गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, March 2, 2026

विदर्भाचे आद्य मराठी गझलगायक गझलगंधर्व सुधाकर कदम-डॉ.श्रीकृष्ण राऊत

           विदर्भपुत्र सुरेश भटांच्या रूपाने जशी अस्सल मराठी गझल महाराष्ट्राला मिळाली आणि मराठी कवितेचा समृद्घ प्रवाह अधिक श्रीमंत झाला, तसाच मराठी गझल गायकीचा उगम विदर्भात होणे अपरिहार्य होते.आद्य मराठी गझलगायक होण्याचा मान यवतमाळ येथे दि. १३ नोव्हें. १९४९ रोजी जन्मलेल्या गझलगंधर्व सुधाकर कदम यांचेकडे जातो. ‘गझल गंधर्व कदम’ ह्या १७ मार्च २००९ च्या पुणे  लोकमतच्या अग्रलेखात जेष्ठ संपादक अनंतराव दीक्षित ह्यांनी केलेली नोंद ह्या संदर्भात महत्त्वाची आहे. ते लिहितात, ‘गेली ४० वर्षे कदम यांनी मराठी गझलेची निरपेक्ष सेवा केली आहे. ' म्हणजे १९६९ पासून 'अशी गावी मराठी गझल' या स्वरूपाचे कार्यक्रम कदम यांनी महाराष्ट्रात गावोगावी केले आहेत. गझल गाताना शब्दप्रधान गायकीला महत्त्व असते. सांगितिक रचनेत शब्दांचे अर्थ उलगडून सांगणारी कदम यांची शैली लोकप्रिय आहे. त्यामागे त्यांचे चिंतन आहे.’ त्यांनी बांधलेल्या गझलांच्या चालीवर फिदा होऊन ‘महाराष्ट्राचे मेहदी हसन’ म्हणून सुरेश भटांनी त्यांना गौरविले आहे. सुरेश भटांचा मुक्काम आर्णीत बरेचदा सुधाकर कदम यांचेकडे असायचा. आर्णीत सुधाकर कदम ह्यांचेकडे मुक्कामी असताना सुरेश भटांनी दि. ९-९-१९८१ ला ‘ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची’ आणि दि. १२-९-१९८१ ला ‘हा चंद्र ही रात फिरायासाठी’ तसेच ‘उजाड वैराण वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद’ ही नात लिहिल्याची नोंद आहे.

            सुधाकर कदमांच्या गझलगायकीचा आदर्श महाराष्ट्रापुढे ठेवण्यासाठी ‘अशी गावी मराठी गझल’ हे मैफलीचे शीर्षक जसे सुरेश भटांनी दिले तसेच अनेक मैफलींचे निवेदन सुरेश भटांनी स्वत: केले आहे.तीन तासांची ही मैफिल केवळ मराठी गझलांची असायची. आजकालच्या मैफिलींसारखी उर्दू-हिन्दी गझलांची व्यावसायिक पेरणी तिच्यात नसायची. १५ जुलै १९८२ ला पुण्याच्या म.सा.प. मध्ये झालेल्या ‘अशी गावी मराठी गझल’ ह्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आणि त्यांच्या आवाजातील गझल गायनाची बहुतांश ध्वनिमुद्रणे आणि निवडक व्हिडिओ रसिक अभ्यासकांसाठी इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ह्या निमंत्रण पत्रिकेत सुधाकर कदमांचा उल्लेख  ‘गझलनवाज’ म्हणून करण्यात आलेला आहे. १९८३ साली ‘भरारी’ शीर्षकाची त्यांची ध्वनिफीत प्रसिद्घ झाली. ज्यात सुरेश भट, उ. रा. गिरी, श्रीकृष्ण राऊत, अनिल कांबळे, सतिश डुंबरे ह्यांच्या गझला आहेत.

            सुरेश भट आणि सुधाकर कदम ह्यांनी एकत्र वणी-नागपूर-मानवत-देगलूर-औरंगाबाद-इचलकरंजी-कोल्हापुर-पुणे असा महाराष्ट्रभर दौरा केला होता. कोल्हापुरच्या त्यांच्या एका मैफलीचे निवेदन डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी केले होते.आर्णी या आडवळणाच्या गावी संगीत शिक्षकाची नोकरी करीत असलेल्या सुधाकर कदमांना दूरदर्शन आणि मुंबई -पुण्याची इतर प्रसिद्धी माध्यमे ह्यांचा लाभ होणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या मराठी गझलगायकीचे योगदान १९८१ नंतर जन्माला आलेल्या आजच्या तरुण पिढीला ठाऊक नसावे ह्यात काहीच आश्चर्य नाही. पाठीच्या दुखण्यामुळे १९९७ नंतर त्यांच्या जाहीर मैफली कायमच्या थांबल्या.

            सुधाकर कदमांच्या ह्या  योगदानाची यथोचित दखल घेऊन दि. १५ मार्च, २००९ रोजी गझल अभ्यासक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी,प्रख्यात सिनेदिग्दर्शक राजदत्त आणि पुणे विद्यापीठाचे तेव्हाचे कुलगुरु नरेन्द्र जाधव ह्यांच्या उपस्थितीत त्यांना आद्य मराठी गझलगायक म्हणून ‘गझलगंधर्व’ ह्या उपाधीने सन्मानित करण्यात आले.मराठी गझल-गायकीच्या रूपाने गझलगंधर्व सुधाकर कदमांनी लावलेल्या ह्या ‘इवल्याशा रोपाचा’ वेलू नंतर  विदर्भातल्याच गझलनवाज भीमराव पांचाळे ह्यांनी ‘गगनावेरी’ नेल्याचा अलिकडचा इतिहास महाराष्ट्राला ठाऊक आहे.ह्या दोन गझलनवाजांच्या नंतरच्या पिढीमध्ये विदर्भाचे डॉ. राजेश उमाळे, दिनेश अर्जुना, मदन काजळे, विजय गटलेवार ही तरूण मंडळी मराठी गझल गायकीच्या क्षेत्रामध्ये नव्या दमाने पुढे येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी शुभेच्छांची फुले घेऊन महाराष्ट्र उभा आहे.

■ डॉ.श्रीकृष्ण राऊत

('लोकराज्य' डिसेंबर २०११)

.

No comments:





संगीत आणि साहित्य :