'हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे '
'गाऊन सोसले मी, सोसून गायिले मी
आयुष्य जाळले मी, प्रिये तुझ्याचसाठी... '
ह्या गझला आहे गझल गंधर्व सुधाकर कदम यांच्या, तर
'लोपला चंद्रमा लाजली पौर्णिमा, चांदण्यांनी तुझा चेहरा पाहिला
सांगतो मी खरे, फार झाले बरे, फक्त त्यांनी तुझा चेहरा पाहिला... '
ही गझल आहे गझलकार श्रीकृष्ण राऊत यांची. अशा एकाहून एक सरस गझलांनी रंगलेल्या मैफलीत रसिक वृंद न्हाऊन निघाले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड आयोजित 'सरगम तुझ्याचसाठी' हा संगीतमय कार्यक्रम निगडी येथील साहित्य परिषदेच्या शांता शेळके सभागृहात संपन्न झाला. या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, संगीतकार सुधाकर कदम उपस्थित होते. सुनीता बोडस यांनी सर्व कलाकारांची ओळख करून दिली.
आयुष्याच्या वाटचालीत येणारे अनुभव, सुख दुःखाच्या विविध भावना असलेल्या आशयपूर्ण रचना गायक मयुर महाजन आणि प्राजक्ता सावरकर शिंदे यांनी सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यावेळी सहकलाकार मुकुंद पेटकर (हार्मोनियम), प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला), आशिष कदम (की बोर्ड) यांनी साथ दिली. सदर कार्यक्रमात ईला पवार यांचा त्यांच्या सांगीतिक वाटचालीबद्दल सत्कार करण्यात आला.
राजन लाखे यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी सूत्रसंचालन केले आणि चोखंदळ रसिकांचे आभार मानले.





No comments:
Post a Comment