गझलकट्टा
मराठी गझल गायकीच्या सुरवतीच्या काळात सुरेश भट आणि मी महाराष्ट्रात दौरे करत असताना अधून मधून सुरेश भटांची सासुरवाडी असलेल्या सदाशिव पेठेतील पुण्याच्या पंतांच्या गोटातील चिरेबंदी वाड्यात नवोदित गझलकरांच्या मैफली जमायचा.पुण्यातील आजचे नावाजलेले बहुतेक गझलकार त्यावेळी नवोदित होते.आणि गाणारा मात्र एकमेव मी.त्यामुळे माझ्याशी सगळ्यांचीच घसीट असायची.त्यावेळी मी रमण रणदिवे,इलाही जमादार,अनिल कांबळे, प्रदीप निफाडकर,संगीता जोशी,म.भा. चव्हाण वगैरेंच्या गझला स्वरबद्ध केल्या होत्या.कार्यक्रमात पण गात होतो.तो काळच काही वेगळा होता.सर्वजण मराठी गझलने पछाडलेले होते.माझा मुक्काम जरी सुरेश भटांच्या सासुरवाडीला असायचा तरी नाश्ता, जेवण मला बाहेर करावे लागायचे.भटांना बाहेर जेवायची हुक्की आली तर त्यांच्या सोबत एखादवेळी मी सोबत असायचो.त्यामुळे नवोदित गझकारांनी दिलेले निमंत्रण मी अगत्याने स्वीकारायचो.या काळात अनिल,प्रदीपच्या घरचा पाहुणचार मी चाखला आहे.
माझ्या म.सा.प.च्या कार्यक्रम अगोदर ९ जून १९८२ ला 'गझल संध्या' या शीर्षकाखाली महाराष्ट्रातील पहिला मराठी गझल मुशायरा म.सा. प.ने घडवून आणला होता. अडीच तास चाललेल्या या मुशायऱ्यात तेव्हाचे नवोदित राजेंद्र शहा,ज्योती बालिगा,प्रदीप निफाडकर,सतीश इनामदार,इलाही जमादार,अनिल कांबळे,रमण रणदिवे हे सहभागी झाले होते. समारोप सुरेश भटांच्या गझलांनी झाला होता. या मुशायऱ्याचे खुमासदार सूत्र संचालन मराठी आणि उर्दू शेरोशायरी पेरत डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी केले होते.
१५ जुलै १९८२ चा पुण्याच्या महाराष्ट्र परिषदेने आयोजित केलेला "अशी गावी मराठी गझल" हा मराठी गझल गायनाचा संपूर्ण तीन तासाचा महाराष्ट्रातील पहिला ऐतिहासिक कार्यक्रम मी पैसे संपत आल्यामुळे अलका टॉकीजसमोरील हॉटेलमधील सकाळच्या नाश्त्यावर केला.रात्रीचे जेवण त्यावेळचे सहाय्यक पोलीस कमिशनर श्री उत्तरवर यांचेकडे घेतल्याचे आठवते.
मुशायरा व गझल गायन या दोन्ही कार्यक्रमास पुणेकर रसिकांनी जबरदस्त दाद दिली होती.माझ्या कार्यक्रमा नंतर जवळ जवळ तीन ते चार मिनिट टाळ्यांचा कडकडाट होत होता.ही माझ्यासाठी खूप मोलाची गोष्ट व कार्यक्रम अवडल्याची पावती होती.
या काळापर्यंत वरील सगळे गझलकार एक असल्याप्रमाणे वागायचे.पण जस-जसे नाव होत गेले तस-तसे सर्वजण आपापले वेगळेपण जोपासायला लागले.२००३ मध्ये पुण्याला स्थायिक झालो तेव्हा ही बाब मला प्रकर्षाने जाणवली. म्हणून सगळयांना एकत्र आणण्यासाठी मी "गझलकट्टा" सुरू केला.काही जण सहभागी झाले.काहींना यात फारसे गम्य दिसले नाही.
नवोदित मात्र यात रस घेत होते. समीर चव्हाण आणि निषाद कदम आयोजनांसाठी कष्ट घ्यायचे.मुली भैरवी आणि रेणू त्यांना सहकार्य करायच्या.समीर नोकरी निमित्त पुणे सोडून गेल्यावर सर्व (आर्थिक आणि शारीरिक) भार निषादवर येऊन पडला. समीर पुणे सोडून गेल्यानंतर काही महिने आमचा कट्टा चालला.आर्थिक आणि शारीरिक भाराच्या बाबतीत एकपात्री व्हायला लागल्यावर निषादने अंग काढून घेतले.या गझलकट्ट्याचा एक फायदा झाला तो असा की, अनेक नवोदित गझलकारांच्या गझला स्वरबद्ध झाल्या.
गझलकट्ट्याचा नियमच असा होता की,दर महिन्याला गझलकाराने नवीन गझल सादर करायची. व मी काही गझला स्वरबद्ध करून(भैरवी,रेणू,व्हायोलिनिस्ट जांभेकरांची मुलगी श्रद्धा यांच्याकडून) सादर करायच्या.रेणू,भैरवी लग्नानंतर कानपूर,दिल्ली निघून गेल्या.माझ्या स्वररचना गाऊन घ्यायला कोणीच नसल्यामुळे शेवटी गझलकट्टा बंद झाला.
तर सांगायचा मुद्दा हा की, पंतांच्या गोटातील वाड्यात जेव्हा एकत्र जमायचे तेव्हा सुरेश भटांच्या गझलांसह महाराष्ट्रातील इतरही नवोदित गझलकरांच्या अनेक गझला स्वरबद्ध केल्या होत्या.
-----------------------------------------------------------------------
दै. विदर्भ मतदार,अमरावती.रविवार पुरवणी.३/५/२०२६





No comments:
Post a Comment