’देव’ ही संकल्पना माणसानं आपल्या एकटेपणावर,अचानक कोसळणार्या संकटांवर मात करण्याचं बळ मिळावं,आपलं दुःख हलकं करण्यासाठी एक मानसिक आधार हवा म्हणून निर्माण केली.त्याला तितपतच महत्व देणं ठीक.परंतूपुढे त्याचे अवडंबर माजवून कहींनी त्याचा धंदा मांडला,काहींनी तर त्याच्या भीतीनं इतरांचं शोषण,लुबाडणूक सुरू केली.संकटसमयी देवाचा धावा करून त्या द्वारे त्या संकटाशी सामना करायची शक्ती मिळवणं ठीक;परंतू त्याचं परावलंबित्व पत्करून,त्याच्या नसलेल्या अस्तित्वावर भार टाकून आपलं भवितव्य त्याच्या स्वाधीन करणं कितपत योग्य आहे ?
-विद्या बाळ-
...विज्ञानाकडून विभूतीकडे वळून बुवाबाजीच्या नादाला लागून कितीतरी जण लुबाडल्या गेलेत.जिवाला मुकलेत...विज्ञानावर विश्वास ठेवणे म्हणजे म्हणजे श्रद्धाहीन असणे,असे काहीजण समजतात,ते बरोबर नाही.विज्ञान कुणाला श्रद्धाहीन बनवत नाही,तर श्रद्धा घासून-पुसून उघड्या डोळ्यांनी घ्यायला शिकवतं.आयुष्यातील प्रत्येक गोष्ट खरं तर अशीच घ्यायला हवी.विज्ञानवादी होणं म्हणजे नास्तिकवादी होणही नसतं.
-उत्तम कांबळे-
अंधश्रद्धा
सार्या अंधश्रद्धा
करिती उध्वस्त
आणि अस्तव्यस्त
माणसाला...
भोंदू महाराज
भरावया पोट
धंदा करतात
अध्यात्माचा...
बाबा बापू झाले
व्यवहारी ऐसे
सत्संगाला पैसे
मागताती...
जीवघेणे डाव
टाकोनिया गब्रु
लुटतात अब्रु
आश्रमात...
आपलं रोजचं
रहाट गाडगं
चालण्यासि वेग
स्वतः द्यावा...
यश अपयशा
’तो’चि बा कारक
वाटणं घातक
सर्वालागि...
परावलंबित्व
यातूनच दिसे
भले-बुरे सोसे
तोचि खरा...
देवाला साकडे
घालोनि व्हायचे
तेच होई साचे
प्रत्यक्षात...
चांगला माणूस
म्हणोनि जगावे
आणिक सोडावे
कर्मकांड...
ज्याची भीती वाटे
त्याची भक्ती कशी
हे ही विचारिशी
मनाला गा...
आपल्याला देव
हवा सखारूप
तर ते स्वरूप
स्विकारार्ह...
विसंबल्यामुळे
स्वयं व्यक्तिमत्व
आणिक जे स्वत्व
आकळे ना...
आपुल्या प्रयत्ने
बरे व वाईट
जे काही अफाट
आपुलेच...
भुलणार्या वाटे
जावो नये कोणी
फक्त पस्तावणी
पदरात...
मारुतीची बेंबी
गार गार म्हणे
बोट घातल्याने
विंचू डसे...
दूध, अभिषेक
जेवणाचे ’भोग’
गरीबांना योग
का न येई ?
आपुला आपण
घेवोनि आधार
हा भवसागर
पार करा...
सुधाकर कदम
No comments:
Post a Comment