गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Friday, November 21, 2025

म.सा परिषद, पिंपरी चिंचवड तर्फे सत्कार...

महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष श्री राजन लाखेंच्या हस्ते सत्कार स्वीकारताना...१५/११/२०२५

 

म.सा.प.पिंपरी चिंचवड कार्यक्रम...



'हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे 
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे '

'गाऊन सोसले मी, सोसून गायिले मी 
आयुष्य जाळले मी, प्रिये तुझ्याचसाठी... '

ह्या गझला आहे गझल गंधर्व सुधाकर कदम यांच्या, तर

'लोपला चंद्रमा लाजली पौर्णिमा, चांदण्यांनी तुझा चेहरा पाहिला 
सांगतो मी खरे, फार झाले बरे, फक्त त्यांनी तुझा चेहरा पाहिला... '

ही गझल आहे गझलकार श्रीकृष्ण राऊत यांची. अशा एकाहून एक सरस गझलांनी रंगलेल्या मैफलीत रसिक वृंद न्हाऊन निघाले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड आयोजित 'सरगम तुझ्याचसाठी' हा संगीतमय कार्यक्रम निगडी येथील साहित्य परिषदेच्या शांता शेळके सभागृहात संपन्न झाला. या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, संगीतकार सुधाकर कदम उपस्थित होते. सुनीता बोडस यांनी सर्व कलाकारांची ओळख करून दिली.
आयुष्याच्या वाटचालीत येणारे अनुभव, सुख दुःखाच्या विविध भावना असलेल्या आशयपूर्ण रचना गायक मयुर महाजन आणि प्राजक्ता सावरकर शिंदे यांनी सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यावेळी सहकलाकार मुकुंद पेटकर (हार्मोनियम), प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला), आशिष कदम (की बोर्ड) यांनी साथ दिली. सदर कार्यक्रमात ईला पवार यांचा त्यांच्या सांगीतिक वाटचालीबद्दल सत्कार करण्यात आला.
राजन लाखे यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी सूत्रसंचालन केले आणि चोखंदळ रसिकांचे आभार मानले.


 

ये न ये टिपूरसे चांदणे पुन्हा पुन्हा...

ये न ये टिपूरसे चांदणे पुन्हा पुन्हा
हो न हो कधी असे जागणे पुन्हा पुन्हा

का जपून बोलशी ? शब्द शब्द तोलशी ?
हे असे न व्हायचे  बोलणे पुन्हा पुन्हा

माझिया मनातला चंद्र मी तुला दिला
का अनोळखी तुझे वागणे पुन्हा पुन्हा

दुःख जीवनातले काय मी न सोसले?
हे तुझे न सोसवे  हासणे पुन्हा पुन्हा

सांग एकदा मला ही तुझी कशी  कला?
जाळणे पुन्हा पुन्हा. टाळणे पुन्हा पुन्हा

गायक - मयूर महाजन आणि प्राजक्ता सावरकर शिंदे.

शब्द - ज्योती राव ( बालिगा )

सहकलाकार - मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड) आणि सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.



 

सरगम तुझ्याचसाठी...

                       सरगम तुझ्याचसाठी, गीते तुझ्याचसाठी
                       गातो गझल मराठी, प्रीये तुझ्याचसाठी

व्याकुळ ही विराणी, गाते तुझी कहाणी
शिवरंजनी दिवाणी, प्रीये तुझ्याचसाठी

घन सावळा गरजतो, बेबंद तान घेतो
बरसून शांत होतो, प्रीये तुझ्याचसाठी

सोसून गायिले मी, गाऊन सोसले मी
आयुष्य जाळले मी, प्रीये तुझ्याचसाठी

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड) आणि सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.

दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,
निगडी,पुणे.


 

तुझे तुला जगायचे...



हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे

कधी कुठे असायचे कधी कुठे नसायचे
खुडून टाकले तरी नभात भिरभिरायचे

सुगंध घेउनी सवे दवात रोज न्हायचे
पुन्हा पुन्हा फलूनिया खुशाल दर्वळायचे

मधाळ चांदरातही न राहिली मिठीत या
म्हणून का उगीच मी तुझ्याविना झुरायचे

हवे तसे जगावयास ना मिळे कुणासही
कठोर सत्य हेच तर कशास मग रडायचे

गायक - मयूर महाजन 
गायिका - प्राजक्ता सावरकर शिंदे
शब्द आणि संगीत - #गझलगंधर्व​ सुधाकर कदम

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड) आणि सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.

दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,
निगडी,पुणे.


 .




संगीत आणि साहित्य :