● शिकवण सुहासिनीची ●
ऑर्केस्ट्रामध्ये असल्यापासून शंकर उर्फ बाबा बडे आणि मी काहीतरी वेगळे करण्याचे ठरविले होते.या उर्मीतून बाबा कविता करायला लागला व मी कवितांना स्वरबद्ध करायला लागलो.खरे म्हणजे बाबाला नट व्हायचे होते व मला संगीतकार! बाबाचे यवतमाळला ड्राय फ्रुटचे दुकान होते.मी आर्णीला संगीत शिक्षक म्हणून नोकरी करीत होतो.ऑर्केस्ट्रा सोडल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत दोघेही आपापल्या ध्येयप्राप्तीसाठी मुंबापुरीला जाऊन विविध स्टुडिओ, दूरदर्शन, संगीतकार वगैरेंचे उंबरठे झिजवित होतो.मुक्काम कल्याणला बाबांच्या जावयाकडे.दर उन्हाळ्यात हेच...एका सुट्टीमध्ये मुंबई दुरदर्शनला भेट दिली.तेथे निर्माती सुहासिनी मुळगावकर यांची भेट झाली.सुहासिनी मुळगावकर हे खूप मोठे व प्रासिद्ध नाव.त्यांना आम्ही आमचा परिचय दिला.व ऑर्केस्ट्रातील आमचे काम व अनुभव सांगितला. बाबाने एक विनोदी वऱ्हाडी कविता पण ऐकविली.मी ज्या ज्या कवींच्या रचना स्वरबद्ध केल्या त्या त्या कवींची नावे त्यांना सांगितली.पण यावर त्यांचे म्हणणे असे:-
'आपण विदर्भात प्रसिद्ध आहात याला काही पुरावा आहे काय? असल्यास दाखवावा.'
आम्ही तर असेच सडे-फटींग गेलो होतो.व पुरावा द्यायचा म्हणजे नेमके काय करायचे ते पण कळेना.शेवटी हिय्या करून मी त्यांना विचारलेच की,पुरावा द्यायचा म्हणजे काय करायचे?
त्या म्हणाल्या,'म्हणजे तुमच्या कार्यक्रमाच्या बातम्यांची काही वर्तमानपत्रातील कात्रणे,कार्यक्रमांच्या जाहिरातीची पॅंपलेट्स वगैरे वगैरे!'
आमच्याकडे हे काहीच नव्हते.त्यामुळे मी त्यांना 'व्हाईस टेस्ट' घ्यावी अशी विनंती केली.त्यावर त्यांनी केळकर नामक एका व्यक्तीकडे पाठविले.त्यानेही थातूर-मातूर 'टेस्ट' घेऊन आमची बोळवण केली.आम्ही पुनः सुहासिनीकडे आलो.त्यांनी 'लवकरच आपणास कळवू' असे सांगून बाहेरचा रस्ता दाखविला.या प्रसंगामुळे दोघांनाही खूप वाईट वाटले.पण एक शिकवण मात्र मिळाली की,आपल्या संदर्भातील प्रत्येक बाब,मग ते वर्तमानपत्रातील बातमीचे कात्रण असो,छायाचित्र असो, कार्यक्रमाच्या जाहिरातीचे पॅंपलेट असो एकूण एक बारीक-सारीक गोष्टींचे '#डॉक्युमेंटेशन' करून ठेवणे!म्हणून मग हे कार्य सुरू केले.त्यातीलच मराठी गझल गायकीच्या संदर्भातील नागपूरच्या नवभारत टाइम्स ह्या हिंदी वर्तमानपत्रात आलेल्या १९८० मधील बातमीच्या सोबत दिलेल्या कात्रणा पासून संग्रह करायला सुरुवात केली.(यावेळी म्हणजे १९८० मध्ये मी फक्त मराठी गझल गायनाचा तीन तासांचा कार्यक्रम करीत होतो.)
----------------------------------------------------------------------------
दैनिक विदर्भ मतदार,रविवार दि.१९ एप्रिल २०२६ (अक्षयतृतीया)





No comments:
Post a Comment