरता येण्यासारखे नाही.अनूप जलोटानेही सुरवातीच्या काळात सुंदर गझला रसिकांना दिल्या.तसेच सर्वसामान्यांपर्यंत गझल पोहचवण्याचे काम पंकज उधास यांनी केले आहे.
              मेहदी हसन,ग़ुलाम अली आणि जगजितसिंग या तीन गायकांनी गझल मांडणीसाठी केलेला स्वराविष्कार आणि विचार अतिशय प्रबुद्ध आहे.शब्दातील भावपक्ष कायम ठेवून शेर मांडणे,योग्य ठिकाणी जोड रागांचा वापर करणे,शेरांची मांडणी करतांना मध्यस्थ स्वरांचे महत्व जपणे,अफाट मेहनत,सुक्ष्म विचार,ताल-स्वरांची सौंदर्य दृष्टी ह्या यांच्या गझल गायनातील अतिशय महत्वाच्या आणि भक्कम बाबी आहेत.त्यामुळेच स्नेहलता स्नेहच्या म्हणण्याप्रामाणे कानो से नही दिलसे सुननेवालीबात,इतर गीतांच्या बाबतीत लागू होईल पण गझलच्या बाबतीत सगळी जबाबदारी ऐकणा-यांवर टाकणे मला पटत नाही.’ग़ज़ल अपने आप दिलमें उतरनी चाहीए’. ती उतरण्यासाठी त्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचायला हवी.त्यातही मार्केटिंगहा महत्वाचा पैलू आहेच...आजच्या काळात हे ही जमायला हवे,व ते ही जमायला हवे.उलट मी असं म्हणेन की ’ते’ नाही जमले तरी ’हे’मात्र जमायलाच हवे....नाही तर त्याचा सुधाकर कदम झाल्याशिवाय राहात नाही....हुसैन बख्श हा माझा आवडता गझल गायक आहे.पण आज तो किती जणांना माहित आहे ? असो...
              माझी गझलशी तोंड ओळख १९६६/६७ च्या दरम्यान यवतमाळला आँर्केस्ट्रा मध्ये असतांना झाली.प्रँक्टीस संपल्यावर रात्री १२/१ च्या नंतर पाकिस्थान रेडिओ लावून गप्पा मारत बसणे,जेवणे वगैरे चालायचे.सकाळी ४/५ ला सर्वजण आपापल्या घराकडे निघाल्यावर झोपायचे,असा आमचा ’रात्र’क्रम होता.त्यावेळी बरकत अली खान,अमानत अली खान,मुन्नी बेगम,इक्बाल बानो,मल्लिका पुखराज,सलामत-नज़ाकत अली, मेहदी हसन,नुरजहान नंतर नंतर ग़ुलाम अली,यांचे गझल गायना सोबतच शास्त्रीय संगीत सुद्धा मनसोक्त ऐकायला मिळाले.त्या काळात रेडिओला पर्याय नव्हता व रात्री फक्त पाकिस्थान रेडिओच सुरु राहात असे.त्यामुळे सतत ऐकून ऐकून मेहदी हसनशी तेव्हा झालेली मैत्री आजतागायत कायम आहे.मेहदी हसन नंतर माझे टाळके सरकवले ते ग़ुलाम अली आणि जगजितसिंग यांनी...दोघांच्या दोन त-हा...पण दोन्हीही काळजात हात घालणा-या.गुलाम अलीच्या गळ्यात हार्मोनियम फिट केली की काय असे वाटावे इतका तयार गळा,हार्मोनियमवर फिरणारी बोटे व डोक्यातील कल्पना सगळे एकजीव होऊन इतक्या आक्रमकपणे पुढे येई की चांगल्या चांगल्या गायक,वादक आणि संगीतकारांनी सुद्धा आश्चर्याने तोंडात बोट घालावे.या उलट जगजितसिंगचे...यांना ऐकणे माझ्यासारख्या खेडे गावात राहणा-याला खूप कठीण जायचे.पुढे पुढे रेकाँर्ड प्लेअर,कँसेट प्लेअर आल्यामुळे या मंडळींना ऐकणे सोपे झाले. आँर्केस्ट्राच्या या काळात गझलने केलेले गारूड मला गझल गायकीकडे घेऊन जाईल असे कधीच वाटले नाही.पण सुरेश भटांची भेट झाली आणि मी मराठी गझल गायकीत स्वतःला झोकून दिले.
        सुरेश भट व डाँ.नईमभाई यांच्यामध्ये अमरावतीत रंगलेल्या चर्चांमुळे माझा गझलचा अभ्यास आपोआप होत गेला, त्यांनी भटांना इस्लामपूर्व गझलेचा शेर काढून दिला त्या प्रसंगी मी आणि भटांचे जीवलग मित्र वलीभाई उपस्थित होतो.मलाही ख-या अर्थाने गझल कळली ती या दोघांच्या चर्चेतून आणि त्यानंतर भटांसोबतच्या बैठकीतून... या बैठकांमध्ये उर्दू गझल व मराठी गझल याची तुलनात्मक चर्चा,त्यातून येणारे नवनवीन मुद्दे,माहिती,बहर,व्याकरण,रदीफ,काफिया,मिसरा,उर्दू गझल गायकांची गायकी,शब्दफेक,स्वररचना,गाण्याच्या पद्धती वगैरे-वगैरे अनेक विषयांवर रात्र-रात्रभर खल चालायचा.सुरेश भट आर्णीला मुक्कामी असले की या चर्चेत कवी कलीम खानही सहभागी व्हायचे.(माझ्या बहुतेक कार्यक्रमाचे सूत्र संचालन कलीम खान करायचे.ते स्वतः उर्दू,मराठीचे जाणकार असून उत्कृष्ट कवी आहेत.आपल्या माहितीसाठी या लेखाच्या शेवटी त्यांच्या रचना देत आहे.)त्यावेळी गझलशिवाय दुसरा विषय नसायचा.मराठी गझल गाणा-यांपासून लिहीणा-यांपर्यंत सा-यांवर ही चर्चा असायची. या चर्चेत गाणा-यांनी लिहीणा-यांवर किंवा लिहीणा-यांनी गाणा-यांवर अतिक्रमण करण्याचा विषय कधीच पुढे आला नाही.मात्र काही वर्षांपुर्वी एका पुस्तकात "संगीताचे गझलेवरील अतिक्रमण" या लेखावरील भाष्य वाचल्यापासून त्यावर लिहावे-लिहावे करता करता जवळ-जवळ सहा वर्षानंतर लिहून झाले
.ते आपणासमोर ठेवत आहे.नीर-क्षीर विवेक बुद्धीने या लेखावर आपल्या प्रतिक्रीया नोंदवाव्या,ही विनंती.

         त्या लेखावरील भाष्यात गायकांवर गझल हडपण्याचा आरोप केला आहे
. तो मला मान्य नाही. कारण गायक ही माझी गझल आहे असे कधीच म्ह्णत नाही. तो कवीच्या नावाचा उल्लेख करतोच. गेल्या ३५/४० वर्षांच्या कालावधीत मी अनेक कवींच्या रचना स्वरबध्द केल्या, गायिलो,गाऊन घेतल्या आणि अजुनही गाऊन घेत आहे.परंतू कवीच्या नावाचा उल्लेख करूनच. जगजितसिंगची गझल, मेहदी हसनची गझल असा उल्लेख श्रोते करतात, गायक नाही ! त्यामुळे याला जबाबदार गायक होवू शकत नाही. आणि श्रोत्यांचीही फार मोठी चूक होते, असे नाही. ज्या गायकाच्या तोंडून ती श्रोत्यांच्या कानावर पडून लोकप्रिय होते. ती गझल कोणी लिहीली याच्याशी श्रोत्यांना काहीच देणे घेणे नसते. ज्याच्या तोंडून ऐकली असेल त्याचेच नाव ऐकणा-यांच्या तोंडी बसते.त्याला काहीच इलाज नाही. चिकीत्सक जाणकार किंवा रसिक मात्र ती गझल कोणी लिहीली हे माहिती करून घेतात. या प्रकाराला अतिक्रमण म्हणावे का ? तसेच "आशयप्रधान गायनात संगीताला फ़ारसा वाव नसावा" असेही म्हटल्या जाते. यालाही तसा कही फारसा अर्थ नाही.कारण शब्दांना स्वरांचे योग्य अवगुंठन बसले तर ज्या रचना नुसत्या वाचून लोकांच्या मनाचा ठाव घेवू शकत नाही त्या रचना लोकांना आवडायला लागतात, हा माझा अनुभव आहे. "या एकलेपणाचा छेडित मी पियानो" ही स्व..रा.गिरींची रचना शब्दानुरुप स्वररचना करुन कार्यक्रमात सादर करायला लागल्यानंतर प्रत्येक कार्यक्रमात फ़रमाईश व्हायला लागली. तो पर्यंत ही रचना लोकांना माहितही नव्हती. त्यामुळे मला वाटते की कवी आणि रसिक यांच्यातील माध्यम किंवा दुवा हा गायक असतो. त्यामुळे त्याला कोणत्याही काव्य प्रकारावर अतिक्रमण करण्याची गरज नाही. सुरेश भटांची "हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही" ही गझल आणि माझी चाल एक रात्रीत तयार झाली. ती गझल भटांची आहे हे कार्यक्रमात सांगूनही सुधाकर कदमची हे तुझे अशा वेळी ऐकली काअसे जर श्रोते म्हणत असतील तर त्यात माझा काय दोष ? त्याला लुटारुपणा म्हणावा का ? शब्दाला पोषक स्वर किंवा स्वराला पोषक शब्द हा सुगम संगीताचा महत्वाचा पैलू आहे. गझल गायनही सुगम संगीत प्रकारामध्येच मोडते. त्यामुळे थोडे फार इकडे-तिकडे होणारच.आणि फारच गंभीरपणे विचार केला तर संगीताच्या अभिव्यक्तीला शब्दांच्या कुबडयांचीही गरज नाही हे वाद्यसंगीतावरून कोणाच्याही लक्षात येईल. तसे नसते तर ४०/४२ वर्षांपुर्वीची "काँल आफ दी व्हँली" ही संतूर,बासरी आणि गिटार या वाद्यसंगीताची रेकाँर्ड लोकप्रिय झालीच नसती.(या रेकाँर्डने त्यावेळचे विक्रीचे सर्व उच्चांक मोडीत काढले होते.) सरोद,सितार,संतूर,बासरी,शहनाई,व्हायोलिन वैगरे वाद्यांना कुठे शब्दांची गरज असते ? बिना शब्दांनीसुद्धा ते श्रोत्यांना मोहवितातच ना ? त्यामुळे गझलेवर संगीताचे अतिक्रमण वगैरे या भाष्याला फ़ारसा अर्थ राहात नाही. हा, हे मात्र खरे की गायकाने शब्दानुरुप स्वररचना करायला हवी. कवीला काय म्हणायचे ते श्रोत्यांपर्यत स्पष्टपणे पोहोचवायला हवे. शब्दोच्चार स्पष्ट असावे. आणि कवीच्या नावाचा उल्लेख करायलाच हवा,हे माझे मत आहे.
          शास्त्रीय संगीत लोकसंगीतापासून तयार झाले. सुरवातीच्या काळात शब्दांशिवाय गुणगुणणे असा प्रकार होता. हळु हळू गुणगुणण्यासोबत शब्दांचाही वापर व्हायला लागला. आणि नंतरच्या काळात लोकगीतांच्या सुरावटीवरुन संगीताचे व्याकरण तयार होवून किंवा राग निर्मिती होवून व्याकरण तयार झाले. अजूनही राग निर्मिती करणा-यांची नावे कोणालाच माहित नाही. आणि श्रोत्यांना त्याच्याशी देणे घेणेही नसते. "भीमसेनचा तोडी ऐकला का" ? "जसराजचा दरबारी ऐकला का" ? किंवा "किशोरीचा भुपाली खरोखरच ऐकण्यासारखा आहे". असेच उद्गार ऐकणा-यांच्या तोंडून निघतात. म्हणून काही या मंडळींनी यावर अतिक्रमण केले असे म्हणता येणार नाही. माझ्या दृष्टीने गायक हा फ़क्त माध्यम असतो. त्याची प्रस्तूती ही त्याच्या प्रकृतीनुसार असते. एकच राग विभीन्न गायकांच्या गळ्यातून वेगवेगळी अनुभूती देत जातो. तसेच वेगवेगळे गझल गायक जरी एकच गझल गात असले तरी त्यांची स्वर रचना, त्यांच्या ढंग,त्यांचे सादरीकरण वेगळे राहणारच. या सर्व बाबींवरुन कोणी कोणावर अतिक्रमण करीत आहे असे का वाटावे हे मला कळले नाही. सर्वसामान्य श्रोता ज्याच्या तोंडून जे ऐकले त्याचे श्रेय गाणा-याला देतो यात अतिक्रमण वगैर प्रकार नाही. जर एखादा गायक दुस-या कवीची रचना आपल्या नावावर खपवत असेल तर त्याला आपण अतिक्रमण किंवा तस्करी म्हणू. जाणकार आणि सर्वसामान्या श्रोता, यातील जाणकार हा गझलकाराचे नाव लक्षात ठेवेल. पण सर्वसामान्य रसिक मात्र गायकाचेच नाव लक्षात ठेवणार याला गायक तरी काय करणार ? यावर एवढेच म्हणावेसे वाटते की कवी, संगीतकार,गायक यांनी एकमेकांच्या हातात हात घालून मराठी गझल व गझल गायकी पुढे नेण्याचा प्रयत्न करुन मराठी गझलला सोन्याचे दिवस दाखवावे.बस्स..........

सुधाकर कदम
सी१सी/१३,गिरीधर नगर.वारजे-माळवाडी,
मुंबई बंगळूर महामार्ग.पुणे ५८
२६/११/२०११ 
kadamsudhakar59@gmail,com
www.gazalgazal.blogspot.com


(एका रोमँटिक मराठी गझलचा मतला व एक शेर.)

मोगरा वेणीत पोरी माळण्याचे दिवस आले
अन्‌ अता हळव्या जीवांना जाळण्याचे दिवस आले

करुनिया लटकाच आता लक्ष्य नसल्याचा बहाणा
पदर वरती ओढणेही टाळण्याचे दिवस आले...कलीम खान.

(उर्दू गझलचा मतला व काही शेर)

जलाए जब तुम्हे शबनम तो मुझको याद कर लेना
उभर आए पुराना ग़म तो मुझको याद कर लेना

तुम्हारे मन के आंगन में,अकेलेपन के पायल की
कभी होने लगे छम छम,तो मुझको याद कर लेना

भले ही भूल जाओ तुम, मुझे ता-ज़िंदगी लेकिन
सुनो जब मौत की सरगम,तो मुझको याद कर लेना...कलीम खान.




संगीत आणि साहित्य :