गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, June 11, 2023

मल्हार...


बहुत प्रकार अपुल्या देशी मल्हाराचे

मज वेड असे पण आंनद मल्हाराचे

 -सुधाकर कदम

     मल्हार प्रकार वर्षाकालीनआहे असे मानतात.पण का? याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही.या राग प्रकाराचा पाऊस किंवा पावसाळ्याशी तसा काहीच संबंध नसावा असे मला वाटते.'दीप' रागाच्या संदर्भात जशी मिथके पेरली तशीच मल्हार प्रकारामध्ये सुद्धा पेरल्या गेली आहेत.जर 'मल्हार' प्रकारातील गायनामुळे पाऊस पडत असेल तर अवर्षणग्रस्त भागात जाऊन कुणी मल्हार गाऊन पाऊस का पाडत नाही?आणि हा प्रकार पावसाळ्यातच का गातात? इतर ऋतूमध्ये तो गायिल्या जात नाही काय?असे अनेक प्रश्न मला पडले आहे.(दीप राग गायिल्याने दिवे पेटतात, अंगाचा दाह होतो आणि मेघमल्हार  गायीला की दाह शांत होतो.तसेच ताना-रिरी नावाच्या दोन भगिनी नदीवर घागर भरताना झालेल्या डुबुक डुबुक आवाजातून मेघ मल्हाराचे स्वर मिळणे', हे वैज्ञानिक कसोटीवर कसे तोलायचे? रागांना काळ-वेळात बांधणे मला अनैसर्गिक वाटते.तानसेन 'संगीत सम्राट' होते हे मान्य! (मी ग्वाल्हेरला जाऊन त्यांच्या मजारी समोर नतमस्तक झालो होतो.) पण त्यांचा मोठेपणा अधिक गडद करण्यासाठी असली मिथके तयार करणे मला तरी योग्य वाटत नाही.बरे, तानसेनाच्या अगोदर किंवा नंतर हा चमत्कार घडल्याचा कुठेच उल्लेख नाही.) मुळात कोणताही राग व सुरावटी भक्कम तयारीनिशी केव्हाही चखलपणे गायिल्या/वाजविल्या गेल्या तर त्या गोड वाटणारच! तसे नसते तर सुगम संगीतात झालेल्या अनेक रचना बारमाही गोड वाटल्याच नसत्या.यावर शास्त्रीय संगीतातील शास्त्री सहमत होणार नाही.पण त्यांनीही यावर जरा डोळसपणे विचार करायला हरकत नाही.यात मी शास्त्रीय गायकांना किंवा अभ्यासकांना कमी लेखतो असा गैरसमज कोणी करून घेऊ नये.कारण इतर गायनशैली सुद्धा शास्त्रीय संगीताचाच आधार घेते हे खरे आहे. पण शास्त्रीय संगीताची निर्मिती लोकसंगीतामधूनच झाली हे पण तेवढेच सत्य आहे.आणि ते केव्हाही गोडच वाटते.

     मल्हाराचे अनेक प्रकार आहेत.शुद्ध मल्हार,पट मल्हार,मेघ मल्हार,सूर मल्हार,गौड मल्हार,नायकी मल्हार,कानडा मल्हार,मीराबाई की मल्हार,धुलिया मल्हार,चरजू की मल्हार वगैरे वगैरे. 'मियाँ की मल्हार' त्यातीलच एक पण लोकप्रिय राग आहे.मल्हार 'देस अंग','कानडा अंग','गौड अंग' अशा तीन अंगाने गातात.दक्षिण भारतीय मल्हारचा उत्तर भारतीय मल्हारशी स्वरांच्या दृष्टीने तिळमात्रही संबंध नाही.मल्हार प्रकारावर अनेक प्रबंध लिहिल्या गेले. संशोधन झाले.या संदर्भात संशोधकांनी आपापली मते मांडली.'मेघ' रागासोबत 'मल्हारी' हे नाव पण समोर आलेले दिसते.तसेच महाराष्ट्रात 'मल्हारी मार्तंड' नावही प्रचलित आहे.पण या दोन्हीचा मल्हार राग प्रकाराशी तसा काहीही संबंध नाही.

     मल्हार प्रकारातील अनेक मल्हार लोकप्रिय आहेत.पण मला अतिशय भावला तो किशोरी आमोणकरांचा 'आनंद मल्हार.' आणि तो त्याच गाऊ जाणे.पंडित भीमसेन जोशींचा मियामल्हार ऐकणीयच... मोठा ख्याल झाल्यावर छोट्या ख्यालामधील विजेच्या गडगडासारख्या कडकडणार्‍या ताना आणि स्वरांचे बेहेलावे एखाद्या धबधब्याखाली बसल्यावर अंगावर पडणार्‍या जलप्रपाताप्रमाणे चिंब-चिंब करून टाकायचे.पण तेथे चिंब होण्याकरीता ’चातक’ बनून वाट बघावी लागायची.सुगम संगीत वा गझल गायन ऐकताना ही वाट बघण्याची प्रक्रिया म्हणा किंवा अंतराय म्हणा कमी लागतो.अर्थात सुगम संगीत वा गझल गायकी आणि शास्त्रीय गाणे बजावणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.पण गझल गायकी म्हणजे 'गागर मे सागर' असे मोठमोठे गायक सुद्धा म्हणायचे.

    

     आता हेच बघा ना ’एक बस तू ही नही मुझसे खफा हो बैठा’ ही गझल मेहदी हसन यांनी मियामल्हार मध्येच त्यांच्या ढंगात पेश केलेली गझल असो वा जगजीत सिंग यांची 'फिर पानी दे मौला' असो...दोघांचाही बाज वेगवेगळा आहे.या दोन्ही गायकांची खासियत म्हणजे त्यांचा खर्ज.मंद्र सप्तकातील त्यांची कारागिरी सरळ हृदयाला भेदून जाणारी आहे.मग जगजित यांचे ’फिर पानी दे मौला’ असो की मेहदी हसन यांचे’मुझसे खफा हो बैठा’ इथे मात्र एकदम बरसातच!असो...

 ●हिंदी

          चित्रपटांमध्येही या रागाचा तुरळक प्रयोग झालेल आहे.वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं,वाणि जयराम यांनी गायिलेल गुड्डी चित्रपटातील ’बोल रे पपीहरा..’ हे अतिशय सुंदर आणि लोकप्रिय झालेलं गाणं...परंतू मला मन्ना डे यांच्या प्रायव्हेट अल्बमधील ’नाच रे मयूरा...’हे गीत अतिशय आवडतं.'लपक झपक तू आ रे बदरवा' (मल्हार रागावर आधारित मन्ना डेंनी गायिलेले विनोदी गीत) चित्रपट-बुटपॉलिश.'ना ना ना बरसो बादल' (मियाँ मल्हार) चित्रपट-सम्राट पृथ्वीराज चौहान. 'भय भंजन वंदना सुनो हमारी' (मियाँ मल्हार) चित्रपट-बसंत बहार.'करो सब निछावर'(मियाँ मल्हार) चित्रपट-सह्याद्री की लडकी. 'नाच मेरे मोर जरा नाच' (मियाँ मल्हार) चित्रपट-तेरे द्वार खडा भगवान. 'बरसो रे बरसो रे' (मेघ मल्हार) चित्रपट-तानसेन.'दुख भरे दिन बिते रे भैय्या' (मेघ मल्हार) चित्रपट-मदर इंडिया.'तन रंग लो जी आज मन रंग लो' (मेघ मल्हार) चित्रपट-कोहिनूर.'हाले दिल युं उन्हें सुनाया गया' (मियाँ मल्हार) चित्रपट-जहांआरा. 'अंग लग जा बालमा' चित्रपट-मेरा नाम जोकर.'छायी बरखा बहार,पडे अंगना फुहार' (सूर मल्हार) चित्रपट-चिराग.'बोल रे पपिहरा' (मियाँ मल्हार) चित्रपट-गुड्डी. 'कहां से आये बदरा' (मेघ मल्हार)

'बिजुरी चमके बरसे मेहा' (मियाँ मल्हार)'बरसों रे मेघा मेघा (मेघ मल्हार) चित्रपट-गुरू. 'घिर घिर आये बदरिया' (मियाँ मल्हार) चित्रपट-सरदारी बेगम. 'बादल उमड बढ आये' (मियाँ मल्हार) चित्रपट-साज.'काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ'...लगान.'मल्हार' (अल्बम) मियाँ मल्हार,

गायक-मामे खान,मनीषा अग्रवाल.'मेरे ती गिरीधर गोपाल' लता मंगेशकर. (मियाँ मल्हार).'घन गरजत बादर आये'

(मियाँ मल्हार,कोक स्टुडिओ) आयेशा ओमर,फ़रिहा परवेज,झारा मदानी.

●मराठी

'आज कुणीतरी यावे' (मियाँ मल्हार) चित्रपट- मुंबईचा जावई. 'घन घन माला' (मियाँ मल्हार) चित्रपट-वरदक्षिणा. 'जन पळभर म्हणतील हाय हाय' (मियाँ मल्हार) भावगीत.

'जिवलगा कधी रे येशील तू' चित्रपट-सुवासिनी.'सावन घन गरजे बजाये' नाटक पंडितराज जगन्नाथ,गायक-प्रसाद सावकार. 'माना मानव वा परमेश्वर' (मियाँ मल्हार) सुधीर फडके.(याचे गीतकार आणि संगीतकार विदर्भातील अमरावतीचे मनोहर कवीश्वर होते.) 'कुहू कुहू कुहू येईल साद' अनुराधा पौडवाल. 'मेघा नको बरसू अता' जयंत मल्हार रागावर आधारित अप्रतिम मराठी गीत.अल्बम-घन घुंघुरवाळा आला.गायिक-अपर्णा बिवलकर. वरील सर्व गाणी मल्हार प्रकारांवर आधारित आहेत.

      आज आपण जगगितसिंग यांनी गायिलेली निदा फाज़ली यांची ’गरज बरस प्यासी धरती को फिर पानी दे मौला’ ही गझल ऐकू या...यातील व्हायोलिन आणि बासरी या दोनच वाद्याचा वापर हे आणखी एक वैशिष्ठ्य आहे.त्यातल्या त्यात व्हायोलिन तर थेट भिडणारेच...तसेच नेहमीचा केरवा ताल येथे वेगळ्या पण गझलेला पूरक पद्धतीने शब्दांसोबत चालत (ठुमकत-ठुमकत) आपल्या समोर आलेला दिसून येतो.हे ही जग्गूभाईंचे वैशिष्ठ्य आहे...

       याच रागातील मेहदी हसन यांनी गायिलेली  फरहत शहज़ात यांची अतिशय सुंदर अशी  ’एक बस तू ही नही मुझसे खफा हो बैठा’ ही गझल ज्यांना रागविस्ताराच्या आलापासह (Live) ऐकायची असेल युट्युबवर जाऊन सर्च करावी व आनंद घ्यावा.

       

(शास्त्रीय गायक/वादकांची 'स्पेसिफिक' अशी नावे सांगण्याची गरज नाही.कारण नेटवर सहज सापडतात.पण सुगम संगीतातील नावे सांगावी

लागतात.)

-------------------------------------------------------------------------

दैनिक उद्याचा मराठवाडा,रविवार दि.११ जून २०२३






संगीत आणि साहित्य :